Wednesday, November 25, 2015

२६/११ आणि तिसरे महायुद्ध



आज २६/११ म्हणजे २६ नोव्हेंबर ही तारीख आहे. जगभर तिची ओळख आहे. कशामुळे ही तारीख जगाच्या इतिहासात नोंदली गेली त्याचे काही स्मरण आपल्याला आहे काय? तर त्या दिवशी किमान दोनशे माणसे मुंबईत हकनाक मारली गेली. रक्ताचे पाट वाहिले आणि त्या फ़ेर्‍यात सापडलेल्या कोणालाही त्यापासून मुक्ती नव्हती. कारण रक्ताला चटावलेले दहा जिहादी पशू इथे मुंबईत आलेले होते. त्यांना आपल्या जीवाची पर्वा नव्हती. ते कराचीहून इथे मरायलाच आलेले होते आणि मरताना शक्य होतील तितक्या इतर निरपराधांना ठार मारून मरायचे, असा त्यांचा मनसुबा होता. त्याला हे दोनशेहून अधिक मुंबईकर बळी पडले. त्याखेरीज चारपाचशे मुंबईकर कमीअधिक जखमी झाले वा कायमचे जायबंदी झाले. तो दिवस म्हणून जग २६/११ या आकड्यांची इतिहासातली नोंद आहे. पण ज्या मुंबईत हा रक्तपात घडला तिथल्या मुंबईकरांना त्याचे स्मरण आहे काय? जे मेले वा जायबंदी झाले, त्यांच्यावर ही पाळी कशामुळे आली, आपण त्यातून बचावलो, असा थोडा तरी विचार कोणी मुंबईकर करतात का? अशा अनुभवाचा विचार आपण भारतीयांनी विचार केला असता आणि त्यापासून काही शिकलो असतो, तर मुळात कसाबच्या त्या टोळीला इथे येण्याची हिंमत झाली नसती. त्यांना रक्तपाताचे प्रशिक्षण देवून इथे धाडणार्‍यांच्या मनाला तसा विचारही शिवला नसता. पण तसे घडले, अनेकदा घडतेच आहे कारण आपणच त्यांचे प्रायोजक आहोत. आपल्याच हत्येला, रक्तपाताला प्रोत्साहन देणारा असा जगात दुसरा कुठला समाज वा देश नसेल, ज्याची भारताशी व भारतीय मानसिकतेशी तुलना होऊ शकेल. कुठल्याही ऐतिहासिक अनुभवातून शिकायचे नाही, की येऊ घातलेल्या संकटाला प्रतिकार करायची तयारी करायची नाही, हाच आपला इतिहास आहे. म्हणून इतिहासाची पुनरावृत्ती होताना दिसते आहे.

