Sunday, January 7, 2018

आमिष दाखवून बलात्कार?

kejriwal kumar vishwas के लिए इमेज परिणाम

अलिकडल्या काळात अनेक अशा प्रकरणांची सुनावणी कोर्टात होऊन वेगवेगळे निकाल आलेले आहेत, जी प्रकरणे वास्तवात दोन व्यक्तींच्या दरम्यानचे खाजगी संबंध होते. त्यात लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक शोषण वा बलात्काराची प्रकरणे होती. त्यावर कोर्टानेही वेगवेगळे मतप्रदर्शन केलेले आहे. आमिषाने असो किंवा कुठल्याही कारणाने असो, जबरदस्तीशिवाय शरीरसंबंध झालेला असेल, तर त्याला बलात्कार संबोधू नये, असे एक ठाम मत पुढे आलेले आहे. कारण आमिष दाखवले हा आरोप खरा असला, तरी त्याला फ़सवणूक म्हणता येईल. पण शरीरसंबंध संगनमताने झालेला असतो. थोडक्यात साधले नाही म्हणून त्या कृतीला बलात्कार म्हणता येत नाही. कालपरवा आम आदमी पक्षाने राज्यसभेसाठी तीन उमेदवार जाहिर केल्यावर त्या पक्षाच्या आजीमाजी नेते कार्यकर्त्यांच्या तक्रारी नेमक्या तसाच कांगावा करणार्‍या होत्या. लोकपाल आंदोलन काळापासून अरविंद केजरीवाल व त्यांचे निकटवर्तिय काहीजण मिळून एक निर्णय घेतात आणि तोच पक्षाचा निर्णय मानण्याची पद्धत आहे. ती कधीच लोकशाही पद्धत नव्हती. पण आरंभी जेव्हा त्याविषयी तक्रारी झाल्या, तेव्हा आक्षेप घेणार्‍याला खड्यासारखे बाजूला करण्यात आले. अशावेळी आज तक्रार करणार्‍यांच्या भूमिका काय होत्या? त्यांनीही त्या अन्याय्य पद्धतीचे समर्थन केलेले नव्हते काय? केजरीवाल यांच्या चुका दाखवणे किंवा त्यावर आक्षेप घेण्याला गद्दारी ठरवण्यात कोण पुढे असायचा? केजरीवाल यांची मनमानी प्रस्थापित करण्यात ज्यांनी पुढाकार घेतला, त्यांना कसले तरी आमिष केजरीवाल यांनी दाखवलेले असणार. किंवा तशा अपेक्षा बाळगूनच ह्या लोकांनी त्या हुकूमशाहीचे समर्थन केलेले असणार ना? मग आज त्यांनी बलात्कार झाल्यासारखी बोंब ठोकणे भामटेगिरी नाही काय? योगेंद्र याद्व किंवा कपील मिश्रा यांची तक्रार म्हणूनच भंपकपणा आहे.

विधानसभेत ७० पैकी ६७ जागा आम आदमी पक्षाने जिंकल्या, तेव्हाच त्यांना राज्यसभेच्या मोकळ्या होणार्‍या तिनही जागा मिळणार ही खात्री होती. सहाजिकच त्यात आपली वर्णी लागेल, अशा आशाळभूत प्रतिक्षेत अनेकजण सहभागी होते. त्यात पत्रकारिता सोडून आलेले आशुतोष होते, तसेच आरंभापासून केजरीवालचे विश्वासू म्हणून ओळखले जाणारे कुमार विश्वासही होते. ज्या अण्णा हजारे यांच्या दिर्घकालीन उपोषणाच्या भांडवलावर केजरीवालना देशव्यापी प्रसिद्धी मिळाली, त्यांनाच राजकारणात जाण्यासाठी केजरीवालनी टांग मारली. तो पहिला विश्वासघात होता. त्यात अण्णांचा बळी गेला आणि ती शिकार केजरीवाल यांनी पचवली. त्यानंतर कोणाचीही शिकार करायला ते श्वापद बिनधास्त झालेले होते. रक्ताची चटक लागलेले श्वापद कधीही कोणाचीही शिकार करू शकते असे म्हणतात. मग अण्णांना झुगारण्यासाठीची शक्ती केजरीवाल यांच्यात आणायला ज्यांनी मदत केली, ते सगळे आपलीही शिकार व्हायला मान्यता देत नव्हते काय? प्रथम जेव्हा केजरीवाल मुख्यमंत्री झाले, तेव्हा त्यांच्या एका आमदाराने मंत्रीपद मिळाले नाही म्हणून नाराजी व्यक्त केली होती. त्यावर पांघरूण घालायला अवेळी त्याच्या घरी जाऊन, खीर खायला गेलो असल्याच्या थापा कुमार विश्वास यांनीच मारल्या होत्या ना? पक्षातली एकजूट दाखवण्यासाठी त्यांच्याकडून केजरीवालनीच खोटेपणा करून घेतला होता. तेव्हा पक्ष शिस्त नव्हेतर आपण खोट्याचे समर्थन करत आहोत, याचे भान विश्वास यांना नव्हते काय? जगाला सराईतपणे उल्लू बनवणारा आपल्याशी प्रामाणिक वागेल अशी अपेक्षा त्यांनी बाळगली असेल, तर गुन्हा एकट्या केजरीवाल यांचा होत नाही. शिकार करण्यासाठी सावजे शोधून देणारेही तितकेच जबाबदार असतात. आपलीच शिकार झाल्याचे कुमार विश्वास यंचे दुखणे म्हणूनच धादांत खोटेपणा आहे.

योगेंद्र यादव आणि प्रशांत भूषण या पक्षाच्या संस्थापकांशी मतभेद झाल्यावर केजरीवाल यांनी चक्क आंगावर गुंड घालून पक्षातून पळवून लावलेले होते. तेव्हा कपील मिश्रा वा यादव यांना त्यातली गुंडगिरी दिसलेली नव्हती काय? तरीही म्हणजे धक्काबुक्की होऊनही यादव कालपरवापर्यंत केजरीवाल यांच्या चारित्र्याचे हवाले देतच होते. मध्यंतरी केजरीवाल व त्यांचे एक सहकारी मंत्री यांच्या आर्थिक लूटमारीच्या कहाण्या समोर आल्या आणि त्यावर आयकर विभागाने कारवाई सुरू केली होती. तेव्हाही अरविंद बाकी चुकत असेल, पण पैसे खाणार नाही; असे यादव छाती ठोकून सांगत होते. म्हणजे त्यांचा बळी आधीच गेलेला असूनही ते भामट्याचे समर्थन करत होते. ही वैचारिक लाचारीच अशा लोकांना शिकार बनवत असते. शाझिया इल्मी वा किरण बेदी यांच्यासारखे लोक विचारवंत नसतात. म्हणूनच आपच्या बदमाशीला कंटाळून बाजूला झाल्यावर त्यांना भाजपात जायला वेळ लागला नाही. पणा प्रशांत भूषण वा योगेंद्र यादव यांची एक वैचारिक अगतिकता असते. जगाला आपण जो पुरोगामी चेहरा दाखवलेला आहे आणि भाजपावर प्रतिगामीत्वाचे आरोप केलेले आहेत, त्याच्याशी निष्ठावान रहाण्यासाठी असे बुद्धीमान लोक बलात्कार सहन करूनही लग्न टिकवण्याचे पातिव्रत्य दाखवत असतात. म्हणूनच काही महिन्यापुर्वी आपचा पालिका मतदानात दारूण पराभव झाल्यावर कपील मिश्रा हा आमदार संतापून आरोप करू लागला, तरी योगेंद्र यादव केजरीवालच्या चारित्र्याची प्रमाणपत्रे वाटत होते. कुमार विश्वास नाराज असूनही खुलेआम केजरीवाल विरोधात एकही शब्द बोलायची हिंमत करत नव्हते. कारण त्यांची आशाळभूत नजर राज्यसभेच्या सदस्यत्वावर रोखलेली होती. कपील मिश्राच्या सत्याला दुजोरा देण्याची हिंमत तेव्हा विश्वास दाखवू शकले नाहीत, की यादवना सत्य बोलायचे धाडस झालेले नव्हते.

आता केजरीवाल यांनी आपल्याच सहकार्‍यांना टांग मारून दोन उद्योगपती पैसेवाल्यांना राज्यसभेच्या जागा विकल्या, तेव्हा आशावाद संपलेला आहे. त्यामुळे विश्वास व यादव यांना शहाणपण सुचलेले आहे. कुठल्याही कामाशिवाय दिल्ली सरकारच्य तिजोरीतून दहा कोटी रुपयांची रक्कम खोटी बिले दाखवून वळवली गेली; त्यावरही यादव यांचा विश्वास नव्हता. मग आज कुठल्याही पुराव्याशिवाय त्यांनी केजरीवालांकडे संशयाने कशाला बघावे? सगळ्यात दयनीय स्थिती बिचार्‍या आशुतोष नावाच्या पत्रकाराची आहे. त्याने एका वाहिनीचा संपादक म्हणून काम केले आणि अखेरीस दिवाळखोर म्हणून त्याची तिथून मालकाने हाकालपट्टी केली होती. तेव्हा मालकाला क्रोनी कॅपिटॅलिझम म्हणून शिवीगाळ करत आशुतोष आम आदमी पक्षात दाखल झालेला होता. आज साडेतीन वर्षांनी त्याच्या पुरोगामी आम आदमी पक्षाला केजरीवाल यांनी गुप्ता नामक दोघा उद्योगपतींना विकून टाकलेले आहे. मग दोन्हीत फ़रक काय राहिला? तेव्हा वाहिनीचा मालक होता, आता पक्षाचा मालक आहे. आशुतोषने अजून तोंड उघडलेले नाही. पण त्याचा कोमेजलेला चेहरा सर्व काही सांगून जातो. काही दिवसातच त्यालाही यात गफ़लती असल्याचे साक्षात्कार होतील आणि हळुहळू त्यालाही ढुंगणावर लाथ मारून बाजूला केले जाईल. त्यानंतर हा माजी संपादकही कुमार विश्वास किंवा योगेंद्र यादव यांच्याप्रमाणे केजरीवाल यांना भामटा ठरवायला उत्साहात पुढे येईल. पण त्याचा काही उपयोग नसेल. ही गुन्हेगारी कार्यशैली असते. बलात्कार झाल्याचे कबुल करण्यात आपलीच अब्रु जाते, म्हणून अनेकजणी निमूट सहन करतात आणि केजरीवाल यांच्यासारख्या भामट्यांना अशा वैचारिक दिवाळखोरांनी आपला जनानखाना नित्यनेमाने भरता येत असतो. त्यामुळे आमिषाला बळी पडलेल्यांनी बलात्काराचे आरोप करण्यात अर्थ नसतो.

6 comments:

  1. नेमके विश्लेषण. पण राजकारणाचा इतिहास पाहिला तर पदोपदी अशी उदाहरणे दिसतील.

    ReplyDelete
  2. Bhau tumche ataparyant sarwat sundar vishleshan.choudharisarkhe ithale purogami ajunahi kwjriwalche samrthan kartat tyanchi kiv yete.kewal modi virodh mhanun tyana kejrila changale mhanave lagtey

    ReplyDelete
  3. "बलात्कार झाल्याचे कबुल करण्यात आपलीच अब्रु जाते, म्हणून अनेकजणी निमूट सहन करतात आणि केजरीवाल यांच्यासारख्या भामट्यांना अशा वैचारिक दिवाळखोरांनी आपला जनानखाना नित्यनेमाने भरता येत असतो. त्यामुळे आमिषाला बळी पडलेल्यांनी बलात्काराचे आरोप करण्यात अर्थ नसतो."

    Ha Tar Ekdam Varmi Tola Aahe Bhau, Pan He Pan Khare Aahe Ki Aata Gamavlela Vishwas Hya Asalya Lokanna Punha Kamavata Yene Farach Kathin Aahe, KHECHARIWALNE Hya Sagalyancha Aksharsha POPAT Kelyavar Hyanche Rajkiya Bhavitvya Kaay ??

    Vinod R. Mulye

    ReplyDelete
  4. भाऊसाहेब लेखाचा शेवट म्हणजे उत्तुंग षटकार... हसून हसून पोट दुखलं..."बलात्कार झाल्याचे कबुल करण्यात आपलीच अब्रु जाते, म्हणून अनेकजणी निमूट सहन करतात आणि केजरीवाल यांच्यासारख्या भामट्यांना अशा वैचारिक दिवाळखोरांनी आपला जनानखाना नित्यनेमाने भरता येत असतो. त्यामुळे आमिषाला बळी पडलेल्यांनी बलात्काराचे आरोप करण्यात अर्थ नसतो."

    ReplyDelete
  5. याच आशुतोषच्या भामटेपणाचे आज कोर्टाने कान उपटले आहेत. तुमचा निवाडा हिंदीत सांगा अशी आशुतोषने मागणी केली आणि कोर्टाने तू स्वतः इंग्लिशमध्ये पुस्तक लिहिले आहेस, इंग्लिश कळत नसल्याचं नाटक करू नकोस असे फटकारले आहे.

    ReplyDelete
  6. भाऊ आपण कितीही प्रयत्न करा ही सुधारणार नाहीत.

    ReplyDelete