Friday, March 29, 2019

मोदी है तो मुमकीन हैकुठे आघाड्या होऊ शकतात आणि कुठे जागावाटपात अधिक जागा कॉग्रेस मागू शकते; त्याची माथेफ़ोड करण्यासाठी कार्यकारिणीची बैठक बोलावली होती. तिथे जमलेले एकामागून एक ज्येष्ठ नेते श्रेष्ठी कपाळाला हात लावून बसलेले होते. राहुल गांधींनी मागल्या कित्येक महिन्यापासुन उडवलेले पतंग एकामागून एक कापले गेल्याने अवघी कार्यकारिणी अस्वस्थ झालेली होती. निवडणूकीचे वेळापत्रक जाहिर झाले आणि तरीही कुठे उमेदवार निश्चीत करता येत नाहीत, म्हणून माजी पंतप्रधान मनमोहन सिंग कपाळाला हात लावून बसलेले होते. पलिकडे बसलेले चिदंबरम त्यांना म्हणाले, सर तुम्ही नशिबवान आहात, कारण शीखधर्मिय आहात. त्यावर आशंकित चेहर्‍याने मनमोहन त्यांच्याकडे बघू लागले. तर चिदंबरम उत्तरले, तुमच्या डोक्याला कसला ताप नाही! पुन्हा मनमोहन शंकाकुल झाले? त्यामुळे चिदंबरमना खुलासा करावा लागला, तुमच्या माथ्यावर फ़ेटा आहे. आम्हाला डोकेच आपटावे किंवा खाजवावे लागतेय आणि तुमचे डोके फ़ेट्यामुळे शाबुत आहे. फ़ेटा खाजवून तुम्ही सुरक्षित आहात. पक्षाध्यक्षांनी आमच्यावर मात्र डोके भिंतीवर आपटण्याची वेळ आणलेली आहे. हे ७२ हजार रुपये कुठून आणायचे आता? त्या उत्तराने मनमोहन समाधानी झाले आणि पुन्हा फ़ेटा खाजवू लागले. अकस्मात राहुल गांधींनी प्रत्येक गरीब कुटुंबाला ७२ हजार रुपये खात्यात देण्याची घोषणा करून टाकली आणि जुन्याजाणत्या कॉग्रेस नेत्यांची अशी घालमेल चालू होती. इतक्यात आपल्या पांढर्‍याशुभ्र भुवयांना पिळ देत ख्यातनाम वकील कपिल सिब्बल बैठकीच्या खोलीत आले. त्यांचा चेहरा पडलेला होता आणि म्हणूनच सदाप्रसन्न मनिष तिवारींकडे सगळ्यांच्या प्रश्नार्थक मुद्रा वळल्या. निवडणूक आयोगाकडे मोदी विरोधात केलेल्या ताज्या तक्रारीचा निकाल घेऊन दोघे बैठकीला आलेले होते. तिथेही थप्पड बसल्याची ब्रेकिंग न्युज त्यांचे चेहरेच देत होते.

अवकाशातला उपग्रह क्षेपणास्त्राने पाडण्याचे तंत्र यशस्वी केल्याची घोषणा पंतप्रधान म्हणून मोदींनी केल्यामुळे राहुलची ७२ हजार रुपयांची योजना उध्वस्त झाली होती. ती वा़चवण्यासाठीच हे दोघे नामवंत वकील आयोगात तक्रार घेऊन गेलेले होते. आचारसंहिता लागलेली असताना पंतप्रधान देशाला उद्देशून अशी घोषणा कशी करतात? तो आचारसंहितेचा भंग असल्याची तक्रार त्यांनीच केली होती. तिलाही आयोगाने वाटाण्याच्या अक्षता लावल्या. म्हणून ते दोघे बेचैन होते. जिथे म्हणून सापळा लावावा किंवा जाळे टाकावे, त्यातून हा मोदी अलगद कसा निसटतो? त्याचा थांगपत्ता लागत नसल्याने ही अवघी कार्यकारिणी रडकुंडीला आलेली होती. पण अजून राहुल किंवा प्रियंकाचा पत्ता नव्हता. त्यामुळे दबल्या आवाजात त्यांच्यात चर्चा चालली होती. इतक्यात कोणी म्हणाले पंतप्रधानाने तशी घोषणा करायला हरकत नव्हती. पण त्यात नेहरूंमुळे हे शक्य झाल्याचे सांगायला हवे होते. शास्त्रज्ञ वा वैज्ञानिक भारतातही सापडू शकतात, अशी ‘डिस्कव्हरी’ पंडीतजींनी आपल्या पुस्तकात केलेली होती. म्हणूनच पुढे भारतात वैज्ञानिक संशोधन सुरू झाले. त्यापुर्वी भारतामध्ये सी. व्ही. रामन वगैरे भोंदू लोक विज्ञानाची भजी वडे तळत असल्याचे इतिहासात नमूद असल्याचेही सुरजेवालांनी कथन केले, तेव्हा उपस्थितांचे चेहरे खुलले. सहाजिकच मुद्दा पुन्हा एकदा आगामी लोकसभेच्या निवडणूक जाहिरनाम्याकडे आला आणि त्यात प्रत्येक कुटुंबाला ७२ हजार कोटी कुठून द्यायचे, याविषयी चर्चा सुरू झाली. पुन्हा चिदंबरम विरळ केसातून हात फ़िरवित डोके खाजवू लागले. कारण पत्रकर परिषदेत राहुलनी त्याविषयीचा खुलासा चिदंबरम देतील, असे जाहिर करून टाकलेले होते. पण तितकी म्हणजे साडेतीन लाख कोटी रुपयांची रक्कम कुठूनही जमा होत नव्हती, अगदी कार्तिने दडवलेली वा वाड्राच्या खात्यातली आणि नॅशनल हेराल्डमधून आलेल्या रकमा एकत्र करूनही तितकी रक्कम दिसत नव्हती. म्हणून चिदंबरम हैराण होते.

