शिवसेनाप्रमुख बाळासाहेब एकदा म्हणाले होते, मुस्लिमांचा मतदानाचा अधिकार काढून घ्या, मग बघूया किती राजकीय पक्ष सेक्युलर रहातात. त्यांच्या मतावर फ़ारशी चर्चा झाली नाही. थोडीफ़ार टिंगल व आक्षेप जरूर घेतले गेले. पण दोनतीन दशकांनंतर आता त्यांचेच शब्द खरे ठरू लागले आहेत. मुस्लिम मतांसाठी सेक्युलर पुरोगामी असली बिरूदावली लावलेल्या पक्षांना हिंदूही मतदार असल्याचे हळुहळू साक्षात्कार होऊ लागलेले आहेत. तसे नसते तर राहुल गांधींनी गुजरात विधानसभेच्या प्रचारात देवादिकांना नवस केले नसते, की मंदिरांच्या पायर्या झिजवल्या नसत्या. तिथे भाजपा थोडा मागे पडलेला दिसताच अनेक पुरोगामी पक्षांना आता मुस्लिमांच्या पद्धतीनेच हिंदूंनाही चुचकारण्य़ाचा मोह होत चालला आहे. काहींनी एका बाजूला पेशवाई गाडण्याच्या घोषणा देत दुसरीकडे थेट ब्राह्मणांचे लांगुलचालन करण्यापर्यंत आपली अधोगती करून घेतली आहे. त्यात कालपर्यंत दुर्गापुजा विसर्जनाला प्रतिबंध लावणार्या ममता बानर्जीही आता सहभागी झाल्या आहेत. पक्षाच्या प्रचार सभांमध्ये नमाज पढल्याचे नाटक करणार्या ममतांना आता ब्राह्मण संमेलने भरवण्याची उबळ आली आहे. त्यांच्या एक आमदाराने वीरभूम जिल्ह्यात भगवत गीतेच्या १५ हजार प्रति वाटण्याचा विक्रम केला आहे आणि लौकरच दिदी ब्राह्मण महासंमेलन करणार असल्याची माहितीही देऊन टाकली आहे. ममता दिदींच्या या आमुलाग्र परिवर्तनाचे कारण केवळ गुजरात विधानसभेचे निकाल नाहीत. या सवंग हिंदूत्वाच्या भूमिकेला बंगालच्याच एका सबंग मतदारसंघाचे निकाल कारणीभूत आहेत. नुकतीच तिथे पोटनिवडणूक पार पडली आणि त्यात भाजपाच्या उमेदवाराला मिळालेल्या मतांनी ममतादिदी गांगरून गेल्या आहेत. त्यामुळेच त्यांना आपण हिंदू असल्याचे सांगताना ब्राह्मणांना गायी व गीता वाटण्याची उपरती झालेली असावी.
दोन वर्षापुर्वी बंगालच्या विधानसभा निवडणूका झाल्या आणि त्यात ममतांच्या तृणमूल कॉग्रेस पक्षाने जबरदस्त यश मिळवले. त्यात भाजपाही कशाबशा दोन जागा मिळ्वू शकला होता. भाजपा गेल्या लोकसभेपासून स्वतंत्रपणे बंगाल व इशान्य भारतात आपले बस्तान बसवू बघतो आहे. अमित शहांनी पक्षाची सुत्रे हाती घेतल्यावर जिथे पक्ष दुबळा आहे, त्या राज्यात प्रयत्नपुर्वक आपला विस्तार करण्याचे काम आक्रमकपणे पुढे रेटलेले आहे. सहाजिकच बंगालमध्ये त्याची प्रचिती विधानसभा निवडणूकीत आली. आजपर्यंत डाव्यांचे वर्चस्व असलेल्या केरळ व बंगाल या दोन प्रांतात भाजपाला विधानसभेचे तोंड बघता आलेले नव्हते. २०१६ च्या आरंभी प्रथमच त्यांना नगण्य म्हणावे अशा जागा मिळाल्या. पण भाजपाला मते देणार्या लोकांची संख्या व मतदानातील टक्केवारी लक्षणियरित्या वाढलेली आहे. खरेतर मोठे यश व जागा मिळवलेल्या ममतांनी त्याची गंभीर दखल घ्यायला हवी होती. पण