Friday, March 18, 2016

ख्रिस्ती धर्मानेच संहिष्णूतेचे थडगे बांधले आहे

संहिष्णूता वा असंहिष्णूता यावरचे नाटक नवे नाही. त्या संदर्भातला हा जुना लेख मराठी विचारवंत लेखक दिवंगत विश्वास पाटील यांचा आहे. तब्बल सतरा वर्षे जुना! चोखंदळ व चिकित्सक वाचकांसाठी तो संग्राह्य सुद्धा ठरावा.
———————————————–

धर्मांतराच्या मुद्द्यावरून ख्रिश्चन आणि ख्रिश्चनधार्जिण्या विचारवंतांनी प्रचाराचा गदारोळ उठवून देण्याचा प्रयत्न चालविला आहे. हिंदूत्ववाद्यांवर हिटलरचे वारस असण्याचाही आरोप केला जात आहे. या आरोपात आकांडतांडवाच्या व्यतिरीक्त दुसरे काहीही नाही. त्याच्या पुष्ठ्यर्थ काही पुरावाही दिलेला नाही. ख्रिस्ती धर्माच्या उगमाचा आणि प्रसाराचा इतिहास दडवून ठेवूनच हा आरोप केला जात आहे.’

धार्मिक संहिष्णूतेचा मुद्दा घ्या. ख्रिस्ती धर्म म्हणजे जणू धार्मिक संहिष्णूतेचा कळस असल्याचा आव आणला जातो. ज्या राष्ट्रातील लोकांचे धर्मांतर घडवून आणण्यात येते, त्या राष्ट्राच्या आत्म्यावर जो वार केलेला असतो, त्याची पुसटशी कबुलीही त्यांच्या (फ़ादर दिब्रिटो) लेखात नाही. पण इतिहास काय सांगतो? रोमन साम्राज्याचा इतिहास काय सांगतो? रोमन राज्यकर्ते मुक्त विचार आणि धार्मिक स्वातंत्र्याचे कट्टर पुरस्कर्ते होते. ‘देवांचा कोणी अपमान केला तर देवांनी त्याला बघून घ्यावे.’ असे रोमन सम्राट टायबेरीयस याची अधिकृत भूमिका होती. त्यामुळे ‘आमचाच देव खरा, तोच एकटा संपुर्ण विश्वाचा अधिष्ठाता’ ही हिब्रु ख्रिश्चनांची भूमिका रोमन लोकांना हेकटपणाची, असंहिष्णू, समाजविरोधी, धोकादायक आणि विषारी वाटली तरी त्यांनी त्यांना प्रतिबंध केला नाही. पुढे विचार आणि धार्मिक स्वातंत्र्याच्या हक्काचा गैरफ़ायदा उठवून ख्रिस्ती पंथाने अनेक गोरगरीब रोमनांचे धर्मांतर घडवून आणले. तेव्हा या पंथाला प्रतिबंध करण्याचे अर्धवट प्रयत्न केले गेले. मात्र विचारस्वातंत्र्य त्यांच्या (रोमनांच्या) रोमारोमांत भिनले असल्याने या प्रयत्नांमध्ये फ़ारसा जीव नव्हता. ख्रिस्ती दुसर्‍या शतकातल्या अनेक अपॉलॉजीस प्रसिद्ध आहेत. त्या वाचताच पहिली गोष्ट लक्षात येते ती ही, की कधी कधी राजकीय सत्ता ख्रिस्ती चर्चच्या हाती आली तर ते धार्मिक आणि वैचारिक स्वातंत्र्य वापरून त्यांनी सत्ता मिळवली होती, ते स्वातंत्र्य कायमचे नष्ट केले जाईल. ख्रिस्ती धर्माव्यतिरीक्त अन्य धर्मांची ससेहोलपट करण्यात येईल. .