Sunday, January 14, 2018

हर शाख पे पप्पू बैठा है

बर्बाद गुलिस्ताँ करने को बस एक ही उल्लू काफ़ी था
हर शाख़ पे उल्लू बैठा है अंजाम-ए-गुलिस्ताँ क्या होगा

ullu के लिए इमेज परिणाम

कुणा प्रसिद्ध शायराचे हे काव्य आहे. एखाद्या सुंदर बगिच्याला उध्वस्त करण्यासाठी एकच घुबड पुरेसे असते. पण जिथे एकच घुबड नव्हेतर प्रत्येक झाडावर आणि प्रत्येक फ़ांदीवर घुबड बसलेले आहे, त्या नंदनवनाचे काय होईल? असा त्या काव्याचा साधसरळ आशय आहे. काव्य ही काही प्रमाणात अतिशयोक्ती असते. म्हणूनच त्यात काही तथ्य असेल असे मानायचे कारण नाही. पण त्यातला आशय महत्वाचा आहे. जिथे एखादा माणूस चुका करत असेल तर ती चुक निस्तरूनही नेता येऊ शकते. पण चुकाच करणार्‍यांचा जमाव समोर जमलेला असेल, तर विध्वंसाला पर्याय नसतो असा त्याचा आशय आहे. ज्या संस्था संघटनेत वा समाजात एकाहून एक मुर्खांचाच भरणा असतो, त्याला विनाशापासून कोणी वाचवू शकत नाही असेच कवीला सुचावायचे आहे. जगात घडणार्‍या घटना अनेकदा त्याची प्रचिती घडवत असतात. कालपरवा सुप्रिम कोर्टाच्या चार ज्येष्ठ न्यायमुर्तीं आजवरचा पायंडा सोडून जाहिरपणे माध्यमांच्या समोर आले आणि त्यानंतर त्यात उडी घेतलेल्या कॉग्रेस आणि पुरोगाम्यांची जी दुर्दशा झाली, ती या काव्याचे स्मरण करून देणारी आहे. अवघ्या चार वर्षापुर्वी कॉग्रेस या देशात सत्ता राबवित होती. तीन दशकांपुर्वी कॉग्रेसला आव्हान देऊ शकेल असा कुठला राजकीय पक्ष देशात उभा राहू शकत नव्हता. त्याच शतायुषी पक्षाला आज कुठल्याही महत्वाच्या घटना वा विषयात ठामपणे कुठला निर्णय घेऊन काम करणेही अशक्य होऊन बसले आहे. या ताज्या घटनाक्रमातही कॉग्रेससह तमाम पुरोगाम्यांना तोंडघशी पडायची वेळ आली. कारण प्रत्येक फ़ांदीवर बसलेल्या घुबडांनी उत्तम संधी मातीमोल करून टाकलेली आहे. त्यामागे किती कारस्थान होते वा नव्हते, त्याचा थेट कुठला पुरावा नाही. पण ज्या हेतूने तमाम पुरोगामी गट आखाड्यात उतरले, त्यांनी आपल्याच कृतीतून आपली नाचक्की करून घेतली.

तीन वर्षापुर्वी संशयास्पद रितीने मृत्यू झालेल्या न्या. लोया यांचे प्रकरण उकरून काढून मोदी व भाजपाला गोत्यात घालण्याचा खेळ चालू झाला होता. कारवान’ नामक एका नगण्य नियतकलिकातून त्याला वाचा फ़ोडणारा लेख प्रसिद्ध झाला. मग वेगवेगळ्या क्षेत्रात दबा धरून बसलेल्या पुरोगाम्यांनी त्यावरून काहुर माजवण्याची मोहिम हाती घेतली. गुजरातमध्ये बारा वर्षापुर्वी झालेल्या एका चकमकीला खोटे ठरवुन त्यात विद्यमान भाजपा अध्यक्ष अमित शहांना गोवण्याचा खेळ रंगलेला होता. त्याचा खटला न्या. लोया यांच्यासमोर चालू होता आणि त्यांचाच संशयास्पद मृत्यू झाल्याने त्यामागे शहांचाच हात असल्याचे सिद्ध करण्याचा हा डावपेच असणार, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. पण अपेक्षेपइतका त्या गौप्यस्फ़ोटाला माध्यमातून प्रतिसाद मिळाला नाही. उलट त्या खळबळजनक कथेतील फ़ुसक्या गोष्टीचेच काही वर्तमानपत्रे व वाहिन्यांनी पोस्टमार्टेम केले. त्यामुळे फ़सलेला डाव अधिक स्फ़ोटक करण्यासाठी मग त्या मृत्यूच्या न्यायालयीन चौकशीची मागणी पुढे करण्यात आली. त्यासाठी एका गटाने मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली आणि त्यावर निर्णय होण्य़ाआधीच दुसर्‍याने सुप्रिम कोर्टात तशीच याचिका दाखल केली. ती याचिका कोणा न्यायमुर्तीकडे सुनावणीला देण्यावरून सुप्रिम कोर्टाच्या ज्येष्ठ न्यायमुर्तीमध्ये बेबनाव झाल्याचा देखावा छानपैकी उभा करण्यात आला होता. योगायोग असा, की त्याच दिवशी एका इंग्रजी दैनिकात त्याच याचिकेत गुंतलेल्या ज्येष्ठ वकिलाचाही नेमका त्याच पक्षपाताविषयीचा लेख प्रसिद्ध झालेला होता. मग न्यायाधीशांनी त्याच दिवशी बंडाचे निशाण फ़डकावले. मग काय लोया मृत्यू प्रकरणामुळेच सुप्रिम कोर्टातही गदारोळ माजल्याचा कांगावा करायची मोकळीक मिळाली. पण या एकूण नाट्याचे सुत्रसंचालन कोण करत होता, त्याचा थांगपत्ता नव्हता.

रंगमंचावर विविध पात्रांनी येऊन कुठलेही संदर्भहीन संवाद फ़ेकावेत आणि अराजक माजावे, तशी एकूण स्थिती काही तासातच तयार झाली. कॉग्रेसचे हितचिंतक म्हणून बहुतेक वाहिन्यांवर हजेरी लावणारे तहसिन पुनावाला यांनी हा अर्ज सुप्रिम कोर्टात केला होता. त्यांची बाजू तिथे मांडणार्‍या दुष्यंत दवे यांनीच त्या दिवशी लेख लिहीला होता. मात्र त्यावर कोर्टामध्ये बाजू मांडण्यापेक्षा त्यांचा पुनावाला यांच्याशी खटका उडाला. कारण तो अर्ज मागे घ्यावा, असे दवे यांचे मत होते. त्याला पुनावाला राजी नव्हते, म्हणून दवे यांनी बाजू मांडण्यास नकार दिला होता. पण स्वतंत्रपणे त्याच सुनावणीला हजर राहून त्यांनी हा अर्ज फ़ेटाळण्याचा युक्तीवाद त्याच कोर्टामध्ये केला. त्या खंडपीठाचे न्यायमुर्ती संशयास्पद असल्याने अर्ज मागे घेण्यासाठी दवे यांनी आपल्यावर दडपण आणले, असाही पुनावाला यांचा दावा आहे. याविषयी कुठलाही समाधानकारक खुलासा दवे करू शकले नाहीत. त्यांचे मत असे होते, की मुंबई हायकोर्टात तोच विषय असल्याने सुप्रिम कोर्टाने त्याची दखल घेऊ नये. इथपर्यंत गोष्टी मान्य करता येतील. पण ज्या वकीलाच्या मनातच खंडपीठाच्या न्यायाधीशाविषयी संशय वा आकस आहे, त्याने तिथे युक्तीवाद कशाला करावा? त्यामुळे त्या वकीलाचे वर्तन शंकास्पद होत नाही काय? सरन्यायाधीश ठराविक विषय ठराविक न्यायाधीशांकडेच सोपवतात, हा यातला कळीचा मुद्दा आहे. पण मग दुष्यंत दवे तरी पुनावाला यांना कोणता वेगळा सल्ला देत होते? आपल्याला हवा असलेला निकाल देऊ शकणार्‍या न्यायाधीशापुढेच खटला चालला पाहिजे, असाच त्यांचा आग्रह दिसत नाही का? म्हणजे न्यायपीठ आधीच निवडून तिथे खटला चालवण्याचे फ़िक्सींग कोण करू बघतो वा करतो? तशी अपेक्षा कोण बाळगताना दिसतो आहे? यात कोणी भाजपावाला नाही. पुनावाला वा दवे दोघेही भाजपाचे कट्टर विरोधक आहेत. मग त्यांच्यात सुसंगत वर्तनाची काळजी कोणी घ्यायला हवी होती?

