Saturday, March 16, 2019

आडाम मास्तरांची गोष्ट

narasaya adam के लिए इमेज परिणाम

राहुल गांधी आपल्या परीने कॉग्रेसमुक्त भारतासाठी दिवसरात्र एक करीत असताना, अतिशय कुशाग्र बुद्धीचे मानले जाणारे डावे राजकीय नेते आपल्या देशातून डाव्या राजकारणाला हद्दपार करायला सिद्ध झालेले आहेत. मग मोदी-शहांना फ़ार कष्ट घेण्य़ाची गरज उरते काय? जगप्रसिद्ध सेनापती नेपोलियन म्हणतो. ‘आपला शत्रू आत्महत्या करीत असेल, तर त्यात हस्तक्षेप करू नये.’ मोदी विरोधकांमध्ये त्यासाठीच स्पर्धा लागलेली असेल, तर भाजपाने आपल्या निवडणूक प्रचाराचे काम हातात घ्यावे. विरोधकांचा विचारही करण्याची गरज नाही. कारण विरोधक आपापल्या मेहनतीने स्वत:च्या पराभवाची बेगमीच करीत आहेत. निदान मागल्या काही महिन्यात त्याची सातत्याने प्रचिती येत आहे. तसे नसते तर नाकर्त्या मार्क्सवादी नेत्यांनी सोलापूरचे राजकीय महर्षी मानल्या जाणार्‍या नरसय्या अडाम यांना पक्षातून हाकलण्याची दिवाळखोरी कशाला केली असती? सोलापूरात राजकीय सामाजिक कार्यकर्ता कुठल्याही पक्षाचा वा विचारांचा असो, अडाम मास्तरांचे नाव निघाले म्हणजे आपोआप नतमस्तक होतो. कारण वैचारिक मतभेद कुठलेही वा कितीही असले; तरी सामान्य माणसाच्या हितासाठी आयुष्य खर्ची घातलेल्या या कार्यकर्ता नेत्याविषयी सर्वांना सारखाच आदर आहे. त्याच्या प्रामाणिक नि:स्वार्थी कार्य व वैचारिक बांधिलकीविषयी त्यांचे राजकीय शत्रूही दोन शब्द विरोधात बोलू शकत नाहीत. त्यांनाच आता पक्षातून हाकलण्यात आलेले आहे. कारण काय? तर त्यांनी नरेंद्र मोदी व देवेंद्र फ़डणवीस यांच्यासोबत व्यासपीठ सजवले. एका कार्यक्रमात तीनचार मिनीटांचे भाषण करताना अडाम मास्तरांनी मुख्यमंत्री व मोदी सरकारने जनहितासाठी केलेल्या मदतीचे आभार मानले. हा त्यांचा गुन्हा ठरवला गेला आणि आयुष्य जिथे खर्ची घातले त्याच पक्षातून त्यांना हाकलून लावण्यात आले. याला पक्षाची राजकीय आत्महत्या नाही तर काय म्हणता येईल?

