Thursday, June 4, 2015

वटवट सावित्रीचे पुरोगामी व्रतवैकल्य



मागले दोनतीन दिवस वटसावित्री या सणाच्या निमीत्ताने सोशल मीडियावर बरीच उलटसुलट मते व्यक्त झाली. अर्थात ज्यांना पुरोगामी वा पुढारलेले म्हणून मिरवायचे असते, त्यांना इतकी उत्तम संधी अन्य कुठली मिळणार? म्हणूनच अशी हिंदू सणाची टिंगल उडवण्यात तत्सम लोकांचा पुढाकार होता. काळाबरोबर जग बदलत असते आणि जुन्याच्या जागी नवी पाखंडे व थोतांडे उदयास येत असतात. मग नव्या पाखंडांना आपले बस्तान बसवण्यासाठी जुन्यांची पाळेमुळे खणून काढावीच लागतात. त्याचा अर्थ नव्या समजूती वा चालीरिती मोठ्या उपयुक्त असतात असे अजिबात नाही. उलट तेही जुन्याच निरूपयोगी निरर्थक व्रतवैकल्याचे आधुनिक स्वरूप असते. अगदी सतीसावित्री म्हणावी, इतक्या निष्ठेने त्याचे पालन करणार्‍या पुरोगामी पतिव्रताही आपल्यात उजळमाथ्याने वावरत असतात. आपल्याला डोळसपणे त्यांच्याकडे बघता यायला हवे. वटसावित्रीचे व्रत म्हणजे तरी काय असते? तर सावित्रीने आपल्या पतीला यमराजाच्या तावडीतून सहीसलामत बाहेर काढल्याची कथा. मग तिच्यासारखेच आपणही पतिशी एकनिष्ठ असल्याची जगाची व स्वत:ची समजूत घालण्यासाठी केलेले औपचारिक कृत्य म्हणजे वटसावित्रीचे व्रत. त्यात मग वडाच्या झाडाला पुजणे, त्याला प्रदक्षिणा घालून आणखी काही उद्योग करणे. यातून सात जन्म तोच पती मिळण्याची अपेक्षा बाळगणे. पुढल्या जन्मात काय होणार किंवा पुढला जन्म आहे किंवा नाही, याची कोण हमी देऊ शकतो? विज्ञानाने ते सिद्ध होत नाही. मग त्याची टवाळी होणारच. आणि टवाळी केल्याने आपण पुढारलेले वा विज्ञानवादी असल्याचे सिद्ध होते. मग मनात कितीही शंका असोत किंवा श्रद्धा असोत. सगळेच मोठ्या तावातावाने असे वागत व दाखवत असतात. विज्ञानाने सर्वच गोष्टी कुठे सिद्ध होत असतात? कित्येक पुरोगामी श्रद्धा व समजूती वटसावित्री इतक्याच भ्रामक असतात ना?

वटसावित्रीचे व्रत करणारे मुर्ख कशामुळे असतात? तर मागला जन्म वा पुढला जन्म असतो, असे अजून तरी विज्ञानाने सिद्ध केलेले नाही. सिद्ध होणे म्हणजे तरी काय असते? ज्या काही कल्पना असतात वा आग्रहाने मांडल्या जात असतात, त्या प्रयोगाने व अनुभवाने दाखवून देता येतात. ज्याचे परिणाम वास्तवात दाखवून देता येतात, तेव्हा ती गोष्ट सिद्ध झाली असे मानले जाते. म्हणूनच त्याला विज्ञान मानले जाते. पण अशा अनेक गोष्टी आहेत, ज्यांचा आधुनिक म्हणून आग्रह धरला जातो, पण त्या कधीच सिद्ध होऊ शकलेल्या नाहीत. जगातल्या कामगारांना एकत्र करण्याच्या घोषणा व प्रयोगाला शंभरापेक्षा अधिक वर्षे उलटून गेली. कामगारांचे राज्य अशी कल्पनाही राबवून अपेशी ठरल्याचे आपण बघितले आहे. मग सात जन्म तोच पति मागणारी कल्पना जिकती भाकड, तितकीच समाजवाद वा कामगारांचे राज्य ही कल्पना भाकड नाही काय? आपण सांगतो तेच सत्य असल्याचा जनमानसावर प्रभाव पाडणार्‍या गोष्टी सत्य म्हणून स्विकारल्या जातात आणि त्यांचा प्रभाव फ़िका पडू लागला, मग त्या भाकड होतात. वटसावित्रीचे व्रतवैकल्य आणि समाजवादी व्रतस्थ लोकांचे वागणे, यात मग कितीसा फ़रक शिल्लक उरतो? पण वटसावित्रीचे व्रत जितक्या आग्रहाने व निष्ठेने आजही अनेक महिला पाळतात किंवा त्यांचे समर्थन जितके लोक करतात, तितकेच फ़सलेल्या समाजवादी विचारांचे समर्थन पदोपदी आपल्या अनुभवास येत नाही काय? मग दोन गोष्टीमध्ये कशाला आधुनिक व पुढारलेले म्हणायचे आणि कशाला कालबाह्य ठरवायचे? मागल्या दोनतीन दशकाचा अनुभव काय सांगतो? फ़ुले अंबेडकरांचा महाराष्ट्र असे सतत कानीकपाळी ओरडले जात असते आणि त्याच राज्यात आजही जातीपातीच्या नावाने अन्याय अत्याचार चालू असतात. त्याच्याशी लागेबांधे असणारेच व्रतस्थ पुन्हा तीच फ़ुले आंबेडकरांची जपमाळ ओढत नसतात काय?

