Thursday, January 4, 2018

पाकचा झिंबाब्वे होतोय?

sharif musharraf bajwa के लिए इमेज परिणाम

नववर्षाच्या पहिल्याच दिवशी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी पाकिस्तानला खुलेआम दहशतवादी देश ठरवण्यापर्यंत मजल मारली आणि त्यावर पाकिस्तान लगेच काही उत्तर देऊ शकला नाही. त्यामुळे भारतातील माध्यमे उत्साहात आली. पाकिस्तानच्या नाडया कशा आवळल्या गेल्या, त्यावरच वाहिन्यांनी सोमवारी आनंदोत्सव सुरू केला होता. पण पाकिस्तानात ज्या काही घडामोडी अलिकडल्या आठवडाभरात चालल्या होत्या, त्याचा कुठलाही संदर्भ या चर्चांमध्ये दिसत नव्हता. पाकिस्तान जिहादी मानसिकतेच्या आहारी गेलेला देश व समाज आहे, यात शंका नाही. पण म्हणून तिथला प्रत्येकजण जिहादीच असतो असेही नाही. त्यातल्या कष्टकरी लोकांना आपले नित्यजीवन सुसह्य झाले तरी पुरे आहे. सुशिक्षीत सुखवस्तु लोकांनाही आपल्या ऐषारामात कुठली बाधा येऊ नये, असेच वाटत असते. पण त्यांच्यापलिकडे अशीही लोकसंख्या असते, ज्यांना धर्म व अन्य काही गोष्टीत रस असतो. असे भारावलेले लोक नेहमी आक्रमक असतात. त्याचा लाभ उठवून काही धर्मांध वा राजकीय पुढारी आपल्या पोळ्या भाजून घेण्याची संधी शोधत असतात. त्यांना लगाम लावण्याची क्षमता प्रशासनात व कायद्यात असली, तरच त्या देशाला ठामपणे उभे रहाता येत असते. दुर्दैवाने पाकिस्तानची निर्मितीच धर्माच्या पायावर झालेली असल्याने, तिथे कधी आधुनिक विचार रुजला नाही आणि नेतृत्व कायम भारतविरोधी नेत्यांच्याच हातात राहिल्याने त्याच विस्तवाला हवा देण्यापलिकडे त्या देशाचे राजकारण जाऊ शकले नाही. मग त्यात अधिक भडकावू व चिथावणीखोर लोकांनी आपले स्वार्थ साधण्याच्या राजकारणात, त्या देशाला धर्मांधतेच्या गर्तेत लोटून दिले. त्यातून जिहादी व दहशतवादी मानसिकता जोपासली गेलेली आहे. ट्रंप वा अमेरिकेच्या कुठल्या एका धमकीने वा कृतीने पाकिस्तान त्या गर्तेतून बाहेर पडू शकणार नाही.

