Friday, March 8, 2019

शिकारी कोण? सावज कोण?

balakot के लिए इमेज परिणाम

पंतप्रधान नरेंद्र मोदी एक गोष्ट पाच वर्षापुर्वीच्या प्रचारात नेहमी सांगायचे. कालपरवा त्यांनी इंडिया टुडेच्या एका समारंभात त्याच गोष्टीची आठवण उपस्थितांना करून दिली. पण त्यातला आशय किती श्रोत्यांच्या ध्यानात आला असेल याची शंकाच आहे. कारण तेव्हाही लोकांनी हसून टाळ्या वाजवल्या होत्या आणि याहीवेळी टाळ्या वाजल्या. ती गोष्ट अशी, दोन मित्र अभयारण्यात शिकारीला जातात आणि शुकशुकाट असल्याने पाय मोकळे करायला जीपच्या बाहेर पडून फ़िरत असतात. त्यांची बंदुक गाडीतच राहिलेली असते आणि अकस्मात त्यांना वाघ सामोरा येतो. तो गुरगुरू लागतो, तर दोघेही मित्र भयभीत होतात. त्यांना काही सुचत नाही. अखेर त्यातला धुर्त माणूस सावधपणे आपल्या खिशातला बंदुकीचा परवाना काढून वाघाला दाखवतो. बंदुक आणि परवाना यातला फ़रक ज्यांना परिणामांच्या संदर्भाने ओळखता येईल, त्यांच्यासाठी अशी गोष्ट बोधकथा असू शकते. ज्यांना आशयाचा गंध नसतो, त्यांच्यासाठी अशा गोष्टी कामाच्या नसतात. ते दुष्परिणामातून सुटू शकत नसतात. सध्या पुलवामाचा हल्ला आणि पाकिस्तानात बालाकोटवर भारताने केलेला हवाई हल्ला, यांचे राजकारण रंगलेले आहे. त्यात या गोष्टीतला आशय नेमका फ़िट बसणारा आहे. कारण या निमीत्ताने देशातील जनतेच्या भावना संवेदनशील झालेल्या आहेत आणि पाकिस्तानला नामशेष करा, म्हणून सामान्यजन वाघासारखे गुरगुरत आहेत. अशा वेळी हल्ला खरेच झाला काय आणि असेल तर खरोखर किती जिहादी मारले गेले? असले प्रश्न गैरलागू असतात. जेव्हा सामान्य जनता पाकची नाचक्की बघायला उत्सुक असते, तेव्हा तशा कल्पनेच्या विरोधात बोलणेही वाघाला अंगावर घेण्य़ासारखे असते. तोच मुर्खपणा मोदी विरोधकांनी मागल्या दोन आठवड्यात मनसोक्त चालविला आहे. त्याची किंमत त्यांना आगामी लोकसभा मतदानात मोजावी लागणार आहे.

खुळेपणा एकदा सुरू झाला, मग त्याला कुठे थांबवायचे त्याचा कुणालाही अंदाज येऊ शकत नसतो. राहुल गांधींनी अविश्वास प्रस्तावाच्या वेळी राफ़ायलचा डंका वाजवला. तिथून या खुळेपणाला प्रारंभ झाला होता. त्याला तेव्हा माध्यमात खुप प्रसिद्धी मिळाली, म्हणून विरोधी पक्ष त्या खुळेपणात खेचले गेले आणि आता कुठवर जाऊन थांबावे, याचाही अंदाज त्यापैकी कुणाला येत नाही अशी दशा झालेली आहे. राफ़ायल खरेदीत भ्रष्टाचार वा गफ़लत झाल्याचा कुठला क्षुल्लक पुरावाही मागल्या आठ महिन्यात राहुल वा कोणाला देता आलेला नाही. अगदी सुप्रिम कोर्टापासून प्रत्येक व्यासपीठावर त्या आरोपाचे रितसर खंडन झालेले आहे. पण नवे काही खुसपट काढून राहुल नवा आरोप करतात आणि नव्याने खुळेपणा सुरू होतो. मग प्रसिद्धीसाठी मोदी व त्यांच्या सरकारवर कुठलेही बिनबुडाचे आरोप करून खळबळ माजवणे हा उद्योग होऊन बसलेला आहे. त्याचाच एक भाग असा, की मोदी वा भाजपाने काहीही म्हणावे, मग त्याच्यावर विरोधकांनी प्रश्नचिन्ह लावायचे हा खाक्या होऊन बसला. अशा ओघात पुलवामाची घटना घडली आणि तेव्हा मोदींच्या नावावर खापर फ़ोडणारा नवा विषय विरोधकांना मिळून गेला. पुलवामानंतर पुन्हा सर्जिकल स्ट्राईक होणार अशी चर्चा चालू असताना, भारतीय हवाई दलाने थेट पाकिस्तानात घुसून बॉम्बहल्ला केला. आता त्याचे कौतुक करायचे तर मोदींची ५६ इंची छाती मान्य करावी लागते. म्हणून आधी मोदी सरकारचे नावही न घेता हवाई दलाचे कौतुक करण्यात आले. पण सामान्य जनतेसाठी हल्ल्याचे श्रेय तात्कालीन सरकारला मिळत असल्याने विरोधकांना पवित्रा बदलावा लागला. हल्ल्याचे कौतुक म्हणजे श्रेय मोदी सरकारला असे होत असल्याने हल्ल्यविषयीच शंका घेण्याचा पर्याय शोधण्यात आला. पण अशा शंका प्रश्नांनी विरोधक सेनेवर हवाई दलावरच संशय घेत असल्याचे आयते चित्र तयार झाले.

