Monday, January 8, 2018

रिपब्लिकन ऐक्याच्या निमीत्ताने



इतिहासात रमणार्‍यांची एक वेगळी गंमत असते. त्यांना सोयीचा इतिहास खरा वाटत असतो आणि सोयीचा नसेल, तो इतिहासच नसल्याची खात्री ते बाळगून असतात. भीमा कोरेगावचा विषयच ऐतिहासिक असल्याने, त्यात अशा गफ़लती सगळीकडून झाल्यास नवल नाही. विरोधाभास असा आहे, की ज्यांनी त्याचा धुरळा उडवला, तेच आता कुठल्या कुठे गायब झालेत. मधल्या मध्ये आंबेडकरी चळवळीचे नेते व हिंदूत्ववादी यांच्यावर सगळीकडून प्रश्नांचा भडिमार चालू आहे. प्रकाश आंबेडकर त्याविषयी बोलताना सतत संयोजक समितीवर आयोजनाची जबाबदारी ढकलून अंग झटकतात. यातून एल्गार परिषद भरवण्यात कोणी आंबेडकरवादी जबाबदार नसल्याची खात्री होऊ शकते. पण या निमीत्ताने पुन्हा एकदा रिपब्लिकन ऐक्याचा विषय ऐरणीवर आणला जात आहे. या घडामोडींनंतर पत्रकारांशी रामदास आठवले यांनी वार्तालाप केला. त्यात त्यांनी ऐक्याच्या भूमिकेला दुजोरा देत, प्रकाश आंबेडकरांनी पुढाकार घ्यावा आणि आपण छोट्या कार्यकर्त्याची भूमिका घ्यायलाही तयार असल्याचे म्हटलेले आहे. हा ऐक्याचा कितवा प्रयत्न आहे, त्याचेही अशा लोकांनी स्मरण करायला हरकत नाही. कारण रिपब्लिकन ऐक्य वा आंबेडकरी चळवळीची एकजुट हा किमान अर्धशतकातला जुना विषय आहे. आज ती भाषा बोलणार्‍या अनेकांचा जन्मही झाला नव्हता, तेव्हापासून तशा एकजुटीवर चर्चा रंगलेल्या आहेत. तसे प्रयत्नही झालेले आहेत. जितक्या आवेशाने हे प्रयत्न झाले, तितक्याच आततायीपणे त्या एकजुटीला चुडही लावली गेलेली आहे. म्हणूनच पुन्हा रिपब्लिकन ऐक्याचा प्रयत्न करायचा असेल तर त्यात कोण दोस्त कोण शत्रू हे ठरवण्यापेक्षा यापुर्वीचा प्रत्येक प्रयास कसा व कशामुळे फ़सला, त्याचा तपशीलवार प्रामाणिक अभ्यास व्हावा. अन्यथा आणखी एक भ्रमनिरास आंबेडकरी जनतेच्या वाट्याला येण्यापेक्षा अधिक काहीही साध्य होऊ शकणार नाही.

