Friday, November 27, 2015

बेगानी शादीमे अब्दुल्ला दिवाना



बंगलोर येथील एका महाविद्यालयातील विद्यार्थिनींसमोर राहुल गांधी यांचे भाषण झाले. तिथे त्यांनी नेहमीप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर तोफ़ा डागल्या. मग त्यावर त्यांनी स्वत:च खुश होणे स्वाभाविकच आहे. राहुल गांधी हे कॉग्रेसचे उपाध्यक्ष आहेत आणि ते कायम खुश असतात. आपला पक्ष मागल्या चार वर्षात प्रत्येक निवडणुक हरला, तरी ते एकदाही विचलीत झालेले कोणी बघितले आहेत काय? जगात काय घडते आहे किंवा त्यात काय चांगलेवाईट आहे, त्याचा त्यांना कधीही अर्थबोध झाल्याचे त्यांची भाषा वा कृतीतून एकदा तरी दिसले आहे काय? शक्यच नाही! सहाजिकच अवतीभवती जे काही घडते, त्यापासून राहुल संपुर्ण अलिप्त असतात. त्यामुळे जगातल्या घटनांविषयी त्यांनी अपरिचित असण्याने काही बिघडत नाही. किंबहूना म्हणूनच त्यांना सर्व गोष्टी नेमक्या कळू शकतात आणि तेच बुडत्या पक्षाला वाचवू शकतील, अशी प्रत्येक निष्ठावान कॉग्रेस कार्यकर्त्याची श्रद्धा आहे. परिणामी राहुल चुकले तरी त्यांची चुक कोणी दाखवून देवू शकत नाही. मग बिचार्‍या राहुलना तरी आपण कुठे चुकलो आणि काय सुधारले पाहिजे, याचा बोध कसा व्हावा? त्यामुळे चुका करूनही ते खुश असतात. बंगलोरला तेच झाले. देशात मोदी सरकार आल्यापासून खुप घोषणा झाल्या, पण प्रत्यक्षात काहीही घडू शकलेले नाही, असे राहुलनी तिथे ठामपणे सांगितले. आता तिथेच थांबायला हवे होते. पण राहुल गांधी यांनी पुढे जाऊन समोर बसलेल्या श्रोत्या मुलींना सवाल केला, की काही घडताना तुम्हाला दिसते आहे काय? क्लीन इंडिया वा मेक इन इंडिया असल्या घोषणांचे पुढे काय झाले? त्यांचा उपयोग होत आहे काय? तर त्या मुलींनी जोरदार आवाजात होकार भरला आणि राहुल चकीत झाले. कारण असे वेगळे मत ऐकायची त्यांना सवयच नाही. सहाजिकच आपल्या कानांवर विश्वास बसला नाही म्हणून त्यांनी पुन्हा तोच प्रश्न विचारला.

