Tuesday, March 8, 2016

सबसे पॉवरफ़ुल है डंडा

गर्दी किंवा जमाव कुठेही जमलेला असो, तो नाक्यावर कुणा खेळीयाने जमवलेला असो किंवा शिवाजीपार्क, जंतरमंतर रामलिला मैदानावरचा असो, नेहरू विद्यापीठातला असो; जमाव कधीच बुद्धीवादी नसतो. कारण जमलेल्या गर्दीचा एक समान विचार असतो किंवा अपेक्षा असतात. सहाजिकच त्यात सहभागी झालेल्या कुणालाही स्वतंत्र्यपणे विचार करता येत नाही किंवा स्वयंभू विचार करू दिला जात होती. ही प्राणिमात्रातील उपजत प्रवृत्ती आहे. त्यापासून माणूस वेगळा काढता येत नाही, की बुद्धीमानही वेगळे ठरू शकत नाही. पण आपण वेगळे आहोत हे दाखवण्याची हौस असलेल्यांना आपले हे पाशवी रुप लपवायचे असते. म्हणून ते अशा कळप वृत्तीला समविचारी असे नाव देतात. कन्हैयाकुमार या विद्यार्थ्याचे कौतुकाचे भाषण दाखवणारे किंवा त्याला ऐतिहासिक ठरवायला धडपडणारे, त्यापेक्षा अजिबात भिन्न नाहीत. वारंवार ते भाषण प्रक्षेपित करून त्यांना काय सिद्ध करायचे आहे, त्यापेक्षा त्यातून काय साध्य करायचे आहे, त्याकडे बघणे म्हणूनच अगत्याचे ठरावे. सभोवताली जमलेली कन्हैयाच्या पुरस्कर्त्यांची वा अनुयायांची गर्दी ज्याप्रकारे त्याला प्रतिसाद देत होती, त्यापेक्षा लोकपाल आंदोलनातील वा केजरीवाल गोतावळ्यातील गर्दी किंचित वेगळा प्रतिसाद देताना कधी दिसली होती काय? मोदींच्या सभा संमेलनात देशभर वा अगदी परदेशात ‘हर हर मोदी’ गर्जणारे आणि कन्हैयाला जोरदार प्रतिसाद देणारे, यातला गुणात्मक फ़रक कोणी सांगू शकेल काय? दोन्हीकडे जमाव तसाच प्रतिसाद देताना दिसतो. पण आमच्या जमावात शिकणारी हुशार बुद्धीमान मुले आहेत, त्यामुळे देशातला बुद्धीमान वर्ग आपल्या सोबत असल्याचा देखावा, या प्रक्षेपणातून साधायचा असतो. अन्यथा लालू वा कन्हैयाच्या भाषणात अन्य फ़रक सापडणार नाही. पण जे सदोदित मोदींच्या भाषणातल्या चुका शोधतात, यांनी कन्हैयाचे पोस्टमार्टेम केले आहे का?
भाषणाच्या ओघात कन्हैया हसवतो, किस्से सांगतो. कधी तो आपल्या गावच्या बाजारात स्टेशनवर अंगुठ्या विकणार्‍या जादुगाराची गोष्ट सांगतो, तर कधी तुरूंगातल्या कुणा पोलिसांशी केलेल्या गप्पांचा उल्लेख कथन करतो. नेमक्या अशाच गोष्टी केजरीवालांनी आपल्याला सांगितल्या नव्हत्या काय? कुणा रिक्षावाल्याने कमावलेले तीस रुपये आम आदमी पक्षाच्या प्रचाराला देणगी म्हणून दिल्याचा किस्सा! किंवा राहुल गांधी यांना दिल्लीच्या सिग्नलपाशी गाडी थांबली असताना भिक मागायला आलेल्या कुणा पोराने उत्तर प्रदेशातून आल्याचे केलेले कथन, आपण विसरून गेलो काय? झेडप्लस सुरक्षा असलेल्या व्यक्तीच्या गाडीपाशी भिकारी येऊन गुजगोष्टी करू शकतो काय? पण राहुल गांधी सांगतात आणि बाकीचे भक्तगण भारावून ऐकतात. कन्हैया तशाच गोष्टी सांगतो. कुणा पोलिस शिपायाशी त्याने केलेली बातचित मनोरंजक आहे. सर्वात पॉवरफ़ुल कोण, असा प्रश्न विचारल्यावर तो पोलिस शिपाई उत्तरतो, ‘ये हमारा डंडा!’ थोडक्यात राज्याची, सरकारची वा कायद्याची शक्ती त्या पोलिसाच्या डंड्यात सामावलेली आहे. कन्हैया त्याला लगेच मान्यता देवून पुढला प्रश्न विचारतो, पण तोच डंडा तु आपल्या इच्छेने चालवू शकतो काय? त्याचा अधिकार तुझ्यापाशी आहे, की दुसर्‍याच कुणाकडे आहे? तिथे शिपाई बिचारा वरमून जातो. किती झकास आझादीचे विवरण केले ना या बुद्धीमंताने? डंडा पोलिसाच्या हाती. पण तो चालवायचा आदेश देणारा भलताच! म्हणजे पोलिस निव्वळ कठपुतळी. मग असे पोलिस शिपाई हवालदार वा सेनेतले सैनिक यांचे कर्तृत्व कन्हैया कथन करतो. ते बिचारे सामान्य घरातले शेतकरी कुंटुंबातून आलेले, असे सांगताना वरीष्ठ अधिकारी उच्चकुळातून आल्याचे सुचवतो. थोडक्यात लढायला सामान्य वर्गातले आणि लढायचा निर्णय घेणारे उच्चकुळातले; असा सिद्धांत तयार होतो. यातली दिशाभूल कन्हैयाच्या लक्षात येत नाही, की तिथे जमलेल्या ‘बुद्धीमान’ जमावाच्याही ध्यानात येत नाही. जंतरमंतरच्या गर्दीलाही अशा गोष्टी उमजत नसतात. कारण ती गर्दी असते.
आता थोडी ही विधाने तपासून बघू. डंडा पोलिसाच्या हाती असतो. पण तो वापरण्याचा निर्णय त्याच्या हाती नसतो. म्हणजेच पोलिस हा सरकार वा राज्यकर्त्यांची गुलामी करतोय आणि त्याच्यापासून त्याला आझादी मिळणे, हाच लढा आहे. कुणावर डंडा चालवायचा अणि कुणावर डंडा चालवायचा नाही, याचा आदेश वरून येता कामा नये. तो निर्णय घेण्याचा अधिकार त्याच शिपायाकडे असला पाहिजे. त्याला आझादी म्हणतात. ती आझादी शिपायाला सरकार वा कायदा देत नाही. ती आझादी कन्हैया देणार आहे. किंबहूना तीच आझादी कन्हैयाने वा त्याच्या कुणा राजकीय पुर्वजाने नक्षलवाद्यांना दिलेली आहे. त्याच्याच कुणा राजकीय वडीलधार्‍याने तशी आझादी जिहादींना बहाल केलेली आहे. अफ़जल गुरू वा याकुब मेमन यांनी त्याच आझादीचा वापर केला आहे. त्याच आझादीतून कोणाचा बळी गेला? कुणा उच्चकुळातील व्यक्ती किंवा मुलाबाळांचे त्या आझादीने जीव घेतले नाहीत. समोर येईल त्या गरीब श्रीमंत, उच्च वा नीच अशा कुठल्याही जातीतल्या निष्पापांचा बळी त्या ‘आझादी’चा वापर करणार्‍यांनी घेतला आहे. त्या आझादीपासून त्याच सामान्य बळी पडणार्‍यांना संरक्षण देताना कन्हैयाच्या शेतकरी कुटुंबातले पोलिस, शिपाई वा सैनिक बळी पडले आहेत. त्यांचा बळी सरकारने घेतलेला नाही, तर कन्हैयाच्या आझादी सैनिकांनी घेतला आहे. अराजक नावाची आझादी असाच सामान्यांचा बळी घेत असते. अर्थात या कन्हैयाची आझादी अराजकात सहभागी असलेल्या नक्षल्यांना असते, जिहादमध्ये भाग घेणार्‍यांना असते. पण तीच आझादी सरकारने आपल्या गणवेशधारी सैनिकांना वा पोलिसांना दिली, तर कन्हैयाला ती गुलामी वाटू लागते. नक्षली व जिहादींप्रमाणे स्वयंनिर्णयाचा अधिकार सरकारने पोलिस वा सेनेला दिला आणि त्यांच्या पायातल्या मानवाधिकाराच्या बेड्या व साखळदंड काढून टाकले, तर कन्हैयाला मान्य आहे काय?
आज सरकारी सुरक्षा यंत्रणांना आपला पॉवरफ़ुल डंडा वापरण्याच्या अधिकारापासून (आझादीपासुन) सरकारने वंचित ठेवलेले नाही. मानवाधिकाराचे जे मक्तेदार आहेत, त्यांनीच पोलिसाचा डंडा त्याने वापरण्याची आझादी हिरावून घेतलेली आहे. जी आझादी पोलिसांकडून हिरावून घेतली आहे म्हणून त्या शिपायाशी सहवेदना कन्हैया व्यक्त केल्याचे सांगतो, ती आझादी गुजरातच्या पोलिसांना इशरत टोळीचा बंदोबस्त करताना सरकारने दिली होती. ती आझादी वापरून जिहादी दहशतवादाचे निर्दालन करणार्‍या वंजारा किंवा अन्य पोलिसांचा गुणगौरव कन्हैयाने केला आहे काय? त्या पोलिसांनी आपला ‘पॉवरफ़ुल डंडा’ वापरून दाखवला, त्यात इशरतचा बळी गेला, तर टाहो कोणी फ़ोडला? कन्हैयाचेच बोलविते धनी त्यासाठी अश्रू ढाळत बसले आहेत ना? तोच डंडा घेऊन छत्तीसगड वा गडचिरोलीत पोलिस नक्षलवाद्यांचा बंदोबस्त करू बघतात, तेव्हा त्यांची आझादी हिरावून घ्यायला कोणी संघवाला किंवा भाजपावाला कोर्टात धाव घेत नाही. तिथे कन्हैयाचे तमाम पुरोगामी कुटुंबिय धाव घेतात. खुद्द कन्हैया किंवा त्याच्या सहकार्‍यांना पोलिस आपल्या डंड्याची पॉवर दाखवायला सरसावले, तेव्हा कोर्टाबाहेर येऊन टाहो फ़ोडणार्‍या रुदाल्या कोण होत्या? कन्हैयाच्या भोवती जमलेल्या गर्दीतच त्या रुदाल्या होत्या ना? त्यापैकी कितीजणांना किंवा खुद्द कन्हैयाला आपण काय बोलतोय, ते तरी कळत होते का? त्या पोलिसाच्या ‘पॉवरफ़ुल’ डंड्याला आझादी नाही, म्हणून आझादीचे नखरे चालू आहेत. ते डंडे पोलिसांनी आपल्या मनासारखे वापरायला सुरूवात केली, तर आझादीची भाषा बोलणे दूर राहिले. त्याचे स्मरणही करायची शक्ती कन्हैया वा त्याच्या गोतावळ्यामध्ये उरणार नाही. तेव्हा निरर्थक शब्दांचे बुडबुडे उडवण्याची आझादी अबाधित आहे, तोवर तमाशे चालू द्या! कोणी तुम्हाला रोखलेले नाही. जोवर विवेकबुद्धीने चालणारी अडाणी जनता देशात बहुसंख्य आहे, तोवर तुमच्या आझादीची कोणाला फ़िकीर असणार नाही.

