Tuesday, November 24, 2015

मुस्लिमाचा तरी मुस्लिमावर विश्वास आहे?एक मुस्लिम डोळ्यावर पट्टी बांधून आलिंगनाची अपेक्षा करत असेल तर त्याला कांगावा म्हणावे काय? त्याला कांगावा संबोधणे क्रुर नाही काय? आस्था, आपुलकी वा प्रेमाची भाषा आम्हाला समजत नाही काय? अशी शंका आधीचा लेख वाचून अनेकांच्या मनात नक्की अलेली असणार. पण त्या व्यक्तीने जो फ़लक झळकवला आहे, तो वाचून त्यातला अर्थबोध कितीजण घेतात? ‘मी मुस्लिम आहे आणि माझा तुमच्यावर विश्वास आहे. तुमचा माझ्यावर विश्वास आहे काय? असेल तर मला आलिंगन द्या!’ हे वाचणे ठिक आहे. पण त्यातला अर्थ असा, की मुस्लिमांवरचा इतरांचा विश्वास उडाला असला तरी मुस्लिम मात्र बिगरमुस्लिमांवर विश्वास ठेवून आहेत. यात कितपत तथ्य आहे? आज जगात किती ठिकाणी आपल्याला मुस्लिमांविषयी अविश्वास दिसून येतो? तेही बाजूला ठेवा. मुस्लिमांनी अन्य कुणावर विश्वास ठेवण्यापेक्षा त्यांनी मुस्लिमांवर तरी विश्वास ठेवला पाहिजे ना? इसिस वा सुन्नी मुस्लिम अन्य पंथाच्या मुस्लिमांशी तरी विश्वासाने वागतात काय? जगातली आजची समस्या मुस्लिम व बिगर मुस्लिम अशी नसून, त्यांच्या कडव्या धर्मश्रद्धांनी उभी केलेली समस्या आहे. कारण एक मुस्लिमच दुसर्‍या पंथाच्या मुस्लिमाच्या विश्वास व श्रद्धा नाकारून त्याच्या जीवावर उठलेला असल्याचे सातत्याने दिसते आहे. सवाल बिगरमुस्लिमाने मुस्लिमावर विश्वास दाखवण्याचा नसून, मुस्लिमाने अन्य पंथीय मुस्लिमावर विश्वास दाखवणेही खुप शांतता निर्माण करू शकेल. इसिसने कोणा अन्य धर्मियाची कत्तल केली, तो विषय सोडून द्या! त्यांनी सर्वाधिक कत्तल मुस्लिमांचीच केली आहे आणि त्यातून पन्नास लाख मुस्लिमच इस्लामी देशातून निर्वासित झाले आहेत. त्यांना आश्रय द्यायला कुठला मुस्लिम देश पुढे आला आहे? निर्वासिताचे लोंढे धावत पळत सुटले आहेत, त्यांना कुठला मुस्लिम (देश) विश्वासाने जवळ घेतो आहे काय?