पाकिस्तान असा धर्माच्या आहारी गेला आणि त्याला आपला आर्थिक औद्योगिक विकास करण्यापेक्षा हिंदू भारताला शह देण्यापलिकडे काही उद्दीष्टच राहिले नाही. मग भारताचा द्वेष इतकेच त्याचे ध्येय बनले. म्हणूनच त्या धारणेचा लाभ उठवत जगातल्या महासत्तांनी व पुढारलेल्या देशांनी आपापले हेतू साध्य करण्यासाठी पाकिस्तानच यथेच्छ वापर करून घेतला. उपयोग संपल्यावर पाकला उकिरड्यात फ़ेकून दिलेले आहे. असा पुर्ण विस्कळीत व दिवाळखोर देश, ही आजच्या पाकिस्तानची ओळख आहे. हळुहळू भारताचा दुसरा शेजारी चीननेही पाकचा तसाच भारताला शह देण्यासाठी उपयोग करून घेतला. या गडबडीत पाकिस्तान कधीही स्वयंभूपणे आपल्या पायावर उभा राहिला नाही आणि सतत अनुदान, कर्ज वा खिरापतीवर जगण्याची वेळ त्याच्यावर आली. अब्जावधी रुपयांचे कर्ज आणि कुठलेही उत्पन्नाचे साधन नाही, अशा चमत्कारीक अवस्थेत तो देश सापडला आहे. पण व्यसनाधीन दारुडा जुगारी जसा अधिकाधिक कर्ज काढून वा उसनवारीने चैन उधळपट्टॊ करीत असतो, तशी पाकिस्तानची दशा झालेली आहे. असे दिवाळखोर नेहमी सावकारासमोर लाचार असतात. मग पाकिस्तान चीन, अमेरिका वा सौदी अरेबियासमोर अगतिक झालेला दिसला तर नवल नाही. ट्रंप म्हणजे त्यातला सर्वात मोठा सावकारच. त्याने एकप्रकारे पाकला यापुढे एक छदाम मिळणार नाही, असे धमकावले तर पाक राज्यकर्त्यांनी गाळण उडणारच ना? पण हे कमी म्हणून की काय, देशाच्या अंतर्गत सत्तास्पर्धेलाही उधाण आलेले आहे. सेना व नागरी राज्यकर्ते यांच्यात सतत बेबनाव असतोच. अधूनमधून घटना गुंडाळून तिथल्या सेनापतींनी सत्तासुत्रे हाती घेतलेली आहेत. आता तो बेबनाव शिगेला पोहोचला आहे आणि त्यात चीनसह सौदी अरेबियाही हस्तक्षेप करताना दिसतो आहे. त्याचवेळी ट्रंप यांनी अनुदान बंद करणे, म्हणूनच दुष्काळातला तेरावा महिना झाला आहे.

ट्रंप यांची धमकी व पाकची दिवाळखोरी यावर खुप चर्चा दोन दिवसात झाली. पण त्याच दरम्यान पाकचे पदच्युत पंतप्रधान नवाज शरीफ़ व सुरक्षा सल्लागार जंजुवा यांच्यातल्या गोपनीय बैठकीचा कु्ठे फ़ारसा उल्लेखही आलेला नाही. घटनात्मक पदी नसलेल्या नवाजना जंजुवा कशाला भेटले व त्यांच्यात काय खलबते झाली? नंतर लगेच सौदी राजपुत्राने पाठवलेल्या विमानातून नवाज सौदीला कशासाठी गेले? तिथे खाजगी भेटीसाठी नवाज यांचे धाकटे बंधू आधीपासूनच पोहोचलेले आहेत. नवाज यांनी पाक सोडताच ट्रंप यांनी अनुदानबंदीची घोषणा कशाला करावी? सुरक्षा सल्लागार हे पाकसेना व नागरी सरकार यांच्यातले मध्यस्थ मानले जातात. सौदी राजांचे आमंत्रण लक्षात घेऊनच पाकसेना अधिकार्‍यांनी नवाजना काही डोस दिलेले होते काय? सौदी व अमेरिका यांचा पाकिस्तानात काय खेळ चालू आहे? बाहेरच्या सत्ता मिळून पाकिस्तानची राजकीय घडी बदलण्याचे डाव खेळत आहेत काय? आपल्याला सत्तेतून पदच्युत करण्यासाठी सेनेनेच न्यायालयाचा वापर केला, असे नवाज बोलत असतात. त्यातून सेना व राजकारण यांचातली दुफ़ळी समोर आलेली आहेच. नागरी समाज वा राष्ट्र म्हणून आज पाकिस्तान शिल्लक उरलेला नाही. अशा स्थितीमध्ये ह्या एकाचवेळी घडणार्‍या घडामोडी शंकास्पद आहेत. त्याला आणखी एक पदर आहे. पाकसेनेची कठपुतळी मानल्या जाणार्‍या इमरान खान याच्या पक्षाने सरकारविरोधी मोर्चाची घोषणा केलेली होती, तीही अकस्मात गुंडाळली गेली आहे. ह्या कित्येक परस्परांशी संबंध नाही अशा वाटणार्‍या घटना आहेत. पण त्याच पाकिस्तानात मोठी राजकीय घालमेल चालू असल्याची साक्ष देणार्‍याही घटना आहेत. पाकिस्तानी सेनेच्या अधिकार्‍यातही आजकाल एकवाक्यता राहिली नसल्याच्या बातम्या सारख्या येत असतात. आतून व बाहेरून चालू असलेली ही धक्काबुक्की या देशाच्या अतित्वावरचे संकट ठरू शकेल काय?