बाबासाहेबांच्या निर्वाणानंतर त्यांच्या स्वप्नातला रिपब्लिकन पक्ष स्थापन करण्यात आला, तरी तो त्यांच्या संकल्पनेवर किती आधारलेला होता? लेबर पार्टी वा शेड्युल्ड क्लास फ़ेडरेशन असे प्रयोग केलेल्या बाबासाहेबांनी नव्या पक्षाची संकल्पना मांडताना, डॉ. राममनोहर लोहिया, मधु लिमये आणि आचार्य अत्रे अशा लोकांना विश्वासात घेत नवी राष्ट्रव्यापी राजकीय मांडणी केलेली होती. त्याचा लवलेश तरी पहिल्या रिपब्लिकन पक्षात होता काय? तो कशाला नव्हता? पुढे स्थापन झालेल्या रिपब्लिकन पक्षात एकाच जातीचे वर्चस्व राहिले, तरी एकवाक्यता कशाला राहिली नाही. नेत्यागणिक गट कशाला निर्माण झाले. त्याचीही उत्तरे आज पन्नास वर्षानंतर शोधली गेलेली नाहीत. किंबहूना म्हणूनच वारंवार ऐक्याच्या गर्जना झाल्या, तरी प्रत्यक्षात एकही पुढले पाऊल टाकले गेले नाही. उलट त्या प्रत्येक ऐक्यासाठी अशाळभूतपणे प्रतिक्षा करणार्‍यांचा नेतागणाने आपल्या अहंकारासाठी बळी दिल्याचा तो निराशाजनक इतिहास आहे. आताही रस्त्यावर उतरलेल्या हजारो आंबेडकरी लोकसंख्येचा बोजा खांद्यावर असल्यानेच ऐक्याच्या गोष्टी सुरू आहेत. पण ती प्रामाणिक इच्छा आहे, की लोकमताच्या दबावाखाली उभा केलेला देखावा आहे? आंबेडकरांवरची दलितांची भक्ती हे अशा नेत्यांचे भांडवल आहे. म्हणूनच तो समाज बेभान होऊन रस्त्यावर उतरला, मग नेत्यांना एकजुटीचे डोहाळे लागत असतात. त्यातून ऐक्यासाठी समिती वगैरे स्थापन केली जाते आणि पुन्हा सामान्य लोकांना एकजुटीचे गाजर दाखवून शांत केले जाते. पुढे रस्त्यावर उतरलेल्या लोकसंख्या ही आपली शक्ती असल्याचे मोठे मार्केटींग नेते करू लागतात. मागल्या पाव शतकाचा तरी तोच इतिहास आहे. प्रकाशजी वा रामदासजी यांना त्याचे स्मरण उरलेले नसेल, तर चेंबूरला नऊ कार्यकर्त्यांनी केलेल्या उपोषणाचा प्रसंग त्यांना नव्याने सांगावा लागेल.

१९८९ सालात जेव्हा राजीव गांधींच्या कॉग्रेसचा पराभव झाला व सत्ता गेली, तेव्हाची गोष्ट आहे. भाजपाचा त्या निवडणूकीने पुनरुद्धार झालेला होता आणि विजयाचा मेळावा शिवाजी पार्कवर झालेला होता. त्यातले कार्यकर्ते माघारी फ़िरत असताना चेंबूर अमर महाल येथे हाणामारीचा प्रसंग उदभवला होता. दलित वस्तीवर हल्ला व गडबड झाल्यानंतर संतापलेल्या नऊ तरूण पोरांनी चेंबूरला बाबासाहेब उद्यानात उपोषण आरंभले होते. तमाम रिपब्लिकन गटांनी एकत्र यावे, इतकीच त्यांची मागणी होती आणि आठदहा दिवसात नेते त्यांना शरण आलेले होते. त्यातून ऐक्याचे प्रयत्न सुरू झाले आणि त्याचा खरा बोलविता धनी कॉग्रेसच होती. शिवसेना-भाजप युती हे महाराष्ट्रात राजकीय आव्हान झालेले ओळखून, मुख्यमंत्री शरद पवारांनी आंबेडकरी मतांची बेगमी करण्यासाठी त्या ऐक्य प्रयत्नांचा साळसूद वापर करून घेतला. त्या बैठकांचे आयोजन व त्यातल्या निर्णयात हस्तक्षेप करायला कसे कॉग्रेस नेते व हस्तक लुडबुडत होते. त्याचा संगतवार इतिहास ज, वि. पवार यांनी पुस्तक रुपाने प्रकाशित केलेला आहे. मुद्दा इतकाच, की त्या उपोषणातून आकाराला येणार्‍या रिपब्लिकन ऐक्याला पवारांनी यशस्वीरित्या सुरूंग लावून, रामदास आठवले यांना हाताशी धरले. त्यात गवई वगैरे जुन्या पिढीचे मुळचे रिपब्लिकन नेते कायमचे निकालात निघाले. आंबेडकरी चळवळ व रिपब्लिकन पक्षाच्या नव्या नेत्यांची पिढी उदयास आली. त्यात बारा जागा रिपब्लिकन आठवले गटाला देऊन पवारांनी एकूण एकजुटीला शह दिला. कॉग्रेसच्या हातून जाऊ शकणारी सत्ता बचावण्यापलिकडे त्या उपोषण व ऐक्याने अन्य काही साधले नाही. मजेची गोष्ट म्हणजे ऐक्याचे तारू विधानसभा निवडणूकीत कोणाशी हातमिळवणी करावी, या खडकावर येऊन फ़ुटले होते. नंतर असे किती प्रयत्न व आटापिटा झाला तरी एकजुट होऊ शकलेली नाही.

