Sunday, March 24, 2019

आघाड्यांचेच रणकंदन

gathbandhan cartoon kureel के लिए इमेज परिणाम

पुढल्या महिन्यात ११ तारखेला लोकसभेसाठी पहिल्या फ़ेरीचे मतदान व्हायचे आहे आणि अजून तरी तथाकथित महागठबंधनाला आकार येऊ शकलेला नाही. त्याउलट विविध राज्यात एकामागून एक नवनव्या आघाड्या उदयास येत आहेत आणि मागले वर्षभर मतविभागणी टाळून भाजपा व मोदींना हरवण्याचे केलेले मनसुबे उध्वस्त होताना दिसत आहेत. उत्तरप्रदेशात तर कॉग्रेसला बाजूला ठेवून सपा-बसपाने आपली आघाडी व जागावाटप आधीच उरकून घेतले आणि आपले अस्तित्व टिकवण्यासाठी कॉग्रेसला आजवर बाजूला ठेवलेला हुकूमाचा पत्ता प्रियंकाला मैदानात आणावा लागलेला आहे. अर्थात हा हुकूमाचा पत्ता आहे अशी काही माध्यमातील राजकीय शहाण्याची समजूत आहे. प्रियंकाने आजवर तरी अशी कुठलीही चमक दाखवलेली नाही. त्यामुळे आता उत्तरप्रदेश चौरंगी लढतीचा आखाडा बनलेला आहे. उत्तरप्रदेशला इतक्यासाठी महत्व आहे, की ते देशातील सर्वात मोठे राज्य असून तिथून लोकसभेचे ८० सदस्य निवडले जातात. त्याच्या खालोखाल महाराष्ट्रातून खासदार निवडले जातात. या दोन्ही राज्यात मागल्या खेपेस कॉग्रेस व त्याच्या मित्रपक्षांना सपाटून मार खावा लागला आणि भाजपा मित्रपक्षांच्या मोठ्या यशामुळे मोदींचा मार्ग सुकर झालेला होता. सहाजिकच यावेळी अशा प्रमुख राज्यात मोदींची कोडी करून व विरोधकांची एकजुट करून मोदींना संख्येत पराभूत करण्याचे मनसुबे रचले गेलेले होते. विरोधी पक्षांनी असे मनसुबे रचले तर समजू शकते. पण माध्यमांसह बुद्धीजिवी वर्गानेही त्यासाठी आपली बुद्धी पणाला लावलेली होती. मात्र कसजशी निवडणूक जवळ आली तसा या महागठबंधनाचा बुडबुडा फ़ुटत गेला. आता कुठल्याही मोठ्या राज्यात अनेक आघाड्या आकाराला आल्या असून त्यांच्यातच रणकंदन माजलेले आहे. महाराष्ट्र तर अशा दिवाळखोर कॉग्रेसी राजकारणाचे पानिपत होऊ घातलेले आहे.

कालपरवा पश्चीम महाराष्ट्र हा कॉग्रेसचा अभेद्य बालेकिल्ला मानला जात होता. कॉग्रेस विरोधकांनी कितीही आक्रमक राजकारण केले तरी कधी या बालेकिल्ल्याला खिंडार पाडण्यात अन्य पक्षाला यश मिळालेले नव्हते. मागल्या वेळी प्रथमच पुण्यात शरद पवारांना व सोलापूरात सुशिलकुमार शिंदे यांना मोठा फ़टका बसला. यावेळी पवारच माढ्याच्या आखाड्यात उतरायला सिद्ध झालेले होते. पण चाचपणी करतानाच त्यांना धोका जाणवला आणि त्यांनी तिथून माघार घेतली. तिथे त्यांच्याच पक्षाचे ज्येष्ठ नेते व विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते पाटील थेट मोदी लाटेतही जिंकलेले होते. त्यांच्याच निष्ठावंतांनी ‘पवारांना पाडा’ असे आवाहन खुलेआम सुरू केले आणि पवार गुपचुउप बाजूला झाले. अर्थात पवार नेहमीच यशस्वी माघार घेत असल्याने त्यांनी सारवासारव केली. पण म्हणून नुकसान व्हायचे थांबत नाही. आता सोलापूरचे मोठे नाव असलेले मोहिते पाटिल घराणेच भाजपात दाखल झाले आहे. दोन आठवड्यापुर्वी असाच पोरखेळ नगरच्या जागेसाठी होऊन विखे पाटिल घराण्याची तिसरी पिढी भाजपात दाखल झालेली होती. पश्चीम महाराष्ट्रातील कॉग्रेसच्या राजकारणाला बसलेले हे दोन मोठे हादरे आहेत. तिथेच हा गोंधळ संपत नाही. विधानसभेच्या निवडणूकीत तुटलेली दोन्ही कॉग्रेसची आघाडी पुन्हा एकत्र आली आणि त्यांच्यात जागावाटपाचा वाद झाला नसला तरी जागांवरून एकमत होऊ शकले नाही. त्यातूनच ही दुर्दशा दोन्ही पक्षांच्या वाट्याला आलेली आहे. मागल्या पाच वर्षात या दोन्ही पक्षांनी समजूतदारपणे आपला उखडलेला पाया भक्कम करण्याचे परिश्रम घेतले असते, तर आता ऐनवेळी अशी लाजिरवाणी परिस्थिती त्यांच्यावर आली नसती की आघाडीचा विचका उडाला नसता. आज इतकी वाईट परिस्थिती आहे की महागठबंधनाची गोष्ट बाजूला ठेवा. किमान आघाडी वा समझोतेही होऊ शकलेले नाहीत. मतविभागणी अधिकाधिक होण्याची मात्र बेगमी झालेली आहे.

उत्तरप्रदेशात पोटनिवडणूकीत भाजपाचा पराभव होण्यातून सुरू झालेली व बंगलोरला कुमारस्वामी सरकारच्या शपथविधीला फ़ॉर्मात आलेली विरोधकांची एकजुट अखेरीस जागावाटपांच्या खडकावर येऊन फ़ुटलेली आहे. बाकी राज्यांची गोष्ट बाजूला ठेवू. महाराष्ट्रात साडेचार वर्षे अखंड एकमेकांना शिव्याशाप देणारे शिवसेना भाजपा फ़टाफ़ट एकत्र आले व त्यांनी जागा वाटूनही घेतल्या. एकत्र प्रचारसभाही सुरू झाल्या. मात्र कॉग्रेसला मित्रपक्षांना सोबत घेण्याचे काम जमलेले नाही, की जागाही निश्चीत करता आल्या नाहीत. त्यातूनच मग विखे व मोहिते यांची नवी पिही भाजपात दाखल झालेली आहे. पण नगरचे विखे वा सोलापूरचे मोहिते भाजपात गेल्याने कॉग्रेसला किंवा महागठबंधनाला मोठा फ़टका बसेल, अशा समजूतीत कोणी राहू नये. या दोन्ही घराण्यांच्या मर्यादा तेवढ्या जिल्ह्यापुरत्या आहेत. बाकीच्या महाराष्ट्रात त्यांचे पक्षांतर मोठा प्रभाव पाडू शकणार नाही. बातम्यांपुरतेच त्याचे महत्व आहे. मात्र कॉग्रेस राष्ट्रवादी यांच्याखेरीज जे पक्ष आघाडीत येऊ शकले असते, त्यांच्याशी समझोता होऊ शकला नाही, त्याचा मोठा दणका कॉग्रेसला सोसावा लागणार आहे. ते पक्ष म्हणजे प्रकाश आंबेडकरांची वचित आघाडी आणि सपा-बसपा यांचे स्वतंत्र लढणे आहे. तसे बघायला गेल्यास या लहान पक्षांची ताकद फ़ार मोठी नाही. पण अनेक जागी काठावर होणार्‍या पराभवातून कॉग्रेस आघाडीला वाचवण्यासाठी असे पक्ष व त्यांची मते मोलाची कामगिरी बजावत असतात. तीच संधी कॉग्रेसने गमावली आहे. त्यातही प्रामुख्याने वंचित आघाडीपेक्षा सपा-बसपा आघाडीने सर्व जागा लढवणे कॉग्रेसला खुप त्रासदायक ठरू शकणार आहे. आंबेडकरांच्या नादी लागण्यापेक्षा कॉग्रेस व पवारांनी सपा-बसपाला इथे महाराष्ट्रात सोब्त घेण्याचा प्रयास केला असता तर अधिक उपयोगी ठरले असते. पण त्याचा विचारही झाला नाही की चाचपणी होऊ शकली नाही.