एकूणच जगाच्या राजकारणात इस्लामी देश म्हणून जो गट तीनचार दशके कार्यरत होता, त्यात आता मोठी दुफ़ळी माजली असून मध्यपुर्वेतही उलथापालथी चाललेल्या आहेत. शिया सुन्नी असे भेद आहेतच. पण सत्ताधार्‍यांच्या मतलबानुसारही मुस्लिम देशांची गटबाजी शिगेला पोहोचलेली आहे. सौदी व इराण यांच्यात मुस्लिम जगाचे नेतृत्व करण्याच्या स्पर्धेला हिंसक व युद्धाचे स्वरूप प्राप्त झालेले आहे. त्यातच शिया मुस्लिम जगाचे नेतृत्व करणार्‍या इस्लामिक क्रांतीचा झेंडा जगभर फ़डकावू बघणार्‍या इराणमध्ये सामान्य जनताही रस्त्यावर उतरू लागलेली आहे. सौदीमध्ये बदलते वारे ओळखून तिथला राजपुत्र धार्मिक बंधने सैल करण्याच्या कामाला लागला आहे. दुसरीकडे अशाच मुस्लिम सत्ता व तिथल्या धर्मपंडिताच्या चिथावण्यांनी पेटलेले जिहादचे यज्ञकुंड अजून विझलेले नाही. त्यातच पाकिस्तानमध्ये होणार्‍या घडामोडी गंभीर आहेत. बलुच व सिंधी-पठाणांच्या उठावाने पाक बेजार झालेला आहे. पण त्याला शिस्त लावायचे बाजूला पडून सेना व राजकारणी एकमेकांचा उरावर बसलेले आहेत. त्याचे परिणाम तात्काळ दिसणारे नसतात. जागतिक राजकारणात इस्लामी देशांचा गट म्हणून दबाव आणणारी शक्ती क्षीण झालेली आहे. म्हणून तर अमेरिका इस्त्रायलच्या जेरूसेलम राजधानीला मान्यता देऊ शकली. तर सौदीसारखे देशही काही करू शकलेले नाहीत. अशावेळी काश्मिरचा विषय भारताने युद्धाच्या मार्गाने निकाली काढायचा ठरवला, तर पाकिस्तान प्रतिकारही करण्याच्या स्थितीत उरणार नाही. म्हणूनच पाकिस्तानातल्या घडामोडी बारकाईने बघण्याची गरज आहे. सात दशके उलटल्यावर पाकिस्तान नावाचा बुडबुडा फ़ुटण्याची वेळ जवळ आली, असे समजायचे काय? २०१८ हे त्यासाठी निर्वाणीचे वर्ष ठरेल काय? पाकिस्तानचा झिंबाब्वे होऊ घातला आहे काय? दिवाळखोर देशाचे दिवाळखोर नेते आणखी काय साधू शकतात?


4 comments:

  1. Bhau
    thnx for writing on this as i requested 2-3 days back.

    Final wordings of ur article seems to beome true in next 4-6 months.

    Rather i feel there is another player in it which is Modiji n Dobhal sir. Pak NSA met Dobhal after trumps twit in singapore was a news thats mostly ignored by media.

    Another new equation is Saudi + Israel. As u mentioned Navaj met Pak NSA. And Pak NSA met dobhal. Then nawaz went to saudi. And Israel's interest in breaking pak which is not much discussed in media.

    Along with this all + India Israel Strong relationship.

    All these pointing towards a very very Good news for all true indians that is much awaited.

    Lets hope it wil b soon .

    ReplyDelete
  2. भारताशी युद्ध छेडणे हा पर्याय राहतोच. त्यातून किती देशांना blackmail करून काही उकळता येऊ शकेल ही शक्यता ही अजमावून पाहिली जाऊ शकते.

    ReplyDelete
  3. mulat pakistan ha deshach nahiye.. pakistan ha bharatane 1947 la gamavalela ek pradesh ahe.. jo yetya kalaat punha bharat kabij karel ashi daat shakyata ahe..

    ReplyDelete
  4. Gurujin baddal khi lihit nhiye ,thod aashcharya watatay..

    ReplyDelete