Friday, March 22, 2019

एक्स्पायरी डेट

priyanka gandhi के लिए इमेज परिणाम

लोकसभा निवडणूकीच्या पहिल्या फ़ेरीतील मतदारसंघातले उमेदवारी अर्ज भरण्याचे काम सुरू झाले आहे आणि अजून अनेक पक्षांना आपले तिथले उमेदवारही निश्चीत करता आलेले नाहीत. अशावेळी कॉग्रेसचा जुनाच हुकमी पत्ता म्हणून राहुल गांधींनी आपल्या भगिनीला मैदानात आणले आहे. तसे बघायला गेल्यास प्रियंका गांधी पुर्वी देखील मैदानात होत्या आणि अनधिकृतपणे पक्षकार्य करीत होत्या. त्यांनी मागल्या दहापंधरा वर्षात अमेठी रायबरेली या दोन लोकसभा मतदारसंघात आई व भावासाठी पक्षाचे कार्य केलेले आहे. तेवढेच नाहीतर राहुलने गडबड केली की सारवासारव आणि सावरासावर करण्याचीही पराकाष्टा केलेली आहे. त्याचा कधी उपयोग झाला नाही, ही गोष्ट वेगळी. पण यावेळी राहुलनी अधिकृतपणे सरचिटणिसाचा दर्जा देऊन आपल्या भगिनीला उत्तरप्रदेशच्या राजकारणात उतरवले आहे. कित्येक वर्षापासून पुरोगामी माध्यमे व पत्रकार अशा निर्णयाच्या प्रतिक्षेतच होते. त्यामुळे अशा लोकांनी विनाविलंब प्रियंकाचा करिष्मा सांगायला सुरूवात केली. त्यांचा अपेक्षाभंग होऊ नये याची काळजी त्या महिलेला घेण्याखेरीज गत्यंतर उरले नाही. रोज उठून मोदींना चार शिव्या हासडल्या, मग पुरोगामी व्यक्तीची पचनसंस्था व्यवस्थित काम करत असते. त्याला हातभार लावण्यासाठी प्रियंकांना काहीबाही बोलणे भाग आहे. सहाजिकच पुर्व उत्तरप्रदेशचा दौरा त्यांनी सुरू केल्यावर असे काही चटपटा बोलणे भाग होते आणि त्यांनीही कोणाला निराश केले नाही. अकस्मात त्यांना राहुलच्या जुन्या गुरूजी दिग्गीराजांचे शब्द आठवले आणि त्यांची उत्पादित मालावर एक्स्पायरी डेट असल्याची थिअरीही आठवली. त्यांनी मोदींना इशारा देऊन टाकला, की मोदी सरकारचीही एक्स्पायरी डेट आलेली आहे. तमाम पुरोगामी पत्रकार खुश झाले आणि ‘एक्स्पायरी मॉल’ चालवणार्‍यांची ही जाहिरात त्यांनी अगत्याने मुखपृष्ठावर छापून टाकली.

मोदींच्या भाषणात आपण पाच वर्षात केलेले काम सांगताना नेहमी ७० वर्षाचा आधीचा कारभार आणि आपली कारकिर्द असा उल्लेख येत असतो. त्यावर शेरा मारताना प्रियंका म्हणाल्या, ७० वर्षाचे रडगाणे गाण्यालाही एक्स्पायरी डेट असते. किती नेमके आणि बोचरे शब्द आहेत ना? खरे़च आहे. तशी जगातल्या कुठल्याही सजीव वा उत्पादित गोष्टीला एक्स्पायरी डेट असते. ती अवघ्या पाच वर्षे वापरलेल्या मोदीं नावाच्या सरकारसाठी असेल, तर सव्वाशे वर्षे वापरून निकामी झालेल्या कॉग्रेस पक्षाला सुद्धा असणार ना? की कॉग्रेस पक्ष अजरामर असल्याचा काही वैज्ञानिक पुरावा आहे? ज्या पक्षाच्या सरचिटणिस म्हणून प्रियंका आता अधिकृतपणे राजकारणामध्ये आलेल्या आहेत, त्या पक्षाची एक्स्पायरी डेट कधीच संपून गेलीय. हे प्रियंकांच्या लक्षात कसे आलेले नाही? १९६७ पासून सामान्य मतदार कॉग्रेसला भंगारात टाकायला उतावळा झालेला आहे. त्यासाठी आघाडीचे वा गठबंधनाचे विविध प्रयोग होऊन गेलेले आहेत. पण प्रत्येकवेळी अधिकाधिक गलितगात्र झालेल्या कॉग्रेसला नवी संजिवनी देण्यासाठी पुरोगाम्यांनी सतिव्रताचा अविष्कार केल्यानेच प्रियंका सरचिटणिस होण्यापर्यंत कॉग्रेस तग धरू शकलेली आहे. आपला पक्ष व त्याची उपयुक्तता कधॊच कालबाह्य होऊन गेलेली आहे, त्याचा थांगपत्ता पक्षाध्यक्ष राहुलना लागलेला नाही आणि ते त्याच एक्स्पायरी होऊन गेलेल्या मालाचा ‘मॉल’ थाटून बसलेले आहेत. तिथे नवनवे विक्रेते आणुन ठेवल्यास आपला एक्स्पायरी होऊन गेलेला माल पुन्हा जोरदार खपू शकेल, अशी त्यांची आशा आहे. काही पुरोगामी विचारवंत व पत्रकारांची तशीच अपेक्षा आहे. त्यामुळे प्रियंकांना मैदानात आणले गेलेले आहे. सहाजिकच आपल्या दुकानातला माल कसा नवा आणि आधुनिक आहे, त्याचा त्यांनी प्रचार जरूर करावा. पण एक्स्पायरी डेट असले शब्द चुकूनही बोलायचे नसतात. हे त्यांना कोणी सांगायचे?

