Monday, March 21, 2016

अमिताभचे ४ कोटी, अमिरचे ३ कोटीशतकाचा महानायक म्हणून ज्याची ओळख झालेली आहे, अशा अमिताभ बच्चनला कोणाच्या प्रमाणपत्राची गरज नाही. पण रविवारी त्याच्या बचावासाठी बंगाल क्रिकेट संघटनेच्या सौरव गांगुलीला धाव घ्यावी लागली. कारण या सामन्यासाठी त्यानेच अमिताभला आमंत्रण दिलेले होते आणि त्यात सहभागी होताना अमिताभने भारतीय संघाच्या सोबत मैदानात उतरून राष्ट्रगीत गायले होते. त्यामुळे अर्थातच ‘भारतमाता की जय’ या घोषणांना चालना मिळाली. पर्यायाने त्यातून प्रदर्शित होणार्‍या राष्ट्रप्रेमाने अनेकांना पोटदुखीचा विकार जडल्यास नवल नव्हते. त्यासाठी मग सोशल माध्यमातून एक आवई पिकवण्यात आली. अमिताभने राष्ट्रप्रेम म्हणून नव्हेतर धंदा म्हणून त्या राष्ट्रगीत गायनाचे चार कोटी रुपये घेतले. सहाजिकच त्यावरून सोशल माध्यमात हाणामारी सुरू झाली आणि प्रस्थापित माध्यमांनाही त्याची दखल घ्यावी लगली. गांगुलीला समोर येऊन खुलासा करावा लागला. थोडक्यात ज्यांनी अशी अफ़वा पसरवली, त्यांचेच नाक कापले गेले. कारण खुलाश्याने अमिताभची प्रतिमा अधिक उंचावली. त्याने गायनाचे पैसे घेतले नाहीतच. पण मुंबईहून कोलकात्याला जाताना खिशातले पैसे खर्च केले आणि हॉटेलमध्ये मुक्काम करण्याचेही पैसे सामना आयोजकांकडून घेतले नाहीत. केवळ क्रिकेटचे प्रेम व राष्ट्राविषयीची आस्था म्हणूनच त्याने इतकी पदरमोड केली. आणि असे असतानाही त्यालाच बदनाम करण्याचा उद्योग कोणी कशाला केला असेल? त्याच शोध घेणे मग क्रमप्राप्त ठरते. अर्थात त्यामागे नेहमीप्रमाणेच तथाकथित सेक्युलर व पुरोगामी मेंदू असणार हे वेगळे सांगायला नको. कारण आता ही सेक्युल्रर मोडस ऑपरेंडी झालेली आहे. मुळात अफ़वा पिकवायची आणि त्याचा गवगवा इतका करायचा, की खर्‍याचा शोधही घेतला जाऊ नये. हे गुजरात दंगलीपासून अखंड चालू राहिलेले कारस्थान आहे.

