Thursday, June 11, 2015

निखीलकी जुबानी, वागळेकी कहानी




अनिरुद्ध जोशी यांनी जी ऑडिओ टेप युट्युबवर टाकली आणि ज्याचा खुप गवगवा झालेला आहे, त्यातल्या शब्दाकडे लोकांचे लक्ष वेधले गेले आहे. पण त्यातून निखील वागळे यांनी आपल्या चारित्र्याचे व स्वभावाचे जे प्रमाणपत्र सादर केले आहे, त्याची फ़ारशी चर्चा होतना दिसली नाही. त्यात निखील अर्वाच्य व आक्रस्ताळी भाषा वापरतो, ही तक्रार आहे. पण त्यातच निखील शाहू, फ़ुले, आंबेडकरांच्या विचारांचा हवाला सतत देत रहातो. तिथेच न थांबता आपल्यावर त्याच थोर महात्म्यांचे संस्कार असल्याचे सांगत जोशीसारख्या ब्राह्मणांवर मनुस्मृतीचे संस्कार असल्याचाही आरोप करतो आणि म्हणूनच समोरची व्यक्ती सनातन संस्थेची अनुयायी व पर्यायाने दाभोळकर पानसरे यांचे मारेकरी असल्याचाची बेधडक आरोप करतांना ऐकायला मिळते. ह्याचा साकल्याने विचार किती केला गेला? ही वृत्ती कोणती? हे संस्कार कुठले? शाहू, फ़ुले आंबेडकर वाचून त्यांचे आकलन होऊ शकते काय? त्या नुसत्या वाचनाने संस्कार होतात काय? त्यांचे संस्कार घ्यायला निखील कुठल्या आंबेडकरी चळवळीत कार्यकर्ता होता? जोशी या नावाखातर ‘भटजी’ अशी हेटाळणीयुक्त भाषा निखील वापरतो, ती भाषा अशा पुरोगामी संस्काराचा पुरावा आहे काय? तसे असेल तर मग एस. एम. जोशी हे सुद्धा ‘भटजी’च होतात. कारण आडनावाने अनिरुद्ध प्रमाणे एसेमही ‘जोशी’च आहेत. आणि योगयोग बघा, निखील त्याच एसेम ‘भटजीं’चे संस्कार घेऊन सार्वजनिक जीवनात आलेला आहे. वसंत बापट नावाच्या दुसर्‍या ‘भटजी’ची गाणी गुणगुणत निखीलची उमेदीची वर्षे खर्ची पडली आहेत. संस्कार घेण्याच्या वयात निखील कधीही शाहू, फ़ुले, आंबेडकर यांच्या विचारांच्या वार्‍याला उभा राहिलेला नव्हता. मात्र इथे अनिरुद्धला धमक्या, शिव्याशाप देताना आपल्यावर त्याच थोर महात्म्यांच्या विचारांचे संस्कार झाल्याचे दडपून सांगतो आहे. अशा दडपेगिरी वा भामटेगिरीला काय म्हणतात?

इतर कोणीही काहीही म्हणोत, खुद्द निखील अशा वर्तनाला काय म्हणतो, त्याला महत्व आहे. भामटेगिरी व बदमाशीची निखीलचीच व्याख्या आपण त्याच्या वर्तनाशी तुलना करून तपासू शकतो. त्या संभाषणात निखील सातत्याने महात्म्यांची नावे कशाला घेतो आहे? त्यांच्या पदराआड कशाला लपतो आहे? त्याचाही खुलासा आवश्यक नाही काय? तो खुलासा खुद्द निखीलनेच आपल्या लेखातून अठरा वर्षापुर्वी करून ठेवलेला आहे. १५ नोव्हेंबर १९९६ च्या ‘महानगर’ दैनिकातील कॅलिडोस्कोप लिहिताना निखील म्हणतो, ‘चारित्र्यवान माणसांपाठी लपून बदमाश नेहमीच आपले धंदे करीत असतात. हितेंद्र ठाकूर. पप्पू कलानी यांनीही आदरणिय माणसांच्या पाया पडून जनतेला लुटलं.’ हा संदर्भ जोडला, मग निखील सतत थोरामोठ्यांचे हवाले आपल्या समर्थनार्थ कशाला देत असतो, त्याची कल्पना येऊ शकते. अनिरुद्ध जोशीला धमकावताना निखील सतत शाहू, फ़ुले, आंबेडकरांची नावे कशाला घेतो, त्याचे रहस्य त्याच्याच या विधानात दडलेले आहे. कारण निखील कधीही अशा महात्म्यांच्या विचारांनी प्रवृत्त व प्रेरीत झालेल्या चळवळी संस्था संघटनांचा हिस्सा नव्हता. तर त्याच्याच ‘आडनावी’ निकषानुसार ‘भटजी’ विचारांच्या संस्था व संघटनांतून निखील वावरला व संस्कार घेत आलेला आहे. आणि त्या संभाषणातही तीच अस्सल भटजीवृत्ती त्याला लपवता आलेली नाही. शापवाणी उच्चारल्यासारखा तो बोलत रहातो. अगदी कुठल्याही चर्चा परिसंवादात इतरांना ‘माफ़ी मागा’ असे धमकावत निखीलभटजी आवेशातच पापक्षालनाचा अट्टाहास धरत असतो. किती गंमत आहे ना? आपणच भटजीगिरी करायची आणि इतर कोणी आडनावाने ब्राह्मण आहे म्हणून त्याला ‘भटजी’ म्हणून हिणवायचे. याला काय म्हणतात? चारित्र्यसंपन्न माणसांपाठी लपून बदमाशी करणे यापेक्षा वेगळे असते का?

