Saturday, November 21, 2015

भीम-बकासूर आणि तुरडाळीची भाकडकथा

  

पूर्वी ज्या भाकडकथा वा पुराणकथा ऐकायला मिळायच्या, त्यात कुठल्या तरी भयंकर राक्षसाच्या उच्छादाने सामान्य जनता हैराण झालेली असते आणि त्याचा बंदोबस्त करू शकत नाही, अशीच ती कहाणी असायची. पण त्यात एक उपाय सांगितलेला असायचा. म्हणजे असे, की तो राक्षस कितीही शकतीशाली वा बलदंड असला आणि त्याच्यावर कुठलेही शस्त्र चालत नसले, तरी त्याला मारण्याचा संपवण्याचा एकमेव उपाय असे. तो म्हणजे त्या राक्षसाचा जीव कुठल्या तरी पक्षी प्राण्यामध्ये लपवलेला असायचा. एकदा का तो पिंजर्‍यात ठेवलेला पक्षी ठार मारला, मग त्या राक्षसाला ठार मारण्याची गरज नसे. इथे पक्षी तडफ़डून मेला, की तिथे राक्षसही मेलाच समजा. अर्थात हे आज कोणाला सहसा पटणार नाही. कारण आता आपण खुप बुद्धीवादी वा अंधश्रद्दा झुगारणारे विज्ञानवादी होऊन गेलोत. तेव्हा आपण पक्षी राक्षस आणि त्यांचा डीएनए वगैरे आक्षेप सुरू करू. पुरावे मागू! पण सुदैवाने पुर्वीच्या काळात लोकांन पुरावे मागण्याची बुद्धी नसे आणि कथेतला बोध समजण्याची अक्कल असायची. म्हणून लोकांना राक्षस ओळखता यायचे आणि त्याचा प्राण दडवून ठेवलेले पक्षीही कुठल्या पिंजर्‍यात आहेत ते ठाऊक असायचे. आता राक्षस राहिले नाहीत की त्यांचा प्राण ज्याच्यात ठेवलेला आहे, असे पिंजर्‍यातले पक्षी राहिलेले नाहीत. हल्ली पिंजर्‍यातल्या पक्षाला सीबीआय किंवा तत्सम काहीतरी म्हणतात. बाकी राक्ष्स कोणाला म्हणायचे आणि तो कसा ओळखायचा, ही मोठीच समस्या होऊन बसली आहे. पण अधूनमधून हिंसाचाराचा राक्षस, दहशतवादाचा राक्षस, भ्रष्टाचाराचा राक्षस वा महागाईचा राक्षस असे शब्द कानी येतात. तो राक्षस कुठे दिसत नाही, की त्याला पकडताही येत नाही. सहाजिकच त्याचा बंदोबस्तही होत नाही. त्याला मारण्याच्या गप्पा खुप चालतात, पण त्यातला कुठला राक्षस मेल्याचे कधी अनुभवास येत नाही.

उदाहरणार्थ सध्या असंहिष्णुता नावाचा एक राक्षस बोकाळल्याचे कानी येत असते. त्याला म्हणे पुरस्काराची भूक लागते. मग तो बकासूरासारखे गाडाभर पुरस्कार नित्यनेमाने खाऊन फ़स्त करीत असतो. महाभारतातल्या कथेत जसा बकासूर असतो आणि त्याला रोज गाडाभर अन्न लागते, अधिक ते घेऊन येणार्‍या माणसालाही बकासूर खाऊन फ़स्त करतो म्हणे. मग एके दिवशी कुंती आपला बलदंड पुत्र भीमालाच त्याच्याकडे पाठवून देते अशी कहाणी आहे. तिथे जाऊन बकासूरासाठी पाठवलेले गाडाभर अन्न भीमच ताव मारून खात बसतो, वगैरे. मग बकासूर चिडतो आणि दोघांची हाणामारी होते. त्यात बकासूर मारला जातो आणि त्या गावकर्‍यांची त्याच्या तावडीतून मुक्तता होते. पण ही झाली भाकडकथा! हल्लीही असे अनेक बकासूर तुरडाळ खातात, पैसे खातात किंवा आणखी काही खातात. मग जनता नावाची भारतीय कुंती आपल्या कुणा पुत्राला भीम बनवून बकासूराच्या बंदोबस्ताला पाठवून देते. गाडाभर मते घेऊन गेलेला हा आधूनिक भीम बकासूराचा बंदोबस्त नक्की करतो. पण तिथेच कथेतील साम्य साधर्म्य संपून जाते. बकासूराचा बध केल्यावर भीम आणखी शिरजोर होतो आणि माघारी येतो. त्याच्या विजयाचा महोत्सव लोक साजरा करतात आणि काही दिवसात लोकांसह जनता नावाच्या कुंतीला लक्षात येते, की बकासूराला संपवायला गेलेला आपला भीम आता बदलला आहे. बकासूराला संपवून परत आला तो भीम आता स्वत:च बकासूर झालेला आहे आणि त्यालाच गाडाभर अन्न, पैसा वगैरे गोष्टी पुरवताना आपला जीव पुन्हा मेटाकुटीला येऊ लागला आहे. पण याचा बंदोबस्त कसा करावा, या समस्येचे उत्तर त्यांना सापडत नाही. कधी हा भीम बकासूर तुरडाळ फ़स्त करतो, तर कधी तांदूळाचे गोदामच रिकामी करून टाकतो. त्याची भूक कशी संपवावी ते लोकांना उमजत नाही, की बंदोबस्त करायचे सुचत नाही.

