सध्या सगळीकडे आणिबाणीची चर्चा चालू आहे. चार दशकांपुर्वी इंदिराजींनी आपली सत्तेची खुर्ची वाचवण्यासाठी देशातल्या जनतेचे नागरी अधिकार रद्द करून आणिबाणी घोषित केली होती. तशी पाळी त्यांच्यावर आली, कारण तेव्हा जगभरच प्रस्थापिताला झुगारणार्या मानसिकतेने रौद्ररुप धारण केले होते. १९६० नंतर प्रथम अमेरिका व युरोपमध्ये ही बंडाळी सुरू झाली. तोपर्यंत जी काही जीवनमूल्ये मानली जात होती, त्या नितीमत्तेला झुगारणार्या पिढीला उदय त्या काळात झाला. त्याचे वारे भारतात यायला काही वर्षे गेली आणि १९७० च्या दशकात भारतातही प्रस्थापिताला झुगारणारी नवी विद्रोही पिढी उदयास आली. साहित्य संस्कृतीच नव्हे, तर जवळपास जीवनाच्या सर्वच क्षेत्रात प्रस्थापिताला आव्हान दिले जाऊ लागले. नक्षलवाद, शिवसेना, दलित पॅन्थर अशा चळवळी होत्या, तशाच आजवरच्या सांस्कृतिक समजूतींना आव्हान देणारे विचार व युक्तीवादही त्यातूनच आले. तोपर्यंतच्या समजूती निकष हेटाळण्याला प्रतिष्ठा मिळू लागली होती. रामायण महाभारतातले हवाले देण्यापेक्षा त्याची टिंगल करण्याला प्रागतिक ठरवणारा बंडखोर पुरोगामी म्हणून मिरवू लागला होता. तोपर्यंत गुरूदक्षिणा म्हणून अंगठा देणारा एकलव्य महान ठरवून द्रोणाचार्यांच्या पक्षपातावर पांघरूण घातले गेले, असाही दावा होता. त्यातून महान गुरू मानल्या गेलेल्या द्रोणाचार्याला झिडकारणारी भाषा पुढे आलेली होती. आपण ज्याला शिकवले नाही किंबहूना शिक्षणच द्यायचे नाकारले, त्याच्या यशानंतर मात्र त्याच्याकडे गुरूदक्षिणा मागणारा द्रोणाचार्य, खलनायक ठरवण्यात पुरोगामीत्व सिद्ध केले जात होते. तर्काला पटणारीच ती गोष्ट होती. सर्व बाजूंनी प्रतिकुल अशा परिस्थितीत एकलव्य न शिकवताही प्राविण्य संपादन करतो आणि त्यातली आपली हार झाकण्यासाठी दोर्णाचार्य त्याच्याकडे अंगठा मागून त्याची फ़सवणूक करतो, हा मोठा कौतुकाचा युक्तीवाद होता.
१९७० नंतरच्या विद्रोही भूमिकेला पुढे करताना अशा अनेक गोष्टी व निकष झुगारण्यात पुरोगामीपणा होता. जे कोणी असे युक्तीवाद करीत, ते एकलव्य असल्याप्रमाणे प्रस्थापिताला आव्हान देत उभे ठाकले होते. मग ते प्रस्थापित विद्यापिठ असेल, राजकीय संस्था असेल किंवा प्रचलित साहित्य कला असेल. त्यांना आव्हान देतानाची एकच ठाम भूमिका होती. तुम्ही कोण ढुढ्ढाचार्य मान्यता देण्याचा आव आणणार? तुमची मान्यताच आम्हाला नकोय. काय योग्य आणि काय अयोग्य, याचा निवाडा करण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला, असा एकूण पवित्रा होता. अशाच काळात विनोद तावडे नावाच्या एका तरूणाला घरच्या गरीबीमुळे व मर्यादित सुविधांमुळे इंजिनीयरींगचे शिक्षण घेणे अशक्य होते. मोजून पाच तशी कॉलेजेस महाराष्ट्रात होती. सहाजिकच गरीब व अशिक्षित पार्श्वभूमीच्या कुटुंबातल्या मुलांना अधिक गुणांची टक्केवारी मिळवून इंजिनीयर होणे शक्य नव्हते. तर मान्यता नसलेल्या, पण तसे शिक्षण देणार्या एका संस्थेत विनोद तावडे भरती झाला आणि एकलव्याने गुरूच्या नुसत्या दर्शनातून तपस्या केल्याप्रमाणे धनुर्धर व्हावे, तसा हा मुलगा इंजिनीयर झाला. अर्थात विद्यापिठाची त्याला मान्यता नव्हती. कारण तो जिथे शिकला त्याला तात्कालीन कुठल्या विद्यापिठाची वा सरकारची मान्यता नव्हती. तशी मान्यता महाभारताच्या काळात एकलव्याने आत्मसात केलेल्या धनुर्विद्येलाही नव्हती. भलेही तो प्रशिक्षीत ‘पदवीधर’ अर्जुन वा दुर्योधनापेक्षा अधिक प्राविण्य व कौशल्य संपादन केलेला धनुर्धर होता. पण त्याला द्रोणाचार्यांची मान्यता नव्हती. आणि त्या कालखंडात द्रोणाचार्यच विद्यापिठ होते ना? त्यांनाच तात्कालीन सरकारची म्हणजे सत्तेची मान्यता होती ना? पण त्यांनाही कळत होते, की आपण शिकवलेल्या व प्रशिक्षीत केलेल्या अर्जुन दुर्योधनापेक्षा एकलव्य अधिक अप्रतिम धनुर्धर आहे.
