Tuesday, March 22, 2016

कुतर्कतीर्थ भाईशास्त्री वैद्य

(छायाचित्र सौजन्य: दै. लोकमत’)
सोमवारी एका मित्राने अगत्याने ‘दिव्य मराठी’ दैनिकाच्या अग्रलेखाचा दुवा पाठवला. त्यात ‘भारतमाताकी जय’ घोषणेच्या संदर्भात बरेच विवेचन केलेले आहे. किंबहूना अशा विषयात दिवसेदिवस पुरोगामी म्हणवणारे शहाणे अधिकच कसे गाळात चालले आहेत, त्याचाही काहीसा उहापोह आहे. अखेरीस या अग्रलेखाने सल्ला दिला आहे, ‘राष्ट्रप्रेमाच्या हेतुत: केल्या जाणाऱ्या अवमानाचा फायदा शेवटी संघ परिवाराला होतो, हे पु्रोगाम्यांनी लक्षात घ्यावे.’ पण असे काही लक्षात घ्यायला किंवा त्यावर गंभीरपणे आत्मचिंतन करण्यासाठी भानावर असावे लागते. आपल्याच मस्तीत मशगुल असलेल्यांना आणि भ्रमातच सुरक्षितता शोधणार्‍यांना येऊ घातलेले संकट बघायचे भान नसते, की त्यावर उपाय योजण्याची सवड नसते. त्यापेक्षा आपली चुक झालीच नाही, हे पटवून देण्यात त्यांची शक्ती अधिक खर्ची पडत असते आणि ते करताना नवनव्या चुका तितक्याच उत्साहात केल्या जात असतात. आताही या अग्रलेखात काय सल्ला दिला आहे, त्याकडे कोणाचे लक्ष आहे? त्यापेक्षा आपण पुरोगामी चळवळ कशी अधिक खड्ड्य़ात घेऊन जावी, त्यावर पुरोगामी ज्येष्ठ आपली बुद्धी एकवटत असल्याचा दाखला सोमवारच्याच सकाळ दैनिकात वाचायला मिळाला. हमीद दलवाई यांनी सुरू केलेल्या मुस्लिम सत्यशोधक मंडळाच्या एका कार्यक्रमात सहभागी झालेले वयोवृद्ध समाजवादी विचारवंत भाई वैद्य, यांनी केलेले वक्तव्य त्याचा दाखला म्हणता येईल. सक्ती असेल तर भारतमाताकी जय असे कदापि म्हणणार नाही, अशी ग्वाही वैद्य यांनी त्या कार्यक्रमात दिली. किंबहूना संघ परिवार त्यासाठी आग्रही असेल, तर तसे अजिबात म्हणणार नाही, हा त्यांचा निर्धार आहे. याचा साधासरळ अर्थ कोणाच्या लक्षात आला आहे काय? यांच्याकडे कुठलाही स्वतंत्र कार्यक्रमच शिल्लक उरलेला नाही. संघाकडे त्यांनी ते काम सोपवले आहे.
म्हणजे संघाने काही ठरवले, की त्याला नुसता विरोध करत रहायचे. बाकी काही करण्याची आता पुरोगामी समाजवादी किंवा डाव्या मंडळींना गरजच वाटेनाशी झालेली आहे. म्हणूनच त्यांचे कार्यक्रम, सेमिनार किंवा अभ्यासगट यातून संघाविषयी अखंड चिंतन मनन चालू असते. त्यात आपण काय करावे, आपले भवितव्य काय? पुरोगामी चळवळीची दिशा कोणती असावी, असा काही उहापोह होत असल्याचे ऐकू येत नाही. बातम्या असतात पुरोगामी चिंतन शिबीराच्या, पण त्यात चिंतन मात्र संघाच्या भवितव्याशी किंवा संघाने करायच्या कामाशी संबंधित होत असते. संघाने काय ठरवले तर आपण काय करू; हेच अशा लोकांकडून आपल्याला ऐकायला मिळत असते. पण आपण काही