एखाद्या असंहिष्णू पंथाच्या विरुद्ध कठोर कारवाई करायची म्हणजे नेमके काय करायचे, याची कल्पना नसल्याने रोमन राज्यकर्त्यांनी गुळगुळीत उपाय योजले. कठोर कारवाई म्हणजे काय याची कल्पना चर्चला होती (जुना करार- ड्युटरॉनॉमी). विचार स्वातंत्र्य हा आमचा रास्त हक्क आहे असा दावा करून चर्चने मोठ्या संख्येने रोमनांचे धर्मांतर घडवले. सत्ता हाती येताच चर्चने विचारस्वातंत्र्य काढून घेतले. ख्रिस्ती धर्मामध्ये हुतात्मे आहेत आणि ते धर्माच्या नावाने बळी गेलेले होते. पण रोमनांनी नाईलाज म्हणून ती कारवाई केली होती. विचार स्वातंत्र्याच्या नावे यापैकी एकही बळी गेला नव्हता. ज्या देशात चर्चची सत्ता नसते, तेथे चर्च विचार व धार्मिक स्वातंत्र्याची मागणी करते; परंतु जेथे सत्ता चर्चच्या हाती असते, तेथे हे स्वातंत्र्य कदापि देत नाही. (जे. बी, बेरी – हिस्टरी ऑफ़ द फ़्रीडम ऑफ़ थॉट. चार्लस गिबन – डिक्लाईन एन्ड फ़ॉल ऑफ़ रोमन एम्पायर)
ग्रीक व रोमन विचरवंत
सुशिक्षित ग्रीक आणि रोमन नागरिक चिकित्सक विचारांचे मित्र होते आणि म्हणूनच उपजत संहिष्णू सुद्धा होते. ‘स्वत:ला अस्खलनीय मानणार्‍या धार्मिक सत्तेच्या पायाशी अक्कल गहाण ठेवा वा अमुक मताला वा मी परमेश्वराचा पुत्र म्हणून घेणार्‍याला शरण गेल्यासच परमेश्वराच्या राज्यात जागा मिळते, या कल्पना ग्रीक व रोमनांना भाकडकथा वाटत.’ ( जे. बी. बेरी).
ख्रिस्ती पंथ का ग्रीकांना फ़ुलीशनेस वाटतो – सेन्ट पॉल.
ख्रिस्ती चर्चेने अंमलात आणलेले कडवे धार्मिक धोरण आणि त्या धोरणाचे घोर परिणाम यामुळे पुढे जातिवंत विचारवंतांना (म्हणाजे जे आयडियॉलॉजिस्ट नव्हते, तर कोठल्याही प्रश्नाच्या मुळाशी जाऊन विचार करीत असत), त्यांना वैचारिक स्वातंत्र्याचा बौद्धिक व तार्किक आधार काय असू शकतो, या प्रश्नाने जागे केले. चर्च बरोबरच्या त्या लढ्यात हजारोजण चर्चने पेटावलेल्या आगीत जळून गेले. या सर्वांच्या आत्मबलिदानामुळे ग्रीक व रोमन विचारवंतांच्या ग्रंथामध्ये दडून बसलेला विचार स्वातंत्र्या़चा आत्मा शेकडो वर्षाच्या अंध:कारातून सूर्यप्रकाशात आला. (जे. बी. बेरी)
संघ परिवारावर खोटा आरोप
संघ परिवारावर टिका करणार्‍यांपैकी एक असलेले फ़ादर दिब्रिटो यांचा एक आरोप असा, की संघ हिटलरचा आदर्श गिरवित आहे. मात्र ते नेमके काय करीत आहेत हे सांगण्याचे त्यांनी चलाखीने टाळले आहे. खुद्द हिटलरने जी रक्तपाती कृत्ये केली, त्याचा नमूना त्याला जुना करार आणि ख्रिस्ती चर्चने ज्यु वा अरबांना जी वागणुक दिली, त्यात मिळाला असण्याची दाट शक्यता आहे. माल्कम नावाचे कॅथलिक इतिहासकार सांगतात की, ‘पहिल्या क्रुसेडचा प्रारंभ आणि शेवट ज्यु लोकांच्या रक्तपाताने झाला (१०९६)’. लॉर्ड एक्टन हे दुसरे कॅथलिक इतिहासकार लिहीतात की, ‘खांद्यावर क्रुस धारण करणार्‍यांनी प्रभूभोजनाचा (कम्युनियन) विधी आटोपताच दिवसाचा उरलेला वेळ ज्यु लोकांच्या माना तोडण्यात घालवला. सहा हजार स्त्रीपुरूषांना त्यांनी ठार केले. गॉडफ़्रे ऑफ़ बुईवा याने १०९९ च्या उन्हाळ्यात जेरूसेलम काबीज केले. पुढचा संपुर्ण आठवडा त्याने रहिवाश्यांची कत्तल करण्यात खर्च केला. ज्यु लोकांना त्याने सिनेगॉगमध्ये बंद केले व नंतर त्या सिनेगॉगला त्याने आग लावली. गॉडफ़्रे याने त्याच्या या पराक्रमाचे वर्णन करणारे पत्र पोपला पाठवले. त्यात तो लिहीतो की, ‘आपच्या लोकांनी इतक्या सारसिनींना (अरब वा मुस्लिम) कंठस्नान घातले, की सालोमनचे देऊळ आणि पोर्च घोड्याच्या गुडघ्याला लागेल इतक्या उंचीपर्यंत केवळ विषारी मानवी रक्ताच्या डोहाने भरले होते.’ माल्कम म्हणतात की, ‘क्रुसेडर्स आणि इन्क्वीझीशनवाले या दोघात कानामात्रेचा फ़रक नव्हता. माणुसकीच्या अभावाच्या बाबतीत ल्युथर, काल्विन, तसेच अन्य दुसरे सेन्ट (संतमहात्मे) यांच्यात डावेउजवे करता आले नसते. (वॉल्टर काफ़मन- फ़ेथ ऑफ़ अ हेरेटीक, पृष्ठ ६९) कमिटेड ख्रिश्चन, कम्युनिस्ट, नाझी वा अन्य कुणी यांच्यात फ़रक करण्याचे कारण नाही. माल्कम हे यांचे ‘युरोप एन्ड द ज्युज’ किंवा फ़ुल्टन यांचे फ़ाईव्ह हंड्रेड इयर्स ऑफ़ ए रिलीजन’ (तीन खंड) ही पुस्तके ख्रिश्चन बांधवांनी अवर्जुन वाचावी. ती न वाचणे म्हणजे मुर्खाच्या नंदनवनात रहाणे होय.
आता चर्च फ़ादर्स यांच्या संहिष्णूतेविषयी थोडेसे. माल्कम हे सांगतात की, ‘सेन्ट अम्ब्रोज (३४०-९७) म्हणत असे की, ‘सिनेगॉग म्हणजे साक्षात पाप आणि अधर्माचे घर, दुष्टता आणि दुर्जनांचे अधिष्ठान. खुद्द देवानेच सिनेगॉगला पापी ठरवले आहे (कंडेम्ड). सेन्ट अम्ब्रोजचे प्रवचन ऐकणार्‍यांपैकी काहींनी ते सिनेगॉग जाळून टाकले. तेव्हा महात्मा अम्ब्रोज उदगारला की, या सिनेगॉगला आग मीच लावली असे मी जाहिर करतो. निदान माझ्या आदेशावरून ती आग लावली गेली होती. ख्रिस्ताला ज्या ठिकाणी नकार दिला गेला, असे काहीही मागे शिल्लक रहाता कामा नये. म्हणून सिनेगॉगला आग लावण्यात आलेली आहे.’
