मराठीतले व्यासंगी पत्रकार संपादक अभ्यासक कुमार केतकर यांचा कॉग्रेसकडे असलेला ओढा त्यांनी कधीच लपवला नव्हता. पण त्याचवेळी संघ वा भाजपाविषयीचा तिटकारा किंवा रागही ते सहसा लपवू शकलेले नाहीत. जेव्हा असे होते, तेव्हा तुमचा अभ्यास व्यासंग तुमच्या विश्लेषणात मदतीला येत नाही. त्यात गफ़लती व्हायला पर्याय उरत नाही. तो भाग वेगळा. कारण आता केतकर कॉग्रेस पक्षाचे निवडून आलेले राज्यसभेतील खासदार आहेत. पण त्यांना केवळ शोभेचे खासदार म्हणूनच ही निवड झाली आहे, की खरोखरच त्यांचा पक्षाला गाळातून बाहेर काढण्यासाठी उपयोग व्हावा म्हणून निवड करण्यात आली; तेच समजत नाही. कारण कॉग्रेस पक्षामध्ये याक्षणी त्यांच्याइतका चांगला व्यासंगी राजकीय अभ्यासक दुसरा कोणी नक्कीच नाही. निदान त्यांचा राहुल गांधींशी संपर्क येत नसावा किंवा त्यांच्याशी सल्लामसलत करणे राहुलना आवश्यक वाटत नसावे. कदाचित अशा कुणा हुशार व्यक्तींची मदत घेण्य़ाची राहुलना गरजही वाटत नसणे शक्य आहे. अन्यथा राफ़ायलच्या निमीत्ताने राहुल इतके बहकत वहावत नक्की गेले नसते. अशा बहकण्याने अतिरेकाचे होणारे दुष्परिणाम कुमार केतकरच नेमके समजावू शकले असते. मागल्या लोकसभेसाठी मतदानाच्या काही फ़ेर्या पुर्ण झाल्या, तेव्हा एका वाहिनीवर चर्चा करताना अशा अतिरेकाचे विपरीत परिणाम केतकरांनी सांगितल्याचे आठवते. तेव्हा नरेंद्र मोदींचा खुप गाजावाजा चाललेला होता. हरहर मोदी घरघर मोदी किंवा मोदी-मोदींच्या सामुहिक गर्जना दिर्घकाळ चालल्याचा सामान्य माणसाच्या मनावर काय परिणाम होतो? तेच सांगताना केतकर म्हणाले होते, हे ओव्हर किलींग आहे. म्हणजे अतिरेक आहे आणि तोचतोचपणा कंटाळवाणा होतो. त्यातून लोकमत दुरावते. मानसशास्त्राच्या संकल्पनेनुसार त्यात तथ्य नक्कीच आहे. मग आठदहा महिने राफ़ायलचा अतिरेक केतकरांनी राहुलला करू दिला असता काय?
