गेल्या आठवड्यात एक आक्षेपार्ह छायाचित्र सोशल मीडियामध्ये भलतेच फ़िरत होते. त्यात नेहरू विद्यापीठातील विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हैयाकुमार याची कुणा प्रौढ महिलेशी जवळीक दाखवणारे चित्रण होते. अर्थातच असल्या छायाचित्राच्या प्रसिद्धीमागे त्याला बदनाम करण्याचा हेतू लपून रहात नाही. म्हणूनच ते छायाचित्र खरे आहे की खोटे, हा भाग दुय्यम! त्यापेक्षा असे चारित्र्यहनन नक्कीच निषेधार्ह आहे. मग ते कोणीही केलेले असो. ते छायाचित्र खरे असले तरीही अशा प्रसिद्धीमागचा हेतू चारित्र्यहननाचा असल्याने त्याचे कुठल्याही कारणास्तव समर्थन ओऊ शकत नाही. शिवाय कुणाच्याही खाजगी आयुष्यात असे डोकावण्याचा अधिकार कोणालाही नाही. ज्या वर्तनाचा सार्वजनिक जीवनाला हानी पोहोचवण्याशी संबंध नाही, अशा कुठल्याही गोष्टीचा असा वापर म्हणूनच आक्षेपार्ह होता व आहे. सहाजिकच ज्याने कोणी हे प्रकार केले वा त्याला अधिक प्रसिद्धी देण्यास ज्यांनी हातभार लावला, त्यांचा निषेध झालाच पाहिजे. पण असे कृत्य कोणी केले वा कोणाच्या बाबतीत केले, यानुसार त्यातली निषिद्धता ठरत नसते. कृत्य कोणी करण्याशी संबंध नसतो. कृत्य कोणाच्या बाबतीतले आहे त्यानुसार त्याचे चांगलेपण किंवा वाईटपण सिद्ध होत नसते. निकष सर्वांसाठी सारखाच असतो. त्यात भेदभाव करता येत नाही. म्हणूनच असे कृत्य ज्याने कोणी कोणाच्याही बाबतीत केले असेल, तर त्याची वैचारिक वा राजकीय बांधिलकी न बघता त्याचा सारखाच निषेध व्हायला हवा. पण दुर्दैवाने आपला समाज अजून तितका सभ्य झालेला नाही. म्हणून मग एका वर्गासाठी जे पुण्यकर्म असते, तेच दुसर्या वर्गासाठी पाप ठरवले जात असते. आज ज्यांना त्यात पाप दिसते, त्यांची स्मरणशक्ती कालच्या तसल्याच गोष्टीतले पुण्यकर्म विसरून जाते. याला निवडक स्मृतीभ्रंशाचा आजार म्हणतात.
दोन वर्षापुर्वी लोकसभा निवडणूकांची रणधुमाळी चालू असताना अशाच एका खाजगी विषयाची देशव्यापी ‘बौद्धिक चर्चा’ रंगलेली होती. त्याला स्नुपगेट असे नाव दिलेले होते. गुजरात पोलिसांच्या एका कृतीविषयी ते संबंधित होते. कुणा एका तरूण मुलीवर गुजरात पोलिसांनी पाळत ठेवली होती आणि त्यासंबंधातले आदेश वा तसम गोष्टी फ़ोनवरून बोलल्या गेल्याची ध्वनीफ़ित गाजत होती. इशरत जहान प्रकरणात गुंतलेल्या एका सिंघल नावाच्या अधिकार्याने ही ध्वनीफ़ित सीबीआयच्या हवाली केलेली होती आणि बदल्यात त्याला जामिन मिळेल अशी सवलत एस आय टी या पथकाने दिलेली होती. कालपरवाच इशरत प्रकरणाची लक्तरे चव्हाट्यावर आलेली आहेत. त्या पथकाने कशी तपासाची अरेरावी केली आणि त्यात नरेंद्र मोदी व अमित शहा यांना गुंतवण्याचा उद्योग केला, इशरत तपासाला चुकीचे वळण देण्यात आले त्याचे वाभाडे निघत आहेत. त्यातूनच ही ध्वनीफ़ित बाहेर आलेली होती. सिंघल यांनी आपल्या फ़ोनवर रेकॉर्ड केलेले हे संभाषण मोठ्या प्रमाणात माध्यमांनी प्रक्षेपित केले होते आणि त्यावरील चर्चेत देशातले बहुतांश मोदीविरोधी राजकीय नेते व विचारवंत चवीने उहापोह करीत होते. अखेरीस त्यात गुंतलेल्या मुलीच्या पित्याने़च कोर्टात धाव घेऊन ही ‘विटंबना’ थांबवण्याची मागणी केली होती. त्यामुळेच त्यावर पडदा पडू शकला. त्यातही या पित्याने आपणच मुलीला धोका असल्याने पोलिसांची मदत मागितली असल्याचा खुलासा दिलेला होता आणि मित्र म्हणून सत्ताधार्याने मदत केल्याचे स्पष्ट केले होते. पण त्या इवल्या पुराव्याच्या आधारे मोदींवर बुद्धीमंत वर्गाने काय काय आरोप केले, ते कोणाला आठवते काय? ते काम पुण्यकर्म होते, असेच त्यांना तेव्हा वाटलेले नव्हते काय? अगदी कालपरवा कविता कृष्णन नावाच्या पुरोगामी बुद्धीमंत महिलेने त्याच्याच आधारे पंतप्रधानांवर चिखलफ़ेक केलेली नव्हती का?