साधारण सतराव्या शतकापर्यंत तरी एवढ्या तेवढ्या कारणावरून ख्रिस्तभक्त ज्यु लोकांच्या कत्तली करीत असत. प्रभू भोजनाच्या प्रसंगी चर्चमध्ये पाव आणि वाईनचा प्रसाद वाटला जातो. पाव म्हणजे प्रतिकरुपी ख्रिस्ताचा देह आणि वाईन म्हणजे रक्त. पाव आणि रक्त ग्रहण करणारा मेल्यावर स्वर्गात जातो अशी समजूत. एकप्रकारच्या बुरशीमुळे कधी कधी हा पाव लाल रंगाचा बनतो. पाव लाल बनला की कुणा दुष्ट ज्युने ख्रिस्ताच्य देहात सुरा खुपसला अशी आवई उठे आणि पाठोपाठ शेदोनशे ज्युंचा जीव घेण्यात येई. इन्क्वीझीशनच्या काळात चेटकाच्या आरोपाखली छोट्यामोठ्या वयाच्या हजारो स्त्रीयांना क्रुसला बांधून जिवंत जाळण्यात आलेले होते. (एक्स्ट्राऑर्डीनरी पॉप्युलर डेल्युजन्स एन्ड मॅडनेस ऑफ़ द क्राउडस- चार्ल्स मॅके)
आणखी काही नमूने
आता हिब्रु आणि जुन्या करारातील संहिष्णूतेचे काही नमूने. यहोवा हा हिब्रुंचा देव परमेश्वर त्याच्या आज्ञा, ‘खुन करू नका, व्याभिचार करू नका.’ पण हे नियम ज्युंनी इतर ज्युंच्या संबंधात पाळायचे होते. खुद्द मोझेस जेव्हा सिनाई पर्वतावरून परमेश्वराचे आज्ञालेख घेऊन जेथे त्याच्या बरोबरची मंडळी थांबली होती तेथे आला आणि आपले लोक सुवर्णाच्या वासराची पूजाअर्चा करीत आहेत असे दिसले, तेव्हा त्याक्षणी त्याने त्यातील तीन हजारांना कंठस्नान घातले. इतरांवर हल्ला करायचा झाल्यास हीच आज्ञा. ‘इतर जे लोक तुझा देव तुझ्या ताब्यात देईल, त्यांचा तू संहार कर. सर्व पुरूषांस तलवारीने मारून टाक. पण स्त्रिया व मुले आदिकरून जी लुट मिळेल ती आपल्यासाठी घे. … त्यांच्या ह्या वेद्या फ़ोडून टाक. त्यांच्या कोरीव मुर्ती अग्नीने जाळून टाक, मी परमेश्वर, तुझा देव परमेश्वर आहे. माझ्यासमोर तुला अन्य देव नसावा.
जोसेफ़ कॅम्बेल हे तुलनात्मक प्राक्ककथांचे अभ्यासक म्हणतात, ‘देवाच्या स्वरूपाबद्दलची ही हिब्राईक कल्पना मला अन्य कोठेही आढळली नाही (मास्कस ऑफ़ गॉड). वास्तविक यहोवा ही अनेक ठिकाणच्या ट्रायबल देवतेसारखी एक देवता. ख्रिश्चन ग्नॉस्टीक संहिता सांगतात की, ‘मी संपुर्ण विश्वाचा एकमेव देव परमेश्वर आहे, अशी गर्जना यहोवा जेव्हा करीत होता, तेव्हा आवाज झाला की, शामाएल तुझी चुक होत आहे! शामाएल याचा अर्थ आंधळा देव. यहोवा ही स्थानिक देवता अनंत दिव्यत्वाचा एक छोटासा स्थानिक अविष्कार. पण त्याला मात्र वाटते की तो म्हणजे संपुर्ण दिव्यच. देव या शब्दातून इंग्रजीत जे सत आणि असतच्या पलिकडे आहे, त्याचा निर्देश होतो. ते शब्दातीत आहे. कारण काळ आणि पैसा या द्वंद्वाच्या प्रांतात उतरल्यावाचून शब्दाचा अर्थ प्राप्त होत नाही. यहोवा हे एक रुपक होय. ती फ़ॅक्ट नव्हे.’ जोसेफ़ कॅम्बेल (पॉवर ऑफ़ मिथ).
