Sunday, June 7, 2015

मिस्टर ओवायसी, नो उल्लू बनाविंग



सामान्य माणसाचीच नव्हेतर सर्वसाधारण बुद्धीमान असलेल्या लोकांची दिशाभूल कशी करावी, याचे प्रात्यक्षिक हवे असेल, तर मुस्लिम धर्मवादी नेत्याचे युक्तीवाद काळजीपुर्वक अभ्यासणे भाग आहे. ही मंडळी अतिशय चतुराईने आपली धर्मांधता, धर्मनिष्ठा आणि कायदे-राज्यघटना यांची सरमिसळ करत असतात. कालपरवा मिसबाह काद्री या मुलीला मुंबईत घर नाकारण्याचा प्रकार गाजला होता. तेव्हा अशीच गफ़लत करण्यात आली. आता तोच युक्तीवाद उलटा फ़िरवून छत्रपती शिवाजी महाराज वा शिवसेनाप्रमुखांच्या स्मारकाला विरोध केला जात आहे. त्याचीच पुनरावृत्ती ‘योगा दिवस’ शाळांमध्ये साजरा करण्यातून केली जात आहे. मात्र कुणी तथाकथित बुद्धीमंत त्यातली धर्मांधता बघू शकत नाही, किंवा त्यावर अवाक्षर बोलणार नाही. याचा एकच अर्थ निघतो, की असे बोलघेवडे बुद्धीमंत निर्बुद्ध तरी असावेत, किंवा जाणिवपुर्वक दिसणारे बघायला राजी नसावेत. औरंगाबाद येथून विधानसभेत निवडून आलेले ओवायसींच्या मजलीस पक्षाचे आमदार व पुर्वाश्रमीचे एक सेक्युलर पत्रकार इम्तियाझ जलील, यांनी औरंगाबाद येथे सरकारी भूमीवर भाजपाचे दिवंगत नेते गोपिनाथराव मुंडे यांच्या स्मारकाला विरोध केला आहे. सरकारच्या जमिनीवर लोकोपयोगी प्रकल्प उभे रहावेत, असा त्यांचा आग्रह आहे. मुंडे यांना आपण आदरार्थी मानतो. पण स्मारक मात्र नको म्हणताना, लोकोपयोगी सुविधेचा विषय कसा अलगद जोडून दिला आहे. त्यांचा हा दावा लोकोपयोगी दिसणारा आहे, यात शंकाच नाही. पण त्यामागे लोकहिताचा आग्रह आहे, की धर्माचा आग्रह आहे? इस्लामच्या ज्या संकल्पना आहेत, त्यात कुणाही दिवंगत व्यक्तीचे स्मारक बसत नाही, हा धर्मवाद यामागे नाही काय? कालपरवाच इसिसने सिरीयातीन हजारो वर्षे जुन्या मुर्ती फ़ोडून टाकल्या, तीच मानसिकता जलिल यांच्या विरोधातही दिसत नाही काय?

एकेश्वरवादी इस्लाममध्ये कुठल्याही प्रतिक व मुर्तीला विरोध असतो. म्हणून दिसतील तिथल्या मुर्ती फ़ोडून टाकणे वा कुठल्या मुर्ती उभारायला प्रतिबंध असणे, ही धार्मिक भूमिका आहे. पण तशी धार्मिक भूमिका म्हणून स्मारकाला विरोध केला, तर धर्मांध ठरवले जाईल. म्हणून मग इस्पितळ बांधा, सार्वजनिक सुविधा उभ्या करा अशी पुस्ती जोडायची. मग आमचे सेक्युलरच नव्हेतर मुक्त विचाराचे उदारमतवादीही हातोहात उल्लू बनायला सज्जच असतात. जलिल यांच्या अशा भूमिकेचे थोडेसे विच्छेदन करून बघता येईल. पेट्रोलचा प्रचंड पैसा सौदी अरेबिया व अन्य तेलसंपन्न देशांच्या हाती आल्यावर त्यांनी गरीब मुस्लिम देशात काही पैसा मुस्लिम संस्थांना पुरवला आहे. त्यातून किती इस्पितळे, दवाखाने व शाळा उभ्या राहिल्या? आलेला प्रत्येक डॉलर भव्यदिव्य मशिदी उभारण्यावर खर्च झाला ना? तेव्हा याच जलिलनी मौन कशाला धारण केलेले होते? मशिदीपेक्षा सार्वजनिक सुविधा व मुस्लिम मुलांना अत्याधुनिक शिक्षण देऊन जीवनाच्या स्पर्धेत यशस्वी होण्याची साधने उभी करावी, असे आवाहन त्यांनी वा त्यांच्या पक्षाने कधी केलेले आहे काय? नसेल, तर अकस्मात त्यांना सार्वजनिक सुविधांचे स्वप्न कशाला पडलेले आहे? अशा स्मारकासाठी सरकारी तिजोरीतुन पैसा येत नाही आणि मुंडे वा अन्य कुणाच्या चहाते समर्थकांनी निधी जमा केलेला असतो. त्याचा वापर कसा व कुठे करावा, यात जलिल यांनी आपले नाक खुपसण्याचे काही कारण आहे काय? सौदी अरेबियाने पाठवलेल्या पैशातून इथल्या ट्रस्ट वा संस्थांनी मशिदी मदरसे उभारण्यापेक्षा इस्पितळे बांधून गरीब मुस्लिमांच्याच उपचाराची व्यवस्था करावी, असे कधी मजलिसने सांगितले नाही. कुणा हिंदूत्ववाद्याने तशी मागणी त्यांच्याकडे केलेली नाही. कुठल्या सेक्युलर शहाण्यालाही तशी सदबुद्धी झाली नाही. मग आताच इस्पितळाची उबळ कशाला?

