Wednesday, March 2, 2016

हिमाचली मुख्यमंत्री शिवसेनेत दाखल?

हिमाचल प्रदेशात कॉग्रेसचे राज्य आहे आणि तिथे पाकिस्तान संघाचा क्रिकेट सामना ठेवू नका, अशी मागणी मुख्यमंत्र्यांनीच केलेली आहे. वीरभद्रसिंग हे तिथले कॉग्रेसी मुख्यमंत्री आहेत आणि त्यांनी तसे पत्रच केंद्रीय गृहखात्याला पाठवले आहे. त्यासाठी त्यांनी मांडलेली भूमिका कॉग्रेसला शोभणारी नसून, चक्क शिवसेनेच्या भाषेत हे पत्र वीरभद्रसिंग यांनी लिहीले आहे. सीमेवर भारतीय जवान पाकिस्तानी हल्ले व घातपाताने शहीद होत असताना इथे पाक क्रिकेट संघाचे स्वागत करायला जमणार नाही. कारण आपण देशप्रेमी आहोत आणि देशासाठी हौतात्म्य पत्करणार्‍या शहीदांचा सन्मान करतो, असे त्यांनी पत्रात म्हटले आहे. वास्तविक आजच्या सेक्युलर पुरोगामी कालखंडात ही तद्दन मागासलेली वा प्रतिगामी भाषा आहे. हे कॉग्रेसच्या एका जुन्याजाणत्या नेत्याला उमजायला हवे. देश आणि त्याच्या सुरक्षेपेक्षा शेजारी शत्रू देशातील कला, क्रिडा यांना प्रोत्साहन देणे पुरोगामी असते, ही त्यांच्या पक्षाची भूमिका आहे. म्हणून तर नेहरू विद्यापीठात देशविरोधी घोषणा झाल्यावर राहुल गांधी बाहू पसरून त्या घोषणाबाजांचे स्वागत करायला धावत सुटले होते. तेच राहुल आपले ज्येष्ठ नेते असल्याचे वृद्ध वीरभद्रसिंग यांना ठाऊक नाही, की तेच खुद्द कॉग्रेसमध्ये असल्याचा त्यांना विसर पडला आहे? आजकाल पुरोगामीत्वामध्ये देशप्रेम किंवा देशासाठी हौतात्म्य पत्करण्याला किंमत राहिलेली नाही. देशबुडव्या किंवा देशाच्या विनाशाच्या गर्जना करण्याला राष्ट्रवाद म्हणतात, याची जाण त्यांना उरलेली नाही काय? देशासाठी हनुमंतप्पा किंवा अन्य दहा जवान प्रतिकुल निसर्गाशी झुंजले, त्यांच्या अंतिम दर्शनासाठी राहुल फ़िरकले नाहीत, की त्यांना श्रद्धांजली द्यायला गेले नाहीत. पण उमर खालीद भारताचे तुकडे करण्याच्या गर्जना करीत होता, त्याची पाठ थोपटायला राहुल गेले होते. हे आपले पक्षीय धोरण वीरभद्रसिंग विसरलेत की काय?
शिवाय सीमेवर भारतीय जवान आजच शहीद होऊ लागलेले नाहीत. गेली तीन दशके सतत हा यज्ञ चालू आहे आणि त्यात शेकड्यांनी भारतीय सैनिकांचा बळी पडलेला आहे. पण त्यापैकी कोणाच्या हौतात्म्याची कदर करायला राहुल वा वीरभद्रसिंग गेल्याचे कोणी ऐकले नव्हते. त्याच कारणास्तव भारतात पाकिस्तानी खेळाडू वा कलाकार यांना येऊ देण्याच्या विरोधात शिवसेना सतत आवाज उठवते आहे. त्याच कारणास्तव पाकचे माजी परराष्ट्रमंत्री कसुरी यांच्या पुस्तकाचे प्रकाशन करण्याचा समारंभ शिवसेनेने हाणून पाडला होता. त्याचे आयोजन करणार्‍या सुधींद्र कुलकर्णी यांच्या तोंडाला शिवसैनिकांनी काळे