प्रेषितांचा इहवाद
‘लिबरेशन थिऑलॉजी’ नावाच्या एका थिऑलॉजीचा फ़ा. दिब्रिटो यांनी उल्लेख केला आहे. थिऑलॉजी म्हणजे देव आणि दैविका संबंधीची बुद्धीनिष्ठ चर्चा. थिऑलॉजी हा शब्द साधारणत: ख्रिस्त धर्माच्या संबंधात वापरला जातो. थिऑलॉजीस अनेक आहेत. ‘क्रायसिस थिऑलॉजी, डेथ ऑफ़ गॉड, एपिरीकल, फ़िलॉसॉफ़ीकल वगैरे थिऑलॉजीस हे त्याचे आणखी काही प्रकार. थिऑलॉजीमध्ये देव आणि दैविकाची चर्चा मोडते. तेथे अर्थशास्त्रीय वा राजकीय विषय येत नाहीत, त्यामुळे फ़ा. दिब्रिटो जे सांगत आहेत की, लिबरेशन थिऑलॉजीच्या निमीत्ताने ख्रिस्ती मंडळी आहेरे आणि नाहीरे यांच्यातील अंतर कमी करण्यासाठी झटत आहेत व म्हणून भांडवलशाहीच्या मक्तेदारांचा त्यांच्यावर रोष आहे. वगैरे… ती त्यांची बौद्धिक गफ़लत आहे.
खरे तर ख्रिस्ती धर्माला याचे वावडे असायला हवे, हिब्रु मोझेस आणि प्रेषित मंडळी इहवादी होती. वर्तमान आयुष्य सुखात कसे घालविता येईल याची चिंता ते करतात. त्यांना (हिब्रुंना) सामाजिक न्यायाशी कर्तव्य आहे. जीजसला मरणोत्तर जगाशी, तेव्हा प्राप्त होणार्‍या परमेश्वरी राज्याशी कर्तव्य होते. परमेश्वराची आज्ञा मोडल्यामुळे अडामला परमेश्वराच्या सहवासाला मुकावे लागले होते. तो सहवास पुन्हा कसा प्राप्त होईल याची चिंता जीजस करतो.
मॅथ्यु-मार्क आदिंपैकी एकाच्याही शुभवर्तमानामध्ये सामाजिक न्याय पिळवणूक या विषयांना स्थान नाही. त्यांचे समिकरण सोपे आहे. तुम्ही जीजसला शरण जा, तुम्हाला स्वर्ग मिळेल. शरण जाऊ नका नरकात पडाल. कारण अडामपासून आजवरच्या पापासाठी जीजस सुळावर बळी गेला आहे. ‘किंगडोम ऑफ़ गॉड इज ऑफ़ नॉट थिस वर्ल्ड’ (जॉन १८:३६). नव्या कराराच्या चारच्या चार शुभ वर्तमानामध्ये मरणोत्तर स्वर्गाची लालूच आणि भावी नरकाची दहशत. दोन्ही सुत्रे आलटून पालटून येतात. दहशत साधीसुधी नाही तर अंतिम निवाडा, हेलफ़ायर, संपुर्ण शरीर नरकात फ़ेकण्यात येईल. अशा ऐकणार्‍याच्या मनाचा थरकाप उडवणार्‍या धमक्यांची आहे. नरकाच्या वर्णनाच्या तुलनेत बक्षिसाच्या रुपाने मिळणार्‍या स्वर्गाचे वर्णन अगदीच मिळमिळीत आहे. किंबहूना स्वर्गाबद्दल विशेष असे काहीच सांगितलेले नाही. शुभवर्तमानावर विश्वास ठेवायचा तर संपुर्ण जगाचा शेवट जवळ आला असून, बहुतेक सगळी माणसे शेवटी नरकाच्या खाईत सापडणार यावर खुद्द जीजसचा दृढ विश्वास होता असे दिसते. मात्र इतकी माणसे नरकाच्या दु:खात पडणार म्हणून जीजसला वाईट वाटल्याची नोंद कुठेही नाही. (वॉल्टर काफ़मन -रिलीजन इन फ़ोर डायमेन्शन्स)
