Monday, June 22, 2015

अमेरिकेतली मुंबई, मुंबईतली अमेरिका


\

प्रियदर्शन या दिग्दर्शकाचा ‘हेराफ़ेरी’ म्हणून खुप गाजलेला चित्रपट आहे. त्यात सुनील शेट्टीच्या शोधार्थ आलेला सरदार ओम पुरीने छान रंगवलाय. उसने पैसे बुडवले म्हणून तो सरदारांची पुर्ण फ़ौज घेऊन आलेला असतो आणि मग ते सगळे सरदार त्या अंबॅसेडर गाडीत मावत नाहीत, असा एक मजेशीर प्रसंग त्यात रंगवला आहे. दोन्ही दरवाजांनी आत घुसणार्‍या त्या सरदारांपैकी इकडला आत घुसला की तिकडला दरवाजा उघडून बाहेर फ़ेकला जात असतो. तो आत घुसला, मग इथला बाहेर फ़ेकला जात असतो. कारण जितक्या प्रवाश्यांसाठी आसन व्यवस्था आहे त्यापेक्षा अधिक लोक घुसायचा प्रयास करीत असतात. मुंबईची अवस्था नेमकी तशीच झाली आहे. एका समस्येवर उपाय केला, मग दुसरी समस्या दत्त म्हणून समोर येऊन उभी रहाते. तोल जितका सावरायला जाल, तितका तोल ढळतच रहातो. आणि त्यावर योग्य कठोर उपाययोजना करण्यातही राजकीय डावपेच चालूच असतात. समस्या वाढतील कशा आणि आपले राजकीय महत्व वाढेल कसे, यावरच सर्व राजकारण्यांचा कटाक्ष असतो. त्यातच मुंबई घुसमटली आहे. त्यातून मग मुंबईकराला मुक्ती कशी मिळणार? पण ज्यांना समस्येवर उपाय शोधण्यापेक्षा बातम्या व चर्चेचेही राजकारणच करायचे असते, त्यांना मग तंत्रज्ञान ही जादूची कांडी वाटत असते. त्या चित्रपटात अखेर अंग चोरून ते चार सरदारजी घुसतात, त्यालाच मग असले अर्धवट विद्वान उपाय समजतात. पण तो उपाय नसतो तर अधिक मोठ्या संकटाला ते आमंत्रण असते. २००५ मध्ये मुंबई यापेक्षा मोठ्या मुसळधार पावसाने बुडाली होती. त्यानंतर काही दिवसातच अमेरिकेच्या लुझियाना राज्यातील महानगर असलेल्या न्यु ओर्लिन्सला असाच चक्रीवादळाचा तडाखा बसलेला होता. तिथे मुंबईसारखा अनागोंदी कारभार नव्हता. मग तिथे झालेल्या विस्कळीत नागरी जीवनासाठी कोणाला जबाबदार धरायचे?

इथे नाले गटारे सफ़ाईच्या गोष्टी रंगवून सांगितल्या जात आहेत. जणू त्यात सफ़ाई योग्य झाली असती, तर निमूटपणे अतिवृष्टीचे पाणी समुद्रात गेले असते आणि बाकीचे नागरी जीवन सुरळीत चालू राहिले असते, अशाच थाटात बातम्या दिल्या जात आहेत व चर्चा रंगवल्या जात आहेत. त्यात किंचित तथ्य असते तर कटरिना वादळाने न्यु ओर्लिन्सलाही फ़टका बसण्याचे कारण नव्हते. कारण तिथे नुसती गटारे-नाले सफ़ाई वेळच्या वेळी होत नाही. शहरातले घाण पाणी कचरा यांचा योग्य निचरा होत असतो. त्यासाठी प्रचंड यंत्रणा उभ्या आहेत. नुसता निचराही होत नाही. सांडपाणी समुद्रात सोडतानाही त्यावर शुद्धीकरणाची प्रक्रिया होत असते. नंतरच ते समुद्रात सोडले जाते. पण त्यानेही त्या शहराला पाणी तुंबण्याचा व बुडण्याचा धोका कायम रहातो. ज्या मार्गाने समुद्रात सांडपाणी सोडले जाते, त्यातूनच समुद्राचे पाणी थेट वस्तीत व घरात येऊन थडकण्याचा धोका असतो. या शहरात दोनतीन इंचापेक्षा अधिक पाऊस सलग पडला, तर पाण्याचा निचरा होणे सोडा, उलटे गटारातले घाण पाणी थेट पहिल्या मजल्यावरच्या घरात संडासातून येऊ लागते. त्याचे कारण काय? तेच कारण मुंबईला अतिवृष्टीमध्ये भेडसावत असते आणि कटरिना वादळात त्याच समस्येने न्यु ओर्लिन्सला बुडवले होते. तो निसर्ग कोप असला तरी शहर उभारणीतले दोष त्याला खरे कारणीभूत होते. हे शहर समुद्राच्या पाणीपातळीपेक्षा खाली आहे. म्हणजे लगतच्या समुद्राच्या पाण्याची पातळी न्यु ओर्लिन्सच्या भूमीपेक्षा उंचावर आहे. म्हणजेच भरतीच्या वेळी सागरी पाणीच शहरात घुसण्याचा धोका कायम असतो. त्याला पायबंद घालण्यासाठी समुद्रात किनार्‍यावर अनेक संरक्षक भिंतींची तटबंदी उभारलेली आहे. पण तेवढ्याने भागत नाही. समुद्राचे पाणी उलटे शहरात येण्याचे थांबले तरी पावसाचे आभाळातून पडणार्‍या पाण्याचे काय करायचे?

