प्रविण तोगडिया हे हिंदूत्ववादी संघटनांमध्ये सर्वाधिक भडक बोलणारे नेते मानले जातात. सोमवारी अकस्मात ते गायब झाल्याच्या वावड्या उठल्या आणि काहीवेळाने ते शुद्ध हरपल्याने कुठेतरी बेशुद्धावस्थेत आढळले. त्यांना कोणीतरी इस्पितळात उपचारासाठी दाखल केले. मंगळवारी त्यांनी त्याच इस्पितळातुन पत्रकारांशी संवाद साधला आणि आपली चकमक व्हायची होती, असा सनसनाटी आरोप केला. सहाजिकच त्यांना सर्व वाहिन्यांवर तात्काळ प्रसिद्धी मिळाली. गुजरातचे रहिवासी तोगडिया नेहमी पुरोगाम्यांच्या हल्ल्याचे केंद्र राहिले आहेत. त्यांना अटक करण्यापासून तुरूंगात डांबण्यासाठी प्रत्येक पुरोगामी संघटनेने मागणी केलेली आहे. असे तोगडीया संघ परिवाराचे सदस्य असून विश्व हिंदू परिषदेने नेते मानले जातात. हिंदू संघटना करताना मुस्लिमांच्या विरोधात अतिशय कडवी भाषा बोलणारे म्हणून ते प्रसिद्धीच्या झोतामध्ये आले. गुजरात दंगल भडकली व मोदींना हटवण्याच्या मागणीने जोर धरला, तेव्हा तोगडीया चालतील काय, असाही डिवचणारा प्रश्न विचारला जात होता. असे तोगडिया आता अकस्मात कॉग्रेसला आपुलकीचे वाटू लागले आहेत. त्यांची प्रकृती गंभीर असताना कोणीही भाजपा नेता त्यांना भेटायला इस्पितळात गेल्याचे कोणीही दाखवले नाही. पण तितक्याच अगत्याने पटेल समाजाचे नेते व कॉग्रेसचे हितचिंतक हार्दिक पटेल त्यांना भेटायला पोहोचले. त्यावर चर्चा चालू झाली, इतक्यात कॉग्रेसचे गुजरातचे ज्येष्ठ नेते अर्जुन मोधवाडीयाही इस्पितळात जाऊन पोहोचले. थोडक्यात नुकत्याच संपलेल्या विधानसभा निवडणूकीपुर्वी राहुल गांधींनी जे हिंदुत्वाचे रुप धारण केलेले आहे, त्याला फ़ळे येऊ लागली आहेत. कदाचित जनेयुधारी राहुलनी केलेल्या नवसाला सोमनाथ पावला म्हणायचा. अन्यथा प्रविण तोगडियांच्या प्रकृतीची चिंता कॉग्रेस नेत्यांना कशाला वाटली असती? आता हिंदू पुरोगामीत्व हळुहळू साकार होऊ लागल्याची ही चिन्हे आहेत.
गुजरात विधानसभा प्रचार काळात राहुल गांधी एकामागून एक मंदिरांच्या पायर्या झिजवू लागले आणि त्याविषयी प्रश्न विचारले जाऊ लागले. तेव्हा खुलासा करताना कॉग्रेसच्या अधिकृत प्रवक्त्याने राहुल हे जनेयुधारी हिंदू व त्यांचे घराणे शिवभक्त असल्याचे स्पष्टीकरण दिलेले होते. दुसरे कॉग्रेसनेते राब बब्बर यांनी अमित शहा वा मोदी खरे हिंदू नसल्याचाही आरोप केलेला होता. त्यामुळे कॉग्रेसची हिंदूत्वाकडे वाटचाल सुरू झाल्याची चर्चा होती. आता तर प्रविण तोगडियांनाही तसेच वाटू लागलेले दिसते. अन्यथा त्यांनी इस्पितळातून पत्रकार परिषद घेऊन ‘पुरोगामी हिंदुत्ववादी’ नेत्यांना कशाला आमंत्रण दिले असते? तोगडियांनी आपण का गायब होतो व मध्यंतरी काय घडले, त्याची कथा वाहिन्यांच्या कॅमेरासमोर कथन केली. त्यामुळे जनेयुधारी कॉग्रेसला आपला मसिहा तात्काळ मिळाला. एका मंदिरात पूजा करीत असताना एक फ़ोन आला आणि गुजरात व राजस्थानचे पोलिस आपल्याला चकमकीत ठार मारण्यासाठी निघाल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे फ़ोन बंद करून आपण मंदिरातून बाहेर पडलो आणि रिक्षाने निसटण्याचा प्रयत्न केला. वाटेत आपल्याला घाम आला व आपली शुद्ध हरपली, असे तोगडियांनी सांगितले. त्यांनी नाव घेऊन कोणावर आरोप केलेला नाही. पण त्यांचा रोख भाजपाचे नेते व पंतप्रधान मोदी यांच्याकडे असल्याचे स्पष्ट दिसते. कारण ज्या दोन राज्यातील पोलिस चकमक करणार असे तोगडिया म्हणतात, तिथे भाजपाचे राज्य असून सोहराबुद्दीन चकमकीत याच दोन राज्यातील पोलिसांना आरोपी बनवले गेलेले होते. त्यात भाजपाचे अध्यक्ष अमित शहांचेही नाव गोवले गेलेले आहे. सध्या गाजत असलेले न्या. लोया मृत्यू प्रकरणही त्याच चकमकी संबंधातले आहे. नेमक्या अशा वेळी तोगडियांनी त्याच दोन राज्यांच्या पोलिसांवर चकमकीचा आरोप ठेवावा याला योगायोग मानता येत नाही.