थोडक्यात राहुलनी आपलीच फ़टफ़जिती त्या विद्यार्थिनींच्या पुढे करून घेतली. भाषण देवून विषय संपला असता. त्यांनी मुलींना उलटा प्रश्न करायचे काही कारण नव्हते. आणि विचारलाच तर त्यावर उलट उत्तर आल्यावर विषय बदलून पुढे जायला हवे होते. पण ते शक्य नव्हते. कारण मोदी सरकार नुसत्या घोषणा करते आणि प्रत्यक्षात काहीही होत नाही, अशी राहुलची ठाम श्रद्धा आहे. तशा बातम्याही झळकत असतात. माध्यमातून त्याचाच नित्य गवगवा चालू आहे. मग राहुलनी कशावर विश्वास ठेवायचा? ‘मोदींच्या थापांवर’ की माध्यमातल्या बातम्यांवर? राहुल अर्थातच माध्यमांवर विसंबून आहेत. जगात काय घडते वा बिघडते, त्याची माहिती त्यांना माध्यमाकडून मिळत असते. प्रत्यक्ष जगाशी त्यांचा काडीमात्र संबंध उरलेला नाही. त्यातून काही सुटलेले असेल तर दिग्विजयसिंग, जयराम रमेश असे विश्वासू सहकारी माहिती द्यायला आहेतच. त्यांनीच लिहून दिलेले मुद्दे राहुल व्यासपीठावर उभे राहुन बोलत असतात. बंगलोरला तेच झाले. पण समोर बसलेल्या मुली सामान्य घरातल्या व समाजात वावरणार्‍या होत्या. माध्यमातल्या बातम्यांपेक्षा वास्त्व जगातल्या घडामोडी त्यांना अनुभवाव्या लागत असतात. त्यामुळेच मोदी सरकार सत्तेत आल्यापासून बदल झाला किंवा नाही, त्याचा अनुभव त्यांना नित्यनेमाने येत असतो. त्यासाठी माध्यमातया बातम्यांवर विसंबून रहाण्याची त्यांना अजिबात गरज नाही. अधिक माध्यमांनी लपवाछपवी केली, तरी आजची ही तरूण पिढी सोशल माध्यमातून माहिती मिळवत असते. म्हणूनच काही होत असेल वा नसेल, तर त्याचा तपशील या पिढीकडे नेमका असतो. म्हणून मग त्यांच्याशी संवाद करण्याचा धोका राहुलनी पत्करायला नको होता. तीच चुक त्यांना महागात पडली. नव्या पिढीसमोर हा कॉग्रेसचा तरूण नेता तोंडघशी पडला. खोटा पडला.

ही गोष्ट एकट्या राहुलचीच नाही. अनेकांची तीच अवस्था असते. त्यांचा जगाशी संपर्क तुटलेला असतो आणि त्यांना माध्यमे दाखवतात, तितकेच जग ठाऊक असते. त्यावरच ही माणसे मतप्रदर्शन करीत असतात. उद्या माध्यमांनी बातम्या रंगवल्या, की देशात वा अमुक शहरात प्रचंड पाऊस पडला आणि जागोजागी महापूर आलेले आहेत. तर असे लोक छत्र्या घेऊन बाहेर पडतील वा पूरात बुडण्याच्या भयाने घराबाहेरही पडणार नाहीत. मग त्यांच्या डोळ्याला दिसणारे कडक भाजणारे सूर्याचे ऊन असले म्हणून काहीही फ़रक पडत नाही. देशातल्या मुठभर प्रतिष्ठीतांना असंहिष्णुता दिसते आणि मग माध्यमातून त्याचा गवगवा झाल्यावर आमिर खानच्या पत्नीला आपल्या बाळाचा जीव धोक्यात आल्याच्या भितीने उगाच पछाडले जात नाही. कर्नल महाडिकच्या मातेला आपला पुत्र सीमेवर कायमच्या गोळीबाराला तोंड देत उभा असतानाही आपले लेकरू धोक्यात असल्याचे वाटत नाही, हजारो सैनिक वा पोलिस डोळ्यात तेल घालून सुरक्षेसाठी अहोरात्र जीवाची बाजी लावतात. त्यांच्या कुटुंबिय वा परिवाराला कुठे जीव धोक्यात आल्याची भिती वाटल्याचे आपण ऐकतो काय? मग आमिर खान वा त्याच्या पत्नीलाच असे कशाला वाटते? त्यांच्या भोवताली काही घडले असेल तर समजू शकते. पण तसे काही घडले तेव्हा ही मंडळी खुशाल निश्चींत होती. राहुल गांधी २६/११ च्या हल्ल्यानंतर विचलीत झाल्याचे कोणी बघितले होते काय? शाहरुख आमिर पंचतारांकित हॉटेलात समारंभ साजरे करतात. त्याच ताज वा ओबेराय येथे कसाब टोळीने कित्येकांना बेछूट गोळीबारात ठार मारले. तेव्हा भारतात जगणे असुरक्षित असल्याची तक्रार त्यांनी केली असती, तर गोष्ट वेगळी होती. पण तेव्हा तर त्यांना कमालीचे सुरक्षित वाटत होते. कारण माध्यमात मुंबई स्पिरीट दाखवले जात होते ना? तेव्हा खरोखर त्यांच्यापर्यंत देशातली असुरक्षितता येऊन भिडली होती. आज तसा कुठलाही प्रत्यक्ष धोका नसताना त्याच लोकांना अशी भिती वाटणे स्वाभाविक आहे. त्यांचे जग हे माध्यमापुरते मर्यादित झालेले आहे आणि त्यांच्या व्यक्तीगत मानवी जाणिवा बोथटल्या आहेत.