गेल्या कित्येक वर्षात व दशकात अडाम मास्तर म्हणजे सोलापूर वा पश्चीम महाराष्ट्रायला डाव्यांचा चेहरा बनलेला होता. त्यांनी सोलापुरच्या परिसरात सर्व घटकातील कष्टकरी कामगार यांच्यासाठी नुसते मोर्चे काढले नाहीत, तर सरकारी योजनांचा लाभ उठवून गोरगरीबांसाठी जीवन सुसह्य करायला अतिशय मेहनत घेतली. त्या मेहनतीतून आज हजारो कष्टकर्‍यांना निवारा सुविधा मिळालेली आहे. हजारो घरकुले उभारणे व अन्य बाबतीत गरीबांसाठी योजना राबवून न्याय मिळवून देणे; यातच अडाम मास्तरांची हयात गेली आहे. किंबहूना त्यामुळेच त्यांना सोलापूरातून अनेकदा आमदार म्हणून निवडून येणे शक्य झाले. दिल्ली वा बंगाल केरळात सत्तेची फ़ळे चाखणार्‍या किंवा त्यावर ऐषाराम करणार्‍या नामांकित मार्क्सवादी नेत्यांना अडाम मास्तरांची मेहनत कधी समजूही शकणार नाही. अर्थात त्यात नवे असे काहीच नाही. किंबहूना अशा हकनाक बळी जाणारेही अडाम डाव्यांपैकी पहिलेच बळी नाहीत. सोमनाथ चॅटर्जी अशाच मनमानीचे व पक्षांतर्गत नाकर्त्या हुकूमशहांचे बळी झालेले आहेत. सोमनाथ चॅटर्जी दिर्घकाळ बंगालमधून लोकसभेवर निवडून आले. २००४ सालात युपीएची पहिली सत्ता आली, तेव्हा डाव्यांच्या पाठींब्यावर ते सरकार स्थापन झालेले होते. त्याची परतफ़ेड म्हणून सभापतींचे पद सोमनाथदांना देण्याचा कॉग्रेसने निर्णय घेतला. तेव्हाही त्यांनी पक्षाने संमती दिल्यास पुढे जाण्याचे सौजन्य दाखवले होते. पुढे पक्षाचे व सरकारचे बिनसले, तेव्हा त्यांनीही राजिनामा देऊन बाजूला व्हावे असा फ़तवा काढला गेला. अभ्यासू संसदपटू म्हणून त्यांनी त्याला नकार दिला. सभापती हा कुठल्याही पक्षाचा सदस्य नसतो हा प्रघात आहे. म्हणूनच आपण पक्षाच्या निर्णयाला बांधील नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. तर सभागृहातच मार्क्सवादी खासदारांनी त्या ज्येष्ठाची निंदानालस्ती करायचे पाप केलेले होते. मग अडाम मास्तरांची काय कथा?

बी टी रणदिवे, ज्योती बसू, पी. सुंदरय्या, नंबुद्रीपाद, अहिल्या रांगणेकर, गोदूताई परुळेकर अशा शेकडो दिग्गजांनी १९६० नंतरच्या काळात शून्यातून ह्या पक्षाचा पाया घातला आणि वैचारिक बांधीलकी मानून आयुष्य खर्ची घातले. त्यातून केरळ बंगाल शिवाय अन्य अनेक राज्यात या पक्षाला स्थान मिळू शकलेले आहे. स्थानिक प्रश्न व राजकारण खेळण्यातून अडाम मास्तरांसारख्यांनी आपापल्या परिसरात मार्क्सवादी विचार व पक्षाचे बस्तान बसवले. त्याला दिल्लीतल्या कोणा नेत्याने येऊन कसली मदत केली नाही. पक्षाच्या दिल्लीत ठरणार्‍या धोरणांमुळे सोलापूरात कधी अडाम मास्तर निवडून आले नाहीत. की ज्योती बसूंना बंगालमध्ये सहा विधानसभा जिंकता आल्या नव्हत्या. अशा पुर्वजांनी आपल्या बुद्धी व मेहनतीतून पक्षाची उभारणी केली. पण त्यातले कोणी नेहरू विद्यापीठाचे पदवीधर नव्हते, की विद्यार्थी नेते नव्हते. त्यामुळे पुस्तकी पांडित्य पक्ष उभारण्यास उपयोगाचे नसते, याची त्यांना जाण होती. स्थानिक गरजा व परिस्थितीनुसार वैचारिक भूमिका लवचिक ठेवून पक्षाची संघटना व शक्ती वाढवण्याचे काम त्यांनी केले. त्यांच्या त्याच मेहनतीमुळे प्रकाश करात वा सीताराम येचुरी यांना नेता म्हणून दिल्लीत मान मिळत राहिला. पण पदवीधर असलेल्या तशा नाकर्त्यांपाशी कुठलेही कर्तृत्व नव्हते आणि नाही. पण पदानुसार अधिकार हाती आल्यावर त्यांनी खर्‍या कार्यकर्ते नेत्यांवरही हुकूमत गाजवण्याचा उद्धट आगावूपणा आरंभला. तिथून मार्क्सवादी पक्षाचा र्‍हास सुरू झाला. ही शोकांतिका जगभरच्या डाव्यांची व उदारमतवादी अतिशहाण्यांची आहे. पुर्वजांनी जनमानसात निर्माण केलेले प्रतिष्ठेचे स्थान, फ़ुकट हाती आलेल्या संपत्तीप्रमाणे उधळण्याचा जुगार सध्या सगळ्याच राजकीय पक्षात चालू आहे. अडाम मास्तर त्याचाच बळी ठरलेले आहेत. पण त्यांचा गुन्हा काय होता? खरे बोलणे हा पुरोगामी गुन्हा झाला आहे काय?