आपण पुराणकाळातून व भाकडकथांतून बाहेर पडल्याचा तो दुष्परिणाम आहे. अन्यथा आपण असे राक्षस संपवायला आंदोलने, निवडणूका असले निकामी प्रयोग उपयोग कशाला केले असते? शास्त्र विज्ञानाच्या मागे धावण्यापेक्षा आपण भाकडकथेचा आधार घेऊन अशा राक्षसाचा जीव कशात वा कोणात लपलेला आहे, त्याचा शोध लावला असता आणि सरळ जाऊन त्या पोपट वा पक्षाची मान पिरगाळली नसती का? हल्लीच्या अशा राक्षसांचा जीव खरेच कुठल्या तरी पक्षात असतो. मात्र ह्या पक्षाला चोच नसते की पंख पिसे नसतात. त्याला राजकीय पक्ष म्हणून ओळखले जात असते. असे पक्ष संघटना, कार्यकारीणी, पदाधिकारी अशा पिंजर्‍यात बंदिस्त कसतात. मात्र कुठल्याही मोकाट होणार्‍या आधुनिक राक्षसाचे प्राण अशा राजकीय ‘पक्षा’तच लपवलेले असतात. हे प्राण किंवा त्या राक्षसाची खरी शक्ती सामान्य माणसाची विस्मृती म्हणजे दुबळी विस्मरणशक्ती असते. आपण सामान्य माणसे काहीही लक्षात ठेवत नाही, की लक्षात ठेवायचा प्रयत्नही करीत नाही. पर्यायाने तीच राजकीय पक्षांची शक्ती बनून जाते. आता महागाईचा राक्षस बोकाळला आहे आणि खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फ़डणवीस यांच्या पत्नीनेही तशी तक्रार केलेली आहे. सामान्य जनता किंवा गृहीणीला तुरडाळीची महागाई सतावते आहे, असे सौ. फ़डणवीस यांनी म्हटल्याचे प्रसिद्ध झाले आहे. किती लोक नुसत्या त्या शब्दांनी सुखावले ना? आता मुख्यमंत्री पत्नीच बोलली म्हणजे त्यांचे यजमान महागाईच्या राक्षसाला संपवणार असे काहीजणांना वाटले आणि त्यांना आनंदाच्या उकळ्या फ़ुटल्या आहेत. पण महागाईचा राक्षस नुसते जीआर काढून वा गोदामावर धाडी घालून मरेल कसा? अशा राक्षसांना अमरत्त्वाचे वरदान लाभलेले असते. त्यांना कुठले हत्यार मारू शकत नसेल, तर जीआर किंवा धाडी धरपकड कशाला इजा पोहोचवू शकेल? त्यासाठी पक्षाचीच मान पिरगाळली पाहिजे.

सौ. फ़डणवीस तुरडाळीबद्दल बोलल्या तसेच अकरा वर्षापुर्वी आणखी कोणीतरी बोलले होते, हे आपल्याला स्मरते का बघा! कितीही स्मृतीला ताण दिला तरी आपली स्मरणशक्ती दाद देणार नाही. कारण तेच तर कुठल्याही राजकीय पक्ष वा सत्ताधार्‍याला मिळालेले वरदान असते. अकरा वर्षापुर्वी देशात मोठे सत्तांतर झाले आणि सोनियांनी पंतप्रधान होण्यापेक्षा डॉ. मनमोहन सिंग यांना त्या पदावर बसवले होते. त्यानंतर होऊ घातलेल्या पंतप्रधान मनमोहन सिंगाच्या पत्नीला त्याबद्दल विचारले होते. आपला पती पंतप्रधान झाल्याच्या बदल्यात तुम्ही काय अपेक्षा करता? या प्रश्नाला उत्तर देताना सौ. मनमोहन म्हणाल्या होत्या, बस गॅसच्या किंमती वाढू नयेत म्हणजे झाले! मनमोहन यांनी पुढल्या दहा वर्षात बाकी काय केले ते सोडून द्या. आपल्या पत्नीची इच्छा तरी पुर्ण केली काय? आजवर कित्येक वर्षे व दशके चालू होते ते गॅस सिलींडरवरचे अनुदान त्यांनीच काढून घेतले, अनुदानित सिलींडरची संख्या कमी केली. गॅसच्या किंमती वाढवल्या. आरंभीच्या आपल्या इच्छा सौ. मनमोहन सुद्धा कधीच विसरून गेल्या. हा आपला दांडगा अनुभव गाठीशी असताना, आपण सौ. फ़डणवीसांनी तुरडाळ स्वस्त व्हायची भाषा केल्यावर हुरळून गेलो ना? हेच तर राजकीय पक्षाचे खरे बळ असते. आपली विस्मृती हे पक्षाचे बळ असते आणि त्याच पक्षात कुठल्याही राक्षसाचा जीव लपलेला असतो. मग त्या राक्षसाचे निर्दालन कसे व्हायचे? सौ. फ़डणवीस असोत की सौ. मनमोहन असोत, त्यांनी तसे बोलायचे असते आणि पत्रकारांनी टाळ्या पिटुन आपल्याला उल्लू बनवायचे असते. यापेक्षा अशा राक्षसाच्या बाबतीत पुढे काहीही होत नाही. कारण आपण राक्षसाच्या निर्दालनालाच भाकडकथा समजून बसलोय. त्यातून मग पंतप्रधान, मुख्यमंत्री यांच्या अर्धांगिनी वा गृहीणीच्या शब्दांच्या विधानांचा भाकडकथा सुरू होतात आणि नव्या पुराणकथांचा जन्म होत असतो. नवे बकासूर उदयास येतात आणि भविष्यातल्या बकासूराला आपण आजच भीम म्हणून डोक्यावर घेऊन नाचत असतो.

2 comments: