Friday, March 25, 2016

सुप्रियाताई, आधी गुरं दावणीला बांधा

सध्या राष्ट्रवादी कॉग्रेसमध्ये नेत्यांचा दुष्काळ पडला आहे काय? कारण खुद्द शरद पवार फ़ारसे क्रियाशील नाहीत आणि मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार अजितदादा सिंचन घोटाळा चौकशीच्या भवितव्यामुळे मौन धारण करून बसले आहेत. छगन भुजबळ तुरूंगात गेल्याने त्याही आघाडीवर शांतता आहे. त्यामुळे सुप्रियाताई सुळेंना पदर खोवून आणि कंबर कसून मैदानात उतरावे लागलेले असावे. पक्षाच्या प्रवक्त्यांना बाजूला सारून ताईच सध्या किल्ला लढवताना दिसत आहेत. भुजबळांना अटक झाल्यावर त्यांनी सर्वांनाच अटक करा आम्ही मराठे घाबरत नाही, अशी जाहिर ग्वाही दिलेली होती. एकूण सध्या सुप्रियाताई राष्ट्रवादी कॉग्रेसच्या पक्षश्रेष्ठी झालेल्या दिसत आहेत. त्यामुळे एकूण पक्षाच्या भूमिका व धोरणे त्यांच्या वक्तव्यातून उघड होतात, असे गृहीत धरायला हरकत नाही. म्हणून मग बारामतीमध्ये त्यांनी सरकारला दिलेला इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फ़डणवीस यांनी गंभीरपणे घेतला पाहिजे. दुष्काळ व पाणीटंचाई अशा दोन समस्यांनी ताई खुप व्याकुळ आहेत. त्यावर तात्काळ उपाय झाले नाहीत, तर थेट मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यात गुरे आणून बांधायची धमकी ताईंनी दिलेली आहे. ताईंनी तसा निर्धार केलेला असेल, तर त्या तडीसही घेऊन जातील याविषयी शंका बाळगण्याचे कारण नाही. पण गुरे कुठे मोकाट सुटली असतील, तर आधी शोधावी लागतील, त्याचे काय? त्यांची काही गुरे मोकाट झाली, म्हणून कोंडवाड्यात टाकावी लागली त्याचे स्मरण ताईंना कसे रहात नाही? सरकारने त्या गुरांकडे दुर्लक्ष केले म्हणून अखेर कोर्टाला त्यांचा बंदोबस्त करावा लागला. भुजबळ यांच्या विरोधातली कारवाई सरकारने केलेली नाही, तर कोर्टाने नेमलेल्या खास चौकशी पथकामुळे त्यांना गजाआड जावे लागले आहे. जीतेंद्र आव्हाड यांना तर अनेकांच्या वावरातून हाकलून बाहेर काढण्याच्या कटकटी सातत्याने होत आहेत.
मध्यंतरी सांगली येथे आव्हाड यांनी अश्लाघ्य भाषा वापरली आणि त्यांना व्यासपीठावर घुसून काही लोकांनी मारहाण केली होती. त्यानंतर अनेकजागी त्यांच्या अशाच आगावूपणामुळे खुद्द अजितदादांच्या नाकी दम आला होता. विधानसभेत चिक्की विकायचा उद्योग आव्हाडांनी केला आणि त्यात तेलगीच्या विषयाला फ़ोडणी दिल्याने भुजबळांना संताप अनावर झाला होता. तेव्हा दादांना हस्तक्षेप करून आव्हांडांना वेसण घालावी लागली होती. आता त्यांनी पुण्याच्याच फ़र्ग्युसन कॉलेजात धमाल केली म्हणून प्रकरण हातघाईवर आले. त्यात पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला होता. वास्तविक फ़र्ग्युसन कॉलेजचा मामला विद्यार्थ्यांचा होता, तिथे आव्हाडांना जायचे काही कारण नव्हते. पण भटक्या गुरांना कुठेही हिरवाई दिसली, मग त्यात तोंड खुपसण्याची सवय असते. आव्हाडांचे तसेच काहीसे झालेले आहे. अशा लोकांना वेळच्या वेळी लगाम लावता येत नसेल, तर घरातच दावणीला बांधणे भाग असते, हे शेतकरी म्हणून करोडोचे पीक दुष्काळातही काढणार्‍या शेतकरी सुप्रियाताईंना माहिती असेलच. अन्यथा त्यांनी दुष्काळातल्या गुरांना चारा नाही म्हणून वर्षा बंगल्यात गुरे आणण्याची धमकी कशाला दिली असती? मात्र तसे करण्यासाठी आपली पाळीव गुरे निदान आपल्याच गोठ्यात वा दावणीला बांधलेली असावी लागतात, ह्याचा ताईंना पुरता विसर पडलेला दिसतो. अन्यथा फ़र्ग्युसन कॉलेजच्या आवारात आव्हाड धुमाकुळ घालत असतानाच ताईंनी मुख्यमंत्र्यांना असली धमकी कशाला दिली असती? चारा वा पाण्याची टंचाई अकस्मात उदभवलेली नाही. ताईंच्याच गुरांनी महाराष्ट्रालाच चरायचे कुरण समजून ‘चर आणि खा’ असा पंधरा वर्षे चरखा फ़िरवला, त्याचा हा दुष्परिणाम आहे. या कालावधीमध्ये चरताना आणि खाताना थोडेफ़ार तरी उगवले पाहिजे, याचे भान राखले गेले असते तर आज ही वेळ आली असती काय?
ताईंना आठवत नसेल, पण तीन वर्षापुर्वी सोलापुरच्या काही शेतकर्‍यांनी मुंबईच्या आझाद मैदानावर धरणे धरून सोलपूरला पाणी देण्यासाठी आंदोलन छेडले होते. तेव्हा ताईंची गुरे काय करत होती? त्यांना पाणीपुरवठा करणार्‍या धरणात पाणीच नाही, तर काय करायचे अशी ‘लघुशंका’ ताईंच्या दादानेच व्यक्त केलेली होती. मग ताईंच्या गुरांना तेव्हा कुठला चारा व पाणीपुरवठा होत राहिला? तेव्हा ताई कशाला गप्प होत्या? गुरे किंवा चारा असली भाषा बोलले, म्हणजे कोणी शेतकरी होतो अशी ताईंची समजूत असेल, तर गोष्ट वेगळी! अन्यथा आज इतक्या तावातावाने बोलणार्‍या सुप्रियाताई तेव्हाही घराबाहेर पडून आक्रोश करताना दिसल्या असत्या. पण दादांची लघुशंका असो किंवा शेतकर्‍यांच्या आत्महत्या असोत, ताईंनी कधी चकार शब्द उच्चारला नव्हता. आज त्यांना दुष्काळ दिसतो आहे, भुकेलेली गुरेही दिसत आहेत. पण त्यासाठी मागल्या दिडवर्षात ताईंनी वा त्यांच्या पक्षाने किती आवाज उठवला? सत्तेत जाऊनही त्याविरुद्ध शिवसेनाच ओरडा करते आहे. त्यांनीही सरकारच्या विरोधात आपल्या सोबत यावे, असे आवाहन ताई करतात. हरकत नाही! पण सोबत कोणी कोणाच्या जावे? सेना सत्तेत गेली तरी पहिल्या दिवसापासून दुष्काळाच्या विरोधात बोंब मारते आहे. तेव्हा ताईंचे आव्हाड चिक्की विकत होते. सांगलीत जाऊन शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचा उद्धार करीत होते. ठाण्यात इशरत जहानची स्मारके उभी करीत होते. मोकाट सुटलेल्या गुरांसारखे वागत होते, त्यांना लगाम लावून शेतकरी प्रश्नाकडे वळवण्यापेक्षा तीर्थरुपांनी त्या मोकाटपणालाच फ़ुले शाहू आंबेडकरांचे कार्य ठरवणारे प्रमाणपत्र लिहून मुख्यमंत्र्यांना इशारा दिला होता. या दिर्घकाळात सत्तेतली शिवसेनाच सरकार विरोधात बोंबा ठोकत होती. तेव्हा सोबतीचा विषय असेल, तर ताईंनीच सेनेच्या सोबत येतो म्हणायला हवे ना?
आज मुख्यमंत्र्याला धमक्या देण्यापेक्षा मागल्या पंधरा वर्षात आपल्या दादालाच इशारे देऊन काही हालचाल केली असती, तर फ़डणविस वर्षा बंगल्यावर वास्तव्य करायलाही जाऊ शकले नसते, की ताईंना उन्हातान्हात इशारे देत फ़िरावे लागले नसते. व्यापारी आणि शेतकर्‍यांना पंतप्रधान व मुख्यमंत्री साधी भेटायला वेळ देत नसल्याची तक्रारही ताईंनी त्याच भाषणात केली आहे. यासारखा विनोद नाही. कारण देशाचे पंतप्रधान तेरा महिन्यापुर्वी बारामतीत आलेले होते आणि त्यांनी जाहिरपणे आपण बारामतीकरांच्याच सल्ल्याने कारभार करतो असे ओरडून सांगितले होते. असा आठवडा जात नाही की शरद पवारांशी आपला संपर्क होत नाही, असे मोदींनीच सांगितले होते ना? त्यांच्या पाठोपाठ फ़डणवीसही बारामतीला येऊन गेले. तिथे जाणार्‍या प्रत्येकाने आपण पवारांच्याच सल्ल्याने चालत असल्याचे कथन केले आहे. मग इतकी भीषण परिस्थिती आली असेल, तर त्याला मुख्यमंत्री व पंतप्रधानांचे सल्लागारच जबाबदार असतील ना? सुप्रियाताई त्या सल्लागाराला जाब विचारण्यासाठी भेट मिळत नाही, अशी तक्रार आहे काय? तो सल्लागार तुम्हाला घरबसल्याही भेटू शकतो, केव्हाही वेळ देऊ शकतो. तुम्ही तसा प्रयत्न तरी कधी केला आहे काय? त्या दोघा मोठ्या कारभार्‍यांना तुमच्या पिताजींची खिदमत करण्यातून सवड झाली, तर शेतकरी वा व्यापार्‍यांना वेळ देणार ना? गरीब गरजूंसाठी त्यांना उसंत मिळत नाही आणि बारामतीला मेजवान्या झोडायला वेळ मिळत असेल, तर तिथल्या तिथे त्यांना खडसावण्याची संधी पुन्हा सुप्रियाताईंना सोडून दुसर्‍या कुणाला होती काय? पण तिथेही ताई निष्क्रीय़च राहिल्या. थेट तोंडावर जाब विचारण्याची संधी सोडून, अशी भाषणे देण्यातले नाटक कोणाच्या लक्षात येत नाही, अशी ताईंची समजूत आहे काय? बाकी गोष्टी सोडून द्या ताई, शक्य झाल्यास तुमची मोकाट झालेली गुरे आधी दावणीला आणून बांधा. निदान वर्षा बंगल्यावर जायचे असेल, तेव्हा जागेवर मिळायला हवीत ना?

5 comments:

 1. "भुजबळांना अटक झाल्यावर त्यांनी सर्वांनाच अटक करा आम्ही मराठे घाबरत नाही, अशी जाहिर ग्वाही दिलेली होती"
  → सुप्रिया ताईंकडून अशी अपेक्षा नव्हती,मराठा शब्द उल्लेखून जातीय ध्रुवीकरण करण्याचा हा प्रयत्न आहे असे वाटते.म्हणजे राष्ट्रवादीत फक्त मराठे आणि इतर पक्षात मराठे नाहीतच कि काय?
  अशी वक्तव्ये करण्यापेक्षा कायदेशीर लढाई लढावी.कारण कोर्ट न्याय करताना कोणाची जात पाहत नाही.
  "निर्दोष असतील तर सुटणार नाहीतर मग कुटणार".

  ReplyDelete
 2. माननीय शरच्चंद्र पवार यांच्या सुकन्या सौ . सुप्रिया सुळे यांनी श्री छगन भुजबळ यांच्या अटकेबाबत ,'मराठे अटकेला घाबरत नाहीत " अशी वीरश्रीयुक्त प्रतिक्रिया दिलेली आहे . राष्ट्रवादी म्हणवणाऱ्या पक्षाला संकटाच्या नुसत्या चाहुलीने अनुयायांमध्ये जोश आणण्यासाठी का होईना पण अशाप्रकारे जातीय अस्मितेचाच आधार घेण्याची वेळ यावी ही गमतीदार विसंगती आह.राष्ट्रवादी हा राष्ट्रीय अस्मितेची भाषा बोलणारा ,राष्ट्रीय म्हणवणारा पण वास्तविक पाहता केवळ महाराष्ट्रापुरता उरलेला प्रादेशिक पक्षच आहे हेच यावरून परत एकदा कळून आले .

  ReplyDelete
 3. ये पाले गए जानवर नहीं आदमखोर जानवर हैं।इनको मृत्युदंड देना चाहिए।

  ReplyDelete
 4. बारामती आणी पुणे ग्रामिण ला फायदा असलेली पुरंदर सिंचन योजना आपण १० वर्षात पुर्ण करु शकला नाहीत. २२० कोटी योजनेचा खर्च ८०० च्या आसपास झाला. आपले च पापं आहेत हे.

  ReplyDelete