आपण हिंदूत्वाचा प्रचार करतो व आपण हिंदूंचे संघटन करतो, तर आपला आवाज दाबला जात आहे अशी पुस्तीही तोगडियांनी जोडलेली आहे. मागल्या तीन वर्षापासून देशात इतरांचा आवाज दाबला जातो अशी तक्रार पुरोगामी करीतच आहेत. आता तोच आरोप विश्व हिंदू परिषदेचा नेता करतो, त्याची म्हणूनच गंमत वाटते. देशाला हिंदूराष्ट्र बनवण्य़ाचे कारस्थान राबवले जात असल्याची पुरोगामी तक्रार आहे आणि दुसरीकडे त्या़च कारस्थानाचा प्रचारक मानला जाणारा नेता तोगडिया आपलाही आवाज दाबला जात असल्याचा आरोप करत आहे. याला विरोधाभास म्हणायचे की योगायोग म्हणायचे? कारण तोगडियांचे शब्द खरे मानायचे, तर इथल्या पुरोगामी लोकांनी अशा सरकारला डोक्यावर घेतले पाहिजे. कारण त्यांना हिंदूत्व रोखणारे सरकार हवे आहे. किंवा तोगडियांच्या मते देशातील यापुर्वीचे युपीएचे पुरोगामी सरकार त्यांचा आवाज दाबत नव्हते व हिंदूत्वाचा खुलेआम प्रचार करण्याची मोकळीक होती. यातील कोणाचे काय खरे मानायचे, असा प्रश्न आहे. यापुर्वी तोगडीयांना सुरक्षित वाटत होते, तर त्यांनी २०१४ पुर्वी खुलेआम राजकीय मैदानात येऊन मोदी विरोधात दंड थोपटायला हवे होते. कारण बाकीचे जग मोदींना उशिरा ओळखू लागले, तोगडिया मोदींना मुख्यमंत्री होण्याच्या आधीपासून व नंतर बारा वर्षे ओळखून आहेत. सहाजिकच मोदी पंतप्रधान झाल्यास देशाला हिंदूराष्ट्र बनवण्यात मोठी अडचण येईल, हे त्यांना नक्कीच ठाऊक असणार. सहाजिकच त्यांना मुक्तपणे बोलण्याची व संघटन करण्याची संधी देणार्या युपीए सरकारला वाचवण्यात हिंदूहित सामावलेले होते आणि त्यासाठी तोगडियांनी झटायला हवे होते. उलट तेव्हा तोगडिया गप्प राहिले असतील, तर त्याला हिंदूराष्ट्र निर्मीतीतला मोठा दगाफ़टका म्हणावा लागेल ना? पण तसे काही चार वर्षापुर्वी तोगडिया कधी बोलले नव्हते.