दोनतीन इंच पाऊस सलग झाला तरी त्या शहरात लगेच पाण्याने नाकेबंदी होऊ लागते. म्हणून सांडपाण्याचा निचरा व शुद्धीकरण यंत्रणा उभ्या असल्या, तरी आणिबाणीच्या प्रसंगी वेगाने पाणी बाहेर फ़ेकले जाण्याची वेगळी व्यवस्था ठेवलेली आहे. तेव्हा शुद्धीकरणाला टांग मारून थेट पाणी समुद्रात पंपींग करून फ़ेकले जाते. त्यात थोडी कसूर झाली, तरी पावसाचे व सांडपाणी थेट उलट्या मार्गाबे घराघरात येऊ लागते. दोनतीन इंचाच्या पावसाने अशी स्थिती या आधुनिक अमेरिकन शहरात होऊ शकते. २००५ सालात वादळाने इतकी भीषण परिस्थिती आली, की तिथल्या अशा यंत्रणा राबवणारे कर्मचारी व पोलिसही आधी पळून गेले. लोकांना वादळातून बाहेर काढायला बसेस होत्या, पण पोलिस व कर्मचारी थांबले नव्हते. महिन्यापुर्वी ह्युस्टन शहरातही आकस्मिक वादळी पावसाने तडाखा दिल्यावर सगळे रस्ते पाण्यात बुडालेले होते. त्यांच्या तुलनेत मुंबईत तर अराजक व अनागोंदी आहे. भ्रष्टाचार व बेकायदा कामांचा भडीमार आहे. निसर्गालाही लाजवील इतका लहरी कारभार मुंबईत चालतो. म्हणून तर पर्यावरणाला धाब्यावर बसवून कुठेही गगनचुंबी इमारती उभ्या राहिल्या आणि खाड्या बुजवित संकुले व झोपडपट्ट्या बोकाळल्या. खाड्या बुजवून मुंबईला अशी बकाल बनवण्याचा कुठला निर्णय शिवसेनेने घेतला? ते काम तर त्या त्या काळातील सरकारांनी घेतले होते आणि ते मुख्यमंत्री वा सरकारे शिवसेनेची नव्हती. सेनेची एक घोडचुक वा गुन्हा असा आहे, की अशा सावळ्या गोंधळातही उत्तम कारभार करायची आश्वासने देत सेनेने सत्तेची लालसा बाळगली. पण दुसरीकडे मुंबईचा चेहरामोहरा विद्रुप करणार्‍या व शहराला रोगट बनवणार्‍या सरकारांना जाब विचारण्यात कसूर केली. अंतुल्यांनी लोखंडवाला अतिक्रमणाला हिरवा कंदील दाखवला. बाबासाहेब भोसल्यांच्या कारकिर्दीत सायन-कुर्ला खाडी बुजली.

ज्यांनी मुंबईत गर्दी वाढवणारे व तिला बकाल करायचे निर्णय घेतले आणि त्यात करोडो रुपयांचा भ्रष्टाचार केला, त्याबद्दल कोणी अवाक्षर बोलत नाही. आणि त्या पंगतीनंतर पडलेल्या खरखट्याची मेजवानी करणार्‍यांच्या डोक्यावर खापर फ़ोडण्याची स्पर्धा लागली आहे. जितक्या खाड्या बुजवल्या गेल्या, तिथे मूळ भूमीपेक्षा अधिक उंच भराव घातला गेला. त्याचा दुष्परिणाम असा झाला, की मुळची मुंबई जी सखल नव्हती ती अतिक्रमित भूमीच्या तुलनेत सखल झाली आणि आज जिथे पाणी साचल्याच्या तक्रारी आहेत. त्यांना बुडवणारा विकास मुंबईत होत गेला. १९८० पर्यंत बांद्रा कुर्ला कॉप्लेक्स नव्हता. तेव्हा सरकारी वसाहत, खेरनगर-गांधीनगर, कलानगरच्या मागली बाजू खोल पाण्याची खाडी होती. पण पुढे ही खाडी भराव टाकून जमिन बनवली गेली आणि तिची पातळी जुन्या वसाहतीपेक्षा ३-४ फ़ूट अधिक असल्याने जुन्या वसाहती सखल म्हणून बुडू लागल्या. त्यांना सखल कोणी बनवले? मुंबई परिसरात अशा रितीने सागरी प्रदेशात आक्रमण झाल्याने ठाणे, रायगड रत्नागिरीच्या किनारी भागात समुद्र गावात घुसू लागला. ह्याला कोण जबाबदार आहे? मुंबईच्या महापालिकेने नाले-गटारे साफ़ केल्याने त्यापासून मुक्ती मिळू शकते का? मात्र शिवसेनेला झोडायचे असले तर सफ़ाईचा मुद्दा जोमदार असतो. आचार्य अत्रेंच्या नावे एक खुप मजेशीर किस्सा सांगितला जातो. एकदा ते मुंबईहून पुण्याला चालले होते. पनवेल येथे चहाला थांबले असताना कोकणातून आलेल्या बसमधून उतरणारे मामा वरेरकर अत्र्यांना दिसले. त्याविषयी अत्रे म्हणाले, हे पात्र बघून काळजात धस्स झाले. काय विपरीत घडणार असा जीवाला घोर लागला. पुण्याला पोहोचलो आणि बातमी कानी पडली, महात्मा गांधी गेले. यातली अतिशयोक्ती लक्षात घेतली तर माध्यमांचा अजेंडा लक्षात येऊ शकतो. वरेरकरांवर अत्र्यांचा राग होता. पण म्हणून त्यांनी केलेली अतिशयोक्ती कितपत वास्तववादी असू शकते? मागल्या दोनचार दिवसापासून माध्यमात नाले सफ़ाईचा गाजावाजा होत आहे, त्याची कथा तरी वेगळी आहे काय?

No comments:

Post a Comment