Tuesday, November 10, 2015

बिहार सिर्फ़ झांकी है, उत्तरप्रदेश बाकी हैयशाला अनेक बाप असतात आणि अपयश नेहमी अनौरस असते. भाजपाची आज हीच अवस्था आहे. लोकसभेतील प्रचंड व अपुर्व यशानंतर भाजपाच्या यशाचे श्रेय घ्यायला खुपजण पुढे आलेले होते. आता दिल्लीच्या पाठोपाठ बिहारमधल्या दारूण पराभवाला कोणी बाप पुढे आलेला नाही. पण म्हणून हे अपत्य कोणाचे, याची चर्चा होणारच. त्यातून सुटका नसते. तर आधी भाजपाचे अपयश म्हणजे काय ते बघावे लागेल. एकहाती सत्ता मिळवण्याची आकांक्षा बाळगण्यात काही चुक नाही. पण आकांक्षा बाळगणे व त्यासाठी तितकी शक्ती अंगी असणे महत्वाचे असते. उसनवारी करून शक्ती दाखवता येते. पण लढाईत टिकाव लागत नाही. हाच बिहारच्या निकालाने भाजपाच्या चाणक्यांना दिलेला धडा आहे. लोकसभा जिंकल्यापासून भाजपा सर्व राज्यातच नव्हेतर अगदी महापालिकेतही स्वबळावर बहुमत मिळवण्याचा वल्गना करू लागला. पण तितके संघटनात्मक बळ नव्हते, तर कुठल्याही पक्षातले दांडगे लोक उचलून त्यांना उमेदवार करण्याचा सपाटा लावला गेला. मोदींचा जल्लोश चालला होता, तोवर तिकडे लोकांनी दुर्लक्ष केले. पण तोच नियम होऊ लागला, तेव्हा लोकांनी हा भेसळीचा माल नाकारण्याचा पवित्रा घेतला, तर नवल नाही. शिवाय बाजारात जशी मालाची पत असते, तशी राजकारणात पक्षाच्या विश्वासार्हतेची पत असते. एकदा ती ढासळली, मग तुमच्या खर्‍या मालावरही कोणाचा विश्वास बसत नाही. खरा अस्सल मालही भेसळ म्हणून नाकारला जाऊ लागतो. भाजपाच्या बिहार अपयशाचे तेच मुख्य कारण आहे. जे लोकसभेच्या यशानंतर सहा महिन्यात महाराष्ट्रात खपून गेले होते. त्यानेच नऊ महिन्यांनी दिल्लीत दगा दिला आणि बिहारमध्ये पुर्ण सफ़ाया केला. पण यात भाजपाचा अस्सल मालही खपू शकला नाही, हे दुर्दैव आहे. आपली जी खरी ताकद होती, तीही भाजपा बिहारमध्ये गमावून बसला आहे.

शेवटचे मतदान मागल्या वर्षी मे महिन्यात लोकसभेसाठी झाले होते. त्यात एनडीए म्हणजे भाजपा व मित्रपक्षांना २४३ पैकी १६३ विधानसभा क्षेत्रात आघाडी मिळालेली होती. म्हणजेच त्यातून सव्वाशे जागा जिंकणे त्यांना अशक्य नव्हते. पण मिळाल्या ५८ जागा! म्हणजेच लोकसभेच्या तुलनेत भाजपा व मित्रपक्षांनी बिहारमध्ये तब्बल १०५ जागा गमावल्या आहेत. लोकसभेसोबत विधानसभा झाल्या असत्या, तर किमान १३०-१४० आमदार त्यांचे निवडून आले असते. मग इतकी घसरण कशामुळे झाली, ती बघावीच लागेल. दुसरा संदर्भ आहे तो पाच वर्षापुर्वी झालेल्या विधानसभा मतदानाचा! तेव्हा नितीश व भाजपा सोबत होते. तेव्हा शंभरावर जागा लढवणार्‍या भाजपाने तब्बल ९१ जागा जिंकल्या होत्या. यावेळी त्यातल्या अवघ्या ५१ जागा भाजपाला टिकवता आल्या आहेत. म्हणजेच मुळची पाच वर्षापुर्वीची असलेली ताकदही जवळपास निम्म्याने घटली आहे. आता अर्थातच भाजपा समर्थक मतांची वाढलेली टक्केवारी दाखवून पराभवातही शक्ती वाढल्याचे दाखले देतील. पण त्याला स्वत:ची दिशाभूल करणे म्हणता येईल. कारण विधानसभेत मतांचे आकडे व टक्केवारीनुसार कामकाज चालत नाही. आमदारांच्या संख्येवर कारभार चालत असतो. पाच वर्षापुर्वी भाजपाने निम्मेही जागा लढवल्या नव्हत्या आणि तेव्हा अठरा टक्के असलेली मते आता सात-आठ टक्के वाढली, तर जागा दुप्पट लढवल्याने वाढलेली दिसतील. पण जागांच्या संख्येने भागले तर काय गमावले, ते लक्षात येऊ शकेल. टक्केवारीच बघायची तर स्वबळावर लढवलेल्या मागल्या लोकसभेतील मतांशी आजच्या टक्केवारीची तुलना करावी लागेल. त्यात मग खरी घसरण किती झाली त्याचा साक्षात्कार घडू शकेल. पण तिकडे प्रामाणिकपणे बघायची हिंमत असायला हवी. त्यानुसार दोष व चुका दुरूस्त करायची तयारी असायला हवी. त्यासाठी सर्वात आधी चुका कबुल करण्याची हिंमत असायला हवी.

