Monday, January 1, 2018

बदमाशांची टोळी

Image result for kumar arawind ashutosh

चार वर्षापुर्वीच्या लोकपाल आंदोलनातून आम आदमी पक्ष नावाची एक संघटना जन्माला आली. तिची व्याप्ती मुळातच दिल्लीपुरती होती. स्थानिक पातळीवर काम करत आपले स्थान व समर्थक निर्माण करणार्‍या अरविंद केजरीवाल यांनी अण्णा हजारे व तत्सम इतरांचा खुबीने वापर करून, ह्या पक्षासाठी पाया तयार केला होता. शिवाय त्यांनी माध्यमातील काही मुखंडांना हाताशी धरूनही आपली प्रतिमा उभारून घेतली होती. जेव्हा असा काही तमाशा सुरू होतो, तेव्हा आसपासचे रिकामटेकडे त्यामध्ये अलगद सामील होतात आणि भरकटतात. प्रशांत भूषण नावाचे अनुभवी वकील, किंवा योगेंद्र यादव यांच्यासारखे अभ्यासू प्राध्यापक त्यात सहभागी झाले. किरण बेदी यांच्यासारख्या जाणात्या प्रशासकीय अधिकारी व कुमार विश्वाससारखे लोकप्रिय कविही त्यात स्वत:ला झोकून मोकळे झाले. इतका तमाशा रंगल्यावर मेधा पाटकर किंवा इतर काहीजणांचे राजकीय ब्रह्मचर्य संपुष्टात आले नसते, तरच नवल होते. पण या लोकांना उल्लू बनवण्याची क्षमता असलेल्या केजरीवाल वा दिल्लीतल्या भामट्या संपादक पत्रकारांना तितक्या सहजपणे सामान्य भारतीय मतदाराला मुर्ख बनवता आले नाही. मात्र अन्य बुद्धीमान बेअक्कल तरीही केजरीवाल यांच्या मोहजालात गुरफ़टून पडलेले होते आणि त्यांचा पुरता लाभ केजरीवाल घेत होते. आपण सामान्य माणसे पुढच्याच ठेच मागचा शहाणा, ह्या नियमाने वागतो. समोरच्या कोणाला दणका बसला तर सावध होऊन जातो. पण शहाण्यांना प्रत्येक अनुभव स्वत:ला घेऊनच मरायची हौस असते. तसे नसते, तर कुमार विश्वास या हुशार कविवर्याला आज इतके अपमानित होऊन बसावे लागले नसते. ज्या केजरीवालचे ढोल वाजवले, तोच चांगुलपणाचे बारा वाजवताना हतबल होऊन सहन करण्याची वेळ भूषण यादव यांच्यावर आली नसती, की आज कुमार विश्वास यांच्यावर आली नसती. 

अण्णांशी फ़ारकत घेऊन केजरीवाल यांनी राजकारणात उडी घेतली, तेव्हा किरण बेदी यांनी त्यांची साथ सोडली होती. पण इतर मंडळी त्यानाच चिकटून बसली होती. त्यात पहिला भ्रमनिरास शाझिया इल्मी व काही लोकांना झाला आणि त्यांनी नाराजी बोलून दाखवायला सुरूवात केली. तर केजरीवाल यांनी कुटीलपणे त्यांचा परस्पर काटा काढला होता. मग जी काही नाटके रंगवली त्यात टाळ्या पिटणारे म्हणून भूषण, यादव किंवा विश्वास यांचाही उपयोग करून घेतला. मात्र दुसर्‍यांदा विधानसभेत यश मिळवल्यानंतर एकेकाला केजरीवाल खड्यासारखे बाजूला करत गेले. भूषण-यादव यांना तर रितसर गुंड अंगावर घालून पळवून लावण्यात आले. खरे तर त्यावेळीच कुमार विश्वास यांनी सावध होण्याची गरज होती. भूषण यांनी आपल्या खिशातून एक कोटी रुपये देणगी देऊन पक्षाच्या कार्याला आरंभ करून दिलेला होता. त्यांच्यावर केजरीवाल यांनी नंतर पक्षच बळकावत असल्याचा आरोप करून पळवून लावले होते. जे केजरीवाल मुख्यमंत्री म्हणून भ्रष्ट साथीदारांना पैसे खाण्याची व गरीबांची लूट करण्याची मुभा देत होते, त्यांनी भूषण यांच्यावर आरोप करण्यातला धडधडीत खोटेपणा बघूनही नजरेआड करण्यातून विश्वास यांनी आपली विश्वासार्हता संपवली होती. आपली प्रतिमा उभी करण्यासाठीच केजरीवाल यांना अशा प्रतिष्ठीतांची गरज होती. ती सार्वजनिक ओळख निर्माण झाल्यावर हे सर्व लोक निव्वळ अडगळ झाली होती. त्यांनी आपणहून बाजूला व्हावे ही अपेक्षा पुर्ण झाली नाही, तेव्हा केजरीवालनी त्यांन जवळपास धक्के मारून पक्षातून हाकून लावले. मग आपला पुढचा नंबर आहे याचे भान विश्वासना आलेले नसेल, तर त्याचे खापर केजरीवाल यांच्या माथी मारण्यात अर्थ नाही. कधीतरी आपल्यालाही सत्तेची फ़ळे चाखता येतील, या आशेवर पक्षामध्ये टिकून रहाताना विश्वास यांनी ठेवलेला विश्वास आता संपला आहे.