अशा कुठल्याही अतिरेकी प्रचाराचा विपरीत परिणाम नक्की होतो. किंबहूना तशाच अतिरेकाने नरेंद्र मोदींना गुजरातच्या मुख्यमंत्री पदावरून पंतप्रधान होण्यापर्यंतचा मार्ग प्रशस्त करून दिला. हे सत्य मात्र तेव्हाही केतकरांनी स्पष्टपणे सांगितलेले नव्हते, की आजही ते सांगत नाहीत. २००२ च्या गुजरात दंगलीवरून मोदींची सातत्याने कोडी करण्याचे डावपेच खेळले गेले. त्यामुळे त्यातली दाहकता हळुहळू संपत गेली. तरी २०१४ पर्यंत त्याच दंगलीचा अगत्याने उल्लेख होत राहिला. त्याला अतिरेक म्हणता येईल. बारा वर्षे दंगलीविषयी बोलण्याच्या आरोप करण्याच्या तुलनेत, पाचसहा महिने घरघर मोदी हा नगण्य अतिरेक होता. झालेही तसेच. मोदींच्या घोषणांचा विपरीत परिणाम होऊ शकला नव्हता. उलट त्यांना त्याचा लाभ मिळाला. मागल्या दोनतीन वर्षात राहुल वा अन्य विरोधकांनी मोदींना भ्रष्ट ठरवण्यासाठी जे डावपेच खेळलेले आहेत, त्याचा मात्र अतिरेक झालेला आहे. नोटाबंदीपासून मोदींची कुठलेही निमीत्त शोधून कोंडी करण्याचा सतत प्रयत्न झाला. तोही प्रत्येकवेळी फ़सत गेला आणि ते आरोप मागे पडत गेले. नोटाबंदी संपल्यावर जीएसटीला गब्बरसिंग टॅक्स म्हटले गेले. अखेरच्या टप्प्यात राफ़ायल विमानांच्या खरेदीत मोदींनी अनिल अंबानी यांच्या खिशात तीस हजार कोटी रुपये घातल्याचा आरोप राहुल आठ महिने सातत्याने करीत आहेत. त्याचा कितपत परिणा होऊ शकणार आहे? कारण त्याचा कुठलाही परिणाम जनमानसावर होताना दिसलेला नाही. उलट आता ‘चौकीदार चोर है’ अशा राहुल गर्जनेचा मोदींनी आपल्या लाभासाठी उपयोग करून घेण्य़ाची झकास खेळी केलेली आहे. त्यांनी आगामी लोकसभा प्रचारासाठी ‘मै भी चौकीदार’ असे एक गीत बनवून त्याची मोहिमच हाती घेतली आहे. तिचा आशय थोडक्यात इतकाच आहे, की मोदी म्हणजे चौकीदार चोर असेल तर आम्ही सारेच चोर आहोत, असे त्यांच्या पाठीराख्यांनी जगाला ओरडून सांगायचे.
हल्लेखोराच्या हातातून हत्यारच काढून घेतले तर त्याच्यातला आवेश गळून पडत असतो. १९९६ च्या सुमारास उत्तरप्रदेशात सपा-बसपा यांच्या आघाडीने निवडणूका लढवल्या होत्या व भाजपाला बहूमत मिळू दिलेले नव्हते. त्या दोघांना एकत्रितही कमीच जागा मिळालेल्या होत्या. पण भाजपा वगळता सर्व पक्षांना एकत्र करून कांशीराम मुलयम यांनी संयुक्त सरकार बनवलेले होते. मात्र कांशिराम यांच्या सहकारी मायावती ते सरकार चालू देत नव्हत्या. त्याचा लाभ उठवून भाजपाने एक डाव खेळलेला होता. ४०-५० आमदारांच्या बसपाने सत्तेतून बाहेर पडावे आणि भाजपाचा बाहेरून पाठींबा घेत मायावतींनी मुख्यमंत्री व्हावे. मोहात पडण्यासारखी ऑफ़र होती आणि मग तसे झाले. त्यावेळी पुरोगामी पत्रकारांनी कांशिराम यांच्यावर प्रश्नांचा भडीमार केला होता. ज्या भाजपाला सतत मनुवादी म्हणून बसपा हिणवत होता. त्याचाच पाठींबा घेऊन आणि पुरोगामी मुलामयना दगा देऊन सरकार बनवणे; हा संधीसाधूपणा नाही का? अशा प्रश्नांची सरबत्ती झाल्यावर कांशिराम बचावात्मक पवित्र्यात गेले नाहीत. प्रश्नकर्त्यांची तीच अपेक्षा होती. पण कांशिराम आक्रमक होऊन म्हणाले, आम्हा दलितांना पाच हजार वर्षे संधीच मिळालेली नाही. यापुढे मिळणारी प्रत्येक संधी साधलीच पाहिजे. त्यामुळे मी नक्कीच संधीसाधू आहे. त्याला मी कलंक मानत नाही. अभिमानाने सांगतो की आम्ही संधीसाधू आहोत. आरोपकर्त्याच्या आरोपामुळे जो घाबरून जातो किंवा ज्याला शरम वाटते, तेव्हा आरोपाची भेदकता असते. पण आरोपाचा इन्कार करण्यापेक्षा ते अभिमानाने मिरवले जातात, तेव्हा आरोपकर्ता निष्प्रभ होऊन जात असतो. कांशिराम यांनी नेमके तेच केले होते आणि आरोपाला घाबरण्यापेक्षा तोच आरोप आभूषण म्हणून मिरवण्याचा पवित्रा त्यांनी घेतला. मग त्यांच्यावर प्रश्नांचा भडीमार करणार्यांचीच बोलती बंद होऊन गेली. मै भी चौकीदार मोहिमेचा अर्थ समजून घेताना कांशिराम यांचा तो पवित्रा लक्षात घ्यावा लागेल.
