Sunday, January 14, 2018

कर्नाटकातील राजकीय आत्महत्या

karnatak politics के लिए इमेज परिणाम

सध्या जानेवारी महिना चालू आहे आणि चार वर्षापुर्वी याच काळात जयपूर येथे कॉग्रेस पक्षाचे अधिवेशन भरलेले होते. तेव्हा युपीए म्हणून देशाची सत्ता कॉग्रेसच्या हाती होती आणि त्या सत्तेला कोणी खंबीरपणे आव्हान देऊ शकेल असे कोणाला वाटत नव्हते. परंतु नरेंद्र मोदी यांचे नाव पुढे आलेले होते आणि भाजपातर्फ़े मोदी पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून चित्र स्पष्ट झालेले होते. पण कॉग्रेसला पराभूत करून मोदी भाजपाला सत्तेवर आणू शकतील,, अशी त्यांच्याच पक्षातल्या कोणा नेत्याला खात्री वाटत नव्हती, की कुणा राजकीय जाणकाराला तशी आशाही वाटत नव्हती. अशावेळी मग मोदी म्हणजे हिंदूत्व आणि हिंदूत्व म्हणजे दहशतवाद अशी काहीशी मांडणी कॉग्रेसने आरंभलेली होती. त्याची वाच्यता करताना आपण हिंदू समाजालाच आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करतोय, याचे भान कुणाही कॉग्रेस नेत्याला राहिलेले नव्हते. सहाजिकच प्रत्येक कॉग्रेसनेता माध्यमांचे लक्ष वेधून घेण्यासाठी बेताल विधाने करीत सुटलेला होता. अशा त्या पक्ष अधिवेशनात मग सुशीलकुमार शिंदे यांनी भाजपाची मातृसंस्था असलेल्या संघाच्या शाखांवर दहशतवादाचे प्रशिक्षण दिले जाते, असा बेछूट आरोप केलेला होता. तेव्हा शिंदे देशाचे गृहमंत्री होते, म्हणूनच त्यांच्या विधानाला महत्व होते. तेव्हा त्यावरून काहूर माजले अणि पुढे त्यासाठी संसदेतच शिंदे यांना माफ़ी मागायची पाळी आलेली होती. कारण त्यांचा रोख भाजपा व संघाकडे असला तरी प्रत्यक्षात बहुसंख्य हिंदू समाजालाच त्यांनी दहशतवादी घोषित करून टाकले होते. नरेंद्र मोदी यांच्यासारख्या धुर्त नेत्याला त्यामुळे आयते कोलित मिळाले आणि कॉग्रेसने त्या एका बेताल वक्तव्यातून हिंदू मतदारांना भाजपाकडे वळवण्यास मोठा हातभार लावला होता. पुढे ज्याला मोदीलाट संबोधले गेले, त्याचा आरंभच असा शिंदे यांच्या हिंदू दहशतवादाच्या बेताल आरोपाने झालेला होता. त्याचीच पुनरावृत्ती कर्नाटकात आता सिद्धरामय्या यांनी केलेली आहे.