गुजरातमध्ये दंगलीचा भडका उडाल्यावर मुख्यमंत्र्याने पोलिसांना हस्तक्षेप न करण्याचे आदेश एका बैठकीतच दिले होते आणि आपण त्या बैठकीला हजर असल्याचा दावा संजीव भट्ट नामक वरीष्ठ पोलिस अधिकार्‍याने केला होता. मग त्यावरून तब्बल बारा वर्षे मोदींना बदनाम करण्यात आले. अखेर सुप्रिम कोर्टानेच संजीव भट्टला खोटा ठरवला आणि पर्यायाने पुरोगामी षडयंत्राचा मुखवटा गळून पडला. कॉग्रेसने याच भट्टच्या पत्नीला विधानसभेची उमेदवारी दिली आणि त्याने पोलिससेवेत असताना तिचा प्रचार केला होता. यातून पुरोगामी मुखवट्यातल्या खोटेपणाचा चेहरा लक्षात येऊ शकतो. त्यानंतर ही पुरोगामी शैलीच होऊन गेली. कुठल्याही बाबतीत अफ़वा पसरवायची, आवई उठवायची आणि मग त्यासाठी माध्यमातल्या त्यांच्याच पुरोगामी दलालांनी भाजपाकडे सतत खुलासे मागत रहायचे. उत्तराखंडात त्सुनामी आली होती. तेव्हा तिथे धाव घेणार्‍या मोदींनी गुजरातच्या फ़सलेल्या पर्यटकांसाठी मदतीचे प्रयास केले. त्यात एका दिवसात १५ हजार लोकांची सुटका केल्याचा दावा मुळात टाईम्सच्या पत्रकाराने परस्पर थाप म्हणून ठोकून दिला आणि त्यावरून आठवडाभर मोदींची टवाळी करण्यात पुरोगामी पुढारी व पत्रकार रममाण झालेले होते. मात्र अधिक तपास सुरू झाला आणि बातमी देणार्‍याने निमूटपणे आपणच थाप मारल्याचा खुलासा केला. हळुहळू मोदीच नव्हेतर त्यांच्याविषयी आपुलकी वा आस्था असेल अशा प्रत्येकाच्या बाबतीत अफ़वा सोडण्याचा उद्योग म्हणजे शोध पत्रकारिता होऊन गेली. अमिताभही त्याचाच बळी होणे स्वाभाविक आहे. कारण त्याने मध्यंतरी रंगलेल्या खास पुरोगामी सन्मानवापसी किंवा असंहिष्णूता नाटकात सहभागी व्हायचे टाळले होते. सहाजिकच तोही प्रतिगामी ठरला तर नवल नाही. त्यामुळेच त्याला धडा शिकवण्याची इतकी उत्तम संधी नव्हती. ती कोलकाता सामन्याच्या निमीत्ताने साधली गेली.मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना पर्यटन प्रचारासाठी त्यांनी अमिताभला आमंत्रित केले. त्यानेही त्यात मदत केली. पण त्या जाहिरातीसाठी अमिताभने एकही पैसा घेतला नव्हता. हे दिर्घकाळ गुपित होते. मोदी व गुजरात सरकार हे पुरोगामी वर्णव्यवस्थेमध्ये बहिष्कृत राज्य असतानाही अमिताभने त्याच्या जाहिरातीत सहभाग घेतला, याचा अनेक पुरोगाम्यांना राग होता. पण मॉडेलींग हा पेशा असल्याने कोणी काही बोलला नाही. पुढे लोकसभा प्रचाराच्या निमीत्ताने मोदींनी विविध वाहिन्यांना मुलाखती दिल्या त्यात अमिताभच्या जाहिरातीचा खुलासा केला होता. त्यानेही राज्य सरकारच्या जाहिरातीसाठी अभिनय करताना एकही पैसा घेतला नव्हता. पण आपले औदार्यही गुपित ठेवले होते. असा माणूस पुरोगाम्यांना तिरस्कारणिय वाटला तर नवल नाही. कारण पुरोगामीत्व हा आजकाल नफ़ा उकळण्याचा धंदा झालेला आहे. गरीब पिडीत जनतेच्या कल्याणाचा व्यापार म्हणजे पुरोगामी धंदा झाला आहे. म्हणूनच अशा कलावंतांचे पुरोगाम्यांना मोठे कौतुक असते. अमिर खान त्यासाठीच पुरोगाम्यांचा खुप लाडका आहे. ‘सत्यमेव जयते’ ही मालिका काढली तेव्हा तर एकूण पुरोगामी चळवळ अमिरच्या पायावर लोळण घेत होती. पण त्यातून जनहिताचा तमाशा करणार्‍या अमिर खानने करोडो रुपयांचा किफ़यतशीर धंदा केला होता. मालिकेच्या प्रत्येक भागासाठी तीन कोटी रुपये मागणार्‍या आमिरने त्यापैकी कितीसा हिस्सा समस्येत फ़सलेल्या गरजवंताना दान म्हणून दिला होता? छदामही नाही! उलट प्रेक्षकांनी आपल्या कुवतीनुसार मदत करावी आणि मग तितकीच रक्कम कोणा बड्या कंपनीने द्यायची, असा मामला होता. त्याचे तोंड फ़ाटेस्तोवर कौतुक करण्यात सर्व पुरोगामी रममाण झालेले होते. पण सामाजिक समस्यांचा तमाशा मांडण्यातून आमिर खानने किती कमाई केली, याची चर्चही प्रस्थापित माध्यमात कोणी केली नव्हती.

