Saturday, June 20, 2015

अज्ञानाची ढगफ़ुटी कल्पनाविलासाची त्सुनामी



१९७३ किंवा ७४ साल असेल. तेव्हा मी दैनिक ‘मराठा’त उपसंपादक म्हणून रात्रपाळी करीत असे. त्या पावसाळी रात्री ज्येष्ठ उपसंपादक पुष्पा त्रिलोकेकर आणि माझी रात्रपाळी होती. रात्रभर धो धो पाऊस पडत होता. दिडदोनच्या सुमारास काम संपले तरी पाऊस कोसळतच होता. काम संपल्यावर तिथल्याच टेबलवर पेपरची फ़ाईल उशाला घेऊन लवंडायचे, असा परिपाठ होता. मी नेहमी उशिरा उठत असे. सहसा सकाळी आठ वाजता ‘सांज मराठा’चा उपसंपादक टेबल मोकळे व्हावे म्हणून माझी झोपमोड करायचा. माझा सूर्य उगवण्यापुर्वीच बाकी सगळे रात्रपाळीवाले घरोघरी गेलेले असायचे. पण त्या रात्रीच्या पावसाने सगळ्यांनाच वरळीच्या कार्यालयात जखडून ठेवले होते. नऊ वाजून गेल्यावर त्यांच्याच गडबडीने मला जाग आली. छापून झालेल्या ‘मराठा’च्या प्रतीही बाजारात जाऊ शकल्या नव्हत्या, इतके पाणी मुंबईभर तुंबून कारभार ठप्प झाला होता. बिचारे कंपोज खात्यासह छपाईतले सगळेच फ़सलेले होते. सकाळच्या पाळीतले कोणी आलेले नव्हते. आज जी वादग्रस्त कॅम्पाकोला सोसायटी आहे, त्याच्या दोनचार भूखंड अलिकडे ‘शिवशक्ती’ या इमारतीत ‘मराठा’चे कार्यालय होते. हमरस्त्याच्या आतल्या गल्ली रस्त्यालगत ही इमारत होती आणि तिथेही पाणी साचलेले होते. प्रयत्न करून मागे परतलेले सांगत होते, की वरळी नाक्यापासून लोटस हाजीअल्लीपर्यंत सगळीकडे नदी झालेली आहे. गुडघावभर आणि पुढे कंबरभर पाणी साचलेले आहे. तिथून लालबागला घरी चालत जायला हरकत नव्हती. पण गळ्यापर्यंत पाणी असेल त्यातून चालायचे कसे? तरी मी अकराच्या सुमारास तिथून निघालो आणि बिचारी पुष्पा सकाळपासून पीटीआयच्या येणार्‍या बातम्यांचा निकाल लावत कामाला बसली होती. वरळी ते लोअर परेल शक्य नसल्याने मी महालक्ष्मी हाजीअल्लीच्या मार्गाने कोलंबसासारखा लालबाग शोधत निघालो.

तशी हाजीअल्लीपर्यंत वाट बरी होती. गुडघाभर पाणी आणि खवळलेल्या समुद्राच्या अंगावर येणार्‍या लाटांचा मारा झेलत चालण्यात धोका नव्हता. हाजीअल्लीच्या नाक्यावर महालक्ष्मी स्थानकापासून रेसकोर्सच्या रस्त्यावरून येणारा पाण्याचा लोंढा पार करताना खुप तारांबळ उडाली. मग ताडदेव तुळशीवाडीच्या मार्गाने पुढे सरकलो आणि ग्रॅन्टरोडचा पुल पार करून भडकमकर मार्गावर आलो. उत्तरेकडे वळून सात रस्त्याच्या दिशेने चालत राहिलो. किमान गुडघाभर पाणी होतेच. जागोजागी रस्त्यातच बंद पडलेल्या गाड्या बेस्ट बसेस यातून मार्ग काढण्यासाठी धडपडणारे डझनावारी मुंबईकर होतेच सोबतीला. पाऊस थांबलेला नव्हता आणि कमीअधिक पडतच होता. खुप मोठी सर आली तर आडोशाला उभे रहायचे आणि पुन्हा वाटचाल, असा प्रवास चालू होता. मराठा मंदिर सातरस्त्यापर्यंत गुडघाभर आणि काही जागी तर गळ्यापर्यंत येणारे पाणी घाबरवून सोडत होते. शिवाय मध्ये कुठे गटार उघडलेले असेल तर जलसमाधी मिळण्याची भिती उरात होतीच. तीन तासांनी सात रस्ता दृष्टीपथात आला. शिरीन टॉकीजच्या बाजूने रेसकोर्सकडे जाणारा पुलाचा रस्ता चढून बघितला. महालक्ष्मी स्थानकाचे फ़लाटही पाण्याखाली गेलेले होते आणि पुर्वेकडून येणारा पाण्याचा लोंढा रेल्वे ओलांडून रेसकोर्स हाजीअल्लीच्या दिशेने दौडताना दिसत होता. तिथून माघारी सातरस्त्याकडे आलो तर मोठी सर आली आणि इराण्याच्या हॉटेलापाशी थांबावे लागले. मस्त पानिकम चहा हाणला आणि सिगरेट फ़ुंकत पाऊस आळसावण्याची प्रतिक्षा करत बाहेर उभा होतो. बाजूलाच त्या फ़ुटपाथवर इतक्या घनघोर पावसात दोन दारूडे अस्ताव्यस्त पडलेले होते. काही वेळाने लक्षात आले, त्यांची कुठली हालचाल नव्हती. हॉटेलवाल्याला विचारले तर तो मख्खपणे म्हणाला कही घंटेसे मरे पडे है. एक आणखी समोरच्या तांबड्या अम्बॅसेडरमध्ये मेलाय.

सगळा चहा व सिगरेटचा नशा क्षणात संपून गेला. समोर तीन मुडदे पडले होते आणि सगळा कारभार नित्यासारखा तिथे चालू होता. प्रत्येकाला आपापल्या सुखरूपतेची फ़िकीर होती. अंगातले त्राण गळाले. म्हणून सुटका नव्हती. सातरस्त्याचे जेकब सर्कल बारापंधरा फ़ूट पाण्यात होते. त्यापेक्षा सुरक्षित मार्ग म्हणून धोबीघाटाच्या बगलेत शिरलो आणि आतल्या मार्गाने सानेगुरूजी मार्गावर आलो. आर्थररोड तुरूंगाच्या आसपास पाणी कमी होते. तसाच पुढे सरकत बकरी अड्डा व चिंचपोकळी स्थानकाच्या पुलावर आलो. साडेचार तासांनी वरळी नाका ते लालबाग काळाचौकी हा पल्ला पार केला होता. घरी मस्त अंघोळ केली. गरमागरम जेवण केले आणि तासाभराची विश्रांती घेऊन पुन्हा बाहेर पडलो. काळाचौकी ते भायखळा पाणी तुंबण्याचा सखल भाग असला तरी लालबाग ते परेल तसा उंचवटा. म्हणून उथळ पाणी साचलेले. त्यातून वाट काढणे अवघड नव्हते. पण परेल नाका, गौरीशंकर छित्तरमल इथे पाणी असणार याची खात्री होतीच. पण संभाळून वाट काढली तर रेल्वेपार जाणे अशक्य नव्हते. एल्फ़िस्टन स्थानकही पाण्यात होते. पण इथे निदान फ़लाट बुडालेले नव्हते आणि लोकांना स्टॉलार चहा फ़राळ मिळायची सोय होती. तसाच पुढे सरकलो आणि सयानी रोड प्रभादेवी करत रविंद्र नाट्यमंदिर गाठले. किमान गुडघाभर पाणी सगळीकडेच होते. मग सेंच्युरी बाजार ग्लॅक्सो पोद्दार हॉस्पीटल करत पुन्हा वरळी नाका गाठला. घर सोडून साडेतीन तासांनी पुन्हा ‘मराठा’च्या कार्यालयात दाखल झालो. बिचारी पुष्पा एकटी किल्ला लढवत होती आणि नाही म्हणायला परेलहून प्रभाकर नेवगी तिच्या मदतीला पोहोचला होता. आज जिथे दै. ‘सकाळ’चे मुंबई कार्यालय आहे तिथे तेव्हा नेवगी वास्तव्य करीत होता. त्या दिवशी पावसातही ऑफ़िसला येणारा तोच एक मर्द ‘मराठा’ होता. मी गाव भटकून माघारी फ़िरलेला.