एक साधी गोष्ट आपल्या डोळ्यांना दिसते आहे. युरोपकडेच नव्हेतर अन्य पाश्चात्य देशांकडे आणि अतिदूर ऑस्ट्रेलियापर्यंत मुस्लिम देशातील निर्वासितांचे लोंढे धावत आहेत. जे देश मुस्लिम नाहीत वा ख्रिश्चन वा सेक्युलर आहेत, तिथेच हे मुस्लिम निर्वासितांचे लोंढे कशाला धावत सुटले आहेत? त्यांचा आपल्याच धर्माचे मुस्लिमांचे राज्य असलेल्या देशावर, तिथल्या मुस्लिम सत्ताधीशांवर किंवा तिथे वसलेल्या मुस्लिमांवर विश्वास नसल्याचे ते लक्षण नाही काय? सिरीया, इराक, पॅलेस्टाईन, लिबीया वा अफ़गाण अशा देशातले हे मुस्लिमांचे तांडे शेजारीच जवळ असलेल्या सुखवस्तू श्रीमंत सौदी, कुवेत ओमान वा आखाती तेलसंपन्न देशात आश्रयाला का जाऊ धजलेले नाहीत? तर तिथे आपल्याला कोणी स्विकारणार नाही. आपलेच धर्मबंधू मुस्लिम नागरिक वा सत्ताधीश गोळ्या घालून पिटाळून लावतील, हाच त्या निर्वासित मुस्लिम लोंढयांना वाटणारा विश्वास आहे ना? म्हणजेच आज जगापुढली सर्वात मोठी विश्वासाची समस्या आहे, ती मुस्लिम बिगरमुस्लिम अशी नसून मुस्लिमांचाच मुस्लिमांवर विश्वास उरलेला नाही. मग अशी आलिंगनाची नाटके हवीत कशाला? मुस्लिम असून इतरांवर विश्वास ठेवणे सोपे आणि नैसर्गिक आहे. सवाल मुस्लिमाने मुस्लिमांवर विश्वास ठेवण्याचा आहे. बिगर मुस्लिमाच्या जीवनशैलीत इतर धर्मियांवर विश्वास ठेवणे ही समस्याच नाही. सवाल मुस्लिमांच्या विश्वासार्हतेचा आहे. एक मुस्लिमच आज दुसर्‍या मुस्लिमावर विश्वास ठेवू शकत नाही. एक मुस्लिमच आज दुसर्‍या मुस्लिमाच्या जीवावर उठलेला आहे. तेव्हा समस्या समजून घेतली पाहिजे. मुस्लिमांवर इतरांचा विश्वास असणे नसणे ही समस्याच नाही. मुस्लिमांमध्येच आपसात विश्वासाला तडा गेलेला आहे. त्याची सर्वात मोठी साक्ष म्हणजे आखाती मुस्लिम देशांनी आपल्याच धर्मबंधू मुस्लिम निर्वासितांना वार्‍यावर सोडून दिले आहे, तर बिगर मुस्लिम देशांनी त्यांना आश्रय दिलेला आहे.

मग हे नाटक कशाला? जेव्हा आश्रय देणार्‍यांवरच मुस्लिम जिहादी अतिरेक्यांनी प्राणांतिक हल्ला केलेला आहे, तेव्हा सवाल नाटकाचा नसून कृतीचा आहे. बेल्जमपासून तमाम युरोपियन देशांनी अशा आलिंगनातून आपल्या देशात व जीवनात असलेली सुरक्षितता धोक्यात आणली आहे. मजेची गोष्ट म्हणजे मुस्लिम देशातून हजारो मैल दूर निर्वासित पळत आहेत. युरोपातील कडाक्याच्या थंडीत उघड्यावर पडलेले आहेत आणि कुणी कुराणाचा अवमान केला, म्हणून दंगलीही करीत आहेत. त्यानंतरही हा तमाशा सोसण्याची परमावधी युरोपियन देशांनी दाखवली आहे. पण शेजारी सौदी अरेबिया नामक मुस्लिम देशात एकाच वेळी ३० लाख लोकांना तात्पुरता आश्रय देता येईल, इतकी यंत्रणा सज्ज आहे. हाज यात्रा करायला येणार्‍या जगभरातील मुस्लिमांना तात्पुरती वास्तव्याची सुविधा म्हणून उभारलेली ही व्यवस्था ३० लाख लोकांना आश्रय देवू शकते. तिथे अद्ययावत नागरी सुविधा आहेत. पण देशोधडीला लागलेल्या आपल्याच धर्मबांधवांना सौदी तिथे घ्यायला आश्रयाचे आलिंगन द्यायला तयार नाही. याला कसला विश्वास म्हणायचे? की सौदी राजे व मक्का मदिना या प्रमुख धर्मस्थळांचे राखणदारच मुस्लिम नाहीत आणि ते मुस्लिमांवरही विश्वास ठेवत नाहीत असा दावा आहे? सवाल म्हणूनच मुस्लिमाने बिगर मुस्लिमांवर विश्वास असल्याचे नाटक रंगवण्याचा नाही. सवाल मुस्लिमांनीच आपल्याच धर्माच्या इतर पंथाच्या अनुयायांवर विश्वास दाखवण्याचा विषय आहे. त्यावरून इतरांचे लक्ष उडवण्याचे हे नाटक आहे. आपला धर्म आपल्याला कुणावरच विश्वास ठेवू देत नाही आणि अगदी आपल्याच धर्माच्या अन्य पंथांचाही द्वेष करायला शिकवण देतो, या वास्तवापासून इतरेजनांची दिशाभूल करण्याचा हा कांगावा आहे. यात किंचित प्रामाणिकपणा असता, तरी हे फ़लकधारी व डोळ्यांवर पट्टी बांधणारे मुंबई पॅरीसपेक्षा सौदीच्या रस्त्यावर जाऊन तसे उभे राहिले असते.