मग वडाच्या झाडाला ठरल्या दिवशी प्रदक्षिणा घालणार्‍या महिला आणि ठरल्या दिवशी फ़ुले आंबेडकरांच्या स्मारकाला भेटी देऊन श्रद्धांजली अर्पण करणार्‍यांमध्ये कितीसा फ़रक असतो? ज्यांचे सगेसोयरे वा निकटवर्तिय असे दलित पीडितांवर अन्याय अत्याचार करतात, त्यांच्याच तोंडी फ़ुले आंबेडकरांचा नामजप चालू असतो, त्याला काय म्हणायचे? गेल्या दोनचार वर्षात महाराष्ट्रामध्ये जितके दलित अत्याचार घडले, तो अनुभव काय सांगतो? ज्याप्रकारे जातीअंताची लढाई चालू होती, ती काय साध्य करू शकली? संघर्षाचे प्रकार व पद्धतीत निदान बदल करायची भूमिका तरी पुढे येऊ शकली आहे काय? अशा घटना घडतात, तेव्हा शरमेने मान खाली गेली असे सांगितले जाते आणि पुढे काहीच होत नाही. मग अशा पिडीतांना घरी जाऊन भेटणे, न्यायाची आश्वासने देणे, खपवून घेतले जाणार नाही अशा वल्गना करणे, हा एक व्रतस्थ उपचार झालेला नाही काय? याच जन्मात न्याय देण्याच्या वल्गना खोट्या ठरतात आणि आणखी अन्याय अत्याचार होत रहातात, तेव्हा संघर्षाचा मार्ग व उपाय कुठेतरी फ़सलेले असतात. त्याचा फ़ेरविचार करायची इच्छा होत नाही आणि त्याच फ़सव्या भ्रामक गोष्टींचा नामजप चालू रहातो, तेव्हा विकृत मानसिकताच दिसून येते. वडाला प्रदक्षिणा निरर्थक असेल, तर विविध स्वरूपाची कालबाह्य आंदोलने व संघर्ष कशाचे लक्षण आहेत? दहाबारा वर्षे गुजरातच्या दंगलीचे निमीत्त करून जो अतिरेक झाला, त्याचे विपरीत परिणाम मतदानातून पुरोगामी राजकारणाला भोगावे लागले आहेत. पण म्हणून त्यातली निरर्थकता शोधण्याचा तरी प्रयास झाला आहे काय? तितक्याचा आस्थेने व निष्ठेने पुरोगामी आपल्या व्रताचे पालन करताना दिसत आहेत. कित्येक वर्षाच्या वटसावित्री व्रताने कुठल्या पतिव्रतेला आपल्या कॅन्सरग्रस्त वा असाध्य आजारी पतीला जीवदान देणे शक्य झालेले नाही. त्यापेक्षा पुरोगामी मुर्खपणा भिन्न आहे काय?