जेव्हा नरेंद्र मोदी लोक्सभेच्या आखाड्यात उतरले, तेव्हा कधीही तोगडियांनी त्यांचे समर्थन केलेले नाही. मागल्या चार वर्षात एकदाही त्यांनी या सरकारचे समर्थन केले नाही वा मोदींचे कौतुकही केलेले नाही. शक्य तितकी मोदी विरोधातली टिका मात्र त्यांनी केलेली आहे. निदान कालपरवाच्या गुजरात विधानसभेच्या प्रचारात तरी समोर येऊन, त्यांनी मोदी-शहांचा मुखवटा फ़ाडून टाकायला हवा होता. मोदींपेक्षा राहुल खरे हिंदू शिवभक्त असल्याची तोगडियांनी तेव्हा जाहिर साक्ष दिली असती, तर मोदी सपाटून हरले असते आणि गुजरातमध्ये हिंदूत्वाची पहाट उजाडली असती. कारण सत्ताबदलामुळे निदान गुजरातमध्ये तोगडीयांचा आवाज दाबणार्यांची सत्ता गेली असती. जनेयुधारी हिंदूत्ववादी सत्तेत आले असते आणि तोगडियांना कुठल्याही चकमकीत मारले जाण्याची शक्यताच संपुष्टात आली असती. पण त्यांनी मोक्याच्या क्षणी यापैकी काहीही केलेले नाही. आताही त्यांनी थेट आपल्याला चकमकीत मारू बघणार्यांची नावे लपवण्याचे काही कारण नाही. ज्या राज्याच्या पोलिसांची नावे घेत आहेत, तिथल्या मुख्यमंत्र्यांना गृहमंत्र्यांना अधिक त्यांच्या पक्षनेत्यांना आरोपींच्या पिंजर्यात उभे करायला काहीही हरकत नाही. जे कोणी त्यांना चकमकीची पुर्वसूचना देतात, त्यांना कोर्टात हजर करून देशात दहशत माजवणार्या सरकारचा पर्दाफ़ाश करण्यात कोणती अडचण आहे? त्यामुळे हिंदूत्वाची संघटना करण्याचा मार्ग प्रशस्त होणार असेल, तर लपवाछपवी कशाला? हिंदुत्वाच्या नावावर चालणारे सरकार इतके दगाबाज असेल, तर त्यातल्या आरोपींची नावे लपवून तोगडिया लाखो हिंदू परिषद कार्यकर्त्यांची दिशाभूल करीत आहेत. त्यांचेही जीव धोक्यात आणत आहेत. यापैकी काहीच नसेल, तर तोगडिया बेताल बकवास करीत आहेत, असेच म्हणावे लागेल. कारण त्यांनी नुसती विधाने केली आहेत आणि त्याला पुरक कुठलीही साक्ष वा पुरावा समोर आणलेला नाही.
भाऊ नमस्कार, काय चाललंय काहीच कळत नाहीये. तोगडिया सारखा माणूस जर सरकार विरोधात जाऊन अश्या प्रकारची भाषा बोलत असतील तर परिस्थिती फारच संभ्रम निर्माण करणारी आहे. 19 च्या निवडणुकीपर्यंत काय काय होणार कुणास ठाऊक...
ReplyDeleteथोडे थांबा आणि पहा,लवकच सत्य समोर आल्याशिवाय राहणार नाही.
ReplyDeleteभाऊ तोगडिया हे मुद्दाम करत असावेत (मोदींच्या इशाऱ्यावर) याची किती शक्यता आहे?
ReplyDeleteम्हणजे मोदींनी कॉंग्रेसला अहिंदू पक्ष मधून जनेयुधारी पक्ष असा बदल केलेला आहेच. आता तोगडियांच्या अश्या बोलण्यामुळे जी कॉंग्रेस त्यांना शिव्या देत होती तीच आता त्यांचे तळवे चाटत आहे. कॉंग्रेसला लोकांसमोर (आणखी) नागडं करायला हे करत असतील का?
bhau
ReplyDeletehar shakhpe bikau baithe hai
hich aapli olakh aahe.
Janatene yana maf karu naye.
2019 paryant baghayche ajun kiti vikau maal sale madhe vikla jato.
Swacchha Bharat che khare yash aahe he
संभ्रम तर आहेच परिस्थितीचा पण नेमकं काय चालू आहे कळेना... पण एक आहे मोदींच्या विरोधातील सगळेच आरोप खोटे नाही असू शकत... काही ना काही असणारच...
ReplyDeleteतोगडियांच्या बाबतीत म्हणायचं तर त्यांना फाटक्या तोंडामुळे मोदींनी त्यांना वरही येऊ दिलं नसेल... त्याचा राग म्हणून ही थेरं चालू असतील...