आजकाल राष्ट्रवादी कॉग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व प्रादेशिक अध्यक्ष यांनाही एकमेकांशी काय बोलतात, त्याचा पत्ता नसतो. म्हणजे असे, की शरद पवार काही बोलतात आणि जयंत पाटिल यांना त्याचा इन्कार करत बसावे लागत असते. मध्यंतरी नगरचे माजी खासदार नेते दिवंगत बाळासाहेब विखे पाटिल यांच्या नातवाने आजोबाची गादी चालवण्याची इच्छा व्यक्त केली. त्यामुळे बाळासाहेबांच्या सुपुत्र रधाकृष्ण विखे यांची मोठी तारांबळ उडालेली आहे. ते कॉग्रेस पक्षाचे विधानसभेतील नेता आहेत आणि त्यांचा पुत्र सुजय याला लोकसभेची निवडणूक लढवायची आहे. पण तिथली जागा आघाडी केल्याने राष्ट्रवादीकडे गेलेली असून, तिथून आपल्या पुत्राला निवडणूक लढवता येणार नाही हे राधाकृष्णाला कळते. त्यामुळेच त्यांनी विखे-पवारांमधले पिढ्यांचे वितुष्ट संपवण्याचा पवित्रा घेतला. आपला पुत्र पवार साहेबांच्या नातवासारखा असल्याचेही बोलून झाले आणि मग पवारांनी या नव्या नातवाचा स्विकार केला. हल्ली साहेबांना हे खरेखोटे नातू खुप सतावू लागलेले आहेत. आपल्याच घरातल्या पार्थाला गीता सांगून हा कृष्ण थकलेला असताना राधाकृष्णाने नवा नातू पदरात टाकल्याने पवारांचा गोंधळ उडाला असावा. त्यांनी नगरच्या जागेचा विवाद संपवून टाकल्याची घोषणा माढा मतदारसंघातल्या अकलूज येथे केली आणि त्याच्या हेडलायनी झाल्या. तेव्हा त्यांचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटिल यांना खुलासे देताना दमायला झाले आहे. राष्ट्रवादीने नगर सोडलेले नाही असे त्यांनी ठामपणे सांगितल्यावर पत्रकारांनी पुरावा मागितला आणि जयंतरावांना पुरावा देण्यासाठी पवाराच्या आवाजाचा हवाला देण्याची नामुष्की आली. ती बघितल्यावर एकदम २६ वर्षे जुन्या एका पुराव्याची आठवण जयंतरावांना करून देण्याचा मोह आवरला नाही. शरद पवार अनेकदा जनहितासाठी धडधडित खोटे बोलतात, इतकेही जयंतरावांना ठाऊक नाही काय?
सध्या पवार पुन्हा माढा लोकसभा मतदारसंघातून आखाड्यात उतरले असून, मोकळा वेळ मिळाला मग ते तिथल्या कुठल्या तरी तालुक्यात सभा घेत असतात. त्यांच्या मागे पत्रकार फ़िरत असतात आणि प्रश्नांचा भडिमार करीत असतात. अशाच एका प्रसंगी मग नगरची जागा सोडल्याचा खुलासा पवारांनी केला आणि दुसर्या प्रसंगी मनसेचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे खरेही बोलत असल्याचे प्रमाणपत्र देऊन टाकले. या दोन गोष्टी विचित्र वाटतील, पण त्यात बारीक सांधा आहे. राज ठाकरे यांनी बालाकोट येथील हवाई हल्ला व त्यात झालेल्या पाकिस्तानी नुकसानाचे पुरावे मागितले आहेत. पवारांनी राजला दुजोरा देऊन तसे पुरावे द्यायला हवेत, अशीही पुस्ती जोडलेली आहे. थोडक्यात कोलकात्यातून ममतांनी जसा मोदी सरकारवर हल्ला करीत बालाकोटचे पुरावे मागितले; तसेच पवारांनीही पुरावे मागितले आहेत. फ़रक इतकाच, की पवार राज ठाकरे यांच्या नसलेल्या पदरामागे दडी मारून मागणी करीत आहेत. तर साडी नेसणार्या असूनही ममता कोणाच्या पदराआड लपून अशी मागणी करीत नाहीत. त्यांनी थेट तशी मागणी केलेली आहे. आता राहिला विषय पवारांच्या छुप्या मागणीचा. त्यांना बालाकोटच्या हल्ल्याचे पुरावे हवे आहेत आणि ती मागणी चुक मानता येत नाही. पण प्रत्येक दावा किंवा घटनेला पुरावा असतोच असे नाही. खुद्द पवारांनी आजवर आपल्या किती दाव्यांना पुराव्यानिशी सिद्ध केले आहे? मग त्यांनी इतरांकडे पुरावे कशाला मागावे? अनेक प्रसंगी जनहितासाठी पुरावे द्यायचे नसतात आणि जनहितासाठी धडधडीत खोटेही बोलावे लागते, हा पवारांचाच सिद्धांत नाही काय? २६ वर्षापुर्वी मुंबईत बॉम्बस्फ़ोटाची मालिका घडली होती आणि त्यात अकरा स्फ़ोट झालेले होते. तेव्हा पवारांनी बिनदिक्कत बारावा स्फ़ोट घडवला नव्हता काय? त्या स्फ़ोटाचे कुठले पुरावे त्यांनी कधी दिले आहेत काय?