4 comments:

  1. भाऊ हेच दांडक घातल पाहिजे डोकीत बुद्धि वाटत असताना देव हे --- खायला गेले होते

    ReplyDelete
  2. Bhau, They are running a show to prove that power is corrupt and mis-used.
    Hence the current ruling party need to go. But the previous ruling party was also equaly corrupt.
    Even there is no guarentee that the naxal movement leaders will not be corrupt.
    Hence following constitution and getting it corrected if required is the only solution.
    I just feel pity for the parents who sent their kids to Jnu who get brainwashed.

    ReplyDelete
  3. भाऊ , ही बहुतांशी पुरोगामी म्हणवून घेणारी मंडळी पहिल्यापासूनच अत्यंत सामान्य वकुबाची असावीत असे वाटते. कारण मोदी विरोधासाठी त्यांनी जो मार्ग निवडला आहे तोच त्यांची अतिसामान्य वैचारिक पातळी दाखवून देतो. एकीकडे मोदी अथक परिश्रम करत आहेत आणि दुसरीकडे त्यांना तेवढाच विरोध ही मंडळी करीत आहेत. सामान्य जनता आपल्याइतकी बुददु नाही ही साधी गोष्ट त्यांच्या लक्षात कशी येत नाही याचेच आश्चर्य वाटते.

    ReplyDelete
  4. भाऊ, ह्या कन्हैय्यासारख्या फुटकळ बांडगूळांची शक्ति त्यांच्या टुकार आणि रद्दी भाषणाच्या पब्लिसिटीत आणि मार्केटींग मध्ये आहे. जोपर्यंत ह्या बाजारू मिडीयाचे लाड कोडकौतुकाने चालू राहतील तोपर्यंत रोज असले फालतू बाजारबुणगे पैदा होत राहतील. ह्यावर एकच उपाय आहे. प्रसार भारती सोडून दुसर्या वाहिन्यांना बातम्या प्रसार करण्यावर निर्बंध लादणे. असेही हे फालतू लोक कुठल्या ना कुठल्या कारणाने आरडाओरड करणारच. मग ह्यावरूनही ओरडूदेत काही वर्ष. हे जरासे गोध्रासारखे होईल त्यांच्यासाठी, पण परिणाम निश्चितच चांगले असतील.

    ReplyDelete