इतक्यात सुरजेवाला म्हणाले चिंता करू नका, आपण प्रियंका गांधींना त्याचे उत्तर शोधायला सांगू. किंवा विजय मल्ल्यांकडून काही रक्कम उधार घेऊ. अशी उलटसुलट चर्चा रंगलेली असतानाच नवे दोन मुख्यमंत्री बैठकीत दाखल झाले. कमलनाथ आणि गेहलोट यांचे उपस्थितांनी स्वागत केले आणि पुन्हा सगळे खाली बसले. सर्वांचे चिंताक्रांत चेहरे बघून कमलनाथांनी आपला सदरा झटकला. त्यांना कोणीतरी ७२ हजार खात्यात जमा करण्याची समस्या कथन केली, तेव्हा मुख्यमंत्री खळाळून हसले. त्यात काय मोठे? आम्ही असे हजारो लाखो रुपये कर्ज माफ़ करून शेतकर्‍यांच्या खात्यात पैसे जमा केले, तीच प्रणाली वापरूया. तिथे रोकड वा रक्कम आवश्यक नाही. अगदी सोपे काम आहे. तुमच्यापाशी नुसता मोबाईल असला म्हणजे झाले. बाकीचे अर्थशास्त्री श्रेष्ठी चक्रावून कमलनाथांकडे आदराने बघू लागले. इतका वेळ अर्थसंकल्प व रिझर्व्ह बॅन्क असला काथ्याकुट करीत बसलेल्या चिदंबरम व मनमोहन यांच्या चेहर्‍यावरचे नवल लपत नव्हते. त्यांनीही प्रश्नार्थक मुद्रेने कमलनाथांकडे पाहिले, तर त्यांनी खिशातून मोबाईल काढला आणि त्यातला एक मेसेज सर्वांना दाखवला. विधानसभा निवडणूकीत सत्ता मिळाल्यावर दहा दिवसात कर्जमाफ़ीचे आश्वासन राहुलनी दिले होते. आम्ही तसा निर्णय दहा दिवसात घेतला आणि अजून एक छदामही लोकांना दिलेला नाही. दिले फ़क्त मेसेज! बाकीच्यांनी त्या मोबाईलवर झडप घातली व संदेश वाचला. त्यात म्हटले होते, लोकसभा निवडणूकीची आचारसंहिता लागलेली असल्याने आता मतदान संपल्यावरच खात्यात पैसे जमा होतील. ही कल्पना सर्वांना खुप आवडली. पण चिदंबरम शंकाकुल झाले. मतदान संपून आपले सरकार आले तर पुढे काय? कमलनाथ म्हणाले, ही शेवटची निवड्णूक थोडीच आहे? देशात कुठेना कुठे निवडणूका सतत चालू असतात. मग एक मतदान संपल्यावर पुढल्या मतदानापर्यंत गप्प बसायचे आणि आचारसंहिता लागली, की हाच संदेश धाडायचा. डोक्याला कसला ताप नाही की पैसे जमवण्याची झिगझिग नाही. अकस्मात बाहेर गडबड झाली, सगळे तिकडे बघू लागले.