तेव्हा शरद पवार संरक्षण मंत्रीपद सोडून महाराष्ट्रात मुख्यमंत्री म्हणून येऊन आठवडाही लोटलेला नव्हता. अशावेळी एकामागून एक ११ बॉम्बस्फ़ोट देशाची आर्थिक राजधानी मुंबईच्या विविध भागात घडलेले होते. अख्खा देश त्या घटनाक्रमाने गोंधळला होता आणि जगही हादरून गेलेले होते. त्या संध्याकाळी राज्याचे गृहमंत्री व मुख्यमंत्री म्हणून पवार यांनी दुरदर्शनवरून सामान्य जनतेला शांततेचे आवाहन करणारे भाषण केले होते. त्यात मुंबईच्या स्फ़ोटमालिकेची माहितीही लोकांना सादर केलेली होती. त्यांनी एकूण बारा स्फ़ोट झाल्याचे सांगितले होते आणि त्यांच्यापाशी तेव्हा अगदी पोलिस खात्यानेही पुरावा मागितलेला नव्हता. केवळ अकरा स्फ़ोट झाले हे माहिती असूनही पोलिसही चिडीचुप राहिले होते. त्या बाराव्या स्फ़ोटाचा तपास कधी झाला नाही आणि काही वर्षांनी खुद्द पवारांनीच तो बारावा स्फ़ोट म्हणजे आपण जनहितासाठी ठोकलेली निव्वळ लोणकढी थाप असल्याचा गौप्यस्फ़ोट केला होता. शेखर गुप्ताच्या एनडीटीव्ही या वाहिनीवर ‘वॉक द टॉक’ या कार्यक्रमात स्वत: साहेबांनीच त्याचा खुलासा केलेला होता. अकराही बॉम्बस्फ़ोट हे बिगरमुस्लिम वस्त्यांमध्ये झाल्यामुळे त्या समाजाकडे संशयाने बघितले जाईल, म्हणून हा खोटा काल्पनिक स्फ़ोट पवारांनी सांगून टाकला होता. इतका सत्याचा अपलाप राजरोस केल्याची कोणी शंकाही घेतली नव्हती. पण त्यांनाच रहावले नाही आणि त्यांनीच काही वर्षांनी आपला खोटेपणा जाहिरपणे सांगितला होता. मुद्दा इतकाच, की अशा नाजुक पेचप्रसंगात अनेक गोष्टी जाहिरपणे तेव्हाच सांगता येत नाहीत आणि प्रसंगी खोटेही बोलावे लागते; हे पन्नास वर्षे सत्ता उपभोगून पवारा्ना उमजलेले नाही काय? की स्मृतीभ्रंशाने त्यांच्याकडून आता असे काही बोलले जाते आहे? तसे नसते, तर नगरच्या लोकसभा मतदारसंघाविषयी जयंत पाटिल यांना तो चमत्कारीक खुलासा कशाला करावा लागला असता?