१९७० च्या दशकात युवक नेते म्हणून उदयास आलेले व युवक कॉग्रेसचे अध्यक्षपद भूषवलेले इंदिराजींच्या काळातील ‘युवक’ अजून कॉग्रेसमध्ये मोक्याच्या जागा अडवून बसलेले आहेत. आनंद शर्मा, तारीक अन्वर, अंबिका सोनी, गुलाम नबी आझाद अशा युवकांची एक्स्पायरी डेट काय असते? तेच अजून नागोबा बनून बसले आहेत. त्यांच्याकडे प्रियंकांनी कधी वळून तरी बघितले आहे काय? नरेंद्र मोदी राजकारणात वा निवडणूकीच्या आखाड्यातही नव्हते, त्या कालखंडातले हे नव्या दमाचे कॉग्रेस नेते लोकसभा मंत्रीपदे भूषवून मोकळे झालेले आहेत. त्यांच्यावर कुठे एक्स्पायरीची तारीख छापलेली आहे किंवा नाही, याची झाडाझडती प्रियंकाने घेतलेली आहे काय? असले शब्द वापरण्यापुर्वी जरा आपल्या दुकानातला माल तपासून तरी घ्यायचा ना? पाच वर्षापुर्वी खुद्द दिग्विजय सिंग यांनी एका कॉग्रेस अधिवेशनात म्हटले होते, राजीव गांधींनी राजकारणात आणलेल्या अनेक नेत्यांची आता एक्स्पायरी डेट उलटुन गेलेली आहे. त्यांनी बाजूला व्हायला हवे आहे. अशा किती लोकांना राहुलनी उचलून कचर्‍यात फ़ेकले आहे? सचिन पायलट वा ज्योतिरादित्य शिंदे यांनी निवडणूका जिंकून दिल्या आणि तिथे मुख्यमंत्री म्हणून कोणाला आणून बसवले गेले? जरा तिकडे वळून बघितले असते तर प्रियंकांना एक्स्पायरी डेट शब्दाचा अर्थ उमजला असता. अजून प्रत्येक मोठ्या समारंभात हाताला धरून मनमोहन सिंग यांना आणले व उठले-बसवले जाते. त्यांचे वय विशीतिशीतले आहे काय? राहुलच्या मागून पाय मुडपत चालणारे मोतीलाल वोरा पाळण्यातले आहेत काय? एकूण कॉग्रेसची राजकीय भूमिका वा नितीधोरणे कुठल्या जमान्यातली आहेत? सगळा कारभार कालबाह्य झाल्यामुळेच मतदाराने शेवटी अख्खा मॉल उचलून भंगारात फ़ेकून दिला, त्याला आता पाच वर्षे उलटून गेली आहेत आणि नवा विक्रेता एक्स्पायरी डेटच्या गोष्टी सांगतो आहे.