कालपरवा मुंबईत सुधींद्र कुलकर्णी नामक एका माणसाच्या तोंडाला काळे फ़ासण्याची घटना घडली. कशासाठी काही लोकांनी हा उद्योग केला? तर सुधींद्र कुलकर्णी यांनी खुर्शीद कसुरी नावाच्या पाकिस्तानी माजी परराष्ट्रमंत्र्याला इथे बोलावले होते. त्याच्या पुस्तकाचे वाजतगाजत प्रकाशन करण्याचा समारंभ योजला होता. कोण हा कसुरी? तर जनरल परवेझ मुशर्रफ़ या पाक लष्करशहाचा सहकारी व पाक हेरसंस्थेच्या आश्रयाने चालणार्‍या संस्थेचा मुख्याधिकारी. ह्या हेरसंस्थेनेच मुंबईत कसाबला तयार करून कत्तलीसाठी पाठवला होता. म्हणजेच अप्रत्यक्षरित्या मुंबईतल्या सात वर्षापुर्वीच्या कत्तलीत ज्याचे हात मुंबईकरांच्या रक्ताने माखलेले आहेत असा हा खुर्शीद कसुरी! त्याला मुंबईत सन्मानाने बोलावले जाते आणि त्याच्या पुस्तकाचे प्रकाशन होताना मुठभर मुंबईकर त्याला काळे फ़ासायला पुढे जातात. तेव्हा त्याच हिंमतबाजांचा निषेध करायला याच मुंबईचे एकाहून एक मोठे बुद्धीमंत वा प्रतिष्ठीत पुढे सरसावतात. निषेध कोणाचा होतो? ज्याचे हात निष्पाप मुंबईकरांच्या रक्ताने माखलेले आहेत, त्याचा निषेध होत नाही. तर त्याला विरोध करणार्‍यांचा निषेध होतो. हे काळे फ़ासणारे मुंबईकरच नव्हेत, बाकीची प्रचंड मुंबई व मुंबईकर संहिष्णू आहेत, असे सांगण्यात धन्यता मानली गेली ना? अगदी महाराष्ट्र सरकारही त्याच मुठभरांवर गुन्हे नोंदवायला पुढे आले. हे मुठभर कोण होते? बाकीची प्रचंड मुंबईकर संख्या कोण आहे? सात वर्षे मागे जा म्हणजे कळेल, की तेव्हाही बाकीची सर्व मुंबईकर लोकसंख्या शेपूट घालून भयभीत झाली होती आणि काही मुठभरच कसाबच्या टोळीशी दोन हात करायला पुढे सरसावले होते. बाकी सगळी मुंबई पुढे आलेली नव्हती. त्या मुठभरांनीच कसाबला आवरला, ठार मारला आणि त्यात आपलेही प्राण गमावले. मगच बाकीच्या लाखो मुंबईकरांचा जीव भांड्यात पडला होता.

आज सात वर्षांनी काळ किती बदलला आहे ना? आम्हाला ओंबळे-करकरे आठवत नाहीत. त्यांचे बलिदान आठवत नाही. त्यापेक्षा आम्हाला गुलाम अलीच्या गजला ऐकण्यात स्वारस्य आहे आणि म्हणून त्याला रोखणार्‍यांचा आम्ही निषेध करतो. कसाबचा बोलविता धनी इथे सन्मानाने वागवला जात नाही, म्हणून आम्हाला लाज वाटतेय. आम्हा्ला त्या मुठभरांची लाज वाटतेय, ज्यांनी आपल्यावर गुन्हे ओढवून घेत, तो कार्यक्रम हाणून पाडला. उद्या वेळ आली तर या निषेधकर्त्यांपैकी कितीजण पुन्हा हल्ला झाल्यास कसाबसारख्या मारेकर्‍याला सामोरे जाणार आहेत? असे मुठभर कोणी असतात, जे अभिमानासाठी झीज सोसतात, म्हणून समाजाला सुरक्षितता मिळत असते. कसाबसारख्यांना रोखले जात असते. कसाबला कशासाठी रोखायचे असते? कसाबला मरायचेच होते. पण त्याच्या टोळीने ज्यांना हकनाक ठार मारले, त्यापैकी कोणाला मरायची इच्छा होती काय? त्यांना इच्छेविरुद्ध कशाला मरावे लागले? कोणीतरी कसाबला आधीच ठार मारला असता आणि त्याची मरायची इच्छा पुर्ण केली असती, तर बाकीच्या दोनशे लोकांना हकनाक मरावे लागले नसते ना? पण तसे झाले नाही वा होत नाही. अशा सामान्य लोकांना नेहमीच हकनाक मरावे लागते आणि शांततेच्य थोतांडासाठी हे सामान्य लोक नेहमीच बळीचे बकरे होत असतात. कधी ते मुंबईकर असतात कधी ते पॅरीसकर असतात, तर कधी न्युयॉर्कर असतात. त्यांना मरायचे नसते, पण शांततवाद्यांना मारेकर्‍यांचे चोचले पुरवता यावेत, म्हणून सामान्य लोकांनी बळीचे बकरे व्हावे अशी जगाची रीत झाली आहे. सुधींद्र कुलकर्णी यांच्या समंजसपणासाठी सामान्य माणसाला मरावे लागते आणि युरोपियन युनियनच्या उदारमतवादी हट्टापायी तिथल्या सामान्य माणसाला हकनाक मरावे लागते. त्या सामान्य माणसाचा गुन्हा एकच असतो, तो मुर्खांना शहाणे समजून जगत असतो.