तिथेही दोन कॉग्रेस पक्षात झालेली आघाडी एका मतदारसंघामुळे मोडली जाऊ नये, म्हणून तोंडदेखली पवारांनी नगरची जागा सोडल्याचा दावा केला आणि नंतर पाटलांना इन्कार करायला पुढे केले का? मग जयंतरावांनी तरी काय करावे? पवारांच्या त्या विधानाचे अस्पष्ट का होईना रेकॉर्डींग असल्याने इन्कार तर करता येत नाही. म्हणून मग जयंतरावांनी साहेब तोंडातल्या तोंडात काय बोलतात, त्यांचा आवाज स्पष्ट येत नसल्याने पत्रकारांचा गोंधळ झाल्याचे सांगून टाकले. मुद्दा जयंतरावांच्याही लक्षात आलेला नसावा. साहेबांपाशी सवयीने खोटे बोलण्याची कला आहे आणि त्यामुळेच असा पुरावा किंवा बारावा प्रसंग येत असतात. प्रसिद्धीसाठी असेच काहीबाही बोलून टाकायचे व धुर्तपणाची झुल मिरवण्याची हौस भागवताना साहेबांनी आपल्या राजकीय आयुष्याचा पुरता चुथडा करून घेतलेला आहे. खरे बोलण्याची भिती त्यांना सतत भेडसावत असते. म्हणून असे गोंधळ उडत असतात. आता असा नेता आगामी लोकसभेत प्रचारासाठी आघाडीवर असला तर सामान्य श्रोत्यांनी त्यांच्या आवाजात असलेल्या दोषामुळे कशाला काय समजावे? त्याचाही एक शब्दकोष राष्ट्रवादी पक्षातर्फ़े प्रसारीत करावा लागेल. मग बालाकोटचा पुरावा म्हणजे बॉम्बस्फ़ोटातला बारावा, असेही नमूद करावे. म्हणजे पवार पुरावा मागतात त्याचा अर्थ पत्रकार आणि सामान्य श्रोत्यांना लगेच समजून येईल आणि प्रदेशाध्यक्षांना असले खुलासे करत बसावे लागणार नाहीत. अर्थात ती एकट्या साहेबांचीच समस्या नाही. त्यांच्या अवतीभवती असलेल्यांनाही तोच आजार सतावतो आहे. बालाकोटच्या हल्ल्यासाठी हवाई दलाची पाठ थोपटणारेच पुन्हा असा हल्ला झाल्याचे पुरावेही मागतात. हा गोंधळ कोणी सोडवायचा? पाकच्या दाव्यानुसार हल्ला वा त्यांचे नुकसान झालेलेच नसेल, तर हे दिवटे कोणाची पाठ कशाला थोपटत आहेत? हल्ल्याचा दावा हवाई दलाचा आहे. मोदींचा वा त्यांच्या सरकारचा नाही ना?
=====================
ज्यांना साहेबांच्या खोटे बोलण्याचा ‘पुरावा’ हवाय त्यांनी पुढील लिन्क उघडून बघावी
https://www.youtube.com/watch?v=nezc_p8d63c
आपल्याच घरातल्या पार्थाला गीता सांगून हा कृष्ण थकलेला असताना राधाकृष्णाने नवा नातू पदरात टाकल्याने पवारांचा गोंधळ उडाला असावा.������������bharich
ReplyDeleteMast ch
Deleteपडदा फाड
ReplyDeleteअप्रतिम लेख, भाऊ! या (दगा)बाजी घोरपड्याचे आपण अगदी योग्य प्रकारे पुरते वस्त्रहरण केले आहे!
ReplyDeleteअतिशय चपखल वर्णन केले आहे,
Deleteविद्याधर जी
भाऊ....
ReplyDeleteसाहेब खोटं बोलतात, तेच ठीक आहे. ते खरं बोलायला लागले, तर अनेकांच्या आयुष्याला "बांबू" लागेल ...😂😂😂
पूर्वी वाचले होते की.. या साहेबांनी दाऊदच्या गुंड़ाला सैन्याच्या विमानात बसवून हवाई सफर घड़वली होती.
ReplyDeleteमी आपल्या लिखाणाचा चाहता आहे एवढेच सांगू इच्छितो...
ReplyDeleteसर्जिकल स्ट्राइक१ च्यावेळेस साहेब म्हणाले होते की असे स्ट्राइक ते संरक्षण मंत्री असताना पण झाले होते त्याला पुरावा काय?(स्ट्राइक झाला त्यांचा-संरक्षण मंत्री असण्याचा नव्हे)
ReplyDelete"आपल्याच घरातल्या पार्थाला गीता सांगून हा कृष्ण थकलेला असताना राधाकृष्णाने नवा नातू पदरात टाकल्याने पवारांचा गोंधळ उडाला असावा"
ReplyDeleteहे मस्त जमलंय तुम्हाला, अगदी चपखल बसलं उदाहरण.
आपल्याच घरातल्या पार्थाला गीता सांगून हा कृष्ण थकलेला असताना राधाकृष्णाने नवा नातू पदरात टाकल्याने पवारांचा गोंधळ उडाला असावा ... जबरदस्त !
ReplyDeleteमाढ्याची जनता साहेबांची आतुरतेनं वाट बघतेय.
ReplyDeleteभाऊ,
ReplyDeleteसलाम तुमच्या लेखणीला,
आजच्या घडीला एवढ्या पातळीची निर्भीड पत्रकारीता दुर्मीळ च