आंबेडकरांना कॉग्रेस आघाडीत सहभागीच व्हायचे नव्हते, हे पहिल्या दिवसापासून स्पष्ट होते. त्यांची भाषा किंवा अटी घालण्याची पद्धत बघितली, तरी त्यांना आघाडी करण्यापेक्षा कॉग्रेस व राष्ट्रवादीला नामोहरम करण्यातच स्वारस्य असल्याचे लपून राहिलेले नव्हते. दुसरीकडे त्यांनी ओवायसी यांच्याशी युती करून वंचित आघाडी बनवली, त्यांनाही कॉग्रेसला अपशकून करण्यात रस आहे. सहाजिकच त्यांच्या नादाला लागण्यात अर्थ नव्हता. पण तोच खेळ चालू राहिला आणि अकारण कालापव्यय मात्र झाला. अगदी या आघाड्या बाजूला ठेवा, दोन्ही कॉग्रेसनी मागल्या वर्ष दिड वर्षात आपापले घर ठिकठाक करण्याचेही प्रयत्न अजिबात केलेले नाहीत. एकामागून एका जिल्हा, तालुका व महापालिका मतदानात भाजपा मुसंडी मारून पुढे जात असतानाही दोन्ही कॉग्रेस झोपा काढत राहिलेल्या होत्या. संघटनात्मक नवी बांधणी व नवे नेतृत्व उभे करण्याकडेही लक्ष दिले गेले नाही. उलट इतक्या वर्षाची सत्ता गमावलेल्या या दोन्ही पक्षातले शिरजोर नेते एकमेकांवर कुरघोड्या करण्यातच रमलेले होते. तसे नसते तर सुजय विखे वा रणजित मोहिते अशा नव्या पिढीच्या वारसांना अन्यत्र आश्रय घेण्याची पाळी नक्कीच आली नसती. नव्या दमाचा मराठी नेता म्हणून ज्याच्याकडे बघितले जाते, असे राज ठाकरे मोदींवर सर्वस्व पणाला लावून तुटून पडत असताना कॉग्रेसच्या वारसांची नवी पिढी भाजपाकडे जाण्याचा अर्थ कोणाच्या लक्षात आला आहे काय? कॉग्रेसला भवितव्य नसल्याची ती लक्षणे आहेत. झुंजण्यापेक्षा बादशहाला शरण जाऊन आपले संस्थान वा वतन टिकवण्याची ती नामुष्की आहे. ह्याचा सुगावा पवारांना लागलेला नसेल तर त्यांना जाणता राजा कशाला म्हटले जाते? राजकारणाचे रंग आमुलाग्र बदलत असताना राज ठाकरेंना सोबत घ्यायचीही हिंमत कॉग्रेस राष्ट्रवादीमध्ये नसेल, तर एकविसाव्या शतकात त्यांनी आपला कारभार गुंडाळावा.

गेल्या आठवड्यात राज ठाकरे यांनी आपला पक्ष लोकसभा लढवणार नसल्याचे जाहिर केलेले आहे. अनेकांना तो चमत्कारीक निर्णय वाटेल. पण मला तसे वाटत नाही. शरद पवारांनी राजवर जादू केली असेही अनेकांचे मत झाले आहे. पण त्यामागेही काही छुपा अजेंडा असू शकतो. ही शक्यता नाकारता येत नाही. जितक्या आवेशात केजरीवाल वा राहुल गांधी भाजपाच्या विरोधात बोलत नाहीत, त्यापेक्षा मोठा आवेश राज ठाकरे आणतात. तेव्हा त्यामागे वेगळे गणित असल्याचीही एक शक्यता आहे. पण तो स्वतंत्र विषय आहे. याक्षणी तो भाजपाच्या विरोधात उभा ठाकलेला पक्ष आहे आणि त्याचा नेता आक्रमक प्रचार करणारा आहे. तर सर्व मुद्दे गुंडाळून त्यालाही सोबत घेण्याची हिंमत कॉग्रेस राष्ट्रवादीने दाखवायला हवी होती. पण त्यामुळे उत्तर भारतातली मते गमावण्याच्या भयाने पवारही अंग आखडून बसले असावेत. तरीही राज ठाकरेंनी जागा मागण्यापेक्षा नुसता भाजपा विरोधात प्रचाराचा वसा घेतला, ही बाब कौतुकास्पद आहे. ज्या मित्रांच्या मागे कॉग्रेस धावत होती, त्यांच्यापेक्षा आपण सच्चे मोदी विरोधक असल्याची साक्षच राजनी त्यातून दिलेली आहे. जागा कोण लढवतो हे महत्वाचे नसून, मोदी-शहांना पराभूत करणे हे ध्येय असल्याची ती साक्ष आहे. त्याला दाद देण्याचीही कुवत कॉग्रेस राष्ट्रवादीकडे नसेल तर त्यांचे कल्याण व्हायचे कोण थांबवू शकतो? वंचित आघाडी असो की मायवतींचा पक्ष असो, त्यांनी जागांसाठी अडवणूक केली, ती राज ठाकरेंनी केलेली नाही. मोदींना रोखणे हेच उद्दीष्ट असेल तर त्या कसोटीवर उतरलेला तोच एकमेव नेता व पक्ष असल्याचे मान्य करावे लागेल. तितकी लवचिकता पवारांना नगर वा माढ्यातही दाखवता आलेली नाही. आपली शक्ती वाढवण्यात सगळे पक्ष भरकटले असताना मोदी विरोधाचा पक्का मनसुबा दाखवू शकलेला राज हा एकमेव नेता आहे. पण त्याला सोबत घेण्याची हिंमतही कॉग्रेस राष्ट्रवादी दाखवू शकलेले नाहीत.

