Saturday, June 27, 2015

आणिबाणीतली ए(क) भयंकर गोष्टआणिबाणी लागली तेव्हा मी दैनिक ‘मराठा’त उपसंपादक होतो. पहिल्या दिवशी जी मार्गदर्शक संहिता जारी करण्यात आली, तिचा अर्थ लावून बातम्या वा लेख लिहायचे म्हणजे काय, त्याचाच पत्ता ज्येष्ठांनाही लागलेला नव्हता. पण दहशत इतकी स्पष्ट होती, की सरकारची नामर्जी ओढवून घेणारे काहीही असले तर थेट पेपरवर बंदी येऊ शकते. प्रत्येक वर्तमानपत्रात लगेच कोणी सेन्सॉर आणून बसवलेला नव्हता किंवा प्रत्येक बातमी तपासून बघितली जात नव्हती. पण पहिल्या दिवसापासून आपापले स्वातंत्र्य घेत त्यातही अनेकांनी आपले अविष्कार स्वातंत्र्य अनुभवण्याची संधी शोधलीच. कोणी अग्रलेखाच्या जागा मोकळ्या सोडल्या, तर कोणी मुद्दाम फ़ोटोच्या जागी काळे चौकोन छापून लोकांच्या नजरेत वैगुण्य आणून देण्याचा प्रयत्न केला. ‘ओपिनियन’ नावाचे एक साप्ताहिक एक पारशी गृहस्थ चालवायचे. त्यांच्या छपाईची गैरसोय करण्यासाठी जिथे ते छापले जाई त्यावर प्रतिबंध लावला जायचा. मग दर आठवड्यात त्यांना नवा प्रेस शोधून, तसे नवे डिक्लेरेशन करायची धावपळ व्हायची. आता सेन्सॉर म्हणजे तरी काय होते? जवळपास प्रत्येक वर्तमानपत्राने आपापल्या परीने सरकार वा तिचे एजंट दुखावले जाऊ नयेत, असे बंधन स्वत:वर घालून घेतले होते. पण लिखीत स्वरूपाच्या संहितेमध्ये सरकार विरोधातील राजकीय मोर्चा, सभा, निदर्शने वा धरपकड यांच्यासह संप आंदोलनांना बंदी असल्याने त्यांच्याही बातम्या प्रसिद्ध होता कामा नयेत. पण ‘मराठा’ हे सामान्य माणसाचे व कामगारांचे हक्काचे व्यासपिठ होते. त्या कामगारांना आणिबाणी वगैरे कळत नव्हते आणि ऑफ़िसात येऊन संप करणारे कामगार बातमी द्यायचा हट्ट करीत. त्यांना आणिबाणी समजावणे अवघड काम होते. म्हणूनच काही दिवसात मी त्यातून एक पळवाट काढली आणि अत्यंत यशस्वीरित्या संपाच्या बातम्या प्रसिद्ध करू लागलो.