सिद्धरामय्या हे कोणी सामान्य कॉग्रेस नेता नाहीत. ते कर्नाटकचे मागली चार वर्षे मुख्यमंत्री असून त्यांनी असा आरोप केल्यावर कर्नाटकातील हिंदू मतदारावर त्याचा परिणाम झाल्याशिवाय रहात नाही. कर्नाटकात कॉग्रेस दिर्घकाळ सत्तेत राहिली आहे आणि तिथे भाजपाला आपले पाय रोवता आले नव्हते, त्याचे मुख्य कारण तिथला हिंदू मतदार आपल्यावर अन्याय होत असल्याच्या धारणेत नव्हता. परंतु त्याचे भान जनता दल वा कॉग्रेसला राहिले नाही आणि त्यांनी जितक्या आक्रमकपणे मुस्लिम लांगुलचालन आरंभले, त्यामुळे हळुहळू कर्नाटकात भाजपाला आपले बस्तान बसवणे सोपे होत गेले. दोन दशकांपुर्वी कर्नाटकात भाजपाला डझनभर आमदार निवडून येणे मोठे कष्टप्रद काम वाटत होते. खरी लढत जनता दल व कॉग्रेस यांच्यातच चालू होती. भाजपा आपले बस्तान बसवायला धडपडत होता. अशावेळी आपली बहुतांश मते हिंदू असल्याचे भान राखून त्या दोन्ही सेक्युलर पक्षांनी हिंदूंना दुखावण्याची भूमिका घेतली नसती, तर भाजपाला कर्नाटकात आपला जम बसवता आला नसता. पण भाजपाला विरोध म्हणजे हिंदूत्वाला विरोध आणि त्यासाठी मुस्लिम दहशतवादाला पाठीशी घालून थेट हिंदू समाजालाच आरोपींच्या पिंजर्‍यात उभे करण्यापर्यंत मजल गेली. त्यातून भाजपासाठी कर्नाटकची दारे सताड उघडली गेली. किंबहूना तिथे गुजरातची पुनरावृत्ती होत गेली. मुस्लिमांच्या मतांवर विसंबून राजकारण करावे, इतकी कर्नाटकातील मुस्लिम लोकसंख्या नाही. ८५ टक्के हिंदू लोकसंख्या व तुलनेत १० टक्केहून कमी मुस्लिम लोकसंख्या आहे. सहाजिकच मुस्लिम मतांचा कितीही गठ्ठा पाठीशी असला म्हणून हिंदू मतांच्या विभागणीवर तिथे सत्ता मिळवणे वा टिकवण्याचे डाव यशस्वी होऊ शकत नाहीत. याचे ना जनता दलाने भान ठेवले, ना कॉग्रेस पक्षाने त्याची जाणिव ठेवली. या दोघांच्या मुस्लिमधार्जिण्या वागण्याने क्रमाक्रमाने हिंदू व्होटबॅन्क तिथे उदयास येत गेली.

गुजरातमध्ये भाजपाला जी व्होटबॅन्क आधीच्या मुर्खपणाने सोनिया व राहुल यांनी निर्माण करून दिलेली होती. ती संपवण्यासाठी राहुलना मागल्या दोन महिन्यात २८ देवळांच्या पायर्‍या झिजवाव्या लागलेल्या आहेत. आपण हिंदूंच्या विरोधात नसल्याचे सिद्ध करण्यासाठी आटापीटा केला, तेव्हा त्यांना अवघी अडीच टक्के मते वाढलेली मिळाली. त्यासाठी राहुल हिंदू असल्याचे दावे दिल्लीतही करावे लागले आणि त्यावर सिद्धरामय्यांनी किती सहजगत्या पाणी ओतले, ते लक्षात येऊ शकते. तेव्हा शिंदे यांनी हिंदू दहशतवादाचे जे अकलेचे तारे तोडले होते, त्याचे पाकिस्तानात धुमाकुळ घालणार्‍या तोयबा प्रमुख सईद हाफ़ीजनेही कौतुक केलेले होते. मात्र त्या बेतालपणासाठी शिंदेंना संसदेत माफ़ी मागून शब्द मागे घ्यायची नामूष्की आलेली होती. इतका अनुभव पाठीशी असताना सिद्धरामय्या यांनी अशी बाष्कळ बडबड का करावी? कुठल्याही तर्काने बघितले तरी त्याला राजकीय आत्महत्या म्हणावे लागेल. कारण कॉग्रेसला मुस्लिम मतांवर कर्नाटकात सत्ता मिळालेली नाही. उलट मुस्लिम मतांची बेगमी देवेगौडा वा जनता दलाने नेहमी केलेली आहे. ज्या किनारी भागात मुस्लिमांचा जास्त भरणा आहे, तिथे भाजपा व जनता दलात लढत होत असते. तर कॉग्रेसला उर्वरीत भागातील हिंदू मतांवरच सत्तेच्या पायर्‍या चढता आलेल्या आहेत. सहाजिकच अशा एका बेताल वक्तव्यातून सिद्धरामय्यांनी कॉग्रेसला सत्ता टिकावता येण्याची जी काही संधी होती, तीच लाथाडलेली आहे. कारण गेल्या खेपेस त्यांना आपल्या बळावर सत्ता मिळालेली नाही, तर भाजपाच्या आत्मघातकी राजकारणाने सत्ता कॉग्रेसला बहाल केलेली होती. तसे झाले नसते तर गेल्या खेपेसही भाजपा आपली सत्ता टिकवू शकला असता. अवघ्या वर्षभरात झालेल्या लोकसभा निवडणूकीपुर्वी ती चुक भाजपाने सुधारली आणि कॉग्रेसला २०१४ सालात कर्नाटकात दणकून मार खावा लागलेला आहे.

