मागल्या दोन महिन्यातली गोष्ट आहे. आधी मुस्लिम तरूणाला नोकरी नाकारण्याचा विषय आणि पाठोपाठ मुस्लिम तरूणीला सदनिका नाकारण्याचा विषय गाजत होता. तेव्हा अजित सावंत ह्या कट्टर सेक्युलर किंवा हिंदूत्वाच्या कडव्या विरोधकाला माध्यमांनी सत्य बोलायला भाग पाडले होते. मागल्या काही वर्षात सातत्याने संघ, भाजपा किंवा नरेंद्र मोदी यांच्यावर माध्यमातून जे सेक्युलर शरसंधान चालू आहे, त्याचा अतिरेक होत चालला आहे. विरोधासाठी विरोध करताना थेट खोटेपणा व बेताल होण्यापर्यंत मजल गेली आहे. पर्यायाने ज्यांना थोडीफ़ार बुद्धी आहे आणि विवेकाची साथ सोडू नये इतके वाटते, त्यांना अशा अतिरेकापासून दूर व्हायला पर्यायच शिल्लक उरलेला नाही. कारण तुम्ही तर्कहीन व विवेकशून्य वाटेल ते बरळू लागता, तेव्हा लोकांच्या मनात तुमच्याविषयी शंका येऊ लागणे अपरिहार्य होऊन जाते. मग भले आयडिया ऑफ़ इंडिया नावाच्या भ्रामक जगातील ‘समविचारी’ गोटात जमून टाळ्या पिटल्या जातील. पण जेव्हा खर्याखुर्या जगात व लोकात फ़िरायची वेळ येते, तेव्हा लोक तुमच्याकडे कोण सरफ़िरा आलाय अशाच नजरेने बघू लागतात. अजित सावंत चर्चेच्या निमीत्ताने समविचारी गोटात वावरत असले, बहुतांश प्रसंगी वास्तव जगात जगत असतात आणि तिथे त्यांना स्विकारले जाणेही अगत्याचे असते. सहाजिकच खुळचटपणा ठरण्यापर्यंत त्यांना आपला सेक्युलर पुरोगामीपणा ताणून चालणार नसतो. म्हणूनच काही प्रसंगी वा प्रामुख्याने जमावाने मुस्लिम एकत्र येतात, तेव्हा अकारण इतरांना त्रास देतात, असे त्यांना एबीपीच्या चर्चेत बोलून दाखवावेच लागले. अर्थात तेवढ्याने ते हिंदूत्ववादी होत नाहीत, की प्रतिगामी होत नाहीत. पण वास्तववादी असतात आणि तसे रहाणे भागच असते. मात्र तरीही अशा लोकांना आपली एक वैचारिक भूमिका म्हणून पुरोगामी खुळेपणालाही साथ देणे भाग असते.