राज्यातील आपला पाया जपण्यापेक्षा दिदीला देशव्यापी प्रतिमा उभारण्याचे वेध लागले आणि म्हणून त्यांनी मोदी, भाजपाला शह देण्याच्या नादात मुस्लिमांचे आक्रमक लांगुलचालन करण्याची मोहिमच हाती घेतली. इथपर्यंतही ठिक होते. पण त्याचा राजकीय लाभ उठवून भाजपा दुखावलेल्या हिंदूंना गोळा करू लागल्यावर तरी शहाणपणा यायला हवा होता. उलट मोदी विरोधासाठी ममतांनी हिंदू विरोधाची टोकाची भूमिका घेतली व हिंदूंना जीव मूठीत धरून जगण्यापर्यंत पाळी आणली. दुर्गापूजा ही बंगालची दिवाळी असते, तर दुर्गापूजेच्या मुर्तीचे विसर्जन मोहरमसाठी रोखण्यापर्यंत ममतांनी मजल मारली. त्यातून जणू हिंदूना आपल्या धर्माचे पालन करायचे असेल, तर भाजपालाच सत्तेवर आणावे लागेल, असा संदेश देऊन टाकला. त्याचेच प्रतिबिंब मग निवडणूकात पडू लागले तर नवल नव्हते. सबंग येथे त्याचीच प्रचिती आली.
२१ डिसेंबर रोजी सबंग येथे मतदान झाले आणि ती जागा तृणमूलने जिंकली. दोन वर्षापुर्वी ती जागा कॉग्रेसने डाव्यांशी आघाडी करून जिंकली होती. मृत आमदाराच्या पत्नीला तृणमूलमध्ये आणून ममतांनी ती जागा जिंकली. यावेळी डावे व कॉग्रेसची युती नसल्याने दोघांचे स्वतंत्र उमेदवार होते आणि त्यात कॉग्रेस चौथ्या क्रमांकावर फ़ेकली गेली. दुसरा क्रमांक डाव्यांनी मिळवला. पण मोठ्या फ़रकाने तृणमूल जिंकली. यात भाजपा कुठे होता व कुठे आला? २०१६ च्या मतदानात भाजप कुठे स्पर्धेत नव्हता. त्याला अवघी साडेपाच हजार मते मिळालेली होती. पण दोन वर्षात किती फ़रक पडला आहे? भाजपा आज तिसर्या क्रमांकावर असला तरी त्याला पराभूत डाव्या उमेदवाराच्या तुल्यबळ मते मिळालेली आहे. साडेपाच हजारावरून भाजपा उमेदवार ३७ हजार मतांपर्यंत पोहोचला आहे आणि डाव्यांना ४२ हजार मते मिळाली आहेत. दोन वर्षात भाजपाने घेतलेली झेप हे पक्षाचे संघटनात्मक यश असे कोणाला म्हणायचे असेल, तर गोष्ट वेगळी. प्रत्यक्षात या यशाला ममतांचा मोठा हातभार लागला आहे. ३२ हजार नवी मते भाजपाला मिळाली असतील, तर ती बहुतांश हिंदूमते आहेत, याविषयी दुमत व्हायचे कारण नाही. त्यातली बहुतेक मते कॉग्रेस आणि डाव्यांच्या गटातून भाजपाकडे आलेली आहेत आणि त्यांना भाजपा काय देणार आहे? अन्य कुठला पक्ष हिंदूवर होणार्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात आवाज उठवत नसेल, तर जो पक्ष शिल्लक रहातो, त्याकडेच मतदार वळणार ना? ते अत्याचार वा अन्याय ममतांचा पक्ष व त्यांनी सोकावून ठेवलेले मुस्लिम धर्मांध करत असतील, तर भाजपाला त्यातूनच आपली शक्ती वाढवता येत असते. त्याचा साक्षात्कार आता ममतांना झालेला आहे. बशिरहाट वा तत्सम अनेक भागात हिंदूंच्या वस्त्या व घरे जाळली गेली. अन्याय झाले त्यातून लोक भाजपाकडे वळू लागले आहेत. सबंगमध्ये त्याचा पुरावा समोर आला आहे.
