Sunday, November 22, 2015

आलिंगनाचे कांगावखोर नाटकसर्वात भयंकर नशा कुठली असेल तर ती उदात्त मानसिकतेची! आपण काही महान कार्य करीत असल्याची समजूत एखाद्या व्यक्तीची करून दिली, मग त्याची सारासार बुद्धी निकामी होऊन जाते. माणसाला जी उपजत विवेकबुद्धी लाभलेली असते, त्यामुळे माणुस समोरच्या घटनांचा अर्थ लावतो आणि त्यानुसार प्रतिक्रीया देत असतो. पण तो विवेक त्याने गमावला, मग त्याला कुठलेच तारतम्य उरत नाही आणि कुठल्याही हानिकारक गोष्टीलाही तो प्रवृत्त होऊ शकतो. गर्द वा तत्सम कुठल्या नशेच्या आहारी गेलेली माणसे अत्यंत विक्षिप्त वागतात, हे आपल्याला ठाऊक आहे. पण निदान ती माणसे नशेच्या आहारी जाऊन आपला विवेक सोडत असतात. काही माणसे कुठल्याही नशेच्या आहारी गेलेली नसूनही तारतम्य सोडून विक्षिप्त कशाला वागतात, असा आपल्याला अनेकदा प्रश्न पडतो. मणिशंकर अय्यर वा सुधींद्र कुलकर्णी यासारखी माणसे जाणिवपुर्वक भारताला हानिकारक वागत असतील, तर त्यात त्यांचे स्वार्थ असल्याची शंका आपण घेऊ शकतो. पण जे कोणी त्याला पुरक असे वागतात आणि त्यात त्यांचा कुठलाही स्वार्थ नाही, असे आपल्याला पक्के ठाऊक असते, तेव्हा त्यांच्या वर्तनाविषयी आपल्यावर चकीत व्हायची पाळी येते. सध्या सोशल मीडियात एक चित्रण बघायला मिळते आहे. कोणी एक मुस्लिम वेशभूषेतला माणूस मुंबईच्या पदपथावर एक हस्तलिखीत फ़लक घेऊन उभा आहे. त्याचे डोळे पट्टीने बांधले आहेत आणि त्याच्या पायाशी एक फ़लक आहे. त्यावर लिहीले आहे, ‘मी मुस्लिम आहे आणि माझा तुमच्यावर विश्वास आहे. तुमचा माझ्यावर विश्वास आहे काय? असेल तर मला आलिंगन द्या!’ त्याच्या आपसास अनेक कॉलेजचे विद्यार्थी विद्यार्थिनी हिंडत फ़िरताना गोळा होताना दिसतात आणि मग कोणी एक तरूण पुढे जाऊन त्याला आलिंगन देतो, मग इतरही हळुहळू त्याचे अनुकरण करतात.