मागल्या दहापंधरा वर्षापासून अडाम मास्तर सोलापूरातील गोरगरीबांना सन्मानाने जगण्यासाठी इवले घरकुल मिळावे म्हणून सरकारच्या अनेक योजनांचे सुत्र पकडून काम करीत होते. अशा ३० हजार कामगारांसाठी भव्य घरकुल योजना त्यांनी आखली होती. पण वेगवेगळ्या नियमांचे अडथळे ओलांडून तिला साकारण्यात काही वर्षे खर्ची पडली. ज्या कॉग्रेस आघाडी सरकारला पक्षाने पाठींबा दिलेला होता, त्यानेही त्यात फ़क्त अडथळे व टाळाटाळच केली. अशा पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात सत्तांतर झाले व देवेंद्र फ़डणवीस मुख्यमंत्री झाले. त्यांनी पक्षाचे विरोधक असूनही अडाम मास्तरांच्या जनहितकारी योजनेत लक्ष घातले आणि त्यातले अडथळे दुर करण्यात पुढाकार घेतला. त्यासाठी मोदी सरकारला देवेंद्रनी साकडे घातले. हा अडाम मास्तरांसाठी सुखद धक्का होता. ज्यांच्यामागे पुरोगामी म्हणून पळालो, त्यांनी टांग मारावी आणि ज्यांच्या विरोधात आयुष्य खर्ची घातले, त्यांनी जनहितासाठी योजनेचा पाठपुरावा करावा, ही कल्पना विचित्र तरी खरी होती. त्यामुळेच आपल्या योजनेला साकार करू बघणार्‍या मुख्यमंत्री पंतप्रधानांच्या कार्यक्रमाला अडाम मास्तर सामान्य सोलापूरकर म्हणून हजर होते. मुख्यमंत्र्यांनी त्यांचीच योजना असल्याने मास्तरांना अगत्याने व्यासपीठावर बोलावले व मोदींची ओळख करून दिली. ज्या सरकारने योजनेला बळ दिले व मदत केली, त्याची पाठ थोपटणे हा गुन्हा असतो काय? याला कुठली लोकशाही म्हणायचे? चांगलेच नव्हेतर आपलेच काम केल्याबद्दल मोदी वा फ़डणविसांचे आभार मानण्यात गुन्हा असतो म्हणजे काय? पक्षाचा भाजपाला विरोध आहे म्हणून लोकहिताच्या योजनेतही सरकारची मदत घेणे हा गुन्हा असतो? याला सहिष्णूता म्हणतात काय? येचुरी करात किंवा तत्सम नेहमी गळचेपीच्या गप्पा करतात त्यांची ही स्वातंत्र्याची व लोकशाहीची व्याख्या आहे काय? स्वातंत्र्य खोटे बोलण्याचे वा सत्य झाकण्यासाठी असते काय?