दिल्लीच्या ७० आमदारांच्या विधानसभेतून दर सहा वर्षांनी राज्यसभेच्या तीन सदस्यांची निवड होत असते. यावर्षी त्या तीन जागा मोकळ्या होत असून, विधानसभेत ६७ आमदार असलेल्या आम आदमी पक्षाला सर्व म्हणजे तिन्ही जागा जिंकणे शक्य आहे. पण तिथे कोणाला उमेदवारी मिळणार हा गहन प्रश्न आहे. राज्यसभेमध्ये जाणार्‍या व्यक्तीला अधिकारही मिळतात आणि म्हणूनच असा सदस्य दिल्लीच्या मुख्यमंत्र्या इतका प्रभावशाली होऊ शकतो. केजरीवाल यांना तिथेच अडचण आहे. आपण सोडून पक्षात इतर कोणाचे महात्म्य असता कामा नये, असा त्यांचा हव्यास आहे. म्हणूनच त्यांनी वर्षभर शक्ती पणाला लावून पंजाब विधानसभा जिंकण्याचा प्रयास केला होता आणि तिथला मुख्यमंत्री होण्याचे मनसुबे रचले होते. पण ते धुळीस मिळाले. लोकसभेतले चारही पक्ष सदस्य पंजाबचे आहेत आणि त्यातला कोणी केजरीवालना दाद देत नाही. म्हणूनच आता त्यांना संसदेचा स्वपक्षीय कोणीही सदस्य नको आहे. कुमार विश्वास त्याच आशेवर होते आणि त्यांची संधी हुकलेली आहे. किंबहूना अशा कुठल्याही सहकार्‍याला खासदारकी द्यायची नाही, म्हणून केजरीवाल यांनी वेगळी शक्कल लढवली होती. पक्षाबाहेरचे कोणी नामवंत घेऊन त्यांनाच आपतर्फ़े राज्यसभेत पाठवण्याची कल्पना मांडलेली होती. पण रघुराम राजन, माजी न्यायमुर्ती ठाकुर वा नोबेल विजेते कैलाश सत्यार्थी; अशा लोकांकडे तशी विचारणा करण्यात आलेली होती. पण केजरीवालना वाटले तितके ते बुद्दू नाहीत. आपला भूषण वा योगेंद्र होण्याचा धोका त्यांना कळतो. म्हणूनच त्यांनी विनम्रपणे ही ऑफ़र नाकारली. मात्र त्यात केजरीवाल यांचा सहकार्‍यांना वंचित ठेवण्याचा डाव उधळला गेला आहे आणि आता अर्ज भरण्याची मुदत जवळ आल्याने उमेदवार उभे करण्याची धावपळ झालेली आहे. त्यातून पक्षाची घालमेल समोर आलेली आहे.

आता मुदत संपण्यापुर्वी तीन उमेदवार मैदानात आणणे भाग आहे. त्यात विश्वास यांची वर्णी लागावी, म्हणून त्यांच्या समर्थकांनी पक्षाच्या कार्यालयाच्या बाहेर धरणे धरले आणि त्याविरुद्ध पक्षानेच पोलिसात तक्रार नोंदवली. यामुळे एक गोष्ट लक्षात येते, की कुठल्याही अन्य पक्षाच्या नेत्यापेक्षाही केजरीवाल व त्यांच्या पक्षाचे नेते अधिक निर्ढावलेले आहेत. ते अशा धरण्याला घाबरून बदलतील, अशी अपेक्षा बाळगता येत नाही. ‘पुरूष’ नावाच्या मराठी नाटकामध्ये असा बेशरम राजकीय नेता नाना पाटेकरने रंगवलेला आहे. ज्या तरूणीवर बलात्कार केला, तिचा पिता गांधीवादी थाटात त्या पुढार्‍याला दारात सत्याग्रह करण्याची धमकी देतो. तर पुढारी झालेला नाना उत्तरतो, अहो मास्तर सत्याग्रहाला घाबरणारे देश सोडून १९४७ सालातच विलायतेला निघून गेलेत. आम्ही सत्याग्रहाला घाबरत नाही. केजरीवाल त्याच वंशातले पुढारी आहेत. म्हणूनच सहकारी मंत्री बलात्कार खोटी प्रमाणपत्रे देऊन वा लाच मागून मोकळे झाले असताना; केजरीवाल अजून स्वच्छ राजकारणाचे हवाले देतातच ना? अशा बदमाशाकडून सभ्य वर्तनाची अपेक्षा कुमार विश्वास बाळगत असतील, तर ते मुर्खाच्या नंदनवनात बागडत असतात. लोकपाल आंदोलनाचे पावित्र्य कधीच संपले आहे. म्हणून तर अण्णांनी कालपरवा नव्या आंदोलनाची घोषणा करतानाच त्यातून नवा केजरीवाल जन्माला येऊ नये, अशी प्रार्थना केलेली आहे. त्याचा अर्थ कोणालाही सहज लक्षात येऊ शकतो. असली आंदोलने वापरून त्यात घुसलेले बदमाश मायावी सैतानाचा अवतार धारण करतात, असेच अण्णा सांगत नाहीत काय? विश्वास या कविला तेही उमजत नसेल तर त्याची कींव करावी लागेल. बदमाशांच्या टोळीत नव्या टोळीची भर, यापेक्षा केजरीवाल टोळीची अन्य ओळख असू शकत नाही. प्रचलीत राजकारणी परवडले, इतके या लोकांनी राजकारण बदनाम केलेले आहे.

2 comments:

  1. bhau trumpne pakchi rasad todli. aata parat baloch aandolan tej honar tyawar lihave hi vinanti

    ReplyDelete
  2. कोरेगाव भीमा दंगली वरती लेख लिहावा

    ReplyDelete