एका बाजूला जलिल असली मुक्ताफ़ळे उधळणार आणि दुसरीकडे त्यांचे सर्वेसर्वा नेता असाउद्दीन ओवायसी शाळांमध्ये योग शिकवण्याला विरोध करणार. योगामध्ये सूर्यनमस्कार असतो आणि त्याला इस्लामची मान्यता नाही. म्हणून शाळेत योगाची सक्ती नसावी, हा ओवायसीचा आग्रह आहे. हा विरोध धर्मासाठी आहे ना? मुद्दा इतकाच, की शाळेत मुलांना कशासाठी प्रवेश दिला जातो? नोकरी कशासाठी दिली जाते? एखाद्या इमारतीमध्ये कुणाला वास्तव्य करण्याची जागा कशासाठी मिळते? तेव्हा धर्मसाठी प्रवेश नाकारता कामा नये. आणि धर्माकडे बघताही कामा नये. म्हणजे शाळा, नोकरी वा जागा मिळवताना जलिल वा ओवायसी यांच्या मुस्लिमांना धर्म  नसतो. एकदा ते साध्य झाले, मग त्यांचा धर्म सुरू होतो. म्हणजे ज्यांनी सुविधा उभारल्या, त्यांच्या धर्माला डावलून प्रवेश मिळायला हवा आणि तो मिळाला, मग ज्याने प्रवेश मिळवला त्याच्या धर्माचे कुठे उल्लंघन होता कामा नये. कशी उफ़राटी बाब आहे ना? शाळेत प्रवेश मिळताना तिथे होणार्‍या प्रत्येक कार्यक्रमात सहभागी व्हायचे बंधन विधार्थ्याने व त्याच्या पालकाने मानलेले असते. मात्र त्याचा अवलंब करण्याची पाळी येईपर्यंत धर्म नसतो. जेव्हा नियम कायदे व बंधने पाळायचा प्रसंग येतो, तेव्हा मग इस्लाम हे निमीत्त करून सर्वकाही धाब्यावर बसवायची सज्जता असते. ही चतूराई नजरेआड केली, मग आपल्या भावना व श्रद्धा जपणारे सामान्य हिंदु धर्मांध होऊन जातात आणि त्यांना झोडायला तथाकथित धर्मनिरपेक्ष हातात राज्यघटनेची छडी घेऊन बसलेले असतात. पण जेव्हा तीच छडी मुस्लिमांच्या चलाखीला रोखायला उचलायची वेळ येते, तेव्हा सेक्युलर हातपाय लटपटू लागतात. हे आता सामान्य लोकांनाही कळू लागले आहे आणि त्यामुळेच मागल्या लोकसभा निवडणूकीत उलथापालथ होऊन गेली. जलिल व ओवायसी त्याला अधिक वेग देत आहेत.

इथे पुन्हा मौलाना वहिउद्दीन यांनी सांगितलेली आडमुठी भूमिका समजून घ्यावी लागेल. मुस्लिमांविषयी जगभर संशयाची व नाराजीची मानसिकता कशामुळे येत चालली आहे, त्याचे नेमके विश्लेषण त्यांनी केलेले आहे. जिथे आपण जातो आणि वास्तव्य करतो, तिथल्या निसर्ग, परंपरा व जीवनाशी एकरूप व्हायला मुस्लिम बिलकुल तयार नसतात. तिथे प्रवेश मिळण्यापर्यंत सर्व अटी मान्य केल्या जातात आणि त्यासाठी धर्म आडवा आणला जाऊ नये, असा मुस्लिमांचाच आग्रह असतो. त्याचा अर्थ असा, की इतर धर्मियांनी उभारलेल्या संस्था वा सुविधांचा लाभ मिळवताना आपला धर्म वेगळा असल्याने अडवले जाऊ नये. पण त्यांच्याच सुविधांचा वापर करताना आपला धर्म इतरांना आडवा येत असेल, तर त्यांनी निमूट सहन केले पाहिजे; असा अट्टाहास असतो. युरोपमध्ये बुरख्याचा आग्रह धरणे वा चर्चप्रणित शाळांमध्ये इस्लामी शैलीच्या वस्त्रप्रावरणांचा आग्रह कशाचे लक्षण आहे? पाऊस पडत असेल तर भिजण्यापासून बचाव म्हणून इतर कुणाच्या छत्रीत जायचे आणि तिथे घेतल्यावर आपणाला भिजवले जाते म्हणत, दुसर्‍याच्या छत्रीवरच हक्क सांगायचा, असा सगळा प्रकार आहे. ओवायसींचा शाळेत योगाचा अभ्यास घेण्य़ाला विरोध कशाला? मुस्लिमांवर सक्ती नको असे म्हणायलाही हरकत नाही. पण योगाला विरोध कशाचे द्योतक आहे? जलिल यांचा स्मारकाला असलेला विरोध त्यांच्या धार्मिक मुर्तीपूजा विरोधी (शिर्क) भावना व श्रद्धेतून आलेला आहे. मुर्तीपूजा हे इस्लाममध्ये सर्वात भीषण पाप मानले जाते. स्मारकाला घातले जाणारे हार खुपतात, त्याचीच मग जाहिर वाच्यता जलिल यांनी केलेली नाही काय? नोकरीत वा सोसायटीत मुस्लिम नको म्हटले, मग धर्मानुसार भेदभाव होतो. मग स्मारक नको किंवा योगाच नकोत, ह्या आग्रहातून जलिल व ओवायसी धार्मिक भेदभावाचाच आग्रह धरत नाहीत काय?

1 comment:

  1. Thanks Sir..The latest statements of Russian and Australia Presidents are also explaining the same nature of Muslim mentality..You are to the point

    ReplyDelete