यालाच खुळेपणा म्हणतात. हवाई दलाचे अभिनंदन करून विषय संपवला असता. पुन्हा विरोधक अन्य आर्थिक सामाजिक विषयाकडे वळले असते, तर भाजपा वा मोदींना त्या हल्ल्याचे राजकीय भांडवल करण्याची संधी नाकारली गेली असती. पण तितका शहाणपणा विरोधकांकडून कोणाला अपेक्षित आहे? त्यांना मोदींना विरोध करण्यापेक्षा मोदींची हेटाळणी व टवाळी करण्यात अधिक स्वारस्य आहे. सहाजिकच हवाई दलासह भारतीय सेनेचे कौतुक भाजपा वा मोदींनी करताच, हल्लाच शंकास्पद करण्याशिवाय विरोधकांना पर्याय उरला नाही. वास्तविक तोच मोदी वा भाजपाने विरोधकांसाठी लावलेला सापळा होता. जंगलात श्वापदाला मारण्यासाठी सापळा लावला जातो आणि चहूकडून हाकारे उठवून त्या जनावराला त्या सापळ्याच्या दिशेने ढकलले जात असते. बेभान होऊन सावज पळत सुटले, मग सापळ्यात येऊन फ़सते किंवा बंदुकीच्या आवाक्यात येत असते. मोदींना प्रत्येक बाबतीत खोटे पाडण्याच्या हव्यासाने बेभान झालेल्या विरोधकांना त्याचे भान राहिले नाही. राफ़ायलच्याच झिंगेत रमलेल्या राहुल गांधींसह कॉग्रेसला त्याचे स्मरण उरले नाही. मोदी बोलले की विरोध, या आवेशात मग त्यांनी मोदींच्या पुलवामा किंवा बालाकोटच्या विषयावरही विरोध हाती घेतला आणि व्यवहारात विरोधकांची भाषा सेना व हवाईदलाच्या विरोधात बोलली जाऊ लागली. हवाई दल वा सेनेच्या शौर्याविषयी शंका वा टवाळी केव्हा होऊन गेली तेही आजून विरोधकांना समजलेले नाही. बंदुक आणि बंदुकीचा परवाना यातला फ़रक तसा असतो. विरोधक जनभावनेच्या वाघाला तत्वाचे खुलासे देत आहेत. आम्ही सरकारवर टिका करतो आहोत आणि सैन्याच्या शौर्याविषयी आम्हाला शंका नाही; असे लाजिरवाणे खुलासे देण्याची वेळ आलेली आहे. पण जनमानसात विरोधक सेनेचेही विरोधक वा पाकिस्तानवादी ठरून गेले आहेत. ह्याला म्हणतात सापळा!

