Thursday, June 11, 2015

समझनेवालोंको इशारा काफ़ी है



मंगळवारी म्यानमारमध्ये जी जबरदस्त कारवाई भारतीय सेना व तिच्या कमांडोंनी करून दाखवली, त्याचे सध्या सगळीकडे कौतुक चालू आहे. चार वर्षापुर्वी अशाच स्वरूपाची कारवाई अमेरिकन कमांडोंनी पाकिस्तानात अबोटाबाद येथे करून सुरक्षित बिळात दडी मारून बसलेल्या ओसामा बिन लादेन याचा खात्मा केला होता. मग ती कारवाई संपली आणि पाकिस्तानची जगभर छीथू झालेली होती. कारण परक्या सेनेच्या मूठभर सैनिकांनी पाक प्रदेशात घुसून पाकसेनेच्या तळानजीक असलेल्या एका सुरक्षित बंगल्यात लपलेल्या ओसामाला संपवला होता. त्याच्या जिवंत पत्नीसह ओसामाचा मृतदेहही पळवून नेलेला होता. पाक सेनेला जाग येईपर्यंत अमेरिकन कमांडो सीमापार निघून गेलेले होते. त्यांचे जगभर कौतुक झाले. सहाजिकच सतत काश्मिरची सीमा ओलांडून भारतात घातपात करणार्‍या जिहादी पाक हस्तकांचा बंदोबस्त आपले सरकार कशाला करू शकत नाही, असा सवाल विचारला जाऊ लागला. भारताच्या सीमेपलिकडे पाक प्रदेशात सोकावलेल्या जिहादी अतिरेकी, त्यांचे तळ आणि म्होरके यांना धडा शिकवायला भारतीय जवानांनी सीमापार मुसंडी मारावी, अशी कुठल्याही देशप्रेमीची अपेक्षा असली तर तिला गैर मानता येणार नाही. पण अशाप्रकारे कारवाई करण्यासाठी भक्कम सरकार व आत्मविश्वासाने भारलेले सैनिक आवश्यक असतात. त्याचा इथे संपुर्ण अभाव होता. प्रत्यक्ष कारवाई सोडाच, तसे नुसते बोलणे सुद्धा कोणाला जमत नव्हते. बहुतेक सत्ताधारी शेळपटासारखे शांततेच्या व सौहार्दाच्या गप्पा ठोकण्यात धन्यता मानत होते. पण मोदी सरकार सत्तेत आल्यावर त्यात फ़रक दिसू लागला आणि त्यांनी संरक्षण मंत्रालय मनोहर पर्रीकर यांच्याकडे सोपवल्यावर, जणू भारतीय सुरक्षा दलांना नवी उभारीच येऊ लागली. त्यातच गुप्तचारांचे जादूगार मानले जाणारे अजित डोबाल मोक्याच्या जागी बसल्यावर चमत्कार व्हायला पर्यायच नव्हता.

गोव्याचे मुख्यमंत्रीपद सोडून मनोहर पर्रीकर हे केंद्रात संरक्षणमंत्री म्हणून दाखल झाल्यावर त्यांनी अनेक गंभीर विधाने केलेली आहेत. प्रत्येकवेळी त्यांच्या विधानावर आपल्याकडल्या अर्धवट विद्वानांनी झोड उठवली होती. पण इथे या सदरात आम्ही सतत पर्रीकरांची पाठराखण केली होती. अर्थात ते पर्रीकर या व्यक्तीचे समर्थन अजिबात नव्हते. वेळोवेळी त्यांच्या विधानातील गर्भितार्थ आम्ही स्पष्ट करून व उलगडून सांगण्याचा प्रयत्न केला होता. त्यातले गांभिर्य उलगडून मांडलेले होते. माजी पंतप्रधानांनी भारताच्या ‘डीप असेट’शी केलेली तडजोड असो, किंवा अतिरेक्यांच्यात फ़ुट पाडून त्यांच्यातच झुंज लावणे वा दहशतवादाच्या विरोधात नाराज दहशतवादी वापरणे, अशी अनेक विधाने वादग्रस्त ठरवण्यात आली. त्याचा अर्थ किती समजून घेतला गेला? अलिकडेच पर्रीकर यांनी असेच एक सूचक विधान केलेले होते. भारताचे १३ लाख सैनिक भजनपूजन करायला खडे नाहीत. शत्रूला पाणी पाजणे व कोणत्याही थराला जाऊन भारतीय सीमा व हितसंबंधाचे संरक्षण करणेही आपल्यासाठी प्राधान्याचा विषय आहे, असे पर्रीकर म्हणाले होते. त्याचा अर्थ काय होता? मंगळवारी म्यानमारच्या सीमेत जाऊन शंभराहून अधिक अतिरेक्याचा खुर्दा पाडला गेला, तोच पर्रीकरांचा इशारा होता. तो इथल्या दिवट्या विद्वानांना उमगला नाही, की देशाच्या शत्रूंना समजला नाही. अर्थात मुर्खांना समजण्याची गरज नव्हती. पण ज्यांना त्याची किंमत मोजावी लागणार होती, त्यांना तरी पर्रीकर काय सांगत आहेत, ते समजायला हवे होते. ते कळले असते तर मणिपुरमध्ये १८ जवानांना कंठस्नान घालण्याचा आगावूपणा झाला नसता आणि त्याची इतकी मोठी किंमत अतिरेक्यांना मोजावी लागली नसती. आता तरी अनेकांच्या डोक्यात प्रकाश पडायला हरकत नसावी, की पर्रीकर आणि अन्थोनी-चिदंबरम यांच्यात जमिन अस्मानाचा फ़रक आहे.