राहुलजी आलेले होते. त्यांचा प्रवेश होताच सगळे ज्येष्ठ श्रेष्ठ उठून ताडकन उभे राहिले आणि कंबरेत वाकून कुर्निसात केला. हसतमुख राहुलना सर्वांचे चिंताग्रस्त चेहरे बघूनही हसूच आले. कसली समस्या आहे? तेव्हा आधी कोणाची बोलायची हिंमत नव्हती. पण सुरजेवालांनी धाडस केले आणि ७२ हजाराचा विषय काढला, तेव्हा इतरांना धीर आला, प्रत्येक कुटुंबाला ७२ हजार म्हणजे साडेतीन लाख कोटी आणायचे कुठून? चिंदबरमनी दबल्या आवाजात प्रश्न केला. तेव्हा राहुल गांधींसोबत आलेले पित्रोडा उत्तरले, फ़ार मोठे काम नाही. मोदी आधारकार्डाला जोडून असलेल्या खात्यात पैसे जमा करतात ना? आपण नीलकेणीला हाताशी धरून एक नवे ओळखपत्र गरिबांसाठी सुरू करायचे. त्याचे नाव असेल ‘उधारकार्ड’ त्यात गरिबालाच नव्हेतर कोणालाही हवी तितकी रक्कम सरकारने द्यायची. फ़क्त ही रक्कम रोखीतली नसेल, दलाल नकोत म्हणून हे उधारकार्ड खुप महत्वाचे ठरेल. त्यात सरकार जमा करील ती रक्कम सरकारच्या माथी उधारी म्हणून बसेल. सरकार त्या नागरिकाचे आपल्याकडे देणे असल्याचे मान्य करीत असल्याची ती पावती असेल. रक्कम द्यायला नको की अर्थसंकल्पात तरतूदही करायचे काही कारण नाही. राहुलची योजना यशस्वी करण्याचा हा सोपा आणि डिजिटल उपाय आहे. इतका वेळ हसत सहकार्‍यांचे ऐकणारे राहुल एकदम चिडले आणि म्हणाले गप्प बसा. तुमची डोकी चालली असती, तर मागल्या लोकसभेत आपण सत्ता गमावली नसती की मोदी बहूमताने निवडून आले नसते. तुमच्या भरवशावर मी आगामी लोकसभा लढवित नाही की कॉग्रेसचे भविष्य अवलंबून नाही. तुमच्यापेक्षा माझा मोदींवर अधिक विश्वास आहे. घोषित केली, तेव्हाही अशी ७२ हजार प्रत्येकी वाटण्याची योजना अशक्य कोटीतली आहे, हे मला पक्के ठाऊक होते. पण मी घोषित केली, कारण तुमच्यापेक्षा माझा मोदींवर विश्वास होता आणि जनतेचाही आहे. चकीत होऊन तमाम कॉग्रेसश्रेष्ठी राहुलकदे बघू लागले. तर हाताची मूठ वळून राहुल उद्गारले, ‘हमे जो नामुमकीन है, वह सबकुछ; मोदी है तो मुमकीन है’.

13 comments:

 1. Aho Bhau
  Bhannat Comedy Kelit. Ekhada Comedy chitrapat kadha asha vishayavar.

  Khup Haslo.

  ReplyDelete
 2. आज mood क्या है ? 😂😂😂😂

  ReplyDelete
 3. राहुल गांधींच्या या नव्या योजनेला किती लोकं भुलतील अस वाटत? मला वाटत काँग्रेसचे पारंपरिक मतदार सोडले तर बाकी कोणीही विश्वास ठेवणार नाही

  ReplyDelete
 4. भाऊ तसे पाहता काँग्रेस व भाजप दोघेही शेतकऱ्यांना खोटे आश्वासन देतात.
  भाजप नेही खोटी कर्जमाफी केलीय. एक रुपया जमा झाली कर्ज खात्यात.
  सगळे सारखेच मग आहे राजकारणी.

  ReplyDelete
 5. वा! भाऊ चपखल उपरोध.