मोदींनी मोठ्या कुशलतेने व धुर्तपणे विरोधकांच्या हव्यासाचा आपल्या राजकीय सापळ्यासाठी उपयोग करून घेतला आहे. विरोधक आपल्या विरोधात प्रत्येक गोष्टीचा गैरवापर बेभानपणे करतात हे ओळखून, इथे मोदींनी विरोधकांना अतिशय गाफ़ील व अलगद पकडले. आपल्या सापळ्यात ओढले. पुलवामा घातपाताचा दोष मोदींच्या माथी मारताना हवाई प्रतिहल्ल्याचे श्रेय नाकारण्यात विरोधक इतके वहावत गेले, की कुठला आरोप कोणा विरुद्ध होतोय याचेही भान या अर्धवटांना राहिले नाही. पण मोदी सावध होते आणि बालाकोट हल्ल्यावर शंका घेतली जाताच मोदींनी सफ़ाईने विरोधकांचा चेहरा सेनाविरोधी किंवा पाकवादी असा रंगवून घेतला. ज्या देशात पाकला साध्या क्रिकेट सामन्यात पराभूत केल्यावर जल्लोश होतो, त्या देशात पाकिस्तानावर हवाई हल्ला भारताने केल्यास किती जोश असेल? त्याच्या विरोधात शंका वा शब्द कोण ऐकून घेईल काय? असली भाषा वाहिन्या वा बौद्धिक वर्तुळात ठिक असते. सामान्य भारतीयाला तोच देशद्रोह वाटत असतो आणि तिथेच मोदींनी चतुराईने डाव विरोधकांवर उलटवून टाकला आहे. ‘मोदीला शिव्या द्या, माझी निंदा करा, पण भारतीय सेना व शौर्याला अपमानित करू नका’, हे मागल्या दोनचार दिवसातले आवाहन सामान्य भारतीयाच्या काळजाला हात घालणारे आहे. त्यामुळे मोदींची शिकार करायला निघालेले विरोधी पक्षाचे शिकारी स्वत:च शिकार होऊन गेलेले आहेत. हे इतके कमी होते म्हणून की काय सध्या दिग्विजय सिंग पुन्हा बोलू लागले आहेत. कॉग्रेससह विरोधकांची नौका आगामी लोकसभेत बुडवायला एकटे राहुल गांधी पुरेसे असताना असे अनेक दिग्गज मैदानात आलेले असतील, तर त्यांच्या पराभवासाठी कोणी कशाला कष्ट घ्यायला हवेत? गळ्यात हार घालून खाटीकखान्याकडे धावत सुटलेल्या बोकडाला साक्षात ब्रह्मदेवही वाचवू शकत नसतो ना?

23 comments:

  1. बुडत्याचा पाय खोलात.

    ReplyDelete
  2. अप्रतिम आणि एकदम सटीक लेख..!

    ReplyDelete
  3. गळ्यात हार घालून खाटीकखान्याकडे धावत सुटलेल्या बोकडाला साक्षात ब्रह्मदेवही वाचवू शकत नसतो ना?

    एकदम खरमरीत.

    ReplyDelete
  4. मला असं वाटतं की मोदी विरोधकांना बालाकोट हल्ल्याच्या यशाच्या बाबतीत संशय घेण्यासाठी आयतं मिळालेलं एक कारण म्हणजे मृत अतिरेक्यांचा आकडा. आणि वायुसेनेनी जेंव्हा स्पष्टीकरण दिलं की आमचं काम फक्त हल्ला करण्याचं आहे, हल्ल्यात किती अतिरेकी मारले गेले हे मोजण्याचं नाही तेंव्हा वायसेनेनी आपली भूमिका स्पष्ट केली. त्यामुळे मारल्या गेलेल्या अतिरेक्यांचा 250 किंवा 300 हा आकडा जाहीर करण्यात सरकारची अंमळ घाईच झाली! त्या मदरश्यामध्ये 300 मोबाई ऍक्टिव्ह होते ही बातमी बरीच उशिरा सांगण्यात आली की ज्याचा संबंध 300 अतिरेक्यांच्या उपस्थितीशी जोडला जाऊ शकेल. अतिरेक्यांच्या विनाशाची आणि पर्यायानी यशाची माहिती जनतेपर्यंत व्यवस्थितपणे पोहोचवण्यात आली नाही हे मान्य करावं लागेल.

