Saturday, March 26, 2016

बेल्जमची इशरत जहानगेल्याच आठवड्यात युरोपियन महासंघाची राजधानी मानल्या जाणार्‍या ब्रुसेल्स महानगरामध्ये लागोपाठ तीन बॉम्बस्फ़ोट झाले. त्यातले दोन विमानतळावर आणि एक भुयारी रेल्वे स्थानकात झाला. त्यात किती माणसे मेली वा जखमी झाली, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. कारण सामान्य माणसे अशा घातपातामध्ये मरण्यासाठीच जन्माला आलेली असतात, असा आजकालचा पुरोगामी सिद्धांत आहे. पण त्यांच्या मृत्यूला वा हत्याकांडाला कारणीभूत असलेल्या कुणाही संशयितावर अन्याय होता कामा नये, याला आज खुप प्राधान्य आहे. शंभर निरपराध मेले तरी चालतील, पण एका संशयिताला धक्का लागता कामा नये; हे न्यायाचे सुत्र झाल्यावर यापेक्षा वेगळे काही घडण्याची अपेक्षा करता येत नाही. सहाजिकच कायद्याने व प्रशासनाने घातपाती, जिहादी वा दहशतवादी यांच्याकडे बघता कामा नये. अधिक कोणी संशयित नजरेने बघत नाही, यावर बारीक नजर ठेवणे, हे सरकारचे कर्तव्य बनून गेले आहे. मग किती मेले वा कोण जखमी झाले, त्याचा उहापोह करण्यात काय अर्थ आहे? म्हणूनच आपण त्यात संशयित कोण आहे आणि उगाच त्याला कायदा सतावत तर नाही ना, याचा उहापोह करणे योग्य ठरेल. चार दिवस त्या स्फ़ोटाला उलटून गेल्यावर बेल्जम पोलिसांना तिघा संशयितांचा शोध लागला. एका कॅमेराने टिपलेल्या तिघांपैकी कोणीतरी स्फ़ोट घडवले असल्याची शंका व्यक्त होऊन, त्यांचे छायाचित्र बेल्जम पोलिसांनी प्रदर्शित केले. त्यांचा शोध सुरू केला. तेव्हा कुणा सामान्य बेल्जम नागरिकांना त्यातल्या कोणाला ओळखता आले नाही. पण तिथून हजारभर मैल दूर असलेल्या तुर्कस्थान देशाच्या पोलिसांना मात्र त्यातला एक घातपाती ओळखता आला आणि त्या देशाच्या अध्यक्षानेच एक मोठा राजनैतिक गौप्यस्फ़ोट केला. यातल्या एका संशयिताला मागल्याच वर्षी तुर्कस्थानने अटक करून जिहादी म्हणून माघारी पाठवले होते. पण तो मुंब्र्याचा इशरत जहान इतकाच निरपराध असल्याचा निर्वाळा देत, बेल्जम सरकारने त्याच्याकडे काणाडोळा केला होता. मग व्हायचे ते होणारच ना?

गेल्यावर्षी म्हणजे २०१५ च्या जुन महिन्यात तुर्की-सिरीयाच्या सीमेवर पोलिसांनी इब्राहीम बुक्रावी नामक एका संशयिताला ताब्यात घेतले. तो युरोपातून इसिसच्या जिहादमध्ये सामिल व्हायला निघाला होता. तपास करता हा बेल्जमचा नागरिक असल्याचे निष्पन्न झाले. म्हणून तशी माहिती तुर्की सरकारने बेल्जियन दूतावासाला दिलेली होती. मग इब्राहीमच्याच आग्रहानुसार त्याला हॉलंडला पाठवून देण्यात आले. तिथून तो पुन्हा युरोपभर कुठल्याही देशात मोकाट हिंडू फ़िरू शकत होता. बेल्जम पोलिसांनी त्या माहितीचा तपास केला आणि तुर्की दावा फ़ेटाळुन लावत इब्राहीम हा किरकोळ गुन्हेगार असल्याचा निष्कर्ष काढत, त्याच्यावर साधी पाळत ठेवायचेही कष्ट घेतले नाहीत. त्यामुळे सिरीयातला उरलेला जिहाद मायदेशी करायला इब्राहीम बुक्रावी मोकळा झाला. ब्रिटीश वा अमेरिकन हेरखात्याच्या दफ़्तरी ज्याची जिहादी म्हणून नोंद आहे आणि तुर्कस्थानने ज्याला सिरीयात जिहाद करायला जाताना पकडून माघारी पाठवले, त्याला बेल्जमने आश्रय कशाला दिलेला होता? तर बेल्जम हा अत्यंत सहिष्णू देश आहे आणि त्यामुळेच सर्वधर्मसमभाव संभाळताना कुठल्याही मुस्लिमाकडे शंकेने बघणे तिथे गुन्हा आहे. मग भले त्याच्या विरोधात अनेक संशयास्पद गोष्टी सापडल्या, म्हणून काय झाले? अन्य देशांनी त्याला जिहादी ठरवले म्हणून काय झाले? त्याने घातपात केला म्हणून काय झाले? कित्येक माणसे हकनाक मारली गेली म्हणून काय झाले? माणसे वा त्यांचे जगणे दुय्यम आणि सर्वधर्मसमभाव प्राधान्याचा विषय असतो ना? आपल्याकडे इअशरतच्या वर्तनामध्ये कित्येक शंकास्पद गोष्टी आढळत असताना तमाम राजकीय नेते, पुरोगामी तिला निर्दोष ठरवायला अखंड राबत होते ना? आपल्याच हेरखात्याला गुन्हेगार ठरवून युपीए सरकारचे म्होरके इशरतला चकमकीचा बळी ठरवण्यात गर्क नव्हते का?

जेव्हा तुर्कस्थान इब्राहीम बुक्रावीला मायदेशी पाठवत होता, तेव्हाच गेल्या जुलै महिन्यात मुंबई स्फ़ोटातला आरोपी याकुब मेमन याची फ़ाशी रोखण्यासाठी किती मोठमोठे वकील वा विचारवंत अश्रू ढाळत होते ना? पण त्यापैकी एकाने कधी घातपातात मृत्यूमुखी पडलेल्यांसाठी डोळ्यात पाणी आणले होते काय? याला सर्वधर्मसमभाव किंवा उदारमतवाद, पुरोगामीत्व म्हणतात. अशाच पुरोगामीत्वाचा युरोपभर जिहादी सुळसुळाट झालेला आहे. फ़ाशीची शिक्षा अमानुष असल्याचा दावा करीत युरोपियन महासंघाने सर्व सदस्य देशांना अतिशय गुंतागुंतीचे मानवाधिकार कायदे संमत करायला भाग पाडले. त्यामुळे गेल्या काही वर्षात, युरोप हे गुन्हेगार, घातपाती व जिहादी लोकांसाठी आश्रयस्थान बनून गेलेले आहे. कुठल्याही अन्य देशात असे घातपाती हिंसा करतात, गुन्हे करतात आणि मग आपल्याला मूळ देशात फ़ाशी होईल वा मानवाधिकारांचे संरक्षण मिळणार नाही, असा बहाणा करून युरोपात आश्रय घेतात. मग तिथेही त्यांचा धिंगाणा सुरू होतो. पण त्याला स्थानिक कायदे वा पोलिस काहीही करू शकत नाहीत. कारण एकदा कागदोपत्री अशा गुन्हेगारांना आश्रय दिला, मग कितीही अमानुष असले, तरी त्यांच्या मानवी हक्काचे संरक्षण ही आश्रय देणार्‍या देशाची जबाबदारी बनून जाते. ललित मोदी व विजय मल्ल्यापासून गुलशनकुमारचा खुनी नदीम सैफ़ी ब्रिटनमध्ये असेच दडी मारून बसलेत ना? इब्राहीम बुक्रावी त्यापेक्षा वेगळा नाही. तो गुन्हेगार, खुनी वा जिहादी दहशतवादी आहे, हीच त्याला युरोपात आश्रय मिळण्यासाठी सर्वात मोठी पात्रता आहे. तितका तो घातक नसता, तर त्याला कधीच मायदेशी हाकलून लावले असते बेल्जमने! आपल्याकडे याकुब वा अफ़जल गुरूच्या नावाने आक्रोश करणारे किंवा इशरतच्या नावाने मातम करणारेही त्यातलेच आहेत. त्यांना बेल्जम वा युरोपसारखी सहिष्णूता हवी म्हणजे काय ते म्हणूनच आपण समजून घेतले पाहिजे. ज्याला आपल्या बापजाद्यांनी कसायाला गाय धार्जिणी असे पिढ्यानुपिढ्या म्हटले आहे, त्याला हल्ली पुरोगामी सहिष्णूता म्हणतात.

गेल्या जुलै महिन्यात तुर्कस्थानने इब्राहिम बुक्रावीला सिरीयात इसिसच्या जिहादमध्ये सहभागी व्हायला निघालेला बेल्जमचा नागरिक म्हणून पकडले आणि माघारी पाठवून दिले होते. समजा तेव्हाच त्याची गंभीर दखल घेऊन काही दक्षता ब्रुसेल्स पोलिस व बेल्जमच्या सरकारने घेतली असती, तर गेल्या आठवड्यातले स्फ़ोट घडले असते का? पण तुर्कस्थानने दिलेले पुरावे, इशारे तपासून बघण्यापेक्षा, असे आरोप करणार्‍या वा शंका काढणार्‍यांनाच मुस्लिमद्वेष म्हणून बदनाम केले जाते आणि मग त्याचा आडोसा घेऊन अधिकाधिक घातक जिहादी पोसले जोपासले जातात. त्याची प्रचिती प्रत्यक्ष घातपात घडल्यावर येते. पण दरम्यान कित्येक निरपराधांचा हकनाक बळी पडलेला असतो. कालपरवा ब्रुसेल्समध्ये वा काही महिन्यांपुर्वी पॅरीसमध्ये मारले गेले, त्यांचा काय गुन्हा होता? तर पुरोगामी, सेक्युलर म्हणवणार्‍या राज्यकर्त्यांच्या नेतृत्वावर त्यांनी विश्वास ठेवला. जे जिहाद वा घातपातालाच जोपासण्यात पुरोगामीत्व समजतात, अशा लोकांच्या नादी लागण्याची किंमत जगातल्या प्रत्येक जिहादी हल्ल्यातल्या बळींना मोजावी लागत असते. पुरोगामीत्वावर प्रवचन देणारे, सर्वधर्मसमभाव म्हणून किर्तन करणारे किंवा वाहिन्यांवर पोपटपंची करणारे, अशा घातपाताचे बळी नसतात. त्यांच्यासाठी हा निव्वळ एक राजकीय प्रयोग असतो. जसा इशरत जहान हा प्रयोग असतो! कुठल्या आधारावर नितीशकुमार वा शरद पवार यांच्यासारखे लोक इशरतला आपली ‘बेटी’ म्हणण्यापर्यंत मजल मारतात? ती दोषी असल्याचा पुरावा नसेलही. पण तिच्या निरपराध असण्याविषयी कुठला पुरावा त्यांच्याकडे असतो?  पण तरीही जेव्हा असले लोक इशरतच्या समर्थनाला उभे ठाकतात, तेव्हा जिहाद घातपाताला रोखणारी यंत्रणा वा पोलिस असतात, त्यांच्या मनात पवार नितीशकुमार दहशत निर्माण करतात. इशरत जिवंत असती, तर इब्राहीमपेक्षा वेगळे काही तिच्याकडून झाले नसते आणि इब्राहीम वेळीच चकामकीत संपला असता, तर ब्रुसेल्सच्या विमानतळावर मेट्रो स्थानकात हकनाक ३५ लोकांचा बळी गेला नसता.

https://www.rt.com/news/336952-erdogan-belgium-attacker-deported/

5 comments:

  1. भाऊ अगदी शंभर टक्के सत्य

    ReplyDelete
  2. https://www.facebook.com/451354288335270/videos/708180852652611/

    ReplyDelete
  3. भाऊ हा लेख वाचताना सारखं डोक्यात तुम्ही काही महिन्यापूर्वी "बेल्जीयम म्हणजे युरोपचे पाकिस्तान आहे" असे म्हणाला होतात.त्या संदर्भात तुम्ही १ लेख हि लिहला होतात. त्याचीच प्रचिती आता येत.

    ReplyDelete