थोडक्यात कॉग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्याकडे विरोधी पक्ष म्हणून बघितले जाते तितके ते विरोधी म्हणून समर्थ पक्ष राहिलेले नाहीत. पहिली गोष्ट म्हणजे मागल्या साडेचार वर्षात शिवसेना भाजपा युती तुटली तिचे सुत्रधार खुद्द शरद पवार होते असे मानले जाते. त्यांनी तेव्हा दोन कॉग्रेसची आघाडी मोडली नसती तर भाजपाला सर्वात मोठा पक्ष होऊन राज्याची सत्ता मिळवता आली नसती. बहूमत हुकल्यावर बाहेरून पाठींबा देण्याची घोषणा करून पवारांनी भाजपाची सत्ता आणखीनच मजबूत केली होती. त्यामुळे शिवसेना दुसर्‍या क्रमांकाचा पक्ष असूनही त्याला भाजपाला अडवणे शक्य झाले नाही. अशारितीने भाजपाला राज्यात आपले बस्तान बसवायला शरद पवार यांनी बहूमोल मदत केली. पुढली चार वर्षे सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेने विरोधी पक्षाचा पुढाकार आपल्याकडे घेऊन विधानसभेतील दोन्ही कॉग्रेस विरोधकांना नामोहरम करून टाकलेले होते. ऐनवेळी पुन्हा शिवसेना भाजपा एकत्र आले आणि कागदावरच्या विरोधी पक्षांना लढण्याइतकेही बळ उरलेले नाही. मागल्या तीन वर्षात सेना सत्तेतून बाहेर पडेल अशा आशेवर कॉग्रेस राष्ट्रवादी आशाळभूत राहिले आणि निवडणूका दारात उब्भ्या ठाकल्यावर सेना भाजपा एकत्र आले. त्यामुळे संपुर्ण विरोधी राजकारणाचा चुथडा होऊन गेलेला आहे. सत्तेत भागिदार असल्याने शिवसेना हा भाजपाचा वा राज्यातील खरा विरोधी पक्ष नाहीच. पण नामोहरम व निष्क्रीय होऊन गेलेले दोन्ही कॉग्रेस पक्षही विरोधी म्हणून विश्वासार्ह उरलेले नाहीत. त्यामुळे आगामी निवडणूक सेना भाजपा युतीसाठी सोपी झालेली आहे आणि म्हणूनच मागल्या खेपेस लहानसहान पक्षांना सोबत घेऊन केलेल्या महायुतीचीही भाजपाला यावेळी गरज भासलेली नाही. त्या पक्षांना सोबत आणणे कॉग्रेसला जमले नाही आणि आपल्या खास नेत्यांनाही खंबीरपणे आपल्या सोबत राखण्यात दोन्ही कॉग्रेस अपेशी झाल्या आहेत.

