Tuesday, June 16, 2015

देणार्‍याने देत जावे, घेणार्‍याने घेत जावे

 ज्येष्ठ नेत्याचाच 'गेम'; पवारांशी दुरावा वाढल्याने भुजबळ अडचणीत

गेल्या काही आठवड्यात एकामागून एक भानगडी बाहेर येत आहेत आणि त्यात माजी बांधकाममंत्री छगन भुजबळ यांच्या विरोधात आरोप होऊ लागले आहेत. अर्थात आरोप नवे नाहीत. त्यातला तपशील नवा आहे. सत्तेत असताना असे अनेक आरोप राष्ट्रवादीच्या नेत्यांवर सतत होत राहिले. पण त्यांच्या पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी अशा आरोपांची कधी दखल घेतली नाही, की त्याची पर्वा करायचे सौजन्य दाखवले नाही. किती हजार कोटींचे असे आकडे नुसते बोलले गेले. पण आरोपांच्या जंजाळात फ़सण्यापेक्षा काम करा, असाच साहेबांचा उपदेश असायचा आणि भुजबळ इत्यादी मंडळी त्याचे तंतोतंत पालन करत राहिली. अन्यथा इतके मोठमोठे आकडे कशाला उघडकीस आले असते. आता भुजबळांवर नव्या सरकारने वक्रदृष्टी रोखलेली असताना अजितदादांना मोकळे सोडल्याचाही आरोप होतो आहे. असे नेहमीच होत असते. टिकाकार कधीच समाधानी नसतात. कितीही करून दाखवले, तरी त्यात त्रुटी दाखवणे हाच विरोधकांचा हव्यास असतो. म्हणूनच भुजबळ फ़सले असतील तरी विरोधक समाधानी व्हायची अजिबात शक्यता नाही. पण भुजबळ यांची श्रीमंती इतक्या वेगाने वाढत असताना त्यांच्या पक्षाध्यक्षांचे तिकडे कसे लक्ष गेले नाही, याचेही नवल वाटते. की इतके काही देण्यासाठीच भुजबळांना शिवसेनेतून आपल्या जवळ आणायचे पुण्य पवारांनी गाठीशी बांधले असेल? भुजबळांनी जे काही मिळवले वा ‘घेतले’, ते देणारा कोणीतरी असायला हवा ना? याही प्रश्नाचे उतर शोधावेच लागेल. इतक्या वेगाने भुजबळ कशी कमाई करू शकले? त्याचे उत्तर शोधायला चार वर्षे मागे जावे लागेल. मगच ‘देणार्‍याने देत जावे, घेणार्‍याने घेत जावे’, या कविवर्य विंदा करंदीकरांच्या ओळींचा अर्थ लागू शकतो. जेव्हा पवार देणारे असतात, तेव्हा घेणार्‍याचे हात पुरेसे नसतात, इतके दिले जात असते.

चार वर्षापुर्वी रामदास आठवले यांनी पवारांची साथ सोडून शिवसेना व भाजपा यांच्याशी दोस्ती करायचा निर्णय घेतला होता. त्याच दरम्यान गोपिनाथ मुंडे आपल्याच पक्षात नाराज होते. त्यांचे पक्षांतर्गत प्रतिस्पर्धी नितीन गडकरी यांना राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून पक्षाने निवडले होते आणि त्याचा वापर करीत गडकरींनी महाराष्ट्रात मुंडे यांच्या पाठीराख्यांना बाजूला करायचा सपाटा लावला होता. जे कोणी मुंडे समर्थक म्हणून ओळखले जात, त्यांना कटाक्षाने संघटनेतून बाजूला करायची मोहिमच उघडली होती. त्यामुळे मुंडे कमालीचे विचलीत झालेले होते. पुण्याचा पक्षाध्यक्ष ठरवण्याच्या विषयात हे भांडण विकोपास गेले आणि मुंडे यांनी भाजपाला रामराम ठोकण्याचा ठाम निर्णय घेतलेला होता. २०११ च्या जुन-जुलै दरम्यानचाच तो प्रसंग आहे. तेव्हा मुंडे कुठल्या दुसर्‍या पक्षात जाणार, अशी चर्चा माध्यमातून रंगलेली होती. त्यावर मुंडे सोनियांना भेटले वा पवारांच्या संपर्कात असल्याच्याही बातम्या चघळल्या जात होत्या. मात्र खुद्द गोपिनाथराव त्याबाबतीत मौन बाळगून होते. आपल्या सहकारी व कार्यकर्त्यांची संवाद केल्यावरच निर्णय घेऊ; असे सांगताना त्यांनी नाराजीला नकार दिलेला नव्हता. अशावेळी मग त्यांच्या भवितव्याची माध्यमातून चर्चा अपरिहार्यच नव्हे काय? मात्र अशा चर्चेत व विषयात शरद पवार यांना नेहमी रस असतो. म्हणूनच मुंडे राष्ट्रवादीत सहभागी होतील काय, या प्रश्नावर पवारांनी केलेले भाष्य मोठे सूचक होते. पण त्याची त्या दृष्टीने फ़ारशी दखल कोणी घेतलेली नव्हती. ‘मुंडे यांना देण्यासारखे राष्ट्रवादीपाशी काहीही नाही’, असे ते विधान होते. त्याचा अर्थच असा की पवार नेहमी कोणाला काहीतरी ‘देऊन’ आपल्या गोटात व गटात आणत असतात. मात्र मुंडे यांच्या अपेक्षा मोठ्या असल्याने इतक्या आपण पुर्ण करू शकत नाही, असेच साहेबांना म्हणायचे असावे.