अडाम मास्तरांनी कुठेही मोदी सरकार व भाजपाचे अवास्तव कौतुक केले नाही, की त्यांच्या राजकारणाची भलावण केली नाही. आज सगळे डावे पुरोगामी नेहरूवादाचे तोंड फ़ाटेस्तोवर कौतुक करीत असतात. ज्याला त्यांच्याच पुर्वजांनी आयुष्यभर विरोध केला. पण त्यापैकी कोणावर येचुरी करातांनी पक्षशिस्तीचा कधी बडगा उगारला नाही. पण मोदी देवेंद्र सरकारने आपल्याच एका नेत्याच्या खर्‍याखुर्‍या जनहिताच्या योजनेला मदत केली, त्याची कबुली मात्र पक्षशिस्तीचा भंग ठरवला गेला. त्यातून त्यांनी सोलापूर परिसरातील मार्क्सवादी पक्षाची कबर खोदण्यापेक्षा दुसरे काय केले आहे? कारण तिथे अडाम मास्तर म्हणजेच मार्क्सवादी पक्ष असतो आणि त्यालाच उखडून टाकणे, म्हणजे राज्यात उरलासुरला पक्षही नेस्तनाबूत करणे आहे. पण अशा लोकांच्या हाती आजकाल मार्क्सवादी पक्षाची सत्ता वा नेतृत्व आलेले आहे. त्यांना पक्ष संपवण्याची इतकी ओढ लागलेली आहे, की सोमनाथदा वा अडाम मास्तर त्यांना खुपू लागलेले आहेत. कारण अशी माणसेच पक्षाला टिकवू वाढवू शकत असतात. त्यांचे अस्तित्व म्हणजे पक्षाचे अस्तित्व असते. त्यांनाच संपवले मग पक्षाचे नामोनिशाण कशाला राहिल? म्हणून मग त्यांच्या पक्षाविषयी जनमानसात विश्वास निर्माण करू शकणार्‍या कामाला कृतीला गुन्हा ठरवून हाकलले जाते. तेव्हा आत्महत्येकडे झालेली वाटचाल असते. अशा आत्मघातकी वाटचालीसाठी धडधडीत खोटेनाटे बोलण्याला प्राधान्य असते आणि सत्य बोलणे हा गुन्हा असतो. थोडक्यात खोटे व असत्य बोलण्याला आता पुरोगामी भाषेत अविष्कार स्वातंत्र्य मानले जाऊ लागले आहे. सत्याच्या गळचेपीला सहिष्णूता ठरवले जात असते. त्याचा नेमका विरोधाभास आपल्याला भाजपामध्ये अनुभवास येत असतो. जिथे मोदींवर हुकूमशाहीचा आरोप होतो, त्या भाजपात कितीसे विचार स्वातंत्र्य आहे?