हळुहळू असे अनेकजण त्या समविचारी गोटापासून दुरावत चालले आहेत आणि निदान खुळेपणा वा अतिरेकापासून अलिप्त होऊ लागल्याची ती खुण होती. वास्तविक मागल्या दोनपाच वर्षात मोठ्या संख्येने मतदार व सामान्य जनता अशीच तथाकथित पुरोगामी खुळेपणापासून आपल्याला अलिप्त करून घेत गेलेली आहे. ज्याला आजकाल भाजपा आपली वाढलेली शक्ती मानतो, ते त्याचे वाढलेले मतदार नसून पुरोगामी खुळेपणातून सुटका करून घेतलेल्या सामान्य जनतेची ती संख्या आहे. ती सर्व लोकसंख्या हिंदूत्ववादी झालेली नाही, की धर्मांध झालेली नाही. पण हिंदू असूनही आपली सातत्याने केवळ हिंदू म्हणून हेटाळणी होते आणि मुस्लिमांच्या कसल्याही अतिरेकाचे पुरोगामी म्हणून समर्थन चालते, त्याला नाकारण्याची उत्सुकता लोकांना मोदींकडे घेऊन गेली. गुजरात दंगलीच्या विरोधातला अतिरेक असो किंवा भाजपाच्या विरोधात नित्यनेमाने आणलेली बालंट असोत, त्यामुळे असल्या खुळेपणापेक्षा वास्तववादी मोदी बरे; असा ओढा लोकांमध्ये निर्माण होत गेला. किंबहूना खुळ्यांचा सहवासातून बाहेर पडण्याला उत्सुक असलेल्यांनी मोदींकडे पर्यय म्हणून बघितले. त्यातून जे काही लोक उरलेत, त्याना संभाळून घेत त्यांना माघारी आणण्यासाठी खरे तर पुरोगाम्यांचा प्रयत्न व्हायला हवा आहे. पण दुर्दैव असे, की पुरोगाम्यांचे नेतृत्व उथळ, उनाड व छछोर लोकांच्या हाती गेलेले आहे. मग अजित सावंत सारख्यांना त्यांच्यामागे फ़रफ़टत जाणे भाग आहे. नसेल, तर विवेकाला स्मरून त्यांच्यापासून स्वत:ला अलिप्त करून घेणे भाग आहे. मुस्लिम भेदभावाचा जो कांगावा दिड दोन महिन्यापुर्वी झाला, तेव्हा अजित सावंत यांची अलिप्त तटस्थ भूमिका त्यातून आलेली होती. आणि तसे माझ्या परिचयातील ते एकटेच नाहीत. आणखी दोन असेच खंदे भाजपा विरोधक अलिकडे स्वत:ला पुरोगामी खुळेपणापासून अलिप्त करताना दिसले.
दुसरे आहेत माझे फ़ेसबुक मित्र व व्यंगचित्रकार लेखक गजू तायडे. मागल्या तीन वर्षापासून आमची सोशल माध्यमात देवाणघेवाण चालू आहे. आपल्या बोचर्या शैलीने गजूने अनेकदा मलाही खोचक सवाल केलेले आहेत. प्रामुख्याने लोकसभा निवडणूकीच्या कालखंडात तर मोदी विरोधात वाटेल तितक्या थराला जाण्याची गजूने कधीही तमा बाळगली नाही. अर्थात त्याचा विरोध पक्ष वा व्यक्तीच्या संदर्भातला नव्हता. त्याच्या पुरोगामी भूमिकेतून आलेला तो विरोध होता. त्याचे खंडन मी कधीच केले नाही. कारण मी हिंदूत्ववादी नाही की बांधिल पुरोगामी नाही. पत्रकार म्हणुन सतत लपवली जाणारी दुसरी बाजू समोर आणण्याची मर्यादा मी स्वत:ला घालून घेतली आहे. सहाजिकच जिथे लपवलेली दुसरी बाजू जाणवते, तितकी अगत्याने समोर आणायची कामगिरी मी बजावत असतो. म्हणूनच गजूसारखे मित्र कायम राहू शकले. अशा गजूला गेल्या आठवड्यात मोदीच्या समर्थनार्थ येऊन उभे रहायची पाळी आली. योग दिवसाच्या निमीत्ताने जो सोहळा पार पडला, त्यावर सगळीकडे ठरलेली टिका व टिंगलटवाळी तितक्याच उत्साहाने पार पडली. त्या सोहळ्यात पुढाकार घेणार्या पंतप्रधान मोदींना व्यायाम कसा जमत नव्हता, इथपासून गळ्यातले तिरंगी उपरणे घाम पुसायला कसे वापरले, इथपर्यंत यथेच्छ टवाळी झाली. तेव्हा वैतागून गजूने मोदींची वकिली केली. मोदींच्या गळ्यात तिरंगा ध्वज नव्हता, तर कुठलाही कॉग्रेसवाला मिरवतो, तसेच तिरंगी उपरणे होते. त्यावर टिका करण्यापेक्षा इतर खुप मुद्दे टिकेसाठी आहेत. खुळ्यासारखी टिका नको, अशी पोस्ट गजूने लिहीली. त्याला आता कुणी मोदीभक्त म्हणायचे काय? त्याच्यावर ही पाळी कशाला आली? त्याच्यावर असा प्रसंग कोणी आणला? अविवेकी व ताळतंत्र सोडलेल्या हेटाळणीतून आपल्याला लोक खुळे समजतील, अशा शंकेने गजुला अलिप्त व्हायला भाग पाडलेले नाही काय?
