Thursday, March 3, 2016

ख्वाजा युनुस नशीबवान नव्हता



   इशरतविषयीचे सेक्युलरांचे प्रेम म्हणजे मगरीचे अश्रू आहेत असे मी म्हणतो; त्याचा साक्षीदार सय्यद ख्वाजा युनूस सय्यद अयुब हा आहे. पण तुमचे आमचे दुर्दैव असे, की आज तो कुठल्या कोर्टातही येऊन साक्ष देऊ शकत नाही. कारण केवळ संशयित म्हणून पकडलेल्या औरंगाबादच्या युनुसला महाराष्ट्रातल्या सेक्युलर सरकारच्या पोलिसांनी कस्टडीतच रक्त ओकण्यापर्यंत मारले आणि मरायला यमयातनांमध्ये सोडून दिले. जेव्हा युनूस शेवटी त्या सेक्युलर यमयातनांचा बळी ठरला; तेव्हा आपल्या माथी खुनाचा आरोप येऊ नये म्हणून सेक्युलर सरकारच्या पोलिसांनी एक बनाव घडवून आणला. युनुस पळून गेल्याचे यशस्वी नाटक रचले. त्यासाठी त्याला औरंगाबाद येथे पुढील चौकशीसाठी घेऊन जात असल्याचे ते नाटक होते. प्रत्यक्षात त्याच्याऐवजी एक पोलिस शिपायालाच तोंडाला बुरखा गुंडाळून गाडीत कोंबण्यात आले. म्हणजे बाहेर बघणार्‍यांना वाटावे, खरेच पोलिस युनुसला कुठेतरी घेऊन निघाले आहेत. मग ती गाडी पवई पोलिस ठाण्यातून रवाना झाली आणि नगरमार्गे औरंगाबादला जात असताना तिला नगर जिल्ह्यात पारनेरनजीक अपघात झाला आणि त्याचा फ़ायदा घेऊन युनुस फ़रारी झाला; असे नोंदवण्यात आले. आता त्या घटनेला तेरा वर्षाचा काळ उलटून गेला आहे, पण युनुसचा कुणाला थांगपत्ता लागलेला नाही. लागणार सुद्धा नाही. कारण त्याच्याकडून आपल्या पापाचा कबुलीजबाब जबरदस्तीने घेण्यासाठी त्याला लाथाबुक्क्याने मारहाण करण्यात आली. त्यातच त्याचा मृत्यू झाला होता. पण पोलिसांच्या ताब्यात, पोलिसांच्या मारहाणीने युनुस मेला, असा दोषारोप नको म्हणून मग असा बनाव पार पाडला गेला. पण त्याचा एक साक्षिदार राहिला होता आणि म्हणूनच या सेक्युलर हत्याकांडाला वाचा फ़ुटली. त्या साक्षिदाराचे नाव आहे डॉ. अब्दुल मतीन. त्याने या सेक्युलर पापाला वाचा फ़ोडली नसती, तर अशा मुस्लिमांच्या सेक्युलर हत्याकांडाच्या गेली कित्येक वर्षे यशस्वीपणे राबवल्या गेलेल्या सेक्युलर ‘पुण्याचा’ बुरखा कधी फ़ाटला नसता. मतीन खुप सावध व हुशार निघाला. त्याने इतक्या घटना वेगाने घडत असतानाही जीव वाचवण्यासाठी मौन धारण केले होते. पण ज्या दिवशी कोर्टात हजर रहाण्याची संधी मिळाली व युनुसचा विषय कोर्टात निघाला; तेव्हा त्याने महाराष्ट्रातील सेक्युलर सरकारचा बुरखा टरटरा फ़ाडून टाकला. ख्वाजा युनुस पोलिसांच्या मारहाणीने अर्धमेला झाला होता, म्हणूनच पळून जाण्याचा स्थितीतच नव्हता; असे मतीनने कोर्टात सांगितले आणि कोर्टाने त्याची दखल घेतल्याने तमाम सेक्युलरांच्या मुस्लिम प्रेमाचा मुखवटा फ़ाटला.