असाच एक व्हीडिओ आणखी कुठल्या पाश्चात्य देशातला आहे. त्यात एक इसम सिरीयात शांतता नांदावी म्हणून भर चौकात हात वर करून डोळ्यावर पट्टी बांधून उभा आहे आणि आपले हात उभे ठेवण्यासाठी लोकांना आवाहन करणारा फ़लक त्याच्या पायाशी आहे. वरकरणी ह्यात मोठे उदात्त हेतू दिसून येतात. मग ज्यांना अन्य काही उदात्त करणे शक्य नसते किंवा ज्यांनी कधी काही समाजोपयोगी कुठले कर्तव्य बजावलेले नसते, असे लोक ह्या सोप्या गोष्टीतून ‘पुण्य’ गाठीशी बांधायला सहजगत्या पुढे येतात. तसे या चित्रणातून बघायला मिळते. या डोळ्यांना पट्टी बांधलेल्या कुणा अनोळखी व्यक्तीला आलिंगन दिल्याने आपण जगात धार्मिक सौहार्द निर्माण करायला मोठा हातभार लावला, असे खोटे समाधान त्यात पुढे येणार्‍यांना मिळते. कसला खर्च नाही की कसली तोशिस नाही. कसल्याही कष्ट मेहनतीशिवाय गाठीशी पुण्य बांधल्याचे पोकळ समाधान मात्र मिळते. आपण धर्मांध नाही, आपण द्वेषाला झिडकारणारे संहिष्णू असल्याचा खोटा अभिमान काळजात जमा होतो. त्या कुणा इसमाच्या हात उंचावण्याने सिरीयात शांतता स्थापन होत नाही, की तिथे हकनाक मरणार्‍या कुणाला जीवदान मिळत नाही. तिथे वा अन्यत्र हिंसाचार माजवणार्‍या जिहादींना कुठला पश्चात्ताप होत नाही, की जग सुरक्षित सुखी होत नाही. पण दरम्यान या प्रत्येक आलिंगन देणार्‍याला मात्र आपण फ़ार मोठे उदात्त कार्य केल्याचे समाधान पदरी पडलेले असते. यातला कोणी रस्त्याच्या कडेला माजलेला कचरा साफ़ करून जीवन निरोगी होण्यासाठी कष्ट करणार नाही. पण हत्याकांड वा हिंसाचार होऊन गेल्यावर मेणबत्त्या किंवा गुलाबाचे फ़ुल तिथे ठेवायला अगत्याने हजेरी लावील. कारण त्यांना समोरची हिंसा थोपवण्याचे बळ त्यांच्यात नसते. तोच आपला नाकर्ता स्वभाव लपवण्यासाठी त्यांना असे काही पळपुटे उपाय हवे असतात.

मग कोणी डोळ्यांना पट्टी बांधून उभा रहातो, तो डोळे बंद असूनही काय होत आहे ते सहज बघू शकत असतो. कारण डोळे त्याचे बंद असतात, पण उघड्या डोळ्यांनी अशा नाटकात सहभागी होणारे किती आंधळे असतात, त्याची गंमत त्याला बघायची असते. पॅरीसमध्येही अशाच एकाने तो प्रयोग केला आणि अनेक डोळस आंधळ्यांनी त्याला आलिंगन देवून आपणही अजून मुस्लिमावर विश्वास ठेवतो, याची भर चौकात येऊन ग्वाही दिली. पण मुळात अशा विश्वासाचा प्रश्नच कशामुळे येऊ शकला, याचे भान यातल्या कुणा आलिंगनकाराला आहे काय? मुस्लिमांवर अन्य बिगर मुस्लिमांचा विश्वास नसता, तर त्या त्या देशात मुस्लिमांना सुखनैव वास्तव्य करता आले असते काय? अनेक युरोपिय देशांनी निर्वासित म्हणून मुस्लिमांना आपल्यात सामावून घेतले त्याला मुस्लिमांवरील विश्वास नाही तर दुसरा कुठला शब्द आहे? त्या पॅरीसच्या वा इथल्या मुंबईतल्या डोळ्यावर पट्टी बांधणार्‍याने आपल्या वस्तीत लपून व मुखवटे पांघरून जिहादी कृत्ये करणार्‍यांवर ‘(डोळ्यावरची धर्माची पट्टी सोडून) नजर ठेवून पोलिसांना खबर दिली असती तर? तर तिथे इसिस वा मुंबईत कसाब रक्तपात करू शकले नसते. डोळ्यावरची पट्टी काढून मुस्लिमांनी आपली विश्वासार्हता सिद्ध करायची वेळ आलेली असताना असली नाटके काय कामाची? चेंबूरच्या त्या दुकानात तलवार घेऊन गुंड घुसला, तेव्हा नासिरुद्दीन मन्सुरी नावाचा मुस्लिम पुढे सरसावला आणि त्यानेच एका बिगरमुस्लिम दुकानदाराचा जीव वाचवला. त्यासाठी आपला जीव धोक्यात घालणार्‍या नासिरुद्दीनला कुठे डोळ्यावर पट्टी बांधून आलिंगनासाठी उभे रहावे लागले नाही. त्याने कृतीतून आपण मुस्लिम असताना माणुसकीवर विश्वास ठेवतो आणि त्यासाठी आपला जीव धोक्यात घालून इतरांचा जीव वाचवतो, हे सिद्ध केले. विश्वास कृतीतून निर्माण होतो व कसोटीला लागतो.