२००८ सालात भाजपा व कॉग्रेस यांच्यात तुल्यबळ लढाई झाली आणि कमी मतातही भाजपा बहूमताच्या जागा मिळवून सत्तेवर आला होता. पण सत्ता टिकवण्यात ज्या तडजोडी केल्या, त्या भाजपाला महागात पडल्या व पुढे पक्षात दुफ़ळी माजली. येदीयुरप्पा यांच्यासारखा दांडगा नेता बाहेर पडला व त्याने प्रादेशिक पक्ष बनवून मतांमध्ये जी विभागणी घडवून आणली, त्याचा लाभ कॉग्रेसला मिळालेला होता. लोकसभेपुर्वी मोदींच्या मध्यस्थीने येदीयुरप्पा भाजपात परतले आणि २८ पैकी १७ जागा भाजपाने जिंकल्या होत्या. त्यातच कॉग्रेसची शक्ती कर्नाटकात किती आहे, त्याचा खुलासा झालेला आहे. सहाजिकच येत्या काही महिन्यात विधानसभा निवडणूका होतील, त्यात कॉग्रेस मजबूतपणे जिंकू शकेल अशी स्थिती नाही. कारण तिथे गैरकारभाराची अनेक प्रकरणे चव्हाट्यावर आलेली आहेत आणि अनागोंदीला लोक कंटाळलेले आहेत. या स्थितीत पर्यायी मोठा पक्ष असतो, त्याकडेच लोकांचा ओढा असतो. असा पक्ष म्हणून देवेगौडांचा जनता दल सज्ज नाही. पण भाजपाने आपले हातपाय पसरले आहेत. त्यातून मार्ग काढायचा असेल, तर सिद्धरामय्यांनी जनता दलाशी युती करणे रास्त ठरले असते. कारण कॉग्रेस आणि जनता दल यांच्या मतांची बेरीज झाली, तर भाजपाला मोठा फ़टका बसू शकतो. उलट त्यांच्यात मतविभागणी झाली तर भाजपाला स्वबळावर बहूमताचा पल्ला गाठणे सहजशक्य आहे. मध्यंतरी पोटनिवडणूकात त्याची प्रचिती आलेली आहे. दोन्ही जागी देवेगौडांनी आपला उमेदवार टाकला नव्हता, म्हणून कॉग्रेस आपल्या जागा राखू शकली होती. त्यातून संकेत घेऊन मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी श्रेष्ठींना देवेगौडांशी युती करण्यासाठी पटवायला आपली बुद्धी वापरली असती, तर त्यांना भाजपाला रोखण्याचा मार्ग सापडला असता. पण त्यांनी राजकीय आत्महत्या करण्याचा मनसुबा पक्का केलेला दिसतो. अन्यथा त्यांनी हिंदू मतदाराला दुखावण्याचे कही कारण नव्हते.

