Sunday, April 17, 2016

संघ, पुरोगामी आणि पर्याय

बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी आता पक्षाध्यक्ष पदाचीही जबाबदारी पत्करली आहे. त्यामुळे अनेकांना आता आगामी लोकसभा निवडणूकीत तेच पंतप्रधान पदाचे उमेदवार असल्याचे भास होऊ लागले आहेत. त्यात गैर काहीच नाही. ज्याच्यापाशी उमेद असेल, त्याने उमेदवारी करायला काहीच हरकत नसते. पण उमेदवारीच्या जोडीला काही अन्य गोष्टी अगत्याचे असतात. त्यात साधने व मेहनत अशा दोन बाबी अतिशय महत्वाच्या असतात. नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत अफ़ाट मेहनत घेऊन यश मिळवले आणि त्यासाठी त्यांना भरपूर साधनेही उपलब्ध होती, यात शंका नाही. पण तितकीच नव्हेतर त्यापेक्षाही अधिक साधने कॉग्रेस व राहुल गांधी यांच्यापाशी होती, हे विसरता कामा नये. त्या साधनांचा कसा वापर करावा याचे तारतम्य मोदींपाशी होते आणि त्यासाठी आवश्यक मेहनत घेण्याचीही त्यांची तयारी होती. म्हणून अतिशय प्रतिकुल वातावरणावर मात करून हा नेता यशस्वी होऊ शकला. म्हणूनच त्याच्याशी टक्कर द्यायला मैदानात यायचे, तर मेहनत ही प्राधान्याची बाब असली पाहिजे. तितकेच संघटनात्मक बळही पाठीशी असायला हवे. मोदींच्या पाठीशी पक्ष कार्यकर्त्यांचे बळ होते आणि रा. स्व. संघाची संघटना होती. बाकी आवश्यक असलेली मेहनत घेण्याची त्यांची तयारी होती. संघाला कोणीही कितीही शिव्या घालाव्यात. पण नि:स्वार्थपणे काम करणार्‍यांची ही फ़ौज इथला डोंगर तिकडे करू शकते, हे वास्तव विसरून चालणार नाही. संघाच्या खांद्यावर बसूनच मोदी हा पल्ला गाठू शकले. तितकी संख्या व संघटनात्मक बळ नितीशकुमार वा अन्य कोणाकडेही आज नाही. म्हणून मोदी वरचढ ठरतात. भाजपाला एखाद्या राज्यात पराभूत केले वा त्या पक्षाची सत्ता गेली, म्हणून मोदींना आताच्या नव्हेतर पुढल्याही लोकसभेत धोका निर्माण करता येणार नाही. नितीशकुमार म्हणूनच तसा धोका नाहीत.
बिहारमध्ये नितीश वा दिल्लीत केजरीवाल जिंकले आणि भाजपा पराभूत झाला. ही वस्तुस्थिती कोणी नाकारू शकत नाही. पण त्यामागची कारणेही शोधणे आवश्यक आहे. ज्या कारणास्तव लोकसभेत केजरीवाल नितीश आपटले होते, त्याच कारणास्तव ते विधानसभेत जिंकले होते. त्यांनी आपापल्या राज्यात भाजपाचा पराभव केला कारण तिथे भाजपापाशी नेतृत्वाचा चेहरा नव्हता. स्थानिक नेता नव्हता. या दोन्ही नेत्यांना लोकसभेच्या वेळी पंतप्रधानपदाची स्वप्ने पडलेली होती. पण त्यांच्यापाशी राष्ट्रव्यापी नेतृत्व करण्याचा चेहरा