करावे म्हणजे संघाला बदलावे लागेल किंवा समाजात काही बदल होतील, असे कधीच ऐकू येत नाही. थोडक्यात आजची पुरोगामी चळवळ ही संघकेंद्रित झाली आहे. संघाला प्रतिसाद द्यायला किंवा प्रतिवाद करण्यापलिकडे त्यांच्यापाशी काहीही उरलेले नाही. अर्थात संघाने काय करावे त्याच्याशीही पुरोगाम्यांना कर्तव्य नाही. जे काही संघ करील वा ठरविल, त्याला विरोध इतकाच अजेंडा पुरोगाम्यांच्या हाताशी उरला आहे. म्हणजे असे, की भारतमाताकी जय अशी घोषणा सर्वांनी द्यावी असे संघाला वाटत असेल, तर त्याला विरोध करणे हे पुरोगामी कार्य होऊन राहिले आहे. उद्या संघाने मुस्लिमांना आपल्यात सामावून घेण्याचा प्रयत्न केला, तर पुरोगामी त्याला विरोध करणार. किंवा संघाने समाजवाद स्विकारण्याची घोषणा केली, तर तात्काळ पुरोगामी समाजवादाच्या विरोधात दंड थोपटून बाहेर येतील. कारण कृती कुठली व त्यामागचा हेतू कुठला, हे पुरोगाम्यांसाठी निरर्थक झाले आहे. कृती कोण करतो त्यानुसार पाठींबा किंवा विरोध अशी आता पुरोगामी नितीमत्ता झालेली आहे. किंबहूना त्यामुळेच आपल्याच तत्वांनाही हरताळ फ़ासायला पुरोगामी मागेपुढे बघत नाहीत.
ज्या हमीद दलवाई यांच्या नावाने पुरस्कार वाटायला भाई वैद्य तिथे उपस्थित होते, त्यांच्या आयुष्यभर जपलेल्या उद्देश व हेतूंना अशा लोकांनी कधीच हरताळ फ़ासला आहे. ज्या मुस्लिम सत्यशोधक मंडळाच्या नावाखाली ह्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले होते, त्याच्या स्थापनेपासूनची पहिली मागणी समान नागरी कायदा अशी होती. भाई वैद्य असोत किंवा बाकीच्या समाजवादी नेत्यांनी चार दशकापुर्वी याच मागणीसाठी आटापिटा केलेला होता. पण १९८० नंतर संघाने वा भाजपाने समान नागरी कायद्याच्या मागणीचा पाठपुरावा सुरू केला आणि तात्काळ ती मागणी प्रतिगामी होऊन गेली. याचा अर्थ काय होतो? जोवर समाजवादी तीच मागणी घेऊन उभे हे होते, तोपर्यंत ती मागणी पुरोगामी होती. सेक्युलर होती. पण संघाने तिलाच पाठींबा दिला, तर लगेच समान नागरी कायद्याची मागणी प्रतिगामी होऊन गेली. समान नागरी कायदा संघाने मागितला, मग मुस्लिमांना धमकावणे किंवा कोंडीत पकडणे असते आणि समाजवाद्यांनी तीच मागणी केल्यावर त्यात मुस्लिमांना न्याय दिला जात असतो काय? हा कुठला चमत्कारीक न्याय आहे? कायदा एकच आहे तर कोणाच्या पाठींब्याने वा विरोधाने त्याचे पावित्र्य घटण्याचा संबंधच कशाला येतो? ज्या मागणीसाठी आपल्या हयातीत हमीद दलवाईंनी सर्व शक्ती पणाला लावली होती, तिलाच आजच्या पुरोगाम्यांनी तिलांजली दिलेली आहे. आणि असे लोक त्याच हमीद दलवाईंची स्मृती वा पुरस्कार साजरे करतात, यापेक्षा त्यांच्या कर्तबगारीची अन्य कुठली विटंबना असू शकते? अशा गतीने गेल्यास उद्या संघाने दलवाई यांच्या स्मृतीदिन साजरा केल्यास बहुधा भाई वैद्य आणि त्यांचे सहकारी हमीदच्या निषेधाच्या सभाही योजू लागतील. कारण संघाचा स्पर्श अशा सनातनी पुरोगाम्यांना वर्ज्य आहे ना? ही कुठली वर्णव्यवस्था आहे, ज्यात संघाच्या स्पर्शाने विटाळ होत असतो?
शनि शिंगणापुरात दैवताला महिलांनी स्पर्श केल्यास ती देवता विटाळते, हा दावा कुणाचा आहे? तर मनुवाद्यांचा! त्र्यंबकेश्वराच्या पिडींला महिलांनी जाऊन पुजाय़चे म्हटल्यास विटाळाचा दावा करणारेही मनुवादीच असतात ना? मग संघाने भारतमातेचा जयजयकार करायचा म्हटल्यास त्यात विटाळ शोधणारे पुरोगामी महामहोपाध्याय भाई वैद्य महा-मनुवादीच नाहीत काय? इतकी आजच्या पुरोगामीत्वाची विवेकबुद्धीशी फ़ारकत झाली आहे. आपण काय बोलतो आणि कसे वागतो, याच्यात काही ताळमेळ असावा, याचीही त्यांना गरज वाटेनाशी झाली आहे. जनमानसाशी त्यांचा पुरता संपर्क तुटला आहे. म्हणूनच त्यांनी उघडपणे अस्पृष्यतेचे समर्थन करण्यापर्यंत मजल मारली आहे. जसे जुन्या काळात दलिताच्या स्पर्शाने काहीही विटाळले जायचे, तसे आजच्याही काळात चालू आहे. फ़क्त आजचा सामाजिक दलित बदलला आहे आणि दलित ठरवणारे महामहोपाध्यायही बदलून गेलेले आहेत. आज वेदशास्त्रसंपन्न महामहोपाध्याय नसतात. तर पुरोगामीत्वाची पोथीपुराणे वाचून तयार झालेल्या, पोपटपंची करणार्‍यांना उपाध्याय मानले जाते आणि त्यांना झुगारणार्‍यांना दलित म्हणून वागवले जाते. म्हणून भारतमाताकी जय ही घोषणा वर्ज्य नसते, तर ती कोणाकडून म्हटली जाते, त्यानुसार वर्ज्य असते. कालपरवा दलित मंदिरप्रवेश मागत होता, त्याला मंदिरात यायला प्रतिबंध होता. आज पुरोगामी वा राष्ट्रीय विचार मंदिरप्रवेशाला संघवाल्यांना बंदी आहे. काळ किती बदलून गेला ना? सनातन धर्म किंवा मनुवादाची राजरोस हेटाळणी चालू असते आणि पुरोगामी मुखवटा चढवून तीच मनुवादी मानसिकता उजळमाथ्याने समाजात प्रतिष्ठीत म्हणून वावरत असते. अंधश्रद्धांच्या गोतावळ्यात यापेक्षा वेगळे काही अपेक्षित नसतेच. मात्र बाकीचा समाज त्यापासून मैलोगणती दुर गेलाय हे पुरोगाम्यांच्या लक्षात यायला खुप काळ लागणार आहे.

1 comment:

  1. उद्या संघाने मुस्लिमांना आपल्यात सामावून घेण्याचा प्रयत्न केला, तर पुरोगामी त्याला विरोध करणार. किंवा संघाने समाजवाद स्विकारण्याची घोषणा केली, तर तात्काळ पुरोगामी समाजवादाच्या विरोधात दंड थोपटून बाहेर येतील. कारण कृती कुठली व त्यामागचा हेतू कुठला, हे पुरोगाम्यांसाठी निरर्थक झाले आहे. >>>>>> Cool.

    ReplyDelete