यातला भंपकपणा किती धोकादायक आहे त्याचे भान अजून जगाला आलेले नाही. म्हणून अशी नाटके चालतात. मुस्लिमाचा विश्वास सर्वप्रथम अल्लाहवर असावा लागतो. आज त्याच अल्लाहवर विश्वास दाखवायला म्हणून धर्माच्या शिकवणूकीचा हवाला देवून राजरोस निरपराधांच्या कत्तली चालल्या आहेत. तेव्हा सवाल मुस्लिमाने अन्य कुणा बिगर मुस्लिमावर विश्वास असल्याची साक्ष देण्याचा नाही. विषय बिगर मुस्लिमांनी मुस्लिमांवर विश्वास ठेवायचा नाही. तर आपण धर्मापेक्षा माणुसकीवर विश्वास ठेवतो, याची साक्ष देण्याची गरज आहे. ते काम असे डोळ्यावर पट्टी बांधून वा एकमेकांना आलिअंगने देवून साध्य होणार नाही. नाटके खुप रंगतील, पण विश्वासाचा ठिसूळ झालेला पाया मजबूत होणार नाही. तेव्हा असल्या नाटकातून लोक फ़सतात व बळी पडतात, ही विवेकबुद्धीला गुंडाळलेली पट्टी काढून टाकायची वेळ आली आहे. जगभर जिहाद नावाचा हिंसाचार इस्लाम धर्माच्या नावाने चालू आहे आणि त्याला नाटकाने रोखता येणार नाही. हेच काम जेव्हा कसाब सामोरा आलेला तेव्हा कोणी कशाला केले नाही? कसाब वा त्याचे साथीदार धर्माच्या नावानेच बेछूट गोळ्या झाडत होते, तेव्हा त्याच्यावर विश्वास ठेवून साक्षात मृत्यूला आलिंगन देणे ही विश्वासाची कसोटी होती? कितीजण तेव्हा पुढे सरसावले? रस्त्यावर कुणाला विश्वासाचे प्रतिक म्हणून आलिंगन देण्याच्या पळवाटेने धोका संपत नाही, अधिक भयंकर रूप धारण करून अंगावर येतो. युरोप त्याच अनुभवातून जातो आहे. असे डोळ्यावर पट्टी बांधणारे नव्हे तर पोलिसी गणवेशातील तुकाराम ओंबळे क्साबला आलिंगन द्यायला पुढे गेला होता. त्याच मुंबईत असली आलिंगनाची नाटके करणार्‍यांना थोडी तरी शरम वाटली पाहिजे. चार दिवसांनी त्या आलिंगनातून शहीद झालेल्या शूरवीर तुकाराम ओंबळेची पुण्यतिथी आहे आणि आपण किती बेशरम होऊन असली नाटके करतोय ना?

https://www.youtube.com/watch?v=lRbbEQkraYg


https://www.youtube.com/watch?v=N96W8CeiT3I&feature=youtu.be


5 comments:

 1. गोऱ्या माणसांना जी कामे करायची नसतात त्या कामांसाठी ते अशा लोकांना आश्रय देतात, पण त्यांची पुढची पिढी मस्तवालपणा करू लागते!

  ReplyDelete
 2. सामान्य माणसाच्या ढोंगावर अचूक बोट ठेवलेत भाऊ. तुम्ही म्हणल्याप्रमाणे अशा सोप्या गोष्टीतून ‘पुण्य’ गाठीशी बांधायला आतुर झालेला सामान्य माणूस मेणबत्ती मोर्च्यांमध्ये हजेरी लावतो आणी मग संजय दत्तला वा सलमान खानला कोर्टात बघायला हजारोंच्या संख्येने उपस्थित राह्तो.

  ReplyDelete
 3. Awesome article...to the point and crisp. People should understand that these kind of symbolic acts are not going to help. Need of time is to work at ground level.

  ReplyDelete
 4. हिंदू असो इसाई असो मुस्लिम असो वा अन्य कोणी...धर्माच्या नावाने असल्या अलिंगनाच्या किंवा अजून कसल्या stunt मार्फत भिका मागणे मागणे म्हणजे धर्मांधपणाच होय

  ReplyDelete