मित्र सहकार्‍यांशी खोटे बोलून त्यांची व काही काळ लोकांची फ़सगत करता येते. पण प्रारब्ध बदलता येत नाही. तो आत्मघात असतो. एक खोटे लपवायला दुसरे खोटे बोलायचे आणि ते उघडे पडायची वेळ आली, मग ते झाकायला तिसरे खोटे बोलून युक्तीवाद चांगले होऊ शकतात. पण वास्तव बदलत नसते. ते अवघड प्रसंगी समोर येऊन उभे ठाकते आणि त्याच्यापासून सुटका नसते. लोकसभा जिंकल्यानंतर मित्र पक्षांना टांग मारून सगळेच यश आपल्या खात्यात ओढण्याचा मोह भाजपाला झाला आणि तिथून त्याची घसरगुंडी सुरू झाली होती. महाराष्ट्रातला जुना मित्रपक्ष संपवून आपलेच साम्राज्य प्रस्थापित करण्याची आकांक्षा चुकीची म्हणता येणार नाही. पण मग विनाविलंब लोकसभा संपताच शिवसेनेला तसे सांगून काडिमोड घेता आला असता. पण अखेरपर्यंत जागावाटपाचा घोळ घालून व अन्य पक्षातून उसनवारीचे उमेदवार आयात करणे, हा निव्वळ खोटारडेपणा होता, दगाबाजी होती. त्यातून सेनेला स्वतंत्रपणे लढायची तयारी करायला मिळू नये, ही चलाखी होती. त्यामुळे अपुरा अवधी मिळून सेनेला दणका बसला. पण त्यातून भाजपाची मित्रांमध्ये असलेली विश्वासार्हता संपुष्टात आली. शिवाय त्या यशामुळे भाजपा इतका बहकला, की त्यांनी दिल्लीत कुठल्याही पक्षाच्या कोणाही उमेदवर नेत्याला आपला उमेदवार करण्यापर्यंत बेतालपणाचा कळस गाठला. त्याचे परिणाम समोर आल्यानंतरही तेच फ़सलेले डावपेच बिहारमध्ये खेळले गेले. अमित शहा किंवा त्यांचे निकटवर्तिय अन्य कुणाला नव्हे, स्वत:लाच अशातून फ़सवत होते. आपले बळ वाढल्याच्या बढाया मारत होते. पण वास्तवात विरार-वसई वा नव्या मुंबईच्या निकालांनी प्रारब्ध समोर येताना दिसत होते. पण बघायची वा स्विकारण्याची हिंमत होत नव्हती. म्हणून ते प्रारब्ध चुकले का? बिहारमध्ये त्याने भाजपाला कोडीत पकडून नामोहरम करून टाकले.

विधानसभा निकालानंतर परस्पर अल्पमताचे सरकार बनवण्यातून पवारांच्या बळावर भाजपा उड्या मारतोय, हे लपून राहिले नाही. पण लोकांचा रोष दिसून आल्यानंतर तडजोड म्हणून सेनेला सोबत घेण्यात आले. पण युती होऊ नये व झालेली टिकू नये, यासाठी सर्वतोपरी प्रयास चालू राहिले. अगदी कालपरवाच एकनाथ खडसे यांनी युती मोडण्याचे कोणात धाडस नव्हते, ते आपणे केले; अशी शेखी मिरवली होती. मग यावरचा युक्तीवाद असा होता, की भाजपाला विधानसभेत आमदार वाढवून पुढे राज्यसभेतले बळ वाढवायचे आहे. ते किती फ़सवे कारण होते? एकत्र युती विधानसभा लढली असती, तर एकत्रित सव्वादोनशे जागा जिंकल्या असत्या आणि कॉग्रेस राष्ट्रवादीला पन्नासच्या पुढे जाता आले नसते. म्हणजेच राज्यसभेत एकच सदस्य दोघांना मिळू शकला असता. युती तुटल्याने दोन्ही कॉग्रेसला प्रत्येकी ४० हून अधिक आमदार मिळाल्याने दोन राज्यसभा सदस्यांची सोय झाली. म्हणजेच युतीचा एक खासदार कमी झाला. याला राज्यसभेतील बळ वाढवण्याचा डावपेच म्हणतात काय? दिल्लीत्तून आता एकही राज्यसभा सदस्य भाजपा देऊ शकणार नाही आणि बिहारमध्ये राज्यसभेत आधी मिळू शकले असते, तितकेही बळ वाढणार नाही. मग युती तोडण्यामागे राज्यसभेतले बळ वाढवण्याचे डावपेच होते, ही धडधडीत थाप नव्हती काय? त्याचा एक परिणाम असा, की आता शिवसेना कधीही भाजपाशी निवडणूकपुर्व युती करणार नाही. कारण आता स्वबळावर लढायची हिंमत तिच्यात आली आहे. अधिक पवारांचे वा अन्य पक्षातले उसनवारीचे उमेदवार मागे गेल्यास भाजपा कोणत्या बळावर लोकसभा विधानसभा लढणार आहे? पवारांशी युती करून लढता येईल. पण मग पुरता सुपडा साफ़ व्हायला वेळ लागणार नाही. सांगायचा मुद्दा इतकाच, की लोकसभा जिंकल्यावर भाजपाची घसरगुंडी महाराष्ट्रातली युती मोडून झाली. त्याची बिहारचे निकाल ही नुसती झांकी आहे, उत्तर प्रदेश, बंगाल वा दिड वर्षानंतर सुरू होणारा निवडणुक मोसम अजून बाकी आहे.