पर्रीकर यांनी आपण काय करू, हे सुचित केले होते. त्यांच्या विधानाने म्हणूनच पाकिस्तानी सेनादलाच्या अधिकार्‍यांच्या काळजात धडकी भरली होती. इथे मायदेशात ज्या विधानांची टवाळी झाली, त्याचा धसका पाक सेनाधिकार्‍यांनी घेतला होता. पण पाकप्रेमी इथल्या काही पत्रकारांना त्याचा अर्थ उमगला नाही. नुसता बचाव नव्हेतर प्रसंगी गरजेनुसार प्रतिहल्ला व पाठलागही आपण करू; असा तो गर्भित इशारा होता. म्यानमारमध्ये त्याचा साक्षात प्रयोग करून दाखवला गेला आहे. अर्थात त्यासाठी म्यानमार सरकारचे सहकार्य भारताला मिळालेले आहे. कालपरवा बंगला देशाशी भारताने अनेक मैत्री करार व समझोते केलेले आहेत. त्यासमोर तिथला पक्का भारतविरोधी पक्ष जमाते इस्लामीही शरणागत झाला आहे. त्याचा अर्थही समजून घेण्याची गरज आहे. जमाते इस्लामी हा पाकिस्तानवादी पक्ष असून कट्टर इस्लामी धर्मांध संघटना आहे. बांगला मुक्ती लढ्यात याच लोकांनी पाक सेनेला बांगला नागरिकांवर अत्याचार करण्यास मदत केलेली होती. त्यांनाही आता भारताशी मैत्री हवी आहे. याचा अर्थ बांगला देश सरकारने भारताशी सहकार्य केल्यास तिथल्या पाकप्रणित हस्तकांचा खात्मा करण्याच्या कारवाया सुरू होणार. म्हणजेच म्यामनार, बांगला देश व नेपाळमधून पाक हेरखात्याचे हस्तक टिपून संपवले जाणार, असा त्याचा अर्थ आहे. जर म्यानमारमध्ये अशी कारवाई होऊ शकली, तर बांगला देशातही होऊ शकते आणि त्याचीच पुनरावृत्ती मध्यवर्ति भारतामध्ये नक्षलवादाचाही तसाच बंदोबस्त करण्यात होऊ शकते. त्यातले अडथळे परदेशी मदत व निधीवर पोसलेल्यांनी उभे केलेत, त्यांची नाकेबंदी आधीच सुरू झालेली आहे. थोडक्यात मागल्या सहा महिन्यात पर्रीकर जे इशारे देत होते, त्याची कृती आता आकार घेऊ लागली आहे. त्यामध्ये आता प्रत्यक्ष घातपाती व अतिरेक्यांचा बंदोबस्त होईल आणि मग त्यांच्या छुप्या साथीदारांकडे मोर्चा वळेल.

म्यानमारमध्ये जी धडाकेबाज कारवाई झाली, त्याचे अनेक अर्थ आहेत. एकाचवेळी म्यामनारचे थेट लष्करी सहकार्य आणि दुसरीकडे बांगला देशचा मोदी दौरा, यातून चीनला इशारा देण्यात आला आहे. श्रीलंकेत आधीच अपरोक्ष हस्तक्षेप भारताने निवडणूक काळात केलेला आहे. पलिकडे व्हिएतनाम, कोरिया व जपान यांच्याशी दोस्ती घट्ट करून मोदी सरकारने चीनला दक्षिण आशियात शह देण्याची तयारी चालविली होती. त्यातील पहिली खेळी म्यानमारची थेट कारवाईची आहे, पाकिस्तानला सतत पाठीशी घालणे व चिथावण्या देऊन भारताची कोंडी करणे, असले उद्योग चीनने थांबवावेत म्हणून केलेली ही व्युहरचना आहे. त्यात म्यानमारची कारवाई यासाठी महत्वाची आहे, की तशीच ठोस कारवाई पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी बलुचिस्तान वजिरीस्तान भागात भारत करू शकतो. तिथे पाक सेनेला टोळीवाल्यांनी हैराण करून सोडलेले आहे. त्यांना हस्तेपरहस्ते मदत देऊन भारत पाकिस्तानातही ‘ठोस’ कृती करू शकेल, असा ताज्या कारवाईत लपलेला इशारा आहे. अर्थात तो समजणार्‍या लोकांसाठी आहे. पाकप्रेमी व अतिशहाण्यांना उमजणारा नाही. पर्रीकर काय बोलतात, मोदी कोणत्या परकीय नेत्यांशी संवाद साधतात आणि सुरक्षा सल्लागार अजित डोबाल कोणत्या व्युहरचना करतात, यांची एकत्रित सांगड घातली; तरच अशी कोडी उलगडू शकतात. त्यातले शब्द व विधाने यातच अडकून पडले, तर रहस्य तयार होते. आणि त्यांची सुसुत्र मांडणी केली तर इशारा व दिशा स्पष्ट होऊन जाते. पाकमध्ये सोकावलेली भाषा बोलणार्‍या सईद हाफ़ीज व उचापती करीत बसलेल्या दाऊदसाठी म्यानमारची मुसंडी हा इशारा आहे. समझनेवालोंको उतनाही काफ़ी है. नासमझ लोकांना इशारा काय कामाचा? म्हणूनच पर्रीकर काय बोलतात, त्याच्या ब्रेकिंग न्युज करण्यापेक्षा त्याचे गांभिर्य समजून घेणे अगत्याचे आहे.

2 comments: