Monday, June 15, 2015

शाहिस्तेखान, कात्रजचा घाट आणि म्यानमार



(राज्यमंत्री राजवर्धन राठोड ज्यांनी वादग्रस्त विधान केले)

पत्रकार, संपादक वा अभ्यासक यांच्या दृष्टीने जगातले अन्य कोणीही शहाणे नसतात आणि ते सतत चुकाच करत असतात. सहाजिकच त्यांच्या चुका दाखवणारा कोणी असायला हवा, म्हणून बुद्धीजिवी जमात उदयास आलेली आहे. मग कुठल्याही बाबतीत काहीतरी बिनसलेले दाखवण्याची स्पर्धा चालू होते. क्रिकेट वा युद्ध  असा विषय जगातला कुठलाही असो, त्यात कृतीशून्य बुद्धीजिवी हा सर्वाधिक जाणता असतो. वारंवार त्याची प्रचिती येत असते. कालपरवा म्यानमारमध्ये जी अतिरेकी विरोधात कारवाई झाली, त्यानंतर ज्या बुद्धीवादी प्रतिक्रीया उमटल्या, त्या त्याचेच पुरावे आहेत. सरकारचे प्रतिनिधी वा मंत्री यांनी या कारवाईविषयी जी माहिती उपलब्ध करून दिली, त्यावरून काहूर कशाला माजले पाहिजे? काहीजणांना वाटते, की सरकारने अशी माहिती जगजाहिर करायलाच नको होती. तर काहीजणांना ती माहितीच खोटी वा अपुरी वाटलेली आहे. दुसरीकडे अशा कारवाईच्या निमीत्ताने पाकिस्तानला धमकावण्याचे काही कारण नव्हते, असेही सांगितले गेले. तर काहीजणांनी म्यानमारच्या सार्वभौम सीमेचे उल्लंघन झाल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. किती मजेशीर प्रतिक्रिया आहेत ना? अनेकदा काही ठराविक परिणाम साधण्यासाठी जाणिवपुर्वक अपुरी वा चुकीची माहिती जगजाहिर केली जात असते. त्यातून काय साधले जाते वा साधायचे होते, त्याचा उच्चार मुत्सद्देगिरीतून होत नसतो. कारण जागतिक राजकारण पत्रकारितेतून नव्हेतर मुत्सद्देगिरीतून चालत असते. सहाजिकच संपादकीय वा बौद्धिक तर्काला पटणार्‍या गोष्टी तिथे बोलल्या वा सांगितल्या जात नसतात. म्यानमार प्रकरण त्याचे उत्तम उदाहरण आहे. भारतातर्फ़े कोणीतरी म्यानमारमध्ये घुसून कारवाई केल्याचा बभ्रा केला आणि म्यानमारने त्याचा साफ़ इन्कार केला. ह्यातून काय साधले गेले? कधीतरी याही बाजूने विचार व्हायला हरकत नाही.

अमेरिकेने पाकिस्तानात घुसून कारवाई केली आणि त्याचे चित्रणही केले. सहाजिकच पाकिस्तानच्या सार्वभौम सीमेचा भंग झाल्याचा इन्कार अमेरिका करूच शकत नाही. भारतीय कमांडोंनी केलेली कारवाई म्यानमारच्या सार्वभौमत्वाला धक्का देणारी असती, तर त्या देशाने नक्कीच तक्रार केली असती. पण तसे झालेले नाही. भारत सरकारने अधिकृतपणे तसे काही सांगितलेले नाही आणि कोणा मंत्र्याने तसा दावा केला असल्यास त्याला दुजोरा दिलेला नाही. उलट म्यानमारने तशा घुसखोरीचा साफ़ इन्कार केलेला आहे. मग अशा बेताल बोलण्याचा परिणाम काय असू शकतो? अशी कारवाई झाल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा उठायचे कारण काय? जर अशी कारवाई म्यानमारच्या सीमेअलिकडे भारतीय हद्दीतच झाली असेल, तर तशाच अनेक कारवाया पश्चिम सीमेवर, नियंत्रण रेषेवर सातत्याने होतच असतात आणि पाकिस्तानने त्याबद्दल कुठली तक्रार केलेली नाही. काश्मिरात अशा कारवाया भारतीय सेना नेहमीच करत असते आणि म्यानमारचा दावा मान्य करायचा, तर त्यांच्या सीमेनजिक तशीच कारवाई भारतीय हद्दीत झालेली आहे. म्हणजे कुठल्याही आंतरराष्ट्रीय करार वा नियमांचा भंग झालेला नाही. पण कोणा ‘आगावू’ माणसाने सीमापार ‘घुसून’ कारवाई झाल्याचा उच्चार केला आणि धमाल उडाली. जर इतक्या क्षमतेने भारतीय कमांडो म्यानमारमध्ये घुसत असतील, तर पाक हद्दीतही घुसू शकतील, अशी धास्ती पाकिस्तानला वाटणे स्वाभाविक आहे. किंबहूना अशी धास्ती त्यांना वाटते किंवा नाही, याची चाचपणी त्यातून होऊ शकली. ज्याने कोणी असली ‘मुर्ख विधाने’ केली, ते केलेच नसते, तर पाकला अशा कारवाईविषयी काय वाटते, त्याचा अंदाज घेण्याचा अन्य कुठला मार्ग उपलब्ध होता? त्या मुर्खपणामुळेच पाकला अशा कारवाईची कशी धडकी भरली, हेच उघडकीस आले ना?

मग एक गोष्ट लक्षात येऊ शकेल, की अनेकदा बुद्धीजिवींना मुर्खपणा वाटणार्‍या विधाने व गोष्टी जाणिवपुर्वकच केल्या जात असतात. किंबहूना त्यांनीही आपल्या परीने हल्ला चढवावा, म्हणून अशी निमीत्ते दिली जात असतात. म्यानमारची कारवाई काश्मिरातल्या कारवायांपेक्षा फ़ारशी भिन्न नाही. पण फ़रक एका विधानाचा आहे. इथे सीमापार घुसून कारवाई झाल्याचा गवगवा करण्यात आला आणि वादळ उठले. काश्मिरात तसे होत नाही आणि कोणी त्या कारवायांची फ़ारशी दखलही घेत नाही. आणखी एक फ़रक लक्षात घेतला पाहिजे. याप्रकारच्या कारवाया काश्मिरात फ़ारश्या झालेल्या नाहीत. आधी जिहादी हल्ले करतात आणि मग त्यांना घेरले जाते. किंवा माहिती मिळाली म्हणून वेढा देऊन जिहादींची कोंडी केली जाते. म्यानमारची कारवाई अजिबात भिन्न आहे. ती कुणाच्या प्रदेशात वा हद्दीत झाली, याला फ़ारसे महत्व नाही. त्या कारवाईची शैली भिन्न आहे. नेमकी माहिती घेऊन अल्पावधीने खात्मा, असे तिचे स्वरूप आहे. काही प्रमाणात हल्ली काश्मिरातही अशा कारवाया सेनेकडून होत असतात. म्हणूनच मोठ्या प्रमाणात जिहादींचा खात्मा चालू आहे. हल्ल्याची प्रतिक्षा न करता आपणच हल्ला करण्याची ही कारवाई आहे. ती अधिकृत सैनिकांनी केली म्हणून सैनिकी असते. पण गणवेशात नसलेल्यांनी केली, तर अतिरेकी कारवाई असते. जे पाकिस्तानचे तंत्र आहे. तेच भारताने अवलंबिले तर पाकिस्तानची स्थिती काय होईल? पाकिस्तान अशा आक्रमक व आकस्मिक हल्ल्यासाठी कितपत सज्ज आहे? पाकला अशा हल्ला वा कारवाईची भिती आहे किंवा नाही? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा मार्ग म्हणजे ‘अकारण मुर्खासारखी बडबड होय.’ ज्याप्रकारे पाकिस्तानातून चवताळलेल्या प्रतिक्रिया उमटलेल्या आहेत, त्यातून याप्रकारे हल्ले झाल्यास आपला टिकाव लागणार नाही, याची पाकिस्तानने कबुलीच दिलेली आहे.