याच काळात मागल्या वर्षभरात आपण शत्रुघ्न सिन्हा वा यशवंत सिन्हा यांच्याकडे बघू शकतो. त्यांनी मोदी सरकारच्या विरोधात राफ़ायलसाठी सुप्रिम कोर्टात याचिका केल्या. त्यांनी विरोधकांच्या बैठकीला उपस्थित राहून पंतप्रधानांची निंदानालस्ती केली. पण भाजपाने आजही शत्रुघ्न वा यशवंत सिन्हा यांच्यावर पक्षशिस्तीचा बडगा उगारून त्यांची हाकालपट्टी केलेली नाही. शत्रुघ्न सिन्हा तर प्रत्येक दिवशी पक्षाला व आपल्याच पंतप्रधानाला अपमानित करण्याचे व्रत चालवित आहेत. पण भाजपाने त्यांना पक्षातून काढले नाही, की कसली नोटिसही दिली नाही. इतके विचार स्वातंत्र्य वा मतस्वातंत्र्याचे प्रदर्शन जिथे चालू शकते, तो पक्ष फ़ॅसिस्ट असतो. कसला आहे हा विरोधाभास? मुस्कटदाबी करणारे नेतृत्व लोकशाहीवादी आणि बोलण्यासह नेतृत्वावर टिकेची मोकळीक असलेला पक्ष हुकूमशाहीवादी? शब्दांना काही अर्थ असतो का? सामान्य लोक बुद्धीमान नसतात आणि त्यांना युक्तीवादही करता येत नाही. पण त्याच अडाणी माणसांना व्यवहारी ज्ञान खुप असते आणि त्यांना नरसय्या अडाम मास्तरांचे काम कळते. मास्तरांचा प्रामाणिकपणा कळतो आणि त्यांची जनहिताची कळकळ ओळखून मदत करणारेही नेमके ओळखता येतात. सामान्य नागरिकांना कुठल्या राजकीय विचारसरणीशी कर्तव्य नसते, की त्यातल्या सोवळ्याओवळ्य़ाशी घेणेदेणे नसते. त्यांना जनहितकारी कार्यकर्ता नेत्या्विषयी आपुलकी असते. त्यांनाच मदत करणार्‍यांबद्दल आस्था असते. सहाजिकच अडाम मास्तरांच्या या भव्यदिव्य योजनेचे श्रेय त्यांच्यासोबत मार्क्सवादी पक्षाला मिळाले असते. ते लाथाडण्याला कोण शहाणपणा समजू शकेल? तेच काम अडवून ठेवलेल्या कॉग्रेस राष्ट्रवादी वा युपीए सरकारच्या बाजूने उभे राहिलेल्या मार्क्सवादी राष्ट्रीय नेतृत्वाची लायकी सामान्य लोकांना सहज कळू शकते. त्यामुळेच अडाम मास्तरांना हाकलणार्‍यांच्या पक्षापेक्षा लोक मास्तरांना मदतीचा हात देणार्‍यांकडेच वळतील ना?

अडाम मास्तरांना पक्षातून हाकलणारे आपल्याच पक्षाला मिळाणारी मते लाथाडतात, त्याला म्हणूनच आत्महत्या म्हणावे लागते. अर्थात सामान्य लोकांना अविष्कार स्वातंत्र्य, गळचेपी वा विचारसरणी असल्या गोष्टी कळत नाहीत. पण त्यांच्या आयुष्यात भेडसावणारे प्रश्न समजत असतात. कारण तो सामान्य मतदाराचा अनुभव असतो. त्या ग्रासलेपणातून बाहेर काढणार्‍या विचाराशी नागरिकाला कर्तव्य नसते तर त्यातून बाहेर काढणार्‍या योजनांच्या अंमलबजावणीला प्राधान्य असते. अडाम मास्तरांना त्यासाठीच गुन्हेगार ठरवणारे म्हणूनच त्या सामान्य मतदारासाठी गुन्हेगार असतात. त्यांनाच मदत करणारे मोदी देवेन्द्र लोकांना श्रेष्ठ वाटणार. मास्तरांना पक्षातून हाकलणार्‍यांनी त्या व्यक्तीचे कुठलेही नुकसान केलेले नाही. कारण पक्ष अशा हाडाच्या कार्यकर्त्यासाठी दुय्यम असतो. त्याची पहिली बांधिलकी विचारांपेक्षाही जनहिताला असते आणि तसे कार्यकर्ते दुर्मिळ असतात. तुमच्या अंगावर दागिना असला म्हणून तुम्ही सुंदर वा मूल्यवान होत नाही. मूल्य सोन्याला व दागिन्याला असते. मार्क्सवादी दिवाळखोर नेत्यांनी अडाम मास्तरांना पक्षातून हाकलण्याने त्याच नेतृत्वाचा क्षुल्लकपणा समोर आला आहे. जनतेपासून असे नेते पक्ष कसे दुरावलेत त्याचीच ही साक्ष आहे. किंबहूना अशा मुर्ख पुस्तक पंडितांनीच नरेंद्र मोदींना कसे मोठे करून ठेवले आहे, त्याचीच साक्ष मिळते. मोदी वा भाजपा जमिनी वास्तवाशी जोडून राहिला म्हणून वाढला व वाढतो आहे. त्याला पुस्तकी आव्हानाने पराभूत करता येणे म्हणून अशक्य आहे. येचुरी वा करात असले कागदी शूरवीर मोदींना हरवू शकत नाहीत. अडाम मास्तर किंवा त्यांच्यासारखे जमिनीत घट्ट पाळेमुळे रुजवून बसलेले कार्यकर्ते नेते भाजपाला हरवू शकतील. पण त्यांनाच उखडून टाकण्यात पुरूषार्थ शोधणार्‍यांच्या हाती पक्षाचे नेतृत्व असेल; तर डाव्या किंवा उदारमतवादी राजकारणाचे रामनाम सत्य होणार ना?