फ़ासले होते. त्यावरून किती गदारोळ झाला होता? कॉग्रेस नेते व प्रवक्ते तर सेनेवर दहशतवादाचे आरोप करण्यासाठी आपली बुद्धी तेव्हा झिजवत होते. त्याच दरम्यान पाकचे गझलनवाज गुलाम अली यांचा कार्यक्रम सेनेने मुंबईत होऊ दिला नाही आणि रद्द करायला लावला. तेव्हाही शिवसेनेचे गुलाम अली यांच्याशी कुठलेही व्यक्तीगत भांडण नव्हते. सीमेवर शहीद होणार्‍यांच्या सन्मानार्थ सेनेने हा पवित्रा घेतलेला आणि सातत्याने घेतलेला आहे. तेव्हा सेनेवर संकुचितपणाचा व मुस्लिम द्वेषाचा आरोप करण्यात तमाम कॉग्रेसी व पुरोगामी शहाणे आघाडीवर होते. आज वीरभद्रसिंग ज्या भाषेतले व आशयाचे पत्र केंद्रीय गृहमंत्र्याला पाठवित आहेत, ती तशीच्या तशी शिवसेनेची भाषा आहे. मग तेव्हा शिवसेना चुक असेल तर आज वीरभद्रसिंग चुकीचे असायला हवेत आणि आज त्यांची भूमिका योग्य असेल, तर तेव्हाची शिवसेनाही योग्यच म्हणावी लागेल. यात कुठला निकष लावायचा? कशाला देशप्रेम म्हणायचे आणि कशाला जातियवाद म्हणायचा? अर्थात राहुल गांधी त्यावर काही बोलणार नाहीत आणि म्हणूनच तमाम कॉग्रेसवाल्यांनाही काही बोलता येणार नाही. कारण अजून राहुलनी देशप्रेम व देशद्रोहाच्या व्याख्या निश्चीत केलेल्या नाहीत.
एका गोष्टीची गंमत वाटते. ह्या पत्राची बातमी ब्रेकिंग न्युज होऊन गाजलेली का नाही? कुठल्याच वाहिनीला त्यात संकुचित जातियवाद कशाला दिसु शकलेला नाही? की जे शब्द वा आशय शिवसेनेने बोलले, मग जातियवाद असतो. त्याचीच कॉग्रेसने री ओढली मग पुरोगामीत्व असते, अशी पत्रकारी व्याख्या आहे? अर्थात वीरभद्रसिंग यांना अकस्मात भारतीय जवानांच्या हौतात्म्याचा उमाळा येण्याचेही कारण आहे. पुढल्या वर्षी तिथे विधानसभेच्या निवडणुका व्हायच्या आहेत आणि त्यात सैनिकांची मते निर्णायक ठरतात. देशातले एक छोटे राज्य असले, तरी तिथून सैन्यात भरती होणारी लोकसंख्या मोठी आहे. त्यामुळेच माजी सैनिक मोठ्या संख्येने त्या राज्यात मतदार आहेत. कालपरवाच नेहरू विद्यापीठातील देशद्रोही घोषणांच्या विरोधात जंतरमंतर येथे माजी सैनिकांनी एक मोठा मेळावा भरवून देशद्रोही घोषणांचे समर्थन करणार्‍यांचा निषेध केलेला होता. ज्यांनी अशा देशद्रोही विद्यार्थ्यांचे समर्थन केले, त्यांचाही माजी सैनिकांनी कडाडून निषेध केलेला आहे. त्यात कॉग्रेसचा राहुल गांधींमुळे समावेश होतो. सहाजिकच त्याचा प्रभाव हिमाचलच्या माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबीय मतदारांवरही पडण्याची भिती आहे. तसे झाल्यास विधानसभेत कॉग्रेसला मोठाच फ़टका बसू शकतो. त्यालाच घाबरून वीरभद्रसिंग यांना देशप्रेमाचा उमाळा आलेला आहे. राहुल गांधी यांनी आपल्या