मागल्या दोन दिवसात आमिर खान व त्याच्या भयभीत झालेल्या पत्नीवर अनेकजण खवळून प्रतिक्रिया देत आहेत. त्यांनी देश सोडून कुठे पाकिस्तान वा इराकमध्ये जावे असेही आगंतुक सल्ले दिले जात आहेत. हा देखील मुर्खपणाच आहे. काही मंडळी ज्या भ्रामक जगात जगतात, त्याचा हा परिणाम वास्तविक जगातल्या लोकांवर होण्याचे काही कारण नाही. कारण त्यांच्यासाठी भारत नावाचा देश जसा काल्पनिक वा आयाडीया असते, तशीच सुरक्षा वा संहिष्णूताही काल्पनिक असते. मग इराक वा पाकिस्तान तरी खरे देश कशाला असतील? राहुल गांधी वा आमिरखान यांच्या विधानाची मार्केटींग करून माध्यमांना काहीकाळ आपल्याकडे लक्ष वेधून घ्यायचे असते. लग्नाच्या वरातीमध्ये घोड्यावर बसलेल्या नवरदेवाच्या भोवती मागेपुढे अ़चकट विचकट हावभाव करून काहीजण नाचत असतात, ते शोभा वाढवत असल्याचे फ़क्त नाटक करतात. वास्तवात त्यांना लोकांचे लक्ष वेधुन घ्यायचे असते. माध्यमांची अवस्था आजकाल तशी झाली आहे. बेगानी शादीमे अब्दुल्ला दिवाना अशी एकुण पत्रकारितेची केविलवाणी स्थिती आहे. मग कधी राहुल, कधी आमिर अशा लोकांचे कुठले तरी नगण्य विधान घेऊन काथ्याकुट चालतो. त्यात मग रंगत आणायला काही प्रतिष्ठीत नावाजलेले चेहरे आणले जातात. तेच चेहरे सतत आणले गेले, मग त्यांनाही आपण बुद्धीमंत विचारवंत झाल्याचे भास होऊ लागतात. राहुल गांधींना ती़च बाधा झालेली आहे. म्हणून कसलाही अनुभव वा अक्कल नसताना हा तरूण काहीही बकवास करतो. आमिरला तर अभिनयाची लोकप्रियता आपल्याला बुद्धीमंत ठरवुन गेलीय असे वाटू लागले आहे. अशा दिवट्यांच्या मुलाखती घेऊन पेश करणर्‍या पत्रकारांनी ही दुर्दशा केलेली आहे. मग त्यात राहुल वा आमिरही बेगाने होऊन नाचू लागले तर नवल कुठले? ते काय बोलले त्याची दखल तरी कशाला घ्यायची?

3 comments:

  1. ४५ वर्ष्याचा तरुण , हा हा हा हा

    ReplyDelete
  2. कसलाही अनुभव व अक्कल नसलेला हा तरुण व दिवटा आमिर !👍

    ReplyDelete
  3. Amir khan la dikdershakani jas sangital tas swathacha dok n vaparata abhinay karava lagato
    Bharatabaddal amir khan bolala tycha dikdershaka kon he baghital pahije

    ReplyDelete