तुम्ही पुण्यकृत्य करता की पापकृत्य या गोष्टीला ख्रिस्ती बक्षिस-शिक्षेच्या समिकरणात काहीही स्थान नाही. स्थान आहे ते तुम्ही ख्रिस्ताला शरण जाता की नाही या गोष्टीला. ‘मनुष्य नियम-शास्त्रातील (तोराह) कर्मानी नितीमान ठरत नाही, तर येशू ख्रिस्तावरील विश्वासाच्या द्वारे ठरतो. अशा समजूतीने आम्ही ख्रिस्तावर विश्वास ठेवला, यासाठी की आम्ही ख्रिस्तावरील विश्वासाने नितीमान ठरावे, नियम-शास्त्रातील कर्मानी ठरू नये’ (२:१६-१७) …. ‘जर नितीमत्व नियम-शास्त्राने आहे तर ख्रिस्ताचे मरण निरर्थक झाले’ (२:२१). नियमशास्त्राच्या योगे कोणी देवापुढे नितीमान ठरत नाही, हे उघड आहे. ‘ख्रिस्ताने आपणाकरता शापग्रस्त होऊन आपणाला नितीशास्त्राच्या शापापासून खंडणी देऊन सोडवले’ (३:१०, १४) पॉलचे गलतीकरांस पत्र. पॉलच्या युक्तीवादाचा एकमेव अर्थ हा की ज्यु आणि जेंटाईल यांच्यापैकी एकहीजण नियमशास्त्राचे नियम खर्‍या अर्थाने पाळू शकत नाही. म्हणजे ख्रिस्ताला क्रुसावर देण्यापुर्वी एकही मनुष्य नरकापासून वाचू शकलेला नाही. आता ख्रिस्त आमच्या पापासाठी क्रुसावर बळी गेला म्हणून आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवला तर नरकापासून वाचू. (रिलीजन इन फ़ोर डायमेन्शन्स).
लेखक:- विश्वास पाटिल, दादर
रविवार १४ फ़ेब्रुवारी १९९९
मुंबई तरूण भारत (आसमंत पुरवणी)

2 comments:

  1. गॉडफ़्रे ऑफ़ बुईवा याने १०९९ च्या उन्हाळ्यात जेरूसेलम काबीज केले. पुढचा संपुर्ण आठवडा त्याने रहिवाश्यांची कत्तल करण्यात खर्च केला. ज्यु लोकांना त्याने सिनेगॉगमध्ये बंद केले व नंतर त्या सिनेगॉगला त्याने आग लावली. गॉडफ़्रे याने त्याच्या या पराक्रमाचे वर्णन करणारे पत्र पोपला पाठवले. त्यात तो लिहीतो की, ‘आपच्या लोकांनी इतक्या सारसिनींना (अरब वा मुस्लिम) कंठस्नान घातले,he jar khare asel tar muslim athava eslam chi sthapana kadhi zali, mazya mahiti praman ti paigambar yanchya samanantar zali Mhanaje 500 te 600 chya darmiyan mag tya aadhi muslim kase aalet

    ReplyDelete
  2. मा.रूपेशजी,आपण कालगणना नीट तपासावी.सागितलेली घटना इस्लामच्या उदयानंतर सुमारे ४०० वर्षानी घडली आहे.

    ReplyDelete