किंवा कुवत नव्हती. ती मोदींपाशी होती, म्हणून सात सार्वत्रिक निवडणुकांनंतर स्पष्ट बहूमताचा कौल येऊ शकला. केजरीवाल किंवा नितीश यांच्यापाशी अशी कोणती कुवत आहे, की त्यांच्याकडे देशाची सुत्रे लोकांनी सोपवावीत? लालू व कॉग्रेसची गोळाबेरीज करून नितीशनी विधानसभेत आपल्या जागा कमी करून घेतल्या आणि मुख्यमंत्रीपद टिकवले. आजही लालू त्यांना नेता मानत नाहीत. मग पुरोगामी नेते व पक्ष नितीशना नेता म्हणून कितपत स्विकारू शकतील? देशातल्या अन्य राज्यात नितीशच्या पक्षाला काडीमात्र स्थान नाही आणि जुन्या जनता वारश्याचे भांडवल करायचे, तर मुलायम, लालू, देवेगौडा यांना सोबत आणावे लागेल. त्यानंतर डाव्यांची मोट बांधावी लागेल. अधिक कॉग्रेसला दावणीला बांधावे लागेल. तेवढ्याने कितपत भागेल? असल्या आघाड्यांना कंटाळलेल्या लोकांनी मोदींना एकहाती बहूमत दिलेले आहे. तेव्हा त्या मानसिकतेकडे काणाडोळा करून लोकसभा जिंकता येणार नाही. किमान नितीशनी आधी आपले पाय बिहारमध्ये घट्ट रोवून उभे रहावे. पुरोगाम्यांची हीच तर अडचण आहे आणि म्हणून मोदींचे पारडे जड होते. मोदी-संघ हा विषय सोडला की पुरोगाम्यांत मतभिन्नतेचा आगडोंब उसळतो. द्वेषाधिष्ठीत वा शत्रूकेंद्री असे हे राजकारण म्हणूनच फ़सत गेले आहे. नकारात्मक झाले आहे.
जनता दल नावाचे जितके पक्ष आहेत किंवा त्याचा वारसा सांगणारे आहेत, त्यांचा इतिहास सातत्याने फ़ाटाफ़ुटीचा राहिला आहे. खुद्द बिहारचीच गोष्ट घ्या. जनता दलाची सत्ता असताना लालूप्रसाद मुख्यमंत्री होते आणि त्यांना पक्षाध्यक्ष करण्यात आलेले होते. मग त्यांच्यावरच चारा घोटाळ्याचा आरोप झाल्यावर मुख्यमंत्रीपद सोडावे लागले होते. त्यांनी काय केले? सत्तेचे पद सोडले आणि पर्यायी मुख्यमंत्री म्हणून आपल्या पत्नीलाच तिथे विराजमान केले. त्यावर आक्षेप घेतला गेल्यावर लालू संतापले आणि त्यांनी आपली वेगळी चुल मांडली. राष्ट्रीय जनता दल नावाचा प्रादेशिक पक्ष स्थापन केला. नितीश, शरद यादव, जॉर्ज फ़र्नांडीस अशा नेत्यांनाच पक्षातून हाकलून लावले. पुढे पक्षाचे इतके तुकडे पडत गेले, की लालू. मुलायम, शरद यादव, अजित सिंग, ओमप्रकाश चौताला अशा प्रत्येक नेत्याचा स्वतंत्र प्रादेशिक पक्ष सुरू झाला आणि जनता दलाचे नामोनिशाण शिल्लक उरले नाही. अशा तमाम जुन्या समाजवादी, लोहियावादी किंवा जनता वारसांना एकत्र केल्यास, एक भक्कम राष्ट्रीय पक्ष उभा राहू शकतो. पण त्यासाठी एका कुणाला पक्षाध्यक्ष व्हावे लागेल आणि तीच तर अडचण आहे. मध्यंतरी म्हणजे वर्षभरापुर्वी तसा प्रयासही झाला होता. जनता दलाचा वारसा सांगणार्‍या सहा पक्षांनी एकत्र यायचे निश्चीत केले आणि सर्वाधिकार मुलायम सिंग यांना बहाल केले. पण बिहारची निवडणूक घोषित झाली तरी मुलायम हातपाय हलवू शकले नाहीत. उलट त्यांनी लालू-नितीश यांच्या संय़ुक्त आघाडीलाच विरोध करणारा पवित्रा घेतला. सहाजिकच जनता दलाचा जिर्णोद्धार तिथेच बारगळला. आता नितीश त्याचीच कास घरणार आहेत काय? त्यासाठी आधी जनता वारसांनी आपापले अहंकार गुंडाळून बाजूला ठेवावे लागतील. संघटनात्मक बळावर पक्षाची उभारणी करावी लागेल. नुसत्या संघ वा भाजपला शिव्या मोजून काहीही साधणार नाही.
दुसरी मोठी अडचणीची गोष्ट आहे परस्परांचे पाय ओढण्याची! समाजवादी मंडळीचे एकाच बाबतीत एकमत असते, ती गोष्ट म्हणजे समाजवाद्यांचे कधी एकमत होऊ शकत नाही. कुठलीही बाब घेतली तर पक्षातच दुफ़ळी असते आणि बारीकसारीक गोष्टीवरून पक्षात सतत फ़ाटाफ़ूट झालेली दिसेल. पन्नास वर्षाचा समाजवादी इतिहास अशा घटनांनीच भरलेला अहे. त्यामुळेच आपल्या पारंपारिक बालेकिल्ल्यातून ही मंडळी नामशेष होऊन गेली आहेत. कारण प्रत्येक गोष्टीला विरोध करण्याचा हव्यास इतका असतो, की कशाला पाठींबा द्यायचा त्याचा विचारही ह्या लोकांना सूचत नाही. आताही बघितले तर हे लोक संघ वा मोदी विरोधात एकवटण्याची भाषा करीत असतात. पण मोदी वा संघ संपला, मग पुढे काय करायचे, या प्रश्नाचे उत्तर त्यांच्यापाशी नाही. कारण तसा विचारही त्यांच्या मनाला शिवलेला नाही. काय करायचे ते ठाऊक नाही, पण कशाला विरोध करायचा त्याबद्दल एकमत आहे. सहाजिकच पुरोगामी म्हणवणारे आता प्रतिगामी वा प्रतिक्रियावादी होऊन गेले आहेत. मोदीं वा संघाने काही केल्यास त्याच्या विरोधात उभे ठाकणे, यापेक्षा कुठले धोरण त्यांच्यापाशी तयार नाही. मोदी यापेक्षा देश महत्वाचा असून समाजापुढे उज्ज्वल भवितव्याचे स्वप्न रंगवण्याची गरज आहे. समोर जे वास्तववादी पर्याय उपलब्ध असतात, त्यातून लोक निवड करतात. अमूक नको, तमूक नको, हे लोक ऐकून घेतात. हवे काय तोही पर्याय द्यावा लागतो. मोदी-भाजपा नको असेल तर बिहारमध्ये लालु-नितीश हा पर्याय समोर ठेवला गेला आणि लोकांनी स्विकारला. तेच राष्ट्रीय पातळीवर करावे लागेल. पण त्यासाठी एकदिलाने व एकजुटीने एकाच नेत्याच्या मागे पर्याय म्हणून उभे रहावे लागेल. जे एका पक्षात राहून शक्य नाही, ते विविध दोन डझन पक्षांची आघाडी करून शक्य होईल काय? मोदी दुय्यम असून तुमचा विस्कळीतपणा घातक आहे. त्यावर कशी मात करणार?