    ReplyDelete
  5. ऱाफेल मधे घोटाळा झालाय याचे पण पुरावे नाहीत तरी देखील मिडीया किती कवरेज देतेय.

    ReplyDelete
  6. गळ्यात हार घालून खाटीकखान्याकडे धावत सुटलेल्या बोकडाला साक्षात ब्रह्मदेवही वाचवू शकत नसतो ना?....हाहाहा...एका वाक्यात स्पष्टता...एकदम सही...भाऊ..

    ReplyDelete
  7. गळ्यात हार घालून खाटीकखान्याकडे धावणाऱ्या बोकडाला कोण वाचवणार 😂😂😂

    ReplyDelete
  8. हवाई दलाचे अभिनंदन करून विषय संपवला असता. पुन्हा विरोधक अन्य आर्थिक सामाजिक विषयाकडे वळले असते, तर भाजपा वा मोदींना त्या हल्ल्याचे राजकीय भांडवल करण्याची संधी नाकारली गेली असती.

    आयला !!!!
    माझ्यासारख्या arm chair strategist (😝) ला पण हे कळलं ते ह्या मोठ्या लोकांच्या टकुऱ्यात कसं आलं नाही 🤔 । अजबच आहे ।

    ReplyDelete
  9. मोदी या वेळी ४०० पुढे सहज जाणार.

    ReplyDelete
  10. ते दीग्गी म्हणजे एक वेगळं संस्थान आहे....
    सगळे फायरिंग करताहेत, मीच मागे राहीलोय...
    राहुल बाबा चिडेल, म्हणुन ते पण बंदूक घेऊन निघालेत...😂😂😂

    ReplyDelete
  11. मस्तच लेख आहे,आवडला

    ReplyDelete
  12. गळ्यात हार घालून खाटीकखान्याकडे धावत सुटलेल्या बोकडाला साक्षात ब्रह्मदेवही वाचवू शकत नसतो ना?

    सौ बात की एक बात!

    ReplyDelete
  13. विरोधकांचे गाढव ही गेले आणि ब्रम्हचर्य पण गेले .खि खि खि

    ReplyDelete
  14. Bhau you should write on Raj Thakare

    ReplyDelete
  15. राजकारणाच्या द्रुष्टीने मोदींनी सापळा करुन विरोधकांना.त्यात पकडले हे जरी मान्य केले तरी पाकविरुद्ध अशा खणखणीत कारवाईचा निर्णय घेणारा हा पहिला नेता आहे. बावळट कचखाऊ लोकांनी देशाची गेल्या पासष्ट वर्षात वाटच लावली आहे. या लाचखाऊंनी देशाला इतकी वर्ष अमेरिका व पाकिस्तानला विकले होते. त्याविरुद्ध मोदी दंड ठोकून उभे राहिले आहेत. त्यांनी पुकारलेले हे एक युद्ध आहे. ते जिंकायलाच हवे. त्यासाठी देशद्रोही पकडण्यासाठी सापळे लावावेच लागतील. जनतेने फक्त भरघोस पाठिंबा द्यावा.

    ReplyDelete
  16. भाऊ मोदींना लोळवण्यासाठी पाकिस्तानने त्यांच्या इथल्या राजकीय मित्रांच्या सल्ल्याने पुलवामा हल्ला केला असावा कारण सर्जिकल strike चा गवगवा बराच झाल्यामुळे परत तशीच कारवाई मोदींना करता येणार नाही आणि मोदींना निवडणुकीत झोडपून काढता येईल त्यामुळे इम्रान खान एका तोंडाने धूर्त पणे समोपचाराच्या आणि शांततेच्या गोष्टी करत होता आणि दुसरीकडे व्याप्त काश्मीरमधील अतिरेकी बालकोटला हलवले गेले होते,मोदींनी याला सुरुंग लावत अनपेक्षितपणे बालकोटच्या अतिरेकी तळावर हवाई हल्ला चढवला आणि बाजी पाकवर आणि त्याच्या इथल्या राजकीय मित्रांवर उलटवली त्यामुळे आता मोदींचा पराभव होणे अशक्य आहे

    ReplyDelete
  17. Hyalach mhantat makdachya hati kolit... aata tich condition Congress n rahul Gandhi chi aahe ....🤣🤣🤣🤣

    ReplyDelete