Monday, March 18, 2019

योद्धामंत्री: मनोहर पर्रीकर

manohar parrikar के लिए इमेज परिणाम

२६ मे रोजी नरेंद्र मोदी यांनी भाजपाचे पुर्ण बहूमत असलेले, पण एनडीए आघाडीचे सरकार स्थापन केले. पुढे त्या मंत्रिमंडळातील खातेवाटप झाले, तर अनेकांना आश्चर्य वाटलेले होते. कारण अर्थखाते आणि संरक्षणखाते त्यांनी अरूण जेटली या एकाच मंत्र्याकडे ठेवलेले होते. जेटली यांचा स्वभाव अर्थकारणाशी जोडलेला असल्याने संरक्षण खात्याचा भार त्यांना नकोसा होता आणि म्हणूनच हे खाते अनाथ मानले जात होते. भारताला कधी ‘पुर्णवेळ’ संरक्षणमंत्री मिळणार, अशी टिका मोदींवर तेव्हा सातत्याने चाललेली होती. पण चारपाच महिने त्यांनी अन्य कुणाकडे संरक्षणखाते सोपवले नाही आणि २०१४ च्या उत्तरार्धात मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला, तेव्हा गोव्याचे मुख्यमंत्री असलेल्या मनोहर पर्रीकरांना त्या पदावर आणले. ह्याचा अर्थ साफ़ होता, की पहिल्या दिवसापासून पंतप्रधानांच्या मनात हा़च माणूस संरक्षणमंत्री व्हायला लायक होता आणि त्याने होकार देईपर्यंत मोदींनी प्रतिक्षा केली होती. त्यांची अपेक्षा व आशावाद अजिबात चुकीचा नसल्याचे पुढल्या काळात सिद्ध झाले. कारण दिर्घकाळ संरक्षण मंत्रालय म्हणजे फ़क्त संरक्षण साहित्याची खरेदी करण्यासाठी करोडो रुपयांची तरत्तुद असलेले मंत्रालय मानले गेले. दलाली काढण्यासाठी कमाईचे सुरक्षित खाते, अशीच त्याची ओळख होऊन बसली होती. त्याला नवे स्वरूप देण्यासाठी पर्रीकर यांच्यासारखाच मंत्री आणयला मोदी कटीबद्ध होते आणि त्यांची अपेक्षा पर्रीकरांनी अचुक पुर्ण केली. त्याची ग्वाही म्हणजे २०१६ सप्टेंबरमध्ये पाकव्याप्त काश्मिरातला सर्जिकल स्ट्राईक होता. त्यांनी संरक्षणखाते सोडल्यानंतर कालपरवा पुलवामा हल्ल्याचा बदला म्हणून झालेला एअरस्ट्राईक त्याचाच पुरावा होता. आता पर्रीकरांनी जगाचा निरोप घेतल्यावर त्यांचे प्रचंड गुणगान चालू आहे. पण याच माणसाच्या कामगिरी व धोरणांमुळे बालाकोट शक्य झाले, हे कोणाला सांगावेसेही वाटू नये?