6 comments:

  1. भाऊ ..लेख नेहमी प्रमाणे मस्तच ....!! चित्रहि लेखाला साजेसेच ...........!! चित्र बघून काही ओळी गुणगुणाव्याश्या वाटतात ........' थकेले थकेले कहा जा रहे हो ......?

    ReplyDelete
  2. पंकजाताईंच्या सेल्फीबाबत काहीतर लिहा.

    ReplyDelete
  3. हे कसले "समाजवादी". हे तर "माज वादी".
    संघ जरी यांच्या मागे उभा राहीला तरी हे मोदींना
    आता हरवू शकत नाहीत. ही खेकड्याची जात आहे.

    ReplyDelete
  4. छान भाऊ मस्त

    ReplyDelete
  5. Bihar/UP chi janata ajunhi jaati pali kade voting karat nahi. Tyamule hyanche faavle.
    Jar Bihari janatene Nitish/Lalu hyancha sweekar kela tar "Jaisi praja, taisa raja" jhaale.
    They will get what they deserve! Nitish ni pan kaam khup kele aahe. Pan varyachi disha olakhta aali nahi. Ekunach avghad paristhiti aahe.

    ReplyDelete
  6. भाऊ अत्यंत म॔मभेदी लेख
    जेव्हा पासून लोकसभा निवडणुकीत मोदी नावाच्या तुफानाने मिडियाच्या मोदींना लोकसभे पय॔ंतं न पोहचण्या साठी च्या गेली 4-5 वष्रे पासुन चाललेल्या हरएक प्रयत्नाना सुरुंग लावला तेव्हा पासुन मिडियाने गनिमी काव्याचा वापर करण्याचा प्रयत्‍न केला आहे. ज्या संघ परिवाराचा या यशा मागे हात असल्याचा दावा केला जातो (अनेकांना वाटते व खुद्द संघ कार्यकर्त्यांना वाटते कि आपल्या मुळेच भाजपा/मोदींना यश मिळाले परंतु सामान्य माणसाला जरी संघाच्या सामाजिक कार्याची जाणीव आहे तरी हा गेली हजारो वर्षे यांच्याच/यांच्यातील पुरोहीती जे उपाहासी /बहिष्कृत करणारे / बळी ठरवणारे/अन्याय करणार्‍या (पुरोहीता कडे बघुन नव्हे (सहज वत॔मानपत्रांवर नजर टाकली तर राज्याच्या याच समाजाच्या मंत्र्याच्या जेवणावळी च्या बातम्या पसरवण्यात यशस्वी झाले आहेत ( व इतिहासाने ह्याच समाजाच्या अती पराक्रमी पिढ्या पाठोपाठ विलासी व भावकिने/सग्यासोयरयांच्या लुडबुडीने मरहाटी राज्य बुडवलेले पाहिले आहे) बहुजन समाजाने (ह्यात पुरोहीती समाजा व्यतिरिक्त इतर समाज येतो) मोदी यांच्या कणखर, विकासी, सोशल मिडियाचा प्रभावी वापर व अल्पसंख्यांक चे लंगुचालन न करणाऱ्या नेतृत्वा कडे बघुन प्रचंड बहुमताने निवडून दिले. व मिडियाने लोकसभा निवडणुकी न॔तर याच संघाच्या आदेशानुसार सध्याचे भाजप सरकार चालते अशी भावना जनमानसात रुजवली.

    त्याच बरोबर विधान सभा निवडणुकी पासुन मिडियाने एका बाजूने मोदींना परदेशी वारी पर्यटक म्हणून बदनाम करुन दुसर्‍या बाजूने समाजातील सर्वात शेवटच्या थरातील माणूसाला या सरकारने/ परदेशी फेर्‍यानी तुम्हाला काय दिले व संघ प्रमुखांच्या आरक्षण विषयक विधानाचे भांडवल करून, दादरि प्रसंग व त्यां वरील भाजप कार्यकर्त्यांच्या प्रतिक्रिया घेउन लोकसभेला भरभरून मतदान करणाऱ्या ह्याच बहुजन समाजाची मते फिरवण्यात मिडीया यशस्वी झाला. व काही राज्यांतील भाजपा च्या पराभवा मध्ये मोठे यश मिडिया ने मिळवले.
    त्यामुळे यापुढे भाजपला सर्व समावेशक व आपण अनेक वेळा सांगितल्या प्रमाणे स्थानिक चेहरा देणे आवश्यक आहे.

    आपण गेली 60 वष्रे सत्ता उपभोगणारया पक्षा प्रमाणे थेट देश नेतृत्वा बरोबर संपर्क असणाऱ्या तालुका पातळीवरील कार्यकर्ते निर्माण केलेले दिसत नाहीत. य (कदाचित भ्रष्टाचार अरोपाला घाबरुन अंतर ठेवत असेल)
    तसेच आत्मकेंद्रीत, स्वार्थी व अजुनही सेलिब्रिटी सिनेकलाकाराना निवडून देणार्‍या साउथ इंडियन (आपला गैरसमज आहे की साउथ इंडियन हे सुशिक्षित आहेत परंतु त्यांनी दशकानुदशके फिल्मी नेत्यांना निवडून दिले आहे व एकही वेळा या मद्रशानी राष्ट्रीय कैउला/लाटे प्रमाणे मतदान केले नाही ) साउथ इंडियन याना सुशिक्षित करुन राष्ट्रीय प्रवाहात सामील केले पाहिजे. व सक्षम परंतु राष्ट्रीय लोकभावनेत साथ देणारे साउथ मधे स्थानिक नेतृत्व तयार करणे आवश्यक आहे.
    अमुल शेटे पनवेल

    ReplyDelete