त्याचे यश हा प्रत्यक्षात द्रोणाचार्याचा पराभव किंवा अपयश होते. ते मान्य करण्याचा मोठेपणा त्यांनी दाखवला नव्हता. आणि १९७० च्या विद्रोही विचारांचा तोच आधार होता. कुणाच्या प्रमाणपत्र वा मान्यतेने कोणी बुद्धीमान वा गुणीजन ठरू शकत नाही. आत्मसात केलेल्या गुणवत्तेवरच त्याचे प्राविण्य निश्चित होत असते. म्हणूनच ते सत्य नाकारणार्या द्रोणाचार्याला नाकारण्याला विद्रोह ठरवले जात होते. योगायोग असा की विनोद तावडे हा त्याच विद्रोही कालखंडातला आधुनिक एकलव्य आहे. जोवर त्याची परिक्षा झाली नव्हती, तोवर त्याच्याकडे कोणी ढुंकून बघितले नाही. आज मात्र त्याने राजकीय जीवनात यश संपादन करून दाखवले, तेव्हा अनेक द्रोणाचार्य पुढे सरसावले आहेत आणि आपली मान्यता तावडेला नसल्याचे दावे करीत, त्याच्याकडे आंगठा मागू लागले आहेत. ज्ञानेश्वर विद्यापिठाला मान्यता नाही म्हणून तावडेंचा राजिनामा मागणे आणि द्रोणाचार्यांनी एकलव्याकडे गुरुदक्षिणा म्हणून अंगठा मागण्यात नेमका कोणता फ़रक आहे? एकलव्य मान्यताप्राप्त गुरूकडे शिकला नाही किंवा त्याच्याकडून आशिर्वाद मिळवू शकला नाही, तर तावडे आधुनिक द्रोणाचार्यांच्या विद्यापिठात दाखल होऊ शकला नाही, की प्रमाणपत्र मिळवू शकला नाही. पण दोन्हीकडे गुणवत्तेच्या बाबतीत कुठलीही तक्रार नाही. सवाल कौशल्य वा गुणवत्तेचा नाहीच. पण मजेची गोष्ट अशी, की ज्यांनी आयुष्यभर एकलव्यावरच्या अन्यायासाठी द्रोणाचार्याला शिव्याशाप देण्यात धन्यता मानली, तेच आज आधुनिक द्रोणाचार्य होऊन त्याच थाटात आजच्या एकलव्याकडे राजिनाम्याचा आंगठा मोठ्या तावातावाने मागत आहेत. मग विद्रोहाचे एक वर्तुळ पुर्ण झाले म्हणायचे काय? तावडेच्या विरोधातला आजचा पुरोगामी युक्तीवाद खरा मानायचा, तर १९७० च्या दशकात द्रोणाचार्याचा निषेध खोटा पडतो आणि तो खरा मानायचा, तर आज मान्यताप्राप्त विद्यापिठाचे प्रमाणपत्र मागण्यातला आवेश निव्वळ ढोंगबाजी ठरते. यालाच काळाचा महिमा म्हणतात. कालचे एकलव्य आज द्रोणाचार्य झालेत का?