जी दुषणे पप्पू कलानी वा हितेंद्र ठाकूर यांना निखीलने लावलेली आहेत, त्यापेक्षा खुद्द निखील तसूभर वेगळा आहे काय? आपली भूमिका वा मुद्दा थेट मांडायचे सोडून, त्या संभाषणात आठदहा वेळा निखीलला आपल्यावर महात्म्यांचे संस्कार असल्याचे हवाले कशाला द्यावे लागत आहेत? जो प्रामाणिक व सच्चा असतो, त्याला कुठल्या देवा़ची शपथ घ्यावी लागत नाही की कुणा महात्म्यांच्या साक्षी काढाव्या लागत नाहीत. अनिरुद्ध एकाही थोरामोठ्याचे नाव घेत नाही. कारण आपल्या सच्चाईविषयी त्याच्या मनात कडीमात्र शंका नसावी. पण निखील मात्र सतत शाहू, फ़ुले, आंबेडकरांच्या विचाराचे हवाले देतो आहे? यातल्या कोणी कधी संदर्भहीन असा ब्राह्मणांचा राग-द्वेष केला आहे? त्यांनी कधी ब्राह्मणद्वेष वा कुठल्याही अन्य जातीपातीचा द्वेष शिकवला आहे काय? दुसर्‍यांना हिणवणे, हीन लेखणे; याच्याच विरोधात त्या महात्म्यांनी आपली बुद्धी व शक्ती खर्ची घातली. उलट त्यांच्याच नावे आपल्या वर्चस्ववादाची बदमाशी निखील सराईतपणे करत असतो आणि कोंडीत सापडला, मग त्याच महात्म्यांच्या पाठीशी दडी मारत असतो. मध्येच दाभोळकर पानसरे यांच्याही पदराआड लपतही असतो. तिथे दाभोळकरांच्या हत्याकांडाचा तपास लावताना पुण्याच्या पोलिसांनी प्लॅन्चेटचा सहारा घेतला, म्हणून त्यांच्याच लेकरांनी आक्षेप घेतला होता. हमीद व मुक्ता दाभोळकरांनी त्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती. आणि त्याच दाभोळकरांच्या हत्याकांडातून आपल्या पुरोगामी प्रतिष्ठेचे ढोल पिटण्यासाठी वापर करणारा निखील अनिरुद्ध जोशीला धमकी काय देतो? मलाही मारलात, तर भूत बनून तुमच्या मानगुटीवर बसेन. तुम्हाला सोडणार नाही. ही दाभोळकरांची विवेकी भाषा आहे की अस्सल वैदू भगताची भटजीगिरी आहे? दुसर्‍याला ‘भटजी’ म्हणून हिणवायचे आणि आपणच अस्सल भटजीगिरी करायची. याला म्हणतात निखील वागळे.