याचा एकत्रित परिणाम असा आहे, की राज्यात आता भाजपा हा समर्थ पक्ष असून आपला विरोधकही त्यांनीच निश्चीत केलेला आहे. निवडणूकीत सेनेला सोबत घ्यायचे आणि बाकीच्या काळात अन्य विरोधी पक्ष वाढू द्यायचा नाही, अशी ही रणनिती आहे. त्यामुळेच महागठबंधन होऊ शकले नाही की कॉग्रेसची जी आघाडी आहे, तिलाही आकार मिळू शकलेला नाही. अनेक आघाड्या आता मैदानात आहेत आणि मतविभागणीचा लाभ घेऊन युतीचे यश निश्चीत आहे. जी काही इतर मते कॉग्रेसला मिळू शकली असती, त्याचे लचके तोडायला वंचित आघाडी व सपा-बसपाही जागा लढवणार आहे. अगदी नेमके सांगायचे तर प्रामाणिकपणे ज्या मतदाराला भाजपाला पराभूत करण्याची अतीव इच्छा आहे, त्याच्यासाठी कुठलाही एक पक्ष वा एक आघाडी मैदानात नाही. विखुरलेले तथाकथित विरोधी पक्ष व नेते असल्यावर सत्ताधारी युतीला कोण कसा पराभूत करणार? बंगाल, उत्तरप्रदेश, महाराष्ट्र अशा तमाम मोठ्या राज्यात भाजपाच्या विरोधात डझनभर आघाड्या एकमेकांचे पाय ओढायला आणि एकमेकांना संपवायला सिद्ध असल्यावर मोदींनी घाबरावे तरी कुणाला व कशाला? महाराष्ट्राबद्दल बोलायचे तर इथे आता विरोधी पक्ष असा कोणी राहिलेला नाही. ती एक मोठी पोकळी आहे. राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणूकीकडे फ़िरवलेली पाठ तीच पोकळी भरून काढण्यासाठी आहे काय? चमत्कारीक वाटणारा असा हा तर्क आहे. राज ठाकरे ती विरोधी राजकारणाची पोकळी विस्तारीत करायला वा वाढवायला निवडणूकीत दुर राहिले आहेत काय? भाजपा विरोधकांना अधिकाधिक उघडे पाडून विरोधी राजकारणाची जागा व्यापण्याचा राजचा दुरगामी विचार असेल काय? १९७८ सालातल्या शरद पवारांचा इतिहास राज ठाकरे नव्याने घडवू बघत आहेत काय? नजिकच्या काळात त्याचा पडताळा येऊ शकेल. पण आज तरी आघाड्यांच्या या रणकंदनात युतीचे काम सोपे झाले आहे. 

16 comments:

  1. इतक्या मोठ्या गोष्टी करण्याची राजसाहेबांची कुवत नाही. तो पक्ष बाल्यावस्थेतच मृत झाला आहे.

    ReplyDelete
  2. हो पण शेवटी राज ठाकरेही भाजप मध्ये गेले नाही म्हणजे मिळवले, नाहीतर त्यांना आता जनाधार कुठे राहिलाय, आणि महाराष्ट्रात आता पाचव्या पक्षाला स्थान जनतेनेच नाकारले आहे

    ReplyDelete
  3. good analysis...doubtful about Raj Thakare...

    ReplyDelete
  4. फक्त राजकारण हा विषय असेल तर एकवेळ ठीक आहे पण राज ठाकरे यातून काही लोकोपयोगी घडवू शकतील असे सध्या तरी वाटत नाही.

    विरोध थोडा संयमाने केल्यास लोकांचा प्रतिसाद वाढू शकेल. पण बेछूट वक्तव्य करून नाही

    ReplyDelete
  5. ज्या मतदाराला भाजपाला पराभूत करण्याची अतीव इच्छा आहे, त्याच्यासाठी कुठलाही एक पक्ष वा एक आघाडी मैदानात नाही


    खरं आहे !!!

    ReplyDelete
    Replies
    1. Proven by Gurcharan Das article in Times of India today, 25 March 2019... 😄

      Delete
  6. भाऊ, एकदम सही विश्लेषण आहे.