मागल्या पाचसहा महिन्यात राहुल यांनी राफ़ायलच्या विषयावरून अनेक बेछूट आरोप केलेले आहेत आणि त्यासाठी कुठलाही पुरावा दिलेला नाही. अशा आरोपांना उत्तरे देऊन वा खुलासे करून झाल्यावरही उपयोग झालेला नाही. कॅग किंवा सुप्रिम कोर्टानेही राफ़ायलमध्ये घोटाळा नसल्याचा निर्वाळा दिलेला आहे. त्यानंतर रोज नवे आरोप करायचे आणि उत्तर मागून भडीमार करायचा. हा अतिरेक राहुलनी केल्याने आधीच हे आरोप हास्यास्पद होऊन गेलेले आहेत. त्यातच आता मोदींनी चौकीदार चोर है, या घोषणेचाच आपल्या लाभासाठी वापर करण्याचा पवित्रा घेतला; तेव्हा कांशिराम यांची आठवण झाल्याशिवाय राहिली नाही. कितीही खुलासे व उत्तरे देऊन तुमचे समाधान होणार नसेल, तर तुम्ही चौकीदार चोर म्हणून हासडलेली शिवी, आपण शिरसावंद्य मानतो असाच हा पवित्रा आहे. प्रामाणिक पंतप्रधानाला राहुल चोर म्हणत असतील, तर देशातला प्रत्येक प्रामाणिक नागरिकच चोर आहे, असेच यातून मोदीना सुचवायचे आहे. ‘मै भी चौकीदार’ ही घोषणा करून मोदी थांबले नाहीत. त्यांनी आपल्या सोशल मीडिया खात्यात आपले नाव बदलून ‘चौकीदार नरेंद्र मोदी’ असे केलेले आहे. तेच नाहीत तर भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांनीही आपल्या खात्यावरचे नाव बदलून चौकीदार अमित शहा असे केलेले आहे. आता पुढल्या काही दिवसात याचे लोण आणले जाईल आणि लाखो करोडो सोशल मीडिया खात्यांवर त्यांचे पाठीराखे चौकीदार ही बिरूदावली म्हणून मिरवू लागतील. ही संख्या जितकी फ़ैलावत जाईल तितका परस्पर त्याचा गवगवा होणार आहे. मुख्य प्रवाहातील माध्यमांनाही त्याच्या बातम्या कराव्या लागतील. मागल्या काही महिन्यापासून चाललेला ‘चौकीदार चोर है’ हा आरोप नुकसान करण्यापेक्षा मोदींना प्रचार व मतदानात लाभ मिळवून देणारा ठरून जाईल. केतकरांच्या भाषेत त्यालाच ओव्हर किलींग वा अतिरेकाचा तोटा म्हणतात ना?
मणिशंकरांचा ‘चायवाला’ नरेंद्र मोदींना पंतप्रधान पदापर्यंत घेऊन गेला होता. राहुलचा चौकीदार चोर काय चमत्कार घडवील?