माणुस बेभान होतो आणि जगासमोर उभा केलेला त्याचा भ्रामक मुखवटा गळून पडतो, तेव्हा़च तो अगदी बावनकशी सत्य बोलत असतो. त्या संभाषणात निखीलचा अस्सल चेहरा व चरित्र समोर आलेले आहे. तो नुसता वर्णवर्चस्ववादीच नाही, तर पक्का अंधश्रद्धाळू आहे. शाहू, फ़ुले, आंबेडकरांचे विचार सोडा, दाभोळकर पानसरेंच्या विचारांशीही त्याचा काडीमात्र संबंध संपर्क नाही. ती त्याची निव्वळ व्यापारी धंदेवाईक बदमाशी आहे. लोकांच्या डोळ्यात धुळफ़ेक करण्यापुरते आणि आपला पुरोगामी मुखवटा शाबुत ठेवण्यापुरता त्याचा अशा महात्मे पुण्यात्मे यांच्याशी संबंध असतो. त्यांच्या पाठीशी लपून आपला हिडीस असली चेहरा त्याला लपवायचा असतो. म्हणून अनवधानाने सत्य बाहेर आले आणि भूत होऊन छळण्याची धमकी उच्चारली गेली. ब्राह्मणाला मारलेत तर ब्रह्महत्येचे पाप माथी येईल, अशी हजारो वर्षे जनमानसात रुजवलेली अंधश्रद्धाच नेमकी निखीलच्या शब्दात कशी उच्चारली जाते? कोणी फ़ुले-आंबेडकरी संस्काराचा माणुस चुकूनही असे बोलू शकेल काय? त्या स्वरूपानंद शंकराचार्यापेक्षा निखीलची बेताल बडबड कितीशी वेगळी आहे? पुरोगामी असो की प्रतिगामी असो, सेक्युलर असो किंवा जातियवादी असो, सर्वांच्यातले नेमके दुर्गुण व दोष निखीलने आत्मसात केले असल्याची प्रचिती या संभाषणातून येऊ शकते. शिवसैनिकाची टपोरी धमकीवजा भाषा इथे आहे. अस्सल भटजीगिरीचा ढोगीपणाही त्यात आहे. थोरामोठ्यांचे हवाले देऊन दिशाभूल करण्याची भामटेगिरी त्यात आहे. कायदा जोशीला लागतो आणि निखीलला लागू होत नाही काय? कोणालाही जेलमध्ये टाकायच्या धमक्या याने द्याव्या, म्हणून राज्यघटना व कायदे जन्माला घातले गेलेत काय? पण तशा अधिकारवाणीने बोलणे म्हणजेच भोंदू भटजीगिरी असते आणि वागळे भटजींइतका अन्य कोणी बदमाश भोंदू एकविसाव्या शतकात दिसू शकत नाही.

9 comments:

  1. निखीलला उघडा पाडावा तर भाऊ तोरस्करांनी ! मस्त !!

    ReplyDelete
  2. Bhau saheb, Wagle kakanchi chorgiri mast paiki ughad kelit tumhi aaj !

    ReplyDelete
  3. BHATAJI he hetalaniyukt kashasathi? amhala to adar vatato.. Bhale Waglena kahihi vato...

    ReplyDelete
  4. भाऊराव,

    दारुड्या दारुच्या नशेत झिंगून मस्ती करत हिंडत असतो. त्याचा त्याला त्रास होत नाही, पण इतरांना होतो. जेव्हा त्याची दारुची नशा उतरते तेव्हा इतरांचा त्रास नाहीसा होतो. मात्र त्याला विरहलक्षणे (withdrawal symptoms) जाणवू लागतात. मग तो दारूसाठी सैरभैर होतो आणि त्या आवेगात इतरांना त्रास द्यायला बिनदिक्कीतपणे सज्ज होतो.

    वरील उताऱ्यात दारुड्याच्या जागी निखिल वागळे आणि दारुच्या जागी प्रसिद्धी टाका. बघा किती चपखल बसतात. वागळ्यांना पाहून एक संस्कृत श्लोक आठवला :

    घटं भिन्द्यात् पटं छिन्द्यात् ( = माठ फोडावा कपडे फाडावे )
    कुर्यात् रासभारोहणम् ( = गाढवावर बसावे )
    येन केन प्रकारेण ( = काहीतरी करून )
    प्रसिद्ध: पुरुषो भवेत् ( = माणसाने प्रसिध्द व्हावे )

    निखिल वागळ्यांना प्रसिद्धीचं व्यसन लागलं आहे. त्यातून सुटण्यासाठी त्यांना मदतीची आणि समुपदेशनाची पराकोटीची आणि तातडीची निकड आहे. ते आजूनही सुटू शकतात.

    वागळ्यांना हे सारं कळूनही वळत नसेल तर मात्र परिस्थिती खरोखरीच टोकाची गंभीर असेल.

    आपला नम्र,
    -गामा पैलवान

    ReplyDelete
  5. वागळे यांना शिवसैनिकांनी जो राडा घातला होता त्यांच्या ऑफिस मध्ये याची विस्मृती झालेली दिसते.

    ReplyDelete
  6. Bhay Saheb Apratim ....... Bharichh..

    ReplyDelete