संरक्षणखात्याचा कारभार हाती घेतल्यावर पर्रीकरांनी काही ठाम निर्णय घेतले. पहिली गोष्ट म्हणजे त्यांनी सत्तासुत्रे हाती घेईपर्यंत युपीए सरकारने पैसे उकळण्याची खाण म्हणूनच या खात्याचा व देशाच्या सुरक्षेचा बट्ट्याबोळ करून टाकला होता. पधरा दिवस लढाई चालली, तर सैन्यापाशी लढायला साहित्य शिल्लक नाही; असे तेव्हा जनरल व्ही. के. सिंग म्हणाले होते. अशा स्थितीतून आज पाकिस्तानात घुसून हवाई हल्ला करण्यापर्यंत सुरक्षा व्यवस्था सज्ज होऊ शकली. त्याचे खरे श्रेय पर्रीकरांना आहे. कारण त्यांनी नुसती शस्त्र सज्जता वा सेनादलांचे आधुनिकीकरण यांना प्राधान्य दिले नाही. तर युद्धसज्जतेची प्रत्येक बाब लक्षात घेतली होती. संरक्षणखातेच नाही तर त्याच्याशी संबंधित असलेल्या इतर बाबीतही त्यांनी बारीक लक्ष घातले होते. मंत्रीपद स्विकारल्यानंतर काही महिन्यातच त्यांनी भारतीय सुरक्षा व्यवस्थेतील एक मोठी त्रुटी किंवा दुबळेपणावर जाहिर बोट ठेवले. तेव्हा राजकीय कल्लोळ माजला होता. २२ जानेवारी २०१५ रोजी मुंबईतल्या एका कार्यक्रमात त्यांनी गुप्तचर खाते दुबळे करण्याचा आत्मघातकीपणा दोन माजी पतप्रधानांकडून झाल्याचे वक्तव्य केले आणि त्यांच्यावर प्रश्नांचा भडीमार झालेला होता. आपल्याच पंतप्रधानांच्या आगावू विधाने वा चुकीच्या धोरणांनी गुप्तचर माहिती मिळवणार्‍या साधनांची नासाडी झाली, असे पर्रीकर म्हणाले होते आणि त्यात मोठे तथ्य होते. कुठलीही सेना वा लष्कर नुसते युद्धसाहित्य व सज्जतेवर लढाई जिंकू शकत नाही. तर त्याची भेदकता वाढवणारी शत्रु गोटातली माहिती मिळवणारी यंत्रणा तितकीच आवश्यक बाब असते. ती यंत्रणा मधल्या काळात मोडकळीस आलेली होती. म्हणून पाकिस्तानचे भुरटे जिहादी भारतीय सेनादलावर भारी पडत होते. रणगाडे, तोफ़ा व विमाने यांच्या बरोबरीने ते मोडून पडलेले हेरांचे जागतिक जाळे नव्याने विणावे लागेल आणि आम्ही ते करणार आहोत. असे पर्रीकर म्हणाले होते.

संरक्षणमंत्री म्हणून आजवर अनेकांनी फ़क्त सैन्याच्या साहित्यविषयक गरजांचा विचार केला, निर्णय घेतले. पण सुरक्षा व्यवस्थेत परदेशातील आपले हस्तक व हेरांचा इतका नेमका विचार कोणी केला नसावा. किंवा निदान त्याची जाहिर वाच्यता केली नव्हती. पर्रीकरांनी तो विषय खुलेआम मांडला आणि तिथून भारताने पाकच्या उचापतींना आक्रमकपणे प्रतिसाद देण्यास आरंभ केला. त्या विधानानंतर दिड वर्षात उरीच्या हल्ल्याला सर्जिकल स्ट्राईकने उत्तर दिले गेले होते. पाकिस्तानसाठी हा अनुभव नवाच होता आणि भारतीय जनतेसाठीही तो अनुभव नवा होता. पाकिस्तानने जिहादी पाठवावेत किंवा नियंत्रण रेषेवर खोड्या काढाव्यात. आपल्या सैनिकांनी निमूटपणे मृत्यू स्विकारावा. असाच खेळ दिर्घकाळ चालला होता. त्याला पहिला शह सर्जिकल स्ट्राईकने दिला गेला. तोही इतका नेमका लक्ष्यवेध होता, की भारतीय सेना नुसत्या सज्ज नाहीत; तर त्यांना शत्रू गोटातली नेमकी माहिती मिळणारी यंत्रणाही तितकीच सज्ज असल्याची खातरजमा झालेली होती. पर्रीकरांच्या या शत्रूगोटात आपले हस्तक निर्माण करण्याच्या भूमिकेचे वा नितीचे ते यश होते. त्याचाच पुढला टप्पा एअर स्ट्राईक होता. अत्यंत नेमकेपणाने भारतीय लढावू विमानांनी बालाकोटवर बॉम्बफ़ेक केली व शेकडो जिहादी ठार मारले,. त्याचे हवाईदला इतकेच गोपनीय माहिती पुरवणारे पाकिस्तानातील भारताच्या हस्तकांनाही त्याचे श्रेय आहे. त्यात पुढाकार घेणारा संरक्षणमंत्री पर्रीकर होते. त्यांनी ते मंत्रालय सोडून दिड वर्षाचा कालावधी उलटून गेला आहे. पण तीच निती बालाकोटला दणका देणारी ठरलेली आहे. त्याबद्दल कालपासून कुठे एक शब्द उच्चारला गेला नाही. एक माणूस ध्येयवेडा असेल आणि आपल्या कर्तव्याशी प्रामाणिक असेल; तर मरगळल्या सुरक्षा व्यवस्थेलाही किती भेदक बनवू शकतो, याचे हे मुर्तिमंत प्रतिक आहे. हा नुसता संरक्षणमंत्री नव्हता, तर योद्धा मंत्री होता.