स्वातंत्र्यलढा वा त्यानंतरची दोन दशके झाल्यापासून कॉग्रेसची एक्स्पायरी डेट संपून गेलेली आहे. वास्तविक कॉग्रेसला सर्वाधिक पूजनीय असलेल्या महात्माजींना सत्तर वर्षापुर्वी ती एक्स्पायरी डेट नेमकी वाचता आलेली होती. म्हणूनच त्यांनी तेव्हाच हा सगळा माल किंवा मॉल भंगारात काढण्याची शिफ़ारस केलेली होती. पण पणजोबा मोठा चतूर होता. त्याने त्याच भंगाराला रंगरंगोटी करून कॉग्रेस नावाच्या पक्षाचे दुकान थाटले आणि मागली सत्तर वर्षे नवा माल किंवा ताजा माल म्हणून एक्स्पायरी डेट होऊन गेलेला माल दिर्घकाळ भारतीय जनतेच्या माथी मारला गेलेला आहे. असा कालबाह्य माल किंवा उपयुक्तता संपलेल्या गोष्टी वापरातून व व्यवहारातून वेळीच बाजूला केल्या नाहीत तर व्यक्तीला वा समाजाला आपायकारक असतात. म्हणून तर ओरडून बोंबलून त्याची एक्स्पायरी डेट संपली असल्याचे पुन्हा पुन्हा सांगावेच लागत असते. तशी बोंब ठोकण्याची कधी एक्स्पायरी असू शकत नाही. कारण वेळोवेळी कालचा ताजा माल आज कालबाह्य होऊन गेलेला असतो. त्याची सामाजिक जाणिव जागृत ठेवण्यासाठीच बोंबा ठोकाव्या लागत असतात. मोदी तेच काम करीत आहेत. स्वातंत्र्य मिळाल्यावर कॉग्रेसची एक्स्पायरी डेट झालेली होती आणि तरीही त्याचा पक्ष बनवून जनतेची जी दिशाभूल करण्यात आली; त्यातून मग घराणेशाही उदयास आली. आता त्या घराणेशाहीची एक्स्पायरी डेट उलटून गेली आहे. त्याचाही बोभाटा करणे आवश्यक आहे. ज्या दिवशी उरलीसुरली कॉग्रेस त्या घराणेशाहीच्या गुलामीतून मुक्त होईल, त्यादिवशीच अशा बोंबा ठोकण्याची एक्स्पायरी डेट येईल. अन्यथा तोपर्यंत अशा कॉग्रेस कालबाह्य झाल्याच्या बोंबा हा ताजा माल असेल आणि त्याची उपयुक्तता तितकीच प्रभावी असेल. प्रियंकांना जितक्या लौकर त्याचे भान येईल तितके बरे. अर्थात एक्स्पायरी झालेल्या वस्तु आपण होऊन कुठे बाजूला होतात? कोणी तरी ते काम करावे लागते. मोदी काय वेगळे करीत आहेत?

13 comments:

  1. सुंदर, भाऊ!
    भंगार मालाला पण एक्सपायरी असते नाहीतर तो सडून जातो, अगदी लोखंड सुध्दा. कॉंग्रेसच्या भंगाराने राजकारणात अडवून ठेवलेली जागा पण लवकरच रिकामी करावी लागणार..

    ReplyDelete
  2. Ravindra ShirgurkarMarch 23, 2019 at 5:30 AM

    Bhausaheb,

    It's tragidy of the oldest party. The worst part is still the leaders of this party don't understand where they are heading towards

    ReplyDelete
    Replies
    1. When you don't know where you are going, you will go where you are going... 😀

      Delete
  3. सचिन पायलट आणि ज्योतिरादित्य शिंदे यांना मुख्यमंत्री केले असते तर 10 - 20 वर्षांनी देवेंद्र फडणवीस आणि योगी आदित्यनाथां पुढे चांगले आव्हान उभे राहु शकले असते.

    ReplyDelete
  4. काँग्रेसला स्वतःलाच पूर्ण बहुमतात निवडून यायचे आहे. मग त्यांना फक्त काँग्रेसचे सरकार आणायची ईच्छा आहे. त्यामूळे एखाद्या कुत्र्यापुढे भाकरीचा तुकडा फेकावा तसा गठबंधनातील इतर घटक पक्षांना जागा देत आहेत. त्यामूळे ही निवडणूक २०१४ सारखीच होत आहे. कदाचित काँग्रेसला पूर्वीपेक्षा कमी जागा मिळतील आणि काँग्रेस स्वतःहून expiry date च्या जवळ जाईल.

    ReplyDelete
  5. भाऊ काका, बारामतीमध्ये भाजपकडून कांचन राहुल कुल यांना तिकिट मिळालंय. याबद्दल काय वाटतं तुम्हाला. खरच तुल्यबळ1उमेदवार आहे का कि मैत्रीपूर्ण लढत आहे?

    ReplyDelete
  6. भाऊ, लोकशाही, घराणेशाही आणि हुकुमशाही या विषयावर काही प्रकाशित करावे ही नम्र विनंती.

    ReplyDelete
  7. भाऊ वर्षानुवर्ष जुना कॉंग्रेस expire होणार काळजी नसावी

    ReplyDelete
  8. नसच पकडली भाऊ 😀

    ReplyDelete
  9. सुंदर विश्लेषण!

    ReplyDelete