    ReplyDelete
  7. Bhau tumch rajvar far Prem distay.mulat ha manus mala rajkarnasathi kami ani hafta vasulisathi jast rajkarnat ahe as vatte. Ani Raj thakre Loksabha ladhavat nahit yach karan tyana sobat ghyayla konihi tayar nahi. Ani ekate te ladhu shakat nahit. Sharad kakani tyana agadit ghyayche prayatn kele pan Congress tyana sobat gheu shakat nahi Karan u p biharmadhye jantela Congress Kay tond dakhvanar. Sharad Pawar tyana sobat ghyayche prayatn kartayat Karan tyancha paksh fakt Maharashtra purta ahe. Ani samja bhavishyat kadhi Congress ne daga dila tar rajna sobat gheta yeil. Ani Raj Aaj ewadhe virodh ka kartayat yache Karan Loksabha nahi kamit kami vidhansabha Tari Congress sobat gheyil. Tyamule ha virodh ahe. Baki Kahi nahi. Bhau vait evdhyach vatatay ki ya mansach vaktrutva evadh Bhari ahe pan ya mansakde vaichar nahit bhavishyach vedh ghenyachi kshmta nahi.
    Ani tumhi evadh rajchya babtit bhavnik ka hotay fakt tyanchya babtit eka pakshyacha neta mhanun vichar kara.
    Ani jar ha manus Sharad Pawar yancha itihas ghadau baghato asel tar yachi zep far pudhchi nahi.karan Sharad Pawar yani fakt prasangik karar kelele ahet.
    Ani dusryanchya aghadyat Kam karnyapeksha swatachaa paksh motha kasa karta yeil yacha vichar ya mansane karava. Ha manus fakt nivdnukipurta Maharashtra firto. Yachya karkrtyani kas Kam karaych. Aho yachyapeksha tumcha maharashtrat sampark jast ahe. yache karyakarte fakt suruwat mhanun manse madhe yetat ani thod nav moth zal ki dusryabpakshat nighun jatat.

    ReplyDelete
  8. राज ला नाशिकची सत्ता टिकवता आलेली नाही. मनसे नावाच्या पक्षानं संपूर्ण मान टाकली आहे. भाजपा विरोधकांना अधिकाधिक उघडे पाडून विरोधी राजकारणाची जागा व्यापण्याचा राजचा दुरगामी विचार असेल काय? ह्या प्रश्नाचं उत्तर 'नाही' हेच आहे.. राज ठाकरे नी ना संघटन केलं
    ना काम. मनसे च प्रयोजन काय आहे? उत्तर
    भारतीय लोकांविरुद्ध गरळ ओकणे कि मिमिक्री करून
    मोदीजींना शिव्या घालणं? भाउ मनसे बद्दल चुकलात













































    ReplyDelete
  9. झाकली मुठ सव्वा लाखाची.म्हणून राज लोकसभा लढवत नाही.त्यात vision काही नाही. एकच आमदार तोहि शिवसेनेत गेला . मोदिला विरोध करणे आत्मघात आहे आणी तोही ऐवढ्या खालच्या पातळीवरुन.डोवाल वर शंका काय,खळखट्याक काय हे काय vision ची लक्षणे आहेत काय.यात कुठे सकारात्मता आहे? शरदची विश्वासहार्यता काय आणी त्याजवळ हा आविश्वासु जातोय. राज कोण होतास तु काय झालास तु!!!

    ReplyDelete
  10. राज ठाकरे यांच्याकडे एवढा दूरदर्शीपणा असेल असे मला तरी वाटत नाही. त्या साठी खुप संयम लागतो, आजपर्यंत तरी असा संयमितपणा राज यांच्या कडे मी पाहिलेला नाही.

    ReplyDelete
  11. भाऊ, तुमच्या मताचा आदर आहे, सन्मान पण आहे. पण राज ???? यांच्या विषयीची मते आम्हाला संभ्रमात टाकतात. आतापर्यंत राज यांनी विलक्षण असे काही केल्याच आठवत नाही. एकमेव आमदार सुद्धा टिकावू शकले नाहीत. प्रतेक वेळी खळ खळखट्याक उपयोगी नाही पडणार. गल्लीतील निवडणुकीत याचा उपयोग होतो देशाच्या नाही.
    तुम्ही म्हणता तसे होवो आणि राजमुळ्ये नवीन काहीतरी घडो.

    ReplyDelete
  12. राज ठाकरे बद्दल चे विश्लेषण अजिबात पटत नाही.

    ReplyDelete
  13. bhau mala asa vattay ki pawar double game taktayt. Jasa tumhi mhanalat tasa harnyacha dhoka olakhun tyanni maghar ghetli tasa pakshat ajit pawarancha dabav vadhtoy. Parth pawar la umedwari milavi mhanun ajit pawaranni baherun dabav takla. Ani pawar tyala ubhe karun (ani to harel yachi kalji gheun) ajit pawarancha vadhlela dabav kami kartil. Eka dagadat don pakshi kinva saap bhi mara aur lathi bhi nahi ya typical pawar style madhye

    ReplyDelete
  14. ट्रोल कारण्याऱ्यांना घरात घुसून मारा... हेच शब्द होते ना

    ReplyDelete
  15. Bhau I think you give more respect to Raj which he doesn't deserve or you are partial about him.
    This is my opinion not critic about your knowledge.
    Do you have soft corner to Raj?

    ReplyDelete