बंगाल हे देशातील सर्वात अधिक मुस्लिम लोकसंख्या असलेले राज्य आहे आणि तिथे २७ टक्के मुस्लिम असल्याचे मानले जाते. त्यांची एकगठठा मते ही आजवरच्या राजकारणाची पुंजी राहिलेली आहे. तो गठ्ठा मिळाला म्हणून डाव्या आघाडीला दिर्घकाळ सत्ता हाती राखता आली आणि तो तृणमूलच्या ताब्यात गेल्यावर डावी आघाडी बंगालमध्ये नामशेष झाली आहे. पण ममताच्या काळात मुस्लिम धर्मांधतेला मोकाट रान मिळाले आणि आजवर धार्मिक विचारही न करणार्या हिंदू समाजात भितीचे वातावरण वाढीस लागले. त्याचा राजकीय फ़ायदा घेण्याचे अमित शहांनी योजले. तिथून मतदानात मोठा लक्षणिय फ़रक पडत गेला आहे. त्याचे भान आल्यावर ममता बानर्जींना हिंदूंना चुचकारण्याची निकड वाटू लागली आहे. सहाजिकच त्यांनी गीता वा गायी वाटण्याचा सवंग मार्ग शोधला आहे. वास्तविक त्याची अजिबात गरज नाही. कारण बंगाली हिंदू जनमानस कधीही धार्मिक उन्मादात वावरलेले नाही. फ़ाळणीच्या जखमाही विसरून हा समाज पुरोगामी वा निधर्मी विचारांचा राहिला आहे. परंतु पुरोगामी मुस्लिम लांगुलचालनाने त्याला हिंदूत्ववादाकडे ढकलण्याचा अट्टाहास केल्याचा हा परिणाम आहे. मुस्लिमांच्या धर्मांधतेचे लाड पुरवताना हिंदूना जीव मूठीत धरून जगण्याची पाळी ममतांनी आणल्याचा तो परिणाम आहे. कित्येक वर्षे दुर्गापूजा व मोहरम एकत्र साजरे होणार्या राज्यात विसर्जनाला प्रतिबंध घालण्यातून दिदीने हिंदूंना हिंदूत्वाच्या आश्रयाला जाण्यास भाग पाडले. तसे नसते तर दोन वर्षात सबंग या मतदारसंघात इतका मोठा फ़रक कशाला पडला असता? विषय तितकाच नाही. त्यात तिहेरी तलाकने मोठा फ़रक आणखी पडतो आहे. पण तिकडे बघायला ममता व पुरोगाम्यांना वेळ कुठे आहे? बंगालमध्ये भाजपाला तलाकबंदी कशी लाभदायक ठरू शकते, तो वेगळ स्वतंत्र विषय आहे. त्याचा नंतर उहापोह करावा लागेल.
भाऊ इतके वर्षं सावरकरांचं नाव घेतलं की कॉंग्रेस, या बंगाली दीदी, डावे सगळ्यांच्या अंगावर पाल पडल्यासारखे अंग झटकायचे. हिंदू वोटबँक मुळे राहुल तर जानवेधारी ब्राह्मण झाले आहेतच. हे असंच चालू राहिलं तर कॉंग्रेसच्या निवडणूक पोस्टरवर नेहरू, इंदिरा, राजीव यांच्या बरोबरीने सावरकर दिसले तर आश्चर्य वाटायची आवश्यकता नाही.
ReplyDeleteअर्थात सावरकरांची दूरदृष्टी खूप जबरदस्त होती. ते म्हणाले होतेच की ज्यादिवशी हिंदूंच्या मतावरून राजकारण सुरु होईल तेव्हापासून कोंग्रेसी कोटावरून जानवं घालून फिरतील. आज त्यांचेच हे देखील शब्द खरे होतायत (इतर अनेक इशाऱ्याप्रमाणे)