चलाखी अशी होती, की संपाच्या, आंदोलनाच्या बातम्यांना प्रतिबंध होता. पण सरकारची वा मंत्र्यांची पाठ थोपटण्याला निर्बंध नव्हता. सहाजिकच कुठल्या संपात मंत्र्याने हस्तक्षेप केला वा तसे काही पाऊल उचलले तर ती बातमी सरकारच्या विरोधात ठरवली जाऊ शकत नव्हती. उलट सरकार कामगारांना न्याय देते असे भासवले जात होते. मग माझ्याकडे असे कोणी कामगार वा त्यांचे संपकरी नेते आल्यास, मी त्यांना एक अट घालायचो. जाऊन मजूरमंत्र्यांना भेटून तुमची समस्या त्याच्या कानी घाला. सरकारकडे ‘न्यायाची मागणी’ करा. अर्थात कुठलाही मंत्री न्याय देणार नाही, असे म्हणू शकत नाही. भले त्याला न्याय देणे शक्य नसले वा न्याय देणार नसला, तरी फ़ुकटचे आश्वासन तेव्हाचेही मंत्री तोंड भरून देत असत. म्हणजे कुठलीही अडचण नव्हती. असे संपकरी भेटले, मग त्यांना तसे आश्वासन मजूरमंत्री द्यायचा व बातमीचा मार्ग मोकळा व्हायचा. मग ती बातमी देताना मी चतुराई इतकीच करायचो, की अमूकतमूक कंपनी कारखान्यातील कामगारांच्या मागण्या व समस्या मंत्र्यानी समजून घेतल्या व त्यांना न्यायाची हमी दिली; अशी बातमीची सुरूवात असायची. पहिल्या परिच्छेदात इतका तपशील टाकला. मग त्या कंपनी व कामगारांची खरीखुरी संपाची बातमी तपशीलवार रंगवलेली असायची. त्यातून अर्थातच तिथे संप चालू असल्याचे लोकांपर्यंत जात असे आणि संपाच्या बातमीला असलेला निर्बंध निकालात निघत असायचा. अशा तीसहून अधिक बातम्या मी काही महिन्यात दिल्या आणि आमच्या एका ज्येष्ठाने़च घात केला. अशा बातम्या चालतात असे समजून, त्याने उत्साहात थेट शिर्षकासह संपाची बातमी दिली आणि ‘मराठा’त खराखुरा सेन्सॉर येऊन आमच्या बोडक्यावर बसला. त्याला मी छेडले. एका बातमीतल्या चुकीला इतके मनावर कसले घेता? तर तो उत्तरला, काही महिन्यात संपाच्या तीसहून अधिक बातम्या आल्यात. आम्ही मागचे अंक चाळलेत.

अर्थात मी कायम रात्रपाळी करत असल्याने अशा सेन्सॉरचा त्रास मलाच अधिक सोसावा लागयचा. कारण हा सेन्सॉर गडी संध्याकळी दाखल व्हायचा आणि संपुर्ण अंकच बारकाईने तपासून बघायचा. पण पहिल्याला हातोहात उल्लू बनवले आणि चार दिवसात त्याच्या जागी दुसरा नेमला गेला. त्याला तर दोन दिवसातच बदलायची वेळ मी आणली. कारण त्यांना शब्दातली चलाखी उमगतच नव्हती. पण त्यांनीच ओके केलेला अंक असल्याने पेपरवर कुठले बालंट येऊ शकत नव्हते. सातव्या दिवशी तिसरा सेन्सॉर अधिकारी आणला गेला आणि हा खरेच खमक्या होता. प्रत्येक शब्द व शिर्षकावर हुज्जत करायचा. तो अर्थात वयस्कर गृहस्थ मुळात निवृत्त शासकीय अधिकारी होता. अजिबात संयम न सोडता त्याने आम्हाला खुप छळले म्हणायला हरकत नाही. त्याचे संपुर्ण नाव आठवत नाही. पण आडनाव अभ्यंकर होते. खाजगीत त्याचे नाव मी ‘ए भयंकर’ असे ठेवले होते. इंदिरा गांधींची निवडणूक केस मीच लिहीत असल्याने प्रत्येक शब्द व वाक्य रचनेवरून ‘ए भयंकर’शी माझी बाचाबाची होत असे. पण त्यावरही मी उपाय काढला होता. त्यांनी अतीच आग्रह धरला, मग मी म्हणायचो मामला कोर्टाचा आहे. कंटेप्ट म्हणजे अवमान झाला तर जबाबदार कोण? म्हणून शब्द वा वाक्यरचना बदलण्याचा अट्टाहास खुप झाला, मग ‘तुम्ही बदल तुमच्या हस्ताक्षरात करा’ असा मीही हट्ट करायचो. तिथे हे गृहस्थ वचकायचे. कारण कायदेशीर भाषा व कंटेप्ट झाल्यास सरकार नव्हे त्यांनाच जबाबदार धरले जाईल, अशी खात्री त्यांनी एका वकीलाकडून करून घेतलेली होती. ते प्रांजळपणे त्यांनी मला सांगितले होते. मग त्याचा गैरफ़ायदा मी उठवला होता. जेव्हा इंदिरा खटल्याचा निकाल लागला, तेव्हा त्याचा खरा लाभ मिळाला. कारण निकालपत्रावर सेन्सॉर लागू होणार नाही असा सुप्रिम कोर्टाचाच आदेश होता ना?