तेव्हा मुंबईत तुंबणार्‍या पाण्याची चर्चा होत नसे आणि नाले-गटार सफ़ाई अभावी मुंबई बुडते अशा अगाध शोध लागलेला नव्हता. म्हणून पावसाने मुंबई ठप्प केल्यावर नालेसफ़ाईवर गहन चर्चा होत नसत. तेव्हाचा हा असा पाऊस आणि तेव्हा बातमीदारी केल्याचा हा अनुभव. आजची बातमीदारी, पत्रकारिता वा पावसाच्या निमीत्ताने मुंबईवर आलेल्या संकटाविषयीच्या ‘अभ्यासपुर्ण’ चर्चा व बातमीदारी बघितली आणि लक्षात आले, की आम्ही तात्कालीन पत्रकार कमालीचे बेअक्कल होतो. आम्हाला नागरी समस्या, भ्रष्टाचार, अनागोंदी, पाऊस वा नागरी दुविधांविषयी कवडीचेही ज्ञान नव्हते. सखल भागात पाणी साचते आणि भरतीच्या वेळी अतिवृष्टी झाली, मग अनेक भागात बुडतीचा प्रसंग येतो, असे आमचे अज्ञान सांगून आम्ही वाचकांची चक्क दिशाभूल करत होतो. अवकाळी पाऊस, अतिवृष्टी वा दुष्काळ अशा गोष्टी नैसर्गिक आपत्ती वाटायच्या. किंबहूना तात्कलीन अज्ञानी संपादकही तशाच स्वरूपाचे लेख वगैरे लिहून आपल्या मागास अंधश्रद्धा जनमानसात रुजवत होते. मानवनिर्मित असो किंवा निसर्गनिर्मित असो, कुठल्याही समस्येला सरकार, सत्ताधारी पक्ष किंवा राजकीय भ्रष्टाचारच कारणीभूत असतो, असा साक्षात्कार तात्कालीन संपादक विचारवंतांना झालेला नव्हता. थोडक्यात एकुणच पत्रकारिता, बुद्धीजिवीवर्ग, समाजातील जाणते अभ्यासक कमालीचे अज्ञानी अडाणी होते. म्हणून समस्या व लोकांच्या हालअपेष्टांची बातमीदारी व्हायची. कोणाला दोषी ठरवण्याचा विचार आमच्या मनाला कधी शिवला नाही. जगातल्या प्रत्येक गोष्टीवर, निसर्गावर किंवा आकस्मिक घटनेवरही नियंत्रण ठेवण्याचा अधिकार राज्यघटनेने भारतीय सत्ताधार्‍यांना दिला असल्याचा शोध तेव्हा लागलेला नव्हता. म्हणून निसर्गापत्ती व मानवी चुकांमध्ये पक्षपात करण्याचा भेदभावी रोग बुद्धीला जडलेला होता. मागल्या दोन दिवसात मुंबईत पाणी तुंबल्यावर जी ज्ञानाची त्सुनामी वाहिन्यांवरून घरोघरी येऊन घुसली त्यामुळे हे अनुभव कथन करण्याची दुर्बुद्धी झाली.

3 comments:

  1. भाऊ ! एक नंबर! आपले हे अनुभव कथन आजच्या पत्रकारांनी वाचायला पाहिजे. त्यांना स्वत:चीच लाज वाटल्याशिवाय राहणार नाही याची खात्री आहे. धन्यवाद भाऊ!

    ReplyDelete
  2. बरोबर लिहिलंय भाऊ... मी आजकाल बातम्या पाहणे सोडून दिलय.. हिंदी बातम्या पहायचे सोडून ३-४ वर्ष झाली...मराठी बातम्या सुद्धा सोडायचा विचार आहे ...

    ReplyDelete
  3. खूप छान लेख भाऊ

    ReplyDelete