न्यायमुर्तीचे बंड व त्याला लोया मृत्यूची पार्श्वभूमी हे सनसनाटी नाट्य होते यात शंकाच नाही. पण त्यातली बहुतेक पात्रे संहिता व संवाद सोडून भलतेच बोलत वागत होती ना? अशा स्थितीत बंड करणार्‍या चेलमेश्वर या न्यायाधीशांनी राजकीय नेता डी. राजा यांना भेटण्याची काय गरज होती? राजांचा हा उतावळेपणा त्या बंडाला राजकीय रंग चढवणारा ठरला आणि त्यातली न्यायाची लढाई संपून गेली. दोन पुरोगामी वा कॉग्रेसवाल्यांच्यातला बेबनाव त्यातला डाव उघडा पाडून गेला. दुष्यंत दवे, डी. राजा, पुनावाला यांचा गोंधळ पुरेसा नव्हता म्हणून की काय, राहुल गांधींनी कॉग्रेस नेत्यांशी तातडीची बैठक बोलावून संध्याकाळी पत्रकार परिषद घेणार असल्याचे जाहिर करून टाकले. पण पुढल्या चारपाच तासात चित्र इतक्या वेगाने बदलत गेले, की त्या घटनाक्रमाविषयी जाहिर मतप्रदर्शन कॉग्रेसला अधिकच अडचणीत आणणार हे लक्षात आले. पत्रकार परिषदेसाठी आपल्या तमाम कायदेपंडीत नेते वकीलांच्या तोफ़ा राहुलनी तैनात केल्या होत्या. पण प्रत्यक्षात कृतीची वेळ आल्यावर कुठलीही प्रश्नोत्तरे केल्याशिवाय नुसत्या चार ओळींच्या निवेदनावर पत्रकार परिषद गुंडाळावी लागली. अनेक दिवसांचे प्रयत्न व नियोजन करूनही रंगवलेला नाटकाचा पहिला प्रयोगच पुरता तोंडघशी पडला. कारण या नाटकाच्या नेपथ्यामध्ये योजलेल्या नंदनवनाच्या प्रत्येक झाडावर फ़ांदीवर पप्पूच बसलेले होते. प्रत्येकजण इतका शहाणा होता, त्याला अन्य कुणाचे काही ऐकून काही करण्यापेक्षा आपली अक्कल चालवण्याची घाई झाली होती. त्यात नाट्यप्रयोग पुरता फ़्लॉप होऊन गेला. झाले ते कमी म्हणून की काय, आता प्रकाश करात यांनी याच चार न्यायाधीशांसमोर अयोध्येची सुनावणी चालवा असेही अकलेचे तारे तोडलेले आहेत. काही प्रसंग असे असतात, जिथे बोलण्याची नव्हेतर गप्प बसून काही सांगण्याची गरज असते. पण जातीवंत जनेयुधारी पप्पूंना ते कोणी कसे समजवावे?


7 comments:

  1. Bhau
    You said who is behind this is not known however There r videos showing one of these meeting D Raja & there was news that RAGA was upset on D Raja as because of him they got exposed.
    Also there was news that its planned Intolerance Part - 3 & Cong has spent 75 crores for this as per twits by Dr. Gaurav Pradhan. He twited a sires where he exposed all this game & Also mentioned the Timing of this Game when RAGA returned from bahrain. Whenever he returns from Holidays you see a new Drama in the country.

    So I request you Bhau to Expose this nexus also so our readers will be aware of it too.



    ReplyDelete
  2. भाऊ,
    तुम्ही संक्रांतिलाच "शिमगा" साजरा केलात.
    संक्रांतीचे निमित्त जमाते पुरोगामी विषयी चार गोड शब्द आपल्या लेखणीतून झरतील अशी अपेक्षा होती.
    फोटोमधील घुबडांचे चेहेरे ओळखीचे दिसले.

    ReplyDelete
  3. Bhau tya 4 judges ni aaj purna maghar ghetaliy.paryaych nawta karan natakamadhun ji sahanubhuti milayachu iccha hoti ti geli.yat modinchi statmanship disali ni rahulchi immaturity.

    ReplyDelete
  4. भाऊ,
    "पप्पू" संबोधल्यामुळे घुबडांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. ते तुमच्यावर खटला दाखल करणार व न्यायालय रात्री उघडायला लावणार आहेत.

    ReplyDelete
  5. Atishay sunsar vivechan aani satyata tar nehemich asate Bhau tumachya likhanat.

    ReplyDelete