आज पर्रीकरांच्या निधनानंतर त्यांच्या कर्तृत्वाचे गोडवे गाणार्‍यांनी तेव्हा म्हणजे २०१५ च्या जानेवारीत पर्रीकरांनीच गुप्तचर डीप असेट विषयी केलेल्या विधानानंतर पाजळलेली आपापली अक्कल जरा शोधून वाचावी. सर्जिकल स्ट्राईकनंतर त्याच पर्रीकरांवर आपण केलेला प्रश्नांचा भडीमार शोधून वाचावा. मग स्वदेशी संरक्षण मंत्र्याला खच्ची करून आपण त्या योद्धा मंत्र्याच्या मार्गातले काटे कसे झालो होतो, त्याचे अशा प्रत्येकाला स्मरण होऊ शकेल. आपले मंत्रालय व त्याच्या मर्यादा ओळखून काम करतानाच, अन्य बाबतीत सुरक्षासंबंधी विषयात रस घेणारा हा देशाचा पहिला संरक्षणमंत्री होता. त्यांच्या आधीचे संरक्षणमंत्री अन्थोनी यांना आपल्या सेनाधिकारी व विविध सेनाविभागांशी जुळवून घेता आले नाही. त्यात सौहार्द निर्माण करता आलेले नव्हते. पर्रीकरांनी आपल्या अल्प कारकिर्दीत सेनादलाचे विविध विभाग आणि त्यांच्यातली सुसुत्रता निर्माण करतानाच सैन्याचा आत्मविश्वासही वाढवण्याला प्राधान्य दिलेले होते. आज पाकिस्तानच नव्हेतर चीनसारखा महाशक्ती देश भारताच्या सैनिकी शक्तीला वचकून वागू लागला. त्याचे खरेखुरे श्रेय पर्रीकरांना द्यावे लागेल आणि त्यांना गोव्यातून दिल्लीत आणायचा हट्ट करणार्‍या पंतप्रधानाला द्यावे लागेल. पण त्याकडे ढुंकून बघायची बुद्धी नसलेल्यांनी मरणोत्तर पर्रीकरांचे गुणगान करून उपयोग नसतो. ते मगरीचे अश्रू असतात. अशा दिवाळखोरांमुळेच देशातले उदयोन्मुख पर्रीकर खच्ची केले जातात. तशी पर्रीकरांची राजकीय कारकिर्दही अल्पायुषी आहे. पण माणूस किती जगतो वा कितीकाळ कर्तृत्व गाजवतो, त्याला महत्व नसते. त्यापेक्षा जितका वेळ त्याने काम केले, त्याचे परिणाम कितीकाळ टिकतात, त्यावर इतिहास घडत असतो. पर्रीकरांनी दोनतीन वर्षाच्या कारकिर्दीत भारतीय सुरक्षेला जे अदभूत परिमाण प्राप्त करून दिले, त्यातून समर्थ भारताची शक्यता निर्माण झाली. त्याच दिशेने वाटचाल करीत भारताने जगाला आपला दबदबा दाखवत रहाणे, हीच त्यांना खरी श्रद्धांजली असेल. शब्दांनी इतिहास लिहीला व सांगितला जातो. पण त्यात आशय हाच प्राण असतो. पर्रीकर हा आज भारतीय सुरक्षेचा प्राण झाला असेल, तर तो जपणे हाच त्यांना अजरामर करण्याचा एकमेव मार्ग आहे.

18 comments:

  1. भाऊ तुम्ही अत्यन्त चपखल शब्दात कै मनोहर पर्रीकर यांची कर्तबगारी जनतेपुढे आणली व त्यांना योग्य शब्दात श्रद्धांजली दिलीत. धन्यवाद .त संघाने घडवलेले एक अत्यन्त कर्तव्य दक्ष मानव होते.

    ReplyDelete
  2. खरच हे कोणाच्या लक्षातच आल नाही.भावपुर्ण श्रद्धांजली

    ReplyDelete
  3. अप्रतिम लेख..!!

    ReplyDelete
  4. शिवाय अमेरिकेला दिलेले जातीचे पैसेही शोधून काढले होते.

    ReplyDelete
  5. खरंच खूप छान मांडणी सर...
    हीच नीतिमत्ता ठेऊन देशाला पुढे घेऊन जाणे म्हणजेच त्यांना ती खरी श्रद्धांजली ठरेल....