तिसरा मित्र आहे सुनील तांबे. मुंबईत पहिल्या पावसाने पाणी तुंबले आणि जो ठरलेला पोरकटपणा माध्यमात व इतरत्र सुरू झाला, तेव्हा सुनील शिवसेनाचे समर्थन करायला पुढे आला नाही. पण जो पोरकटपणा चालू होता, त्यापासून अलिप्त करून घ्यायला त्याने मुद्दाम पोस्ट टाकली. मुंबईचा भूगोल व इतिहास ज्यांना ठाऊकच नाही, त्यांच्याकडून असला खुळेपणा चालू आहे, असे त्याला मुद्दाम सांगायची पाळी हिंदूत्वाने आणली नाही, तर सेक्युलर बेतालपणाने आणली. तेवढ्यावर भागले नाही. मग विनोद तावडे यांच्या वादग्रस्त पदवीचा मामला आला आणि तावडेंबद्दल दोन शब्द चांगले लिहीणे सुनीलला भागच पडले. कारण तावडे संघाचे, भाजपाचे म्हणून कुठल्याही वस्तुस्थितीचे भान न राखता टिकेचा जो खुळेपणा सुरू झाला, त्यातून ज्ञानेश्वर विद्यापिठ नामक एका अभिनव प्रयोगावर अन्याय चालू होता, त्यापासून सुनीलला अलिप्त होणे भाग पडले. ही वेळ त्याच्यावर कोणी आणली? ज्यांनी पुरोगामीत्व सिद्ध करण्यासाठी ताळतंत्र सोडून अतिशयोक्ती व अतिरेक चालविला होता, त्यापासून आपल्याला अलिप्त करून घेण्याखेरीज सुनील, गजू वा अजित सावंत यांचा आणखी कुठलाही हेतू नव्हता व नाही. हे विचार करणारे व विवेकाने वागणारे मित्र आहेत. आपल्या विचारांशी बांधिल आहेत. पण त्याखेरीज जे कुठलीही विचारांची बांधिलकी मानणारे नसतात आणि धर्माचे अभिमानीही नसतात, त्यांच्यावर काय पाळी येत असेल? जे काही थोडेथोडके असे लोक समाजात अजूनही शिल्लक आहेत, त्यांना पुरोगामी राजकारण व भूमिका यापासून पळवून लावायचा असाच उद्योग सुरू राहिला, तर भविष्यात काय स्थिती होईल? ह्या तीन मित्रांप्रमाणेच अनेकांना पुरोगामी लोकांपासून स्वत:ला दूर करणे अपरिहार्यच ठरत जाणार नाही का? पुरोगामीत्व जितके हास्यास्पद होत जाईल, तितका अधिक समाज व अधिक लोकसंख्या त्यापासून स्वत:ला अलिप्त करीत जाईल. त्यांना मोदी वा भाजपा हवे असतील असे नाही. पण या खुळेपणापासून मुक्ती नक्कीच हवीशी वाटत जाईल. आणि पर्यायच नसेल तर लाचारी म्हणून मोदी वा तत्सम पर्याय स्विकारालाच लागेल. त्याचे श्रेय भाजपा व संघ नसेल, तर छछोर व बेताल पुरोगाम्यांना असेल.
No comments:
Post a Comment