'Chowkidaar Chor hai' has been turned on its head...
ReplyDeleteThis man feeds on negativity. Never throw negativity at him... 😄
Superb study in mass communication and mass influence... 👏🏻👏🏻
भाऊ, तुम्ही म्हणता आहात तसेच घडो..
ReplyDeleteमै भी चौकिदार हूँ
ReplyDeleteमोदींना हे आधीच सुचले असावे, overkill होऊ नये म्हणून मुद्दाम उशीर केला असावा.
ReplyDeleteभन्नाट भाउ.खरच मोदींनी आरोपाचा अलंकार केलाय.गुजरात दंगलीवेळी पण असच केल होत,चायवालाच पण आता हे
ReplyDeleteया यडपटांनी मोदीला आणखी ओळखलेच नाही...मोदीला दगड फेकून मारले तरी मोदी त्यापासून घर बनवुन आनंदाने राहतिल. RSSआणी मोदी द्वेष या शिवाय त्यांच्या जिवनात दुसरे ऊद्दिष्टच नाहि...
ReplyDeleteनिवडणुका , त्यापूर्वीचा पाकिस्तानवरचा विमानहल्ला ( जो आपणच करायला सांगितला होता असे आता शरदराव सांगत आहेत ) काँग्रेस, राष्ट्रवादीमधले जागा वाटप , विखेप्रकरण ह्या साऱ्या धामधुमीत आपले महाविचारवंत आणि तल्लख बुद्धीचे स्वामी कुमार केतकर सध्या कुठेतरी गायब झाले आहेत हे समजत नाही । तुमच्या लेखामुळे त्यांची विलक्षण आठवण होते आहे आणि त्यांचे विचार कानी न पडल्यामुळे जीवाची तगमग व्हायला लागली आहे हे आत्ता लक्ष्यात येते आहे ।
ReplyDeleteभाऊ, मै भी चौकीदार
ReplyDeleteमौत का सौदागर, चायवाला असे शब्द मोदींची टिंगलटवाळी, निंदानालस्ती करण्यासाठी वापरले गेले. परिणाम मोदी गुजराथचे मुख्यमंत्री, देशाचे पंतप्रधान बनले. आजही तसाच पलटवार मोदींनी केला.
ReplyDeleteभाऊ ....
ReplyDeleteसुंदर...नेहमीप्रमाणे...
भाऊ, कुमार केतकरांचा मोदी द्वेष जगजाहीर आहे. पण मागच्या निवडणुकीत एका वाहिनीवर ते बोलल्याच आठवतयआ की मोदी हे पक्के राजकारणी आहेत.ते बुद्धीबळाच्या खेळासारख राजकारण करतात.विरोधकांना वाटत आपण मोदींना घेरलय,पण मोदी अशी चाल खेळतात की मग विरोधकांच्या लक्षात
ReplyDeleteयेते की मोदींनीच विरोधकांना घेरलय.
जे तुम्हाला एक विश्लेषक म्हणून कळत ते काँग्रेस ला कधी कळेल का?? शक्यताच नाही. तुम्हाला एक विनंती आहे. एकदा राज ठाकरे हे का हाराकिरी करताहेत हे समजत नाहीये ते कळवून घ्यायचं आहे. तुम्ही काही सांगू शकलात तर ,..??
ReplyDeleteचमत्कार 44 वरुन 4
ReplyDeleteअगदी खरंय भाऊ, राहुल गांधींना युवराज म्हणून सगळे हिणवत असताना त्यांनी हे म्हंटल होतं, त्यात काय वाईट आहे? हो आहे आमचा परिवरवाद वगैरे...! त्या नंतर भाजपला हा मुद्दाच बदलावा लागला. पण हे उदाहरण सुद्धा गांधींना लक्षात येऊ नये? :)
ReplyDeleteGoogly
ReplyDeleteमै भी चौकीदार
ReplyDelete