    ReplyDelete
  6. सुंदर लेख ... 👏👏🇮🇳

    ReplyDelete
  7. भाऊ,तुमचे लेख मला मुखपुस्तकावर दिसत नाहीत.मी काय करावे?

    ReplyDelete
  8. त्रिवार वंदन

    ReplyDelete
  9. खूप सखोल अभ्यासपूर्ण विवेचन, धन्यवाद.

    ReplyDelete
  10. ह्या पार्श्वभूमीवर राहुल गांधींचे त्यांच्याशी बोललेले खोटे आठवते. आजारी असलेल्या माणसाला भेटायला जाऊन बाहेर आल्याआल्या राहूल गांधी खोटे बोलले

    ReplyDelete
  11. अतिशय सुंदर विवेचन,एक महत्वाची लष्करी जवानांच्या दृष्टीने बार OROP ची मागणी गेली 45 वर्षांपासून प्रलंबीत होती.

    ReplyDelete
  12. भाऊ तुम्ही छान लेख लिहिलाय असं तरी कोणत्या तोंडाने म्हणणार? कदाचित वाजपेयींच्या निधनानंतर पण झाले नसेल इतके दुःख या नेत्याच्या अकाली निधनानंतर झाले आहे.. आणि गम्मत म्हणजे गोव्यातले भाजपाचे कट्टर विरोधक मित्र पण यांच्या निधनानंतर अश्रू ढाळताना दिसले यातच सारे आले..

    ReplyDelete
  13. वा भाऊ , काय लाख मोलाचे शब्द आहेत तुमचे!

    ReplyDelete
  14. भाऊ अतीशय सुंदर लेख. जे कोणी पर्रीकरांच्या एकदा तरी संपर्कात आले त्यांना पर्रीकर काय चीज आहे हे सांगायची गरज नाही. मी मुंबईकर पण म्हापसा गोवा येथे शाखा प्रबंधक म्हणून माझी बँकेने केली तेव्हा पर्रीकर गोव्याचे मुख्यमंत्री होते. एकदा ते म्हापसा येथे शासकीय कार्यक्रमासाठी पाहुणे म्हणुन आले असताना माझ्या सारख्या सामान्य व्यक्तिला त्यांना भेटून हस्तांदोलन करता आले व काही क्षणापुरती का होईना भेट झाली हा अविस्मरणीयप्रसंग होता.हल्ली मुंबाईत साध्या नगरसेवकाला भेटायचे असेल तरी दोन तीन हेलपाटे घातल्यावर भेट होते.28 महीन्यांच्या अल्पशा काळात संरक्षण खात्यात आमुलाग्र बदल घडवून OROP व शस्त्रखरेदीला प्राधान्य देऊन सैन्याला मजबूत करायचा प्रयत्न केला.त्यांच्या कर्तुत्वाला सलाम.

    ReplyDelete
  15. ह्याचा अर्थ साफ़ होता, की पहिल्या दिवसापासून पंतप्रधानांच्या मनात हा़च माणूस संरक्षणमंत्री व्हायला लायक होता आणि त्याने होकार देईपर्यंत मोदींनी प्रतिक्षा केली होती. त्यांची अपेक्षा व आशावाद अजिबात चुकीचा नसल्याचे पुढल्या काळात सिद्ध झाले.
    हा आपला केवळ तर्क कीं याला काही आधार आहे ? असा प्रश्न पडतो . मोदींच्या मनात काय चालले होते ते आपल्याला कळले असे मानावे काय ?

    ReplyDelete
  16. खुप च छान,
    इतके सविस्तर कोनी च सांगू शकत नही, नाही म्हटले तर आज राजकारण मध्ये समोरच्या माणसाची बदनामी करुण मोठे होणारे च लोक आहेत,पन असे पारदर्शक व्यक्तिमत्व विरल च बग़ायल मिलत
    आशा या महान चरित्रा ला शतशः नमन,

    ReplyDelete
  17. खुप च छान,
    इतके सविस्तर कोनी च सांगू शकत नही, नाही म्हटले तर आज राजकारण मध्ये समोरच्या माणसाची बदनामी करुण मोठे होणारे च लोक आहेत,पन असे पारदर्शक व्यक्तिमत्व विरल च बग़ायल मिलत
    आशा या महान चरित्रा ला शतशः नमन,

    ReplyDelete