भाजपाचे धोरण व तत्वज्ञान बघितले तर त्यांनी मुस्लिम मतांवर कधी भिस्त ठेवलेली नाही. किरकोळ स्वयंभूपणे भाजपाला मुठभर मुस्लिम मते देत असतील, तर गोष्ट वेगळी. पण आपली मदार हिंदू मतांवर असल्याचे भाजपाने कधी लपवलेले नाही. तेवढेच नाही, तर हिंदूहित व अस्मितेसाठी आपण कोणाची पर्वा करीत नसल्याचे भाजपा सातत्याने दाखवत असतो. सहाजिकच मुस्लिम मतांची विभागणी कॉग्रेस व जनता दल यांच्यात होत असते. त्यातही भाजपाला दूर ठेवायचे आवाहन केल्यास मुस्लिम आपोआप कॉग्रेसकडे येत असतात. मग तेवढ्यासाठी हिंदू मतांना दुखावण्याची काय गरज होती? सिद्धरामय्यांनी तीच चुक केली आहे. त्यामुळे मुठभर का होईना जो हिंदू दुखावतो, त्याला इच्छा नसली तरी मग भाजपाच्या आश्रयाला जावे लागते़च ना? सध्या दक्षिण कर्नाटक व उत्तर केरळात पीएफ़आय नावाच्या मुस्लिम अतिरेकी धर्मांध संघटनेने थैमान घातलेले आहे. संघाच्या वा हिंदू कार्यकर्त्यांच्या हत्याकांडासाठी त्या संघटनेच्या अनेकांना आरोपी म्हणून धरपकड झाली आहे अथवा शिक्षाही फ़र्मावण्यात आलेल्या आहेत. अशा संघटनेवर बंदी घालण्याचा विचारही सिद्धरामय्यांनी केलेला नाही. उलट त्यांना पाठीशी घालताना मुख्यमंत्र्यांनी संघावर व भाजपावरच हिंदू दहशतवादाचा आरोप केलेला आहे. तो हिंदू लोकसंख्येच्या कितीसा गळी उतरणार आहे? नसेल, तर या हिंसाचाराने घाबरलेल्या बहुसंख्य हिंदू मतदार वर्गाला कोणाच्या आश्रयाला जावे लागेल? तो तसा भाजपाकडे जाईलच असे नसते. पण मुख्यमंत्रीच जिहादी मानसिकतेला पाठीशी घालू लागला, मग सामान्य हिंदू मतदाराला आपला वेगळा पर्याय शोधावाच लागतो. भाजपा व संघ तो पर्याय म्हणून आपल्याला पेश करत असतील, तर त्यांची महत्ताच सिद्धरामय्या वाढवित नाहीत काय? म्हणून सध्या त्यांनी जी बडबड चालविली आहे, त्याला राजकीय आत्महत्या म्हणावे लागते.

हिमाचल प्रदेशात राहुल गांधी फ़िरकलेही नव्हते. कारण मागल्या पाच वर्षात तिथे वीरभद्रसिंग यांनी केलेला कारभार पक्षाला पुन्हा निवडून आणायला मदत करणारा नाही, याची त्यांना खात्रीच होती. सहसा पाच वर्षे कारभार करणार्‍या पक्षावर लोकांचा रोष असतो. म्हणूनच दुसर्‍यांना बहूमत मिळवणार्‍या जयललिता वा ममता बानर्जी यांचे कौतुक आहे. सलग सहाव्यांदा बहुमत मिळवणार्‍या गुजरातच्या भाजपाचे कौतुक केले जाते. सिद्धरामय्या यांच्यापाशी तितकी लोकप्रियता आहे काय? आपल्या बळावर किंवा लोकप्रियतेवर पुन्हा कॉग्रेसला बहूमतापर्यंत घेऊन जाण्याइतके त्यांनी चांगले काम केलेले आहे काय? नसेल तर त्यांना सत्तेतून हाकलायला मतदार सज्ज असतो. अशावेळी असलेली वा मिळणारी मते टिकवण्याबरोबर आणखी अधिकची मते मिळवण्याचा प्रयास अगत्याचा असतो. उर्मटपणाने व उद्धट विधाने करण्यातून मतदार दुखावण्याला राजकारण म्हणत नाहीत. पंतप्रधान असूनही गुजरात निवडणूकीत म्हणून दुखावलेल्या पाटीदार समाजाला चुचकारण्यासाठी मोदी अधिक मेहनत घेत होते. उलट हिंदू मतांवर सत्ता भोगलेले सिद्धरामय्या त्याच मतांना लाथाडण्याचा आगावूपणा करून बसलेले आहेत. त्यांनी भाजपाचे काम सोपे करण्याचा जणू विडा उचलला आहे. त्यातून मग हिंदू दहशतवादाचा मुर्खपणा केला जात असतो. जिथे ८० टक्केहून अधिक हिंदू मतदार आहे आणि तिथेच मुस्लिम अतिरेकी धुमाकुळ होत असेल, तर त्यातला बहुसंख्य मतदार विचलीत होणारच. त्याला धर्माशी कर्तव्य नसले तरी त्याचा ओढा हिंदूत्वाकडे जाणारच. त्याला आक्रमक हिंदूत्वाचे आकर्षण वाटले तर नवल नाही. मुख्यमंत्रीच मुस्लिम अतिरेकाचे समर्थन करतो, तेव्हा मग हिंदू आक्रमक पवित्रा मतदाराला खेचून आणत असतो. थोडक्यात सिद्धरामय्या सध्या भाजपाच्या बहूमतासाठी बेगमी करीत असल्याचे दिसते. मग त्याला आत्महत्या नाहीतर काय म्हणायचे?