त्यानुसार निकालाची लिहीलेली बातमी सेन्सॉरला दाखवायला मी बांधील नव्हतो आणि ‘भयंकर’ हट्ट धरून बसले. त्यांचीही चिंता चुकीची नव्हती, माझ्या बातमीचा रोख इंदिराजी कोर्टात हरल्या असा होता आणि शिर्षकही ‘शांतीभूषण कोर्टात जिंकले’ असे होते. अभ्यंकर त्यामुळे विचलीत होते. ते शिर्षक त्यांना सरकार विरोधी वाटत होते. पण बदल त्यांनी त्यांच्या अक्षरात करून सही करावी, असा माझाही हटट होता. तिथे त्यांनी माघार घेतली. दुसर्‍या दिवशीच्या सर्व वर्तमानपत्रात इंदिराजी निवडणूक खटला जिंकल्याचा मथळा होता. मात्र ‘मराठा’त त्या पराभूत झाल्याचा मजकूर होता. त्यातली चलाखी अशी होती, की प्रत्यक्ष निवडणूक निकालाला मी प्राधान्यच दिले नव्हते. तर त्या निमीत्ताने घटनादुरूस्तीवर आलेल्या निकालांना मी मुख्य मुद्दा बनवून बातमी रंगवली होती. इंदिराजींनी आपली कातडी बचावण्यासाठी घटनादुरूस्त्या केल्या होत्या, त्यातली महत्वाची दुरूस्ती फ़ेटाळली गेली, तिलाच मी मथळा बनवले होते. सेन्सॉरमधून सुट घटनात्मक निकालाला नव्हती, तर निवडणूक खटल्याच्या निकालाला होती. पण ‘ए भयंकर’ गोंधळून फ़सले आणि मला हवी तशी राजकीय बातमी प्रसिद्ध झाली होती. मुद्दा इतकाच, की अविष्कार स्वातंत्र्य असो किंवा इतर दुसरे कुठलेही स्वातंत्र्य असो, ते कोणी खिरापत म्हणून तुम्हाला देत नाही. तशा मिळतात, त्याला सवलती वा मुभा म्हणतात. त्याचा लाभ उठवून तुम्ही सत्ताधीशांचे डाव हाणून पाडायची संधी शोधता व साधता, त्याला स्वातंत्र्य म्हणतात. स्वातंत्र्य घ्यायचे असते, भिकेसारखे मागायचे नसते. ज्यांनी स्वातंत्र्याचे नुसते ढोल पिटले, त्यांनी कधी सामान्य जनतेला त्याचा अर्थ समजावला नाही. शिवराय तो शिकवू शकले म्हणून प्रतिकुल परिस्थितीतही स्वराज्य उभे राहिले. गांधीजींनी लोकांमध्ये स्वातंत्र्य घेण्य़ाची उर्मी जागवली. आजच्या स्वातंत्र्यवीरांना नुसते पिंजर्‍यातल्या पोपटासारखे मिरवायचे असते, ज्याला दरवाजा उघडला तरी उडून मोकळ्या आभाळात उडायचीच भिती ग्रासत असते.

3 comments:

  1. खूप छान भाऊ! आपण आणीबाणीतही लिखाण स्वातंत्र्य मिळवून दाखवले.

    ReplyDelete
  2. mast...sundar......zakaaaaaaaaas........

    ReplyDelete
  3. भाउ, तुमच्या चतुराईवरून एक प्रसंग आठवला. विनोबांना तुरुंगात आणल्यावर त्यांना नाव विचारल्यावर त्यांनी विनोबाजी भावे असे सांगितले. त्यामुळे इतरांना वामन्या वगैर म्हणत पण विनोबांना मात्र विनोबाजी म्हणले जाई.

    ReplyDelete