13 comments:

  1. भाऊ तेवढं मंदसैनिकांबद्दल(मनसे) बोला हि पिलावळ मोदी आणि डोभाल बद्दल आक्षेपार्ह भाषा बोलतात त्यांना द्यायचे सडेतोड उत्तर उपलब्ध करून घ्यावे हि नम्र विनंती- एक नियमित वाचक

    ReplyDelete
  2. विनाशकाले विपरीत बुद्धी, दुसरे काय?

    ReplyDelete
  3. हे पुरोगामी कसे? जे भाजपच्या लोकांना केवळ राजकीय प्रतिस्पर्धी न समजता अस्पृश्य मानणारे आणि कोणतीही अस्पृश्यता न पाळल्यामूळे आपल्याच पक्षातील ज्येष्ठ व्यक्तीला जातीबाहेर टाकणारे?

    ReplyDelete
  4. भाऊ अडाम मास्तर यांनाच भाजप मध्ये घेऊन सोलापूर मधून तिकीट द्यावे मोदींनी

    ReplyDelete
  5. वा भाऊ,सही पकडे है...!

    ReplyDelete
  6. एेकावे ते नवलच,हे माहित नव्हत भाउ.

    ReplyDelete
  7. लेख अतिशय उत्तम!!

    ReplyDelete
  8. भाऊ काका, दोनच दिवसापूर्वी प्रियांका वाद्रा चंद्रशेखर रावणला (उ प्र) भेटल्या होत्या. त्यानंतर काल एका पत्रकार परिषदेत तो बोलला की "भीमा कोरेगाव दोहरा देंगे". अशी उघड धमकी देऊन सुद्धा एकही पुरोगाम्यांने त्यावर काही प्रतिक्रिया दिली नाही.हेच लोक भिडे गुरुजिंविरोधात बिन बुडाचे आरोप करून बदनाम करत होते. आता मूग गिळून गप्प बसलेत. पुरोगामीत्व...

    ReplyDelete
  9. भाऊ काका, दोनच दिवसापूर्वी प्रियांका वाद्रा चंद्रशेखर रावणला (उ प्र) भेटल्या होत्या. त्यानंतर काल एका पत्रकार परिषदेत तो बोलला की "भीमा कोरेगाव दोहरा देंगे". अशी उघड धमकी देऊन सुद्धा एकही पुरोगाम्यांने त्यावर काही प्रतिक्रिया दिली नाही.हेच लोक भिडे गुरुजिंविरोधात बिन बुडाचे आरोप करून बदनाम करत होते. आता मूग गिळून गप्प बसलेत. पुरोगामीत्व...

    ReplyDelete
  10. येचुरी हे डाव्यांचे राहुल गांधी होत आहे. त्यांना राहुलप्रमाणेच त्यांचा पक्ष विसर्जीत करण्याची घाई झाली आहे.

    ReplyDelete
  11. आणखी एक ऐतिहासिक घोडचूक अशी कबुली देतील हे डावे काही दिवसांनी.. 😂😂😂

    ReplyDelete
  12. Bhau jabardast salute to addam master too

    ReplyDelete
  13. उत्तम लेख, परखड विवेचन
    विचित्र व दुर्दैवी सत्य

    ReplyDelete