गुजरात निवडणूकांच्या तोंडावर मणिशंकर अय्यर यांनी मुक्ताफ़ळे उधळली, त्याची किंमत कॉग्रेसला मोजावी लागली होती. आता चार महिन्यांनी कर्नाटक विधानसभा मतदान व्हायचे आहे. सिद्धरामय्यांच्या अशा मुक्ताफ़ळांनी काय होऊ शकते? सध्या असे ऐकू येते, की त्याच मुस्लिम अतिरेकी संघटनेशी जागावाटपाचा कॉग्रेसचा विचार आहे. तसे झाले तर राहुल गांधीच्या सौम्य हिंदूत्वाचे भवितव्य काय असेल? २७ टक्के मुस्लिम लोकसंख्या असूनही बंगालच्या मुख्यमंत्री आजकाल आपल्यावर लागलेला मुस्लिम लांगुलचालनाचा डाग पुसण्याच्या प्रयत्नात कशाला आहेत? मुख्यमंत्रीच आपल्याला पाठीशी घालत असेल तर ही मुस्लिम संघटना अधिकच हिंसेचा मार्ग पत्करणार आणि अधिकच दहशत माजवणार हे वेगळे सांगायला नको. पर्यायाने त्यातून जो हिंसाचार माजेल, त्याची विषारी फ़ळे हिंदूंना भोगावी लागणार आणि त्याचेच प्रतिबिंब मग मतांमध्ये पडल्याशिवाय रहाणार नाही. म्हणूनच या एकूण आगावूपणाला राजकीय आत्महत्या म्हणावे लागते. एका पोटनिवडणूकीत भाजपाला जागा जिंकता आली नाही तरी भाजपाच्या मतात झालेल्या अफ़ाट वाढीने ममतांना धक्का बसला. त्यांनी हिंदू मतदाराला चुचकारण्याचा पवित्रा आजकाल घेतला आहे. तर सिद्धरामय्या नेमक्या उलट्या दिशेने चाललेले आहेत. २०१४ च्या जानेवारीत जितक्या आवेशात सुशिलकुमार शिंदे यांनी असे आरोप केलेले होते, त्यापेक्षा सिद्धरमय्यांचा आव कमी नाही. मग परिणाम तरी कसे वेगळे असतील? त्या बेताल बोलण्याने लोकसभेत कॉग्रेसला विरोधी पक्ष म्हणून मान्यता मिळण्या इतक्याही जागा राखता आल्या नाहीत. कर्नाटक विधानसभेत सिद्धरामय्या कॉग्रेसला कुठल्या ‘विक्रमी’ संख्येपर्यंत घेऊन जाणार आहेत? कारण सत्ता गमावायची असेल, तर मान खाली घालून कशाला हरायचे? चांगले रक्तबंबाळ होऊन नामोहरम होऊनच जायचा त्यांचा निर्धार पक्का दिसतो.


4 comments:

  1. Gujratmadhye Jo soft hindutwa paryay waprla tyacha Rhoda fayda zala he mahit asunpan CM base vidhan kartat BJP at a yach bhandwal nakkich karnar

    ReplyDelete
  2. सखोल विश्लेषण केले आहे भाऊ राजकीय घडामोडी तुम्ही एकदम पारदर्शक पद्धतीने मांडतात.

    ReplyDelete
  3. सिद्धरामय्या भाजपात येणार नाहीत ना?😂

    ReplyDelete