पुढे पवारांच्याच जमान्यात नामांतराचा प्रश्न ऐरणीवर आला आणि पुन्हा नामांतरासाठी एकजूटीची आरोळी ठोकली गेली. तेव्हा रामदास आठवले राज्यात मंत्री होते आणि एकजुटीसाठी त्यांनी मंत्रीपदाचा राजिनामा देण्याची अट घातली गेली होती. ते साध्य झाले नाही. पण नामांतर बाबतीत तडजोड होऊन विषय निकाली निघाला आणि रिपाब्लिकन ऐक्याचा विषय पुन्हा धुळ खायला अडगळीत जाऊन पडला. एकजुट व ऐक्याच्या प्रत्येक प्रयत्नाने नवे नवे दलित नेते उदयास आले. पण दलित मते वा पक्षांची एकजुट कधी होऊ शकली नाही. युतीची सत्ता असताना रमाबाई आंबेडकर नगर दंगलीच्या नंतर तसा प्रयत्न झाला होता. पण तेव्हाही कॉग्रेसी खेळीने त्यात यश येऊ शकले नाही. पुढे रामदास आठवले यांना शिर्डी लोकसभा मतदारसंघात पराभूत व्हावे लागल्यावर, त्यांनी वेगळा विचार करीत सेना भाजपा युतीच्या गोटात जाण्याची वेळ आली. आज ते मोदी सरकारचे केंद्रीय मंत्री आहेत. आता वेगळ्या कारणाने पुन्हा रिपब्लिकन एकजुटीचा विषय पुढे आला आहे. पण त्यामागचा इतिहास कोणी विचारात घेण्याच्या मनस्थितीत नाही. त्यात ज्यांना खरेच आस्था आहे, अशा कार्यकर्त्यांनी व भीमसैनिकांनी भावना बाजूला ठेवून, ज. वि. पवार यांनी संगतवार लिहून ठेवलेला ऐक्याचा इतिहास व त्याविषयीची कारणमिमांसा अभ्यासावी. त्यामुळे ऐक्य होईल असे नाही. पण वारंवार आंबेडकरी समाजाच्या नव्या पिढीच्या पदरी येणारी निराशा तरी कमी होईल. या विषयाकडे प्रामाणिकपणाने बघायची व समस्येवर उत्तर शोधण्याची सुरूवात होऊ शकेल. तेच मग दलित चळवळीला नवी उमेद व नवे नेतॄत्व देऊ शकेल. पॅन्थरच्या रुपाने नव्या दलित नेतृत्वाचा १९७० च्या दशकात उदय झाला, तसा एकविसाव्या शकतातील आंबेडकरी नेतृत्वाला आकार येण्याची शक्यता निर्माण होईल. ते झाले नाही, तर या भावनाविवश समुदायाच्या पदरी कायमच वैफ़ल्य व निराशाच येत राहिल.

3 comments:

  1. भाऊ आजपर्यंत या धरसोड वृत्ती मुळेच हे लोकं कधी 'नेते' म्हणून उगवले नाहीत. आठवले तर कायम आज या पक्षाबरोबर उद्या त्या पक्षाबरोबर अश्या उड्या च मारत राहिले (पवारांच्या इशाऱ्यावर कदाचित).

    आणि मला असं वाटतं की त्यांच्या पाठीराख्यांना पण या गोष्टींचा कंटाळा आला असावा. कोणताही आंबेडकरी नेता आरक्षण, ब्राह्मण मराठा वर्चस्व या गोष्टींमधून कधीच बाहेर पडू शकला नाही. जो पर्यंत त्यांना भविष्याचा विचार करून नवीन शिक्षण घेऊन प्रगती करा असा मार्ग दाखवणारा नेता येत नाही तो पर्यंत त्या जनतेचे असे हाल होत राहतील. आणि मग त्याचा उद्रेक हे असे भीमा कोरेगाव वगैरे सारखे मोर्चे काढून होत राहील.

    ReplyDelete
  2. Dalit netyanchi eki sambhav nahi.charcha keval dishabhul karanyasathi hotat nivadanuka varsh-deed varashavar aalyaki yaala jor chadhato.etakech.
    bramhanya virodh mhanat karyakartyacha budhibhedh karat rahayache he tharun gelely baab zali aahe. bhauji tumache mandalele mat yogyach watato.

    ReplyDelete
  3. पण जाणता राजा तर 'संत' आहे. आणि त्याला त्या पदापर्यंत पोहोचवण्यासाठी लेखणी झिजवलेले 'महासंत' आहेत

    ReplyDelete