पोरकटपणातून देशभरची कॉग्रेस बुडवलेली आहेच. आता हिमाचलची कॉग्रेसची सत्ता त्यांच्या देशद्रोही समर्थनामुळे बुडीत जाण्याचे भय मुख्यमंत्र्यांना जाणवलेले असावे. त्यातून त्यांना राजकारण व क्रिकेटचे परस्पर संबंध लक्षात आलेले आहेत. अन्यथा त्यांनी धावतपळत केंद्रीय गृहमंत्र्याला असे पत्र कशाला लिहीले असते? अंगावरची कॉग्रेसची झुल उतरून वीरभद्रसिंग एका रात्रीत शिवसैनिक असल्यासारखे कशाला बडबडू लागले असते?
राजकारण मतांचे किती लाचार झाले आहे, त्याची लक्षणे यातून दिसतात. पाकिस्तान वा काश्मिर आणि मुस्लिम हा खरे तर मुलायम सिंग यांचा जिव्हाळ्याचा विषय! पण नेहरू विद्यापीठातल्या गदारोळात मुलायम सिंग अगदी गप्प आहेत. कुठलीही ठाम स्पष्ट भूमिका घ्यायची त्यांनी टाळाटाळ केलेली आहे. मागल्या विधानसभेत त्यांनी यशस्वीपणे मुस्लिम मते मिळवून बहुमताचा पल्ला गाठला होता. पण लोकसभेत त्याच मुस्लिमधार्जिण्या भूमिकेने तमाम सेक्युलरांचा उत्तरप्रदेशात बोर्‍या वाजला. म्हणून आताही नेहरू विद्यापीठ गाजत असताना मुलायम गप्प आहेत आणि मायावतींनीही हैद्राबादच्या रोहित वेमुलावरून तोफ़ा डागल्या, तरी नेहरू विद्यापीठ व तिथल्या पाकधार्जिण्या घोषणांविषयी मायावतींनी मौनव्रत घेतले आहे. करण उत्तर प्रदेशातही सैनिकांची मोठी संख्या असून त्यांच्या कुटुंबातील मतदारांनी विरोधात जायचे म्हटले, तर या दोन्ही उत्तरप्रदेशी नेत्यांचे राजकारण संपुष्टात येण्याचा धोका आहे. म्हणूनच बाकी तमाम सेक्युलर पक्ष एकवटले असताना, मायावती मुलायम मुग गिळून गप्प राहिले आहेत. हिमाचलमध्ये तर मुस्लिम लोकसंख्या नगण्य आहे. म्हणून वीरभद्रसिंग थेट शिवसेनेच्या कडव्या भूमिकेपर्यंत येऊन पाकिस्तानी क्रिकेट संघालाच विरोध करायला उभे ठाकले आहेत. हा आहे पुरोगामीत्वाचा अस्सल पाखंडी सेक्युलर चेहरा! ज्यात मुस्लिमधार्जिणेपणाही खोटा आणि संधीसाधू स्वरूपाचा आहे. राहुल गांधींच्या नेहरू विद्यापीठात जाण्याने जो देशद्रोहाचा डाग कॉग्रेसला लागला आहे, त्याने वीरभद्रसिंग भयभीत झाले असून त्यांनी शिवसेनेला शोभेशी राष्ट्रप्रेमाची कडवी भूमिका घेतलेली आहे. कारण भाजपाचे ज्येष्ठ नेता व माजी मुख्यमंत्री शांताकुमार यांनी यापुर्वीच हिमाचलमध्ये पाक संघाचा सामना ठेवण्याला विरोध केलेला होता. त्यामुळे मते गमावण्याच्या भयाने विरभद्रसिंग यांना राष्ट्रप्रेमाचा उमाळा आलेला आहे.

2 comments:

  1. भाऊ खरच या नागड्या व भामट्या पञकार सेल्यूलराँना थोबाड फौडून माजी सैनिकांचा हवाली करा मग पहा कसे गोळी झाडतात

    ReplyDelete
  2. थोडक्यात आवश्यक अशी राष्ट्रवादी वोट बॅक तयार व्हायला लागली आहै.

    ReplyDelete