लिओ ट्रॉटस्की हा रशियन विचारवंत नेता म्हणतो, ‘तुम्हाला भले युद्ध नको असेल, पण तुम्ही मात्र युद्धाला (बळी म्हणून) हवे असता.’ त्याचा अर्थ समजून घेतला तर आपण असुरक्षित कशामुळे असतो, हे लक्षात येऊ शकेल आणि जीवन अधिक सुरक्षित होऊ शकेल. आपले दुर्दैव असे, की अशा जटील प्रश्नांची सोपी सुटसुटीत उत्तरे नसतात आणि फ़सवी उत्तरे आपल्याला नेहमीच भुरळ घालतात. मग आपण कसायाला शरण जात असतो. कधी तो हातात बंदूक घेऊन येतो, तर कधी साळसूद चेहरा लावून शांतता सामंजस्याचे मुखवटे लावून आपल्याला मृत्यूच्या गर्तेत लोटून देत असतो. कसाबला मरायचेच होते. अशा हल्ल्यानंतर आपण सुखरूप निसटणार नाही, हे त्यालाही ठाऊक होते. पण त्याच्या हातून जे मारले गेले, त्यांना तर कसाबला मारायचे नव्हते? त्यांना कुणालाच मारायचे नव्हते? स्वत:ही मरायचे नव्हते ना? मग त्यांच्या नशीबी हा असा हिंसक क्रुर मृत्यू कशाला यावा? तर युद्ध हे त्याचे उत्तर आहे. ते तुम्हाला नको असल्याने टाळता येत नाही. कारण कुणाला तरी युद्ध हवे असते आणि तो तुमच्यावर युद्ध लादत असतो. तेव्हा त्याच्यापासून पळ काढून सुरक्षा मिळत नसते की युद्धाची स्थिती नाकारून जगता येत नसते. त्याला सामोरे जाऊन अशा युद्धखोरीचा नि:पात करणे, हाच एकमेव मार्ग असतो. थोडक्यात ज्याला युद्धाची खुमखुमी असते, त्याच्यावर युद्ध लादून त्याचा खात्मा करणे, हाच एकमेव युद्ध थांबवण्याचा मार्ग असतो. दुसर्‍या महायुद्धानंतर युद्ध टाळण्यासाठी राष्ट्रसंघाची स्थापना झाली व तसे प्रयत्न झाले. म्हणून युद्धे टळली नाहीत, की त्यात मरणार्‍या माणसांना जीवदान मिळू शकले नाही. उलट युद्धापेक्षा अधिक संख्येने माणसे मारली गेलीत. युद्धापेक्षा शांततेने अधिक लोकांचा बळी घेतला आणि सुरक्षेचे तर कुठे दुरदुर दर्शन होत नाही. किंबहूना त्याच पळपुट्या शांततावादाने जिहाद नावाचा भस्मासूर उभा केला आहे, जो आता तिसर्‍या महायुद्धाचे अक्राळविक्राळ रुप धारण करून सामोरा येतो आहे.

4 comments:

  1. भाऊ युध्दाच उत्तर जर युध्द आहे तर युध्द कसे थांबतील? कारण युध्दात हरणारे नेहमी स्वत: ला शोषित आणि जिंकणार्याला शोषक असण्याचा कांगावा करून सूड उगवायला पाहतात. जर्मनी ने World War II मधे तेच केल आणि पाकिस्तान पण बांग्लादेश च युध्द हरून तेच करत आहे.

    ReplyDelete
  2. _/\_ संपूर्ण तर्कशुद्ध.

    ReplyDelete
  3. Bhau hich tar aapli khasiat ahi aaple rakatch uslat nahi khare yodhe sample ahit.aapli avastha ww2 madlya France sarkhi ahi kon general gol vachotoy te pahaicheahi

    ReplyDelete
  4. Kashmir madhe ghusle;panjab madhe ghusle;purva Bhartat ghusle; Mumbai madhe ghusle pan aapan Kaye kele ???aapan ya shandhan mule kayavh karu shakat nahi

    ReplyDelete