  ReplyDelete
 6. भाऊ सही होळी शिमग्याच्या सोंगाचे बिंग चांगले बाहेर काढलेत...
  मजा आ गया...
  मोदी स्स्वतःच्या कर्तबगारी वर मोठे झाले व प्रत्येक मिळालेल्या संधीचा ऊपयोग केला.
  व पाय जमिनीवर च ठेऊन सुरवात केली व जमिनीवर च पाय राहु दिले..
  म्हणजे गुजरात मध्ये शेतकरी व शेती विकास यावर भर देत सुरवात केली व पुढे ईतिहास घडवला..
  आणि देश पातळीवर नेतृत्व करताना पहिली विदश निती वर भर दिला कारण केंद्रा मध्ये नेतृत्वाचा अनुभव नसल्यामुळे ही बाजु भक्कम करणे आवश्यक मानले. याची मिडियावाले व दलाल घराणेशाहीच्या देशभर पसरलेले अनौरस पुत्रानी खुप बदनामी केली व भोळ्या अशिक्षीत व शिक्षीत जनतेची मोदी सुटबुट घालुन देशाच्या पैशावर विदेश वारी करतायत असा मिडियावाले द्वारे डंका पिटत दिशाभुल केली पण मोदींच्या या दुरगामी धोरणाचे परिणाम पुलगामा हल्ल्याचा बदला घेताना व ईतर अनेक बाबतीत जनतेला दिसले.. पण परत मिडियावाले व दलाल यांनी अशा सर्जीकल स्टाईकवरच अविश्वास व्यक्त केला तर दुसरीकडे हे सैन्याचे यश आहे असे दाखवून मोदी क्रेडिट घेतात अशी अशिक्षीत जनतेची दिशाभूल केली. पण हिच सेना ईतर सरकार असताना हे का करु शकली नाही या मुद्द्यावर डोळेझाक करतात.. व बरेचसे माध्यमवाले व पुरोगामी खानदानी अनौवरस पुत्र हा मुद्दा बाजुला पडावा व पुर्वीच्या सरकार ची नाकामियत लपवत आहेत.. यात बिजेपीचे प्रवक्त्ये पण हा मुद्दा लाऊन धरुन पुरोगामी वर हल्ला करण्यात कमी पडतायत..
  मोदींना भारताला जयचंदी दलाल अनौरस औलादांचा शाप आहे हे माहीत आहे व त्यानुसारच चाली खेळतात.. यामुळे विरोधी पक्षाची केविलवाणी अवस्था झाली आहे.
  यामुळे 72000 रु वाटण्याची घोषणा करत शतायुषी पक्षाने परत एकदा (एमपी राजस्थान याचा अनुभव घेऊन) मोठी ( देशासाठी विनाषकारी) चाल खेळली व 6000 ला 72000 चे ऊत्तर दिले. यात जनता नक्कीच भुलणार याची तिळमात्र शंका या पक्षाला नाही. व अखलाख सारखे तातपुर्ते व राम मंदिर 15 लाख ईतर मुद्दे याची कोल्हेकुई करायला मिडियावाले व पुरोगामी आहेत. केवळ या भांडवलावर मोठा जुगार खेळत मात करण्याचा प्रयत्न केला आहे..
  यामुळे नक्कीच फरक पडणार आहे. व प्रादेशिक पक्ष झोपडपट्टीत व शेतकरी कामकरी मजुर यांना नक्कीच परत मोदी भाजपची मत फिरवण्यात यशस्वी होणार करणार.. यात युपी पण सपा बसपा आघाडी भाजप साठी बिघाडी करणार अशीच चिन्हे दिसतात पण युपी वाले कदाचित मतदान करताना बुवा बबुवा यांनी केलेल्या आवहानाला प्रतिसाद देतात कि देशाच्या पातळीवर विचार करुन मतदान करतात यावर बरच अवलंबून आहे
  या परिस्थितीत जरी वरकरणी मोदी यशस्वी होतील असे वाटले तरी अकारण नाराज स्वार्थी मध्यमवर्गीय जिएसटी प्लॅस्टीकची बंदी पेट्रोल डिझेल दरवाढ रेल्वे दरवाढ, आयकर कपात केली नाही याचा डुक ठेवत किरकोळ मताच्या फरकाने देशाला विनाशा कडे परत घेऊन जाणार.. असेच वाटते..
  याला मोदी काय प्रतीचाल खेळतात हे पहिले पाहिजे.
  जाती पाती धर्म प्रांतीय व जयचंदी स्वार्थी खुशालचेंडु मध्यमवर्गीय जनता एक गठ्ठा मतदान करत नाही व मत विभागणी करुन परत देशाला लंगुचालन अराजकी व भ्रष्टाचारी खाईत लोटणार का हे काळच सांगेल.. यात शरद पवार यांनी सांगितलेले धोरण प्रत्येक प्रादेशिक पक्ष आपापल्या राज्यात मत मिळवत काही खासदार निवडुन आणण्यासाठी यशस्वी झाले तर हेच कडबोळे परत सत्तेसाठी एकत्र येईल ...
  यावर निश्चित काही करणे आवश्यक आहे..
  एकेएस

  ReplyDelete
 7. वा झकासच । अबकी बार मोदीही दुबार ।।

  ReplyDelete
 8. त्यापुर्वी भारतामध्ये सी. व्ही. रामन वगैरे भोंदू लोक विज्ञानाची भजी वडे तळत असल्याचे इतिहासात नमूद असल्याचेही सुरजेवालांनी कथन केले.................भाऊ एकच नंबर लेख एकदम कडक जमला आहे बघूया काय होते जशी जशी निवडणूक जवळ येतेय तसे तसे लेख एकदम मार्मिक होत आहेत

  ReplyDelete