हा फ़रक लक्षात घेण्य़ासारखा आहे. कारण तेव्हाही आमिरच्या कमाईचा प्रश्न सोशल माध्यमातून विचारला गेला होता. तर अभिनय व मनोरंजन हा त्याचा पेशा आहे आणि त्यासाठी त्याने पैसे घेण्यात गैर काहीच नसल्याची सारवासारव पुरोगामीच करीत होते. कारण आमिर पुरोगामी गोतावळ्याचा लाडका आहे. तो अण्णांना रामलिला मैदानावर जाऊन भेटतो. मेधाताईंच्या जंतरमंतर धरण्यात काही तास जाऊन बसतो. बाकीच्या वेळी तुडूंब पैसे कमावतो. याला पुरोगामीत्व म्हणतात. अमिताभला असे काही जमत नाही. उत्तम अभिनय करूनही पाखंडात तोकडा पडतो. म्हणून मग त्याच्या औदार्य वा दानधर्मावरही शंका घेतल्या जातात आणि आमिरच्या धंद्यालाही दानधर्म ठरवण्याची स्पर्धा चालते. याचे कारणही समजून घेतले पाहिजे. अशा पुरोगाम्यांना अमिताभ वा अमिरविषयी कुठलाही रागलोभ नसतो. त्यांना ढोंग पाखंडाशी कर्तव्य असते. देखावे उभे करण्यात रस असतो. म्हणूनच अमिताभविषयी कुठलीही माहिती न घेता अशा अफ़वा पसरवल्या जातात आणि त्यावरून चर्चेचे गुर्‍हाळ सुरू केले जाते. त्यांच्या देशद्रोहाचा पुरावाही मान्य केला जाणार नाही, पण तुमच्या राष्ट्रप्रेमाची प्रमाणपत्रे मागितली जातील. ओवायसीने ‘भारतमाताकी जय’ म्हणायचे नाही ठरवल्यास तो त्याचा संवैधानिक अधिकार असतो. मग कुठल्याशा समारंभात मौलवीने दिलेली टोपी मोदींनी घालण्याचा आग्रह कशासाठी असतो? भारताच्या घटनेत मोदींनी मुस्लिमांची टोपी घातली तरच ते राष्ट्रवादी वा सेक्युलर ठरतील, असे लिहून ठेवले आहे काय? पण त्यावरून काहुर माजवले गेले. ते माजवणार्‍यांनी ओवायसी बंधूना तितक्याच उत्साहात कधी उलटे प्रश्न विचारले होते का? हा ढोंगीपणा आता पुरोगामीत्वाचे व्यवच्छेदक लक्षण बनत चालला आहे. किंबहूना ढोंग, मुखवटा किंवा खोटारडेपणा ही पुरोगामीत्वाची ओळख झाली आहे. म्हणूनच सामान्य जनता त्याच्यापासून दुरावली आहे.

5 comments:

 1. bhau ase kiti chan jamte ...
  asha secular lonkacha burkha phadalach pahije...

  ReplyDelete
 2. भाऊ आणखी एक मिडिया व पूरोगामी (जे मोठे विचारवंत, संशोधक, परखड पुरस्कार विजेते विशेषतः रोमन मेगेसेसे आवाड॔ त्यांची प्रतिमा ऊंचावणया साठी दिले जातात व त्यां नावाखाली देशविघातक फुटीर वादी देशाची प्रगती करणारया मुलभूत प्रकल्प / सुविधा (जसे धरणे विजनिरमिती इ.) रोखण्याची सुपारी घेणारे विशिष्ट पक्षाच्या घराणेशाही ला लोकशाही च्या नावाखाली खपवणरे विचारवंतांची टोळी तयार केली जाते व अशा विचारवंताच्या जोडीने माध्यमातून धुमाकुळ घालायचा व असत्याला देशविघातकाला घटनाना बेमालूम पणे सत्य भासवून नागरिकांची दिशाभूल करायची व देशविघातक सत्ता दशकानुदशके चालवायची मोहिम हाती घेतली हे समजायला (फक्त काही जणांनाच आजही हे समजले आहे बाकी 90% नागरिकांना काहीच पडलेले नाही) 60 वष्रे गेली) अशा विचित्र अवस्थेत देश सापडला आहे. त्यातून बाहेर पडण्यासाठी आता खूपच उशीर झालेला आहे व केवळ देव सापेक्ष व्यक्तीच अशा परिस्थितीतून देशाला बाहेर काढू शकते. म्हणूनच की काय राम कृष्ण शिवाजी असे महात्मे या देशात जन्म घेतात.
  भाऊ आपल्या लेखातून जे काही समाज प्रबोधन होते आहे ते आम्ही सध्या what's app च्या माध्यमातुन पसरवण्याचा प्रयत्न करत आहोत.
  धन्यवाद
  अमुल शेटे पनवेल

  ReplyDelete
 3. हे तथाकथित पुरोगामि ढोंग जर आम्ही तरुणांनी उघड पाडायच ठरवलं तरी ते कस करणार?
  किती लोकांना ओरडून सांगणार ? जे शक्य नाही
  म्हणून न थांबता आपण कोणते पद्धतशीर प्रयत्न करावे? कृपया कळवावे

  ReplyDelete
 4. भाऊ आजचे ब्रुसेल्स स्फोट म्हणजे तुम्ही १६ जानेवारी ला दिलेला इशारा (जगभरचा पुरोगामी जिहाद)

  ReplyDelete
 5. Satymev jayte ha show cha concept ani tyachi research team Aamir khan chi hoti. Don varsh to v tyachi team ya showla ban ayla lavte lokamnadhe awareness vadhnyasathitya kalat to kontihiad swikarat nahi tyatun to tyachech nukaan karto. Show banbnyasathi tyane v tyachya team ne kiti mehnat ghetli aahe he tyachya team la vicharave jya team madhe satyjit bhatkar v Swati chakravarrti hote. Tyanchya mehntiche paise tyani ghetle tar Kay vait
  ?aani Maharashtra sarkar aani government of India chya kontyahi campeign sathi tyane ekhi paisa ghetla nahi. Incredible India aso Ki kuposhan ch campeign aso.

  ReplyDelete