आपण मुस्लिम आहोत आणि आपल्याच धर्माच्या शिकवणूकीचा आधार घेऊन हजारो निरपराधांची नित्यनेमाने जगात कुठेतरी हत्या चालली आहे, तर आपल्या धर्माची शिकवण बदनाम होते आहे, याचे तरी भान असायला नको का? सुन्नी लोक शिया मुस्लिमांची हत्या करत आहेत. सिरीयातील मुस्लिमांना घरदार सोडून परागंदा व्हावे लागले आहे. जगात कुठेही मुस्लिमांचा हिंसक चेहरा समोर आला आहे. अशा वेळी ज्या धर्माच्या प्रेरणेने हे चालले आहे असा दावा केला जातो, त्याला आव्हान देण्याची गरज आहे. किंबहूना आपल्या धर्माची चाललेली विटंबना रोखण्यासाठी तरी इतर धर्मातील लोकांना येऊ घातलेल्या धोक्यापासून सावध करण्याची प्रामाणिक गरज आहे. अशावेळी हे आलिंगनाचे नाटक म्हणूनच घातपाताचाच प्रकार आहे. दोन महिन्यापुर्वी बाहू पसरून युरोपियन देश निर्वासितांचे स्वागत करत होते. त्या लोंढ्यातून काही जिहादी येतील, ही शंकाही कुणाच्या मनात आली नाही. कारण आलिंगनाची नशाच और असते. आता दोन महिन्यानंतर पॅरीसमध्ये आलिंगनाचे धमाके झाल्यावर तिथे सरकार व लोकांना जाग येऊ लागली आहे. बेल्जमने तर सगळ्या सार्वजनिक सुविधा ठप्प करून एक एक घराची झडती आरंभली आहे. त्याला विश्वासाला तडा जाणे म्हणतात. तो विश्वास तोडणारे कोणी बिगरमुस्लिम नाहीत तर मुस्लिमच आहेत. आणि त्यांचे डाव हाणुन पाडण्यानेच विश्वासाचा पुरावा समोर येऊ शकतो. आपण मुस्लिम असण्यापेक्षा आपण हिंसक जिहादी तत्वज्ञानाचे विरोधक आहोत, असे फ़लक घेऊन रस्त्यावर मुस्लिमांनी उतरण्याची गरज आहे. आज असे आलिंगनाचे नाटक रंगवावे लागते आहे, कारण मुस्लिमांवरचा लोकांचा विश्वास उडालेला आहे आणि अकारण कुठल्याही मुस्लिमाकडे लोक संशयाने बघू लागलेत. त्यावरचा उपाय आलिंगनाचे नाटक नाही, तर आपल्या आसपास जिहादी शिकवण देणार्‍यांना शोधून पोलिसांच्या हवाली करण्याची गरज आहे. त्याची शक्यता किती आहे?

6 comments:

 1. Superb blog!!!!
  Shocking reality !!!
  An eye opener for fake seculars!!!

  ReplyDelete
 2. नेहमीप्रमाणेच नावीन्यपूर्ण लेख!

  ReplyDelete
 3. आपले विचार एकदम अचुक आहेत तोरस्कर सर. खरोखरीच प्रत्येक धर्मातील लोकांनी आपापल्या धर्मातील कट्टरतावाद्यांना पाठिशी घालण्याऐवजी एखाद्या विष भिनलेल्या अवयवाप्रमाणे स्वत:च्या धर्मातुन वेगळे केले पाहिजे. आणि स्वधर्माच्या प्रतिमेस मलिन होण्यापासून वाचवले पाहिजे.

  मन:पुर्वक धन्यवाद सर.

  सुप्रभात !

  ReplyDelete
 4. योग्य विचार मांडले आहेत.

  ReplyDelete
 5. Islam la avhan denyacha vichar mandlay..
  Pan Islam is a closed loop...
  Swatah Paigambar mhanun gelay ki mi shevatcha tyamule kuni uthun swatahala Paigambar jari mhanu lagla tar tyala martil he lok...
  Tyamule hi shakyatach nahi..

  ReplyDelete