11 comments:

 1. भाऊ, बिहार निकालातून भाजप काही शिकेल अथवा न शिकेल, अमित शहांची उचलबांगडी होईल अथवा न होईल पण एक गोष्ट निश्चित झाली की लालू नावाच्या भस्मासुराला संजीवनी मिळाली आहे. हि फक्त बिहारसाठीच नाही पण लोकशाहीसाठी एक धोक्याची घंटा आहे. लालू राज्यात दिवसाढवळ्या खून, खंडणीसत्रे, अपहरण ह्या आम गोष्टी होत्या. ह्याच जंगल राज्याविरुद्ध नितीशनी कौल मागीतला होता.

  आज (तुमच्यासह) अनेकजण आपापले विश्लेषण करत आहेत पण (तुमच्यासह) कोणीच लालू नावाच्या भस्मासुराचे पुनर्जीवन वा नितीशची सद्सद्विवेकबुद्धी ह्यावर भाष्य करताना दिसत नाही. लालूंशी हातमिळवणी करून वा त्यांना जास्त जागा देऊन नितीशनी मोठे मन दाखवलं, अहंकार बाजूला ठेवला की मोदीद्वेषानी इतके आंधळे झाले की लालूंशी हातमिळवणी करण्यात त्यांना अजिबात वावगे वाटल नाही. बाकी कुणाकडून नाही पण निदान तुमच्याकडून ह्या भाष्याची अपेक्षा आहे.

  ReplyDelete
  Replies
  1. भाजपचे लोक भाष्य करत आहेत की लालू विषयी! भाऊंनी भाजपच्या पराभवाचे विश्लेषण करायचे की लालूंच्या विजयाचे, हे भाऊंवर सोडा.

   Delete
 2. दिशा उद्याची नव्या युगाची नेत्रदानाची।

  ReplyDelete
 3. भाऊ मला वाटते की बिहार व महाराष्ट्राचा परिस्थिती वेगळी आहे. शिवसेनेने फक्त 3 जागांसाठी युती मोडली. ती जर मोडली नसती तर चित्र वेगळे दिसले असते. राहता राहिला बिहार. भाजप विरुद्ध सर्व पक्ष अशी लढत झाली. तुम्ही म्हणता त्याप्रमाणे लालु यादव यांना जदयू च्या मतदारांनी काही मतदारसंघात मते दिली नाहीत. त्यामुळे जदयुच्यासिट कमी आल्या पण एकत्र लढण्याचा फायदा लालु व काॅग्रेस ला झाला. पण हे औटघटके चे राज्य ठरण्याची जास्त शक्यता आहे. आता पासुनच लालु चे बेलगाम बोलणे सुरु झाले आहे.

  ReplyDelete
  Replies
  1. शिवसेनेने युती मोडली की भाजपने? स्वतः खडसेसाहेबच बोलले की मोदींसमोर मी ठणकावून सांगितले मी युती तोडल्याचे जाहीर करतो. अजून काय पुरावा पाहिजे?

   Delete
  2. मुंडे असते तर अजून तीन जागा सोडून देखील युती टिकवली गेली असती... भाजपाने आपली ताकद वाढल्याचा फुगा सोडला होता. .आता गेली हवा....

   Delete
 4. ज्या लालूंना नितिशकुमारांनी सत्तेवरून उतरवले त्यांनीच परत सत्तेत आणुन बसवले.आता जरी मुंख्यमंत्री नितिशकुमार झाले तरी रिमोट कंट्रोल लालूंकडेच राहणार.

  ReplyDelete
  Replies
  1. त्यात भाजपचा फायदा काय? भाजपचा पराभव झाला तो झालाच ना?

   Delete
 5. अजुनही जर युती कोणी तोडली हे लक्षात येत नसेल कोणाला तर भाऊ मग पालथ्या घड्यावर पाणीच समजावे भाजपभक्तांना हे लक्षातच का येत नाही की भाजपाला युती करायचीच नव्हती

  ReplyDelete
 6. My blog dated 9/11/2015 related to Bihar election
  http://nivruttisugave.blogspot.in/2015/11/part-1.html

  http://nivruttisugave.blogspot.in/2015/11/blog-post_10.html

  ReplyDelete