जितक्या बौद्धिक कसरती तावडे यांच्या पदवीला खोटे व बोगस ठरवण्यासाठी चालू आहेत, त्यात प्रामुख्याने तेव्हाच्या पुरोगामी विद्रोही मंडळीचा पुढाकार आहे. आपण आपल्याच जुन्या विद्रोही भूमिकेला तिलांजली देऊन प्रतिगामी भूमिकेत कधी येऊन पोहोचलो, त्याचेही भान अशा मंडळींना उरलेले नाही. १९७० च्या दशकातले बहुतांश विद्रोही बंडखोर आज प्रस्थापिताचे अंग होऊन गेलेत. आपल्याच त्या क्रांतीकारक भूमिकांना हरताळ फ़ासण्यात ते धन्यता मानताना दिसतील. पुराणकालीन शास्त्रीबुवांना लाज वाटावी, अशा थाटात आजचे पुरोगामी भेदभाव करताना दिसतात, तेव्हा त्यांच्या मर्कटलिलांची मौज वाटते. याचा राजिनामा मागायचा, त्याच्याकडे माफ़ीची मागणी करायची, हा उद्योग बघितला, मग पुराणकथेतल्या पाप-पुण्याचे निवाडे करणार्यांचे स्मरण होते. ज्याचा निषेध करीत या आजच्या बुद्धीमंत पंडीतांनी प्रतिष्ठा संपादन केली, त्यांना आज आपल्याच जुन्या युक्तीवादाचे स्मरण उरलेले नाही. त्यांचा बुद्धीवाद सोयीनुसार कोलांट्या उड्या मारणारे माकड होऊन गेला आहे. उडाला तर पक्षी आणि बुडाला तर बेडूक, इतके सोपे तत्वज्ञान त्यांनी करून ठेवले आहे. तावडे यांची पदवी खरी की खोटी, त्यांनी शिक्षण घेतले ते विद्यापिठ मान्यताप्राप्त होते की बोगस? अशा चर्चा रंगवताना, आपल्या पायाशी काय जळते आहे, त्याचेही भान अनेकांना राहिलेले नाही. याचा अर्थ इतकाच, की चार दशकात तेव्हाचे बंडखोर आता कालबाह्य होऊन गेलेत आणि आपल्या कालबाह्यतेने त्यांना पछाडलेले आहे. म्हणूनच पराभूत द्रोणाचार्याने तांत्रिक मुद्दे काढून एकलव्याला स्पर्धेतून बाद करण्याची लबाडी केल्यासारखी केविलवाणी धडपड चालू आहे. विनोद तावडे यांना राजकारणात पेच टाकून रोखण्य़ासारख्या डझनावारी गोष्टी आहेत. ती कुवत नसणार्यांनी असल्या लबाड्या केल्याने तावडे यांचे कुठलेही नुकसान होणार नाही, हे त्यांनाही पक्के ठाऊक आहे.
भाऊ, अहो ताबडतोब घ्या किंवा मुंडे घ्या,खरे टार्गेट फडणवीस/मोदी आहेत.
ReplyDelete👍👍👍👍👍
ReplyDeleteभाऊराव,
ReplyDeleteकुणाच्याही ध्यानीमनी नसलेला मुद्दा नेमका खणून काढायचं तुमचं कौशल्य वादातीत आहे. तुमच्या लेखावरून एक गोष्ट माझ्या लक्षात आली.
सलवा जुडूम नामे सरकारी कार्यक्रमाद्वारे वनवासींना बंदुका मिळायच्या. शिवाय त्या चालवायचं प्रशिक्षणही मिळायचं. याचे सुपरिणाम लगेच दिसून यायला लागले. वनवासी माओवाद्यांना आणि नक्षलवाद्यांना भारी पडू लागले. साहजिकच पुरोगाम्यांचं पित्त खवळलं. त्यांनी न्यायालयातून कार्यक्रमावर बंदी आणवली.
एकलव्याला विद्या नाकारणारे म्हणून द्रोणाचार्यांचा निषेध हे पुरोगामी करतात. पण आज याच निषादपुत्रांच्या हातातून संरक्षणविद्या हिसकावून घेतांना या पुरोगाम्यांना जराही लाज वाटंत नाही. भयंकर अत्याचार करणाऱ्या माओवाद्यांची तळी उचललेली या पुरोगाम्यांना बरी चालते !
आपला नम्र,
-गामा पैलवान