शेकडो उदाहरणे देता येतील. जिथे महिलांना वडाचे झाड पूजायला जवळ मिळत नाही, तिथे विकतची वडाची फ़ांदी आणून व्रताची सांगता केली जात असते. वास्तविक ते झाड इतकेच पवित्र दैवत असेल, तर त्याची तोड होता कामा नये. पण व्रतस्थांच्या श्रद्धा जेव्हा अतिरेकाच्या आहारी जातात, तेव्हा दैवताचीही खैर नसते. जितके हे श्रद्धाळूंच्या बाबतीतले सत्य आहे, तितकेच ते पुरोगामी असण्यातले सत्य आहे. तिथे पुजाअर्चा औपचारिकरित्या पार पाडली जाते आणि इथेही तितकीच औपचारिकता दिसून येईल. आपण पुरोगामी आहोत म्हणजे जे काही हिंदू असेल त्याच्या विरोधात उभे राहिले मग फ़ेअर एन्ड लव्हलीच्या गोरेपणा इतके झटपट पुरोगामीत्व मिळत असते. म्हणून मग वटसावित्री वा तत्सम कशाची तरी टवाळी हा सोपा मार्ग झाला आहे. पण जितके हास्यास्पद असा व्रतांना मानले व ठरवले जाते, तितक्यच निष्ठेने आपापली पुरोगामी व्रते संभाळली जात असतात. ‘आम्ही सारे दाभोळकर’ वा ‘आम्ही सारे पानसरे’ अशा घोषणा देणारे तारखा व तिथी पाळतात आणि एक उपचार पुर्ण करतात. पुढे काय होते? खरेच हे सगळे दाभोळकर असते, तर पानसरेंची हत्या होऊच शकली नसती. म्हणजेच दाभोळकरांच्या हत्येनंतर उपचार म्हणून संघर्ष झाला आणि पानसरेंचा बळी जाऊ शकला. एका हत्येपासून धडा घेऊन काहीही उपाय शोधले गेले नाहीत, तर पानसरे मारले जाणारच. कारण त्यांना न्याय देणे वा त्यांच्या मारेकर्‍यांना शोधण्याची इच्छाच कुणाला नव्हती. त्या निमीत्ताने करायचे औपचारिक राजकारण मात्र साजरे झाले, जशा वडाला प्रदक्षिणा घालून सण साजरा व्हावा. त्यातून काही निष्पन्न होणार नाही, याची खात्री असते. पण देखावा करावा लागतो. जुनी व्रतवैकल्ये आणि नवी व्रतवैकल्ये यातला फ़ोलपणा व त्यातली अंधश्रद्धा जशीच्या तशी एकजिनसी व समामधर्मीच आहे. वटसावित्री करणार्‍या निमूट असतात आणि पुरोगामी व्रतस्थ बोलघेवड्या वटवटसावित्री असतात.

1 comment:

  1. भाऊराव,

    तुम्ही म्हणालात की :

    >> ... पुढला जन्म आहे किंवा नाही, याची कोण हमी देऊ शकतो? विज्ञानाने ते सिद्ध होत नाही.

    अहो, पुनर्जन्म असतो हे विज्ञानाने सिद्ध झालंय. डॉक्टर इयन स्टेव्हनसन यांनी पुनर्जन्माची सुमारे पन्नासेक प्रकरणे आपल्या पुस्तकात चर्चिली आहेत. बहुतांश भारतातली आहेत. काही प्रकरणांत तर पुनर्जात बालकाच्या आठवणींवरून पूर्वजन्मातली निवासस्थाने आणि नातेवाईकही शोधले आहेत. त्यांनीही आदल्या जन्मास दुजोरे दिले आहेत. इतक्या परिपूर्ण नोंदी उपलब्ध असतांना एखादा पढतमूर्खच पुनर्जन्म नाकारेल. डॉक्टरसाहेबांच्या अमेझनवरील पुस्तकांची यादी इथे आहे : http://www.amazon.co.uk/Ian-Stevenson/e/B001IXRWB8

    आता थोडं विज्ञानाकडे वळूया. वटसावित्रीच्या व्रताची टिंगल करणाऱ्या टवाळखोरांना एक गोष्ट मुद्दामून विचारावी. आधुनिक विज्ञानमहर्षी आयझॅक न्यूटन यांची बायबलवर प्रगाढ श्रद्धा होती. तो देवाचा शब्द आहे अशी त्यांची धारणा होती. मग हे टवाळखोर लोकं न्यूटनची थट्टा करणार का? की हिंदू बायका मृदूलक्ष्य (= सॉफ्ट टार्गेट) आहेत म्हणून फक्त त्यांच्यावरच शौर्य गाजवणार?

    आज ज्याला हिंदू संस्कृती म्हणतात ती हिंदू स्त्रियांनी व्रतं आणि वैकल्यं करून टिकवली आहे. हेही नमूद करावंसं वाटतं.

    आपला नम्र,
    -गामा पैलवान

    ReplyDelete