एका तरूणीवर मोदींची नजर होती आणि त्यासाठी पोलिस खातेच तिच्या पाळतीवर सोडलेले होते, असा निष्कर्ष काढणार्या स्नुपगेट संबंधातील चर्चा आज सगळेच कसे विसरून गेलेत? निदान अशा बाबतीत जी मंडळी संवेदनाशील असतात, त्यांना तरी कन्हैयाकुमारचा आक्षेपार्ह फ़ोटो बघितल्यावर स्नुपगेट आठवायला हवे ना? त्यासाठी प्रामणिक स्मरणशक्ती असावी लागते आणि पुरोगामी बुद्धीमंत असल्यावर स्मरणशक्ती निवडक स्मृतीभ्रंशाच्या आजाराने ग्रासलेली असावी लागते. अन्यथा आज कन्हैयाच्या आक्षेपार्ह छायाचित्राबद्दल निषेधाचा सूर आळवणार्यांनी स्नुपगेटच्या वेळीही निषेधच केला असता. पण तेव्हा तर हीच मंडळी मोठ्या चवीने स्नुपगेटची गोष्ट चघळत होते. तेव्हा त्यांना त्यातले पाप दिसले नव्हते, की चारित्र्यहनन दिसू शकलेले नव्हते. त्यातला हिरो होता आशिष खेतान! त्याला स्नुपगेटनेच प्रसिद्धी दिली. तेवढ्याच पुण्यकर्माने या इसमाला राजकारणातही स्थान मिळून गेले. आम आदमी पक्षाचा दिल्लीतील उमेदवार म्हणून त्याने लोकसभेची निवडणूक लढवली होती. थोडक्यात कन्हैयाकुमारचे चारित्र्यहनन करण्याला पुरोगामी भाषेत तेव्हा पुण्यकर्म मानले जात होते. कारण त्यातून नरेंद्र मोदी नामक प्रतिगाम्याची बदनामी चालू होती. कन्हैया पडला पुरोगामी! सहाजिकच त्याचे चारित्र्यहनन तितकेच निषेधार्ह असले तरी पाप होऊन जाते. कारण कुठलेही कृत्य पुण्य किंवा पाप नसते. कृत्य कोणी केले व त्यात कोणाचा बळी पडतो, यानुसार त्याची वर्गवारी होत असते. सहाजिकच कन्हैयाचे छायाचित्र बदनामीकारक असले, तर पाप होत असते आणि तसे काही भाजपाच्या कोणी केले असेल तर घोर पाप असते. पण तसेच काम स्नुपगेट म्हणून आशिष खेतानने केल्यास मोदी विरोधातले असल्याने महान पुण्यकर्म होऊन जाते. सामान्य लोक ह्याला बेशरमपणा म्हणतात, पुरोगामी भाषेत यालाच बुद्धीवाद म्हणतात.
या विषयाचा पाठपुरावा गुजरातचे एक सनदी अधिकारी प्रदीप शर्मा यांनी सुप्रिम कोर्टातल्या याचिकेत केला होता. पण तिथे पुरोगामी प्रतिगामी असे निकष नसल्याने दणका बसला. आपल्या याचिकेतील स्नुपगेटचा उल्लेख वगळल्याशिवाय कोर्टाने याचिकेची दखल घेणार नसल्याचा इशारा दिल्यावर त्याने आरोप मागे घेतला होता. पण पुरोगाम्यांच्या बौद्धिक चर्चेत असल्या गोष्टी लाळ गळेपर्यंत चवीने बोलल्या जात राहिल्या. गतवर्षी बेटी बचाव म्हणून मोहिमेचा आरंभ करताना आपल्या मुलीसह सेल्फ़ी छायाचित्र घेऊन मला पाठवा, असे आवाहन पंतप्रधानांनी केल्यावर कविता कृष्णन या पुरोगामी विदुषीने त्याच्या विरोधात आवाहन केले होते. पंतप्रधान मुलींचा पाठलाग व पाळत यासाठी कुख्यात आहेत, म्हणून मुलींच्या बापांनी छायाचित्रे पाठवू नयेत, असे ट्वीटरवरून म्हटले होते. ही पुरोगामी सभ्यता आहे. जिथे अफ़वांना पुरावे मानले जातात आणि त्याच पुराव्याच्या आधारे चारित्र्यहनन हा बुद्धीवाद असतो. त्यालाही हरकत नाही. पण मग अशा लोकांनी तितक्याच चवीने कन्हैयाचे आक्षेपार्ह छायाचित्र मान्य करायला हवे ना? स्नुपगेटच्या पुरस्कर्त्यांनी कन्हैयाच्या फ़ोटोविषयी आगपाखड कशाला करावी? त्याचे मानसशात्रीय कारण स्मृतीभ्रंशाच्या रोगामध्ये आढळते. काहींना सरसकट स्मृतीभ्रंश होतो, तर काही लोकांना निवडक आंशिक स्मृतीभ्रंश होत असतो. पुरोगामी बुद्धीवादी असला तर त्याला निवडक स्मृतीभ्रंश होत असतो. सोयीनुसार त्यांना स्मृतीभ्रंश होतो आणि सोयीचे असेल तेव्हा त्यांचीच स्मरणशक्ती कमालीची तल्लख होते, जशी कविता कृष्णन यांची आहे. हा कुठला निकष आहे की ज्यामध्ये कृत्य तेच असते, पण पुरोगाम्यांनी केल्यास पुण्य असते आणि बाकीच्यांनी केल्यास तेच कृत्य पापकर्म असते? उच्चवर्णियाचा जाणतेपणी शुद्राला पाय लागला तरी पुण्य़ व्हायचे आणि शुद्राचा अनवधानाने वा चुकून उच्चवर्णियाला स्पर्श झाला, तरी अक्षम्य गुन्हा वा पाप असायचे ना? मग कोण मनुवादी आणि कोण पुरोगामी?
No comments:
Post a Comment