नुसत्या अशा शक्यतेचा उच्चार होताच पाकिस्तानने थेट अण्वस्त्रांच्या तलवारी उपसल्या, हे शौर्याचे लक्षण नाही. ते पाकिस्तान भयभीत झाल्याचे लक्षण आहे. घुसून बघा, तुम्हाला मुडदे जागीच टाकून पळावे लागेल, असेही पाकिस्तानी राज्यकर्ते वा सेनाधिकारी बोलू शकले असते. त्यातून आपण आपल्या सीमांचे रक्षण करायला पुर्ण सिद्ध व सज्ज असल्याची ग्वाही त्यांना देता आली असती. थेट युद्धाची धमकी देण्याचे काहीही कारण नव्हते. पण म्यानमारच्या कारवाईने जी भारतीय सज्जता दाखवली आणि ‘अन्यत्र’ तशा कारवाईची शक्यता बोलून दाखवली गेली, त्याने पाकिस्तानला बेसावध गाठले. लालमहालात निश्चींत घोरणार्‍या शाहिस्तेखानाला अपरात्री झोपेत गाठावे, तसे एकूण प्रकरण आहे. तेव्हा जसा खान व त्याचे सरदार चवताळले होते, त्यापेक्षा पाकिस्तानची प्रतिक्रीया भिन्न नाही. ‘कात्रजचा घाट दाखवणे’ हा वाक्प्रचार कौतुकाने वापरणार्‍यांना म्यानमार कारवाईतला कात्रजचा घाट कितीसा ओळखता आला? त्याचीच तर चाचपणी भारतीय सुरक्षा योजकांना करायची असेल, तर अशी विधाने आवश्यक असतात. ती संपादकीय अग्रलेख वा विवेचन करणार्‍यांसाठी नसतात. तो शत्रु गोटातील माहिती मिळवण्याचा मार्ग असतो. प्राथमिक शाळेतल्या मुलांसाठीच्या पुस्तकातला धडा घेऊन त्यावर पदवीच्या वर्गात विवेचन करणारा मुर्ख असतो. त्या बालवर्गातील धड्याचे प्रयोजन विसरून विश्लेषण करायचे नसते. तर ज्या वर्गात शिकवायचे आहे, त्यासाठीचे पाठ्यपुस्तक व त्यातला धडा घ्यायचा असतो. पण इथल्या बुद्धीजिवींनी काहुर माजवले आणि त्याच ‘मुर्ख’ विधानाला पाकिस्तानमध्ये वजन आले. खरीखुरी धमकी समजून पाकिस्तानात बेसावध प्रतिक्रीया उमटल्या. त्याचा एकत्रित अर्थ इतकाच, की पाकिस्तान याप्रकारच्या हल्ल्यासाठी वा त्याच्या प्रतिकारासाठी अजिबात सज्ज नाही. या कामी ज्याने ‘मुर्ख’ विधान केले त्याच्या इतकेच श्रेय भारतातल्या बुद्धीमान लोकांना श्रेय द्यायला हवे. कारण त्यांच्या ‘शहाणपणाने’ पाकिस्तानला बेसावध प्रतिक्रीया देण्याइतके ‘मुर्ख’ बनवले ना?

3 comments:

  1. Bhau apratim vishleshan. Gharach bhau tumhala challenge nahi.

    ReplyDelete
  2. Marvellous article Bhau..... You really educating people to read between the lines.Hats off to you. I wish you long life and all the best.

    ReplyDelete
  3. Tumachya likhanamule Ghatanekade phanyachi drushti milate

    ReplyDelete