अर्थात पवारच कशाला कुठल्याही पक्षात वा राजकीय गोटात इतरत्रचा कोणी दाखल होतो, तेव्हा मोठ्या मतपरिवर्तनाने जागा बदलत नसतो. त्याचा काही स्वार्थ त्यात सामावलेला असतो. मोदी विरोधात मंत्रीपद सोडून गेलेले रामविलास पासवान पुन्हा मोदींच्याच नेतृत्वाखाली काम करण्याला तत्वाचा मुलामा लावतात, तेव्हा त्यातला त्यांचाही स्वार्थ लपून रहात नाही. अन्य पक्षातून जिंकणारे उमेदवार आपल्या पक्षात आणणारे काहीतरी आमिष दाखवत असतात. पण त्यापैकी कोणी इतके स्पष्टपणे देण्या वा घेण्याची जाहिर वाच्याता करीत नाहीत. पवार साहेब मात्र खुलेआम तसे बोलले होते. मात्र मुंडे यांना देण्यासारखे काही नाही, तर इतरांना आजवर काय काय दिले, त्याचे स्पष्टीकरण पवारांनी द्यायला हवे होते. सेनेतून भुजबळ, गणेश नाईक वा जनता दलातून बबनराव पाचपुते अशा लोकांना आपल्या पक्षात आणताना पवारांनी काय दिले होते? त्याचा खुलासा तेव्हाच केला असता, तर आज भुजबळांवर ही पाळी आली असती काय? आज जी काही चौकशी व तपास चालू आहे, त्याला भ्रष्टाचार असे संबोधले जाते. पण वास्तविक भाषेत तो राजकीय व्यवहार आहे. पवारांच्या गोटात दाखल होण्यासाठी भुजबळांना मिळालेली ती देणगी वा भेटवस्तु आहे. त्यामध्ये किती कोटी रुपयांची मोजदाद होते, त्याला अर्थ नाही. पवार देतात तेव्हा छप्पर फ़ाडके देतात, इतकाच त्याचा अर्थ आहे. मात्र त्याची कधी चर्चा होत नाही. आतासुद्धा भुजबळांच्या विरोधात काहुर माजलेले आहे. पण भुजबळांना जातियवादी शिवसेनेच्या राजकारणातून या समतेच्या राजकारणात पवारांनी आणलेच नसते, तर यातली दमडी तरी भुजबळांच्या खात्यात कुणाला दाखवता आली असती काय? हा फ़रक लक्षात घेतला पाहिजे. पवार साहेब नुसते देत नाहीत, तर दिसेल व नजरेत भरेल इतके भरभरून देतात. मुंडेंना देण्यासारखे काही नाही याचा अर्थ म्हणूनच गोंधळात पाडणारा आहे.

थोडा उलटा विचार करून बघा. तब्बल दोन दशके रामदास आठवले कायम पवारांच्या गोटात होते. त्यांनी काय काय मिळवले? त्यांना पवारांनी काय काय दिले? जेव्हा आठवले साथ सोडून महायुतीत गेले, तेव्हा पवारांनी या जुन्या मित्राला काय सल्ला दिलेला होता? बाबासाहेबांनी दिलेला पंचशीलाचा उपदेश विसरू नकोस. त्याला न जुमानता आठवले युतीत गेले आणि अजून तिथेच आहेत. त्यांच्यासहीत विनायक मेटे, राजू शेट्टी वा महादेव जानकर महायुतीत आहेत. त्यांना युतीने काय दिले? एक आमदारपद वा तेवढेही नाही. इथे फ़रक लक्षात घ्यायला हवा. युतीत गेल्यावर देण्यासारखे काहीच नसते. आणि पवारांकडे हीच मंडळी गेली असती, तर शेट्टी, जानकर एव्हाना काय काय मिळवून बसले असते. भुजबळ नुसते आमदार मंत्रीच झाले नाहीत. मुलगा पुतण्याला सत्तापदे मिळण्यापासून अब्जावधी रुपयांची माया भुजबळांच्या खाती जमा झाली. ह्याला पवारांची माया म्हणतात. नाहीतर युतीची किमया बघा. साधी सत्तापदेही देताना मारामार. पवार द्यायला समर्थ असतात. पण घेणार्‍याला मिळाले ते टिकवता आले पाहिजे आणि पचवता आले पाहिजे. भुजबळांना पचवता आले नाही तर तो पवार साहेबांचा दोष कसा असेल? आताही भुजबळांच्या तपासातून अनेक गोष्टी बाहेर येत असताना पवार किंचीतही विचलीत झालेले नाहीत. कारण स्पष्ट आहे. ज्याने घेतले त्याची जबाबदारी असते. भुजबळांनी घेतले त्याला साहेब कसे जबाबदार असतील? इतका कल्लोळ भुजबळांच्या नावे चालू आहे. पण एका शब्दाने तरी साहेबांनी खुलासा केला आहे काय? साहेब क्रिकेट संस्थेच्या निवडणूकीत गर्क आहेत. तिथेही अनेकांना देण्यासारखे काही असेल तर दानधर्म करायला नको का? साहेब सतत पुढे जात असतात. मागल्या गोष्टीत अडकून ते कधी प्रतिगामीत्वाच्या आहारी जात नाहीत. त्या गोष्टी भुजबळ सारख्यांनी संभाळायच्या असतात.

5 comments:

  1. 'मुंडे यांना देण्यासारखे राष्ट्रवादीपाशी काहीही नाही’,
    म्हणजे मुंडेंच पोट भरलेले.

    ReplyDelete
  2. पवारसाहेबांनी भुजबळांची साथ सोडलेली दिसते आहे, नाहीतर भुजबळ अडकणे अवघड होते.

    ReplyDelete
  3. भुजबळांची जागा धनंजय मुंडे साठी राखीव?

    ReplyDelete