   कोण होता हा ख्वाजा युनुस? काय गुन्हा होता त्याचा? त्याने कुठला घातपात केला होता? इशरतचे नाव निदान लष्करे तोयबाच्या वेबसाईटवर काही महिने होते व ती आपली फ़िदायिन असल्याचे त्यांनी जाहिरपणे म्हटले तरी होते. युनुसबद्दल असेही नव्हते. या कसाब टोळीच्या मुंबई हल्ल्यातल्या डेव्हीड कोलमत हेडली या साथीदारानेही तिचे नाव तोयबाची हस्तक म्हणून घेतलेले आहे. पण युनुसचे नाव अशा कोणी कुठल्या साक्षीत वा जबाबात घेतलेले नाही. मग युनुसचा गुन्हा तरी काय होता? हा युनुस माफ़िया टोळीतला कोणी शार्पशूटर होता काय? सेक्युलर महाराष्ट्र सरकारच्या मुंबई पोलिसांनी त्याला ताब्यात तरी कशाला घेतले आणि कोणाच्या आदेशानुसार घेतले? कारण जेव्हा युनुसला औरंगाबाद येथून मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले, तेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सेक्युलर कॉग्रेसचे नेते विलासराव देशमुख होते, तर उपमुख्यमंत्री व गृहमंत्री सेक्युलर राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ होते. त्या दोघांच्या इच्छेविरुद्ध मुंबई पोलिस अशी कुठली मुस्लिमांना सतावण्याची कृती करतील काय? जर गुजरातची प्रत्येक चकमक मुख्यमंत्र्याच्याच इशार्‍यावर होत असेल, तर महाराष्ट्रातही तेच होत असणार ना? मग ख्वाजा युनुसला ताब्यात घेण्याचा आदेश विलासरावांचा होता, की भुजबळांचा होता? आणि असा युनुस होता कोण? औरंगाबादचा ख्वाजा युनुस सॉफ़्टवेअर इंजिनीयर होता आणि दुबईमध्ये एका बहुराष्ट्रीय कंपनीच नोकरीला होता. अशी नोकरी करण्याला सेक्युलर भाषेत घातपाती वा दहशतवादी म्हणतात काय? नसेल तर युनुसला मुंबई पोलिसांनी कशाला ताब्यात घेतले? युनुस महिनाभराच्या सुट्टीवर दुबईहून मायदेशी आलेला होता व लग्न करण्याचा त्याचा विचार होता. इतक्यात २३ डिसेंबर २००२ रोजी भुजबळ विलासरावांच्या सेक्युलर मुंबई पोलिसांनी त्याच्यावर झडप घातली. त्याला अटक केली. ताब्यात घेतले आणि कोर्टासमोर हजर करून पुढील तपासासाठी कस्टडी घेतली. ज्या दिवशी तिथे औरंगाबदेत युनुसला मुंबई पोलिसांनी अटक केली, त्याच दिवशी मुंबईच्या जे. जे. रुग्णालयातून डॉ. अब्दुल मतीन यालाही अटक करण्यात आलेली होती. दोघांवर मुंबईत बॉम्बस्फ़ोट घडवल्याचा आरोप होता. काही दिवसच आधी मुंबई उपनगरात घाटकोपर येथे बसमध्ये स्फ़ोट झाले होते. त्याचा शोध घेताना पोलिस या दोघांपर्यंत पोहोचले होते. एकाला औरंगाबादेत तर दुसर्‍याला मुंबईत अटक झाली. योगायोग बघा, ज्या दिवशी या दोघा्चा सेक्युलर नरकवास सुरू झाला; त्याच दिवशी मुबईमध्ये मोठा सत्ताफ़ेर झालेल होता. ती तारीख होती २३ डिसेंबर २००२ आणि त्याच दिवशी महाराष्ट्रात सेक्युलर छगन भुजबळ यांनी तेलगी घोटाळा प्रकरणात आपल्या पदांचे राजिनामे दिले. पुढे दोनच दिवसांनी राष्ट्रवादीचे दुसरे सेक्युलर नेते आर आर आबा पाटील यांची गृहमंत्री पदावर नेमणूक झाली. पण विलासराव मात्र मुख्यमंत्री पदावर कायम होते.

   इथे युनुस व मतीन यांचा सेक्युलर नरकवास सुरू झाला आणि तिकडे महाराष्ट्रातल्या सेक्युलर राजकारणातही उलथापालथ सुरू झाली होती. आठवडाभरातच विलासराव यांच्यावर सोनियांची खप्पा मर्जी झाली आणि त्यांना सत्तेची खुर्ची सोडायची पाळी आली. त्यांच्याजागी सुशीलकुमार शिंदे महाराष्ट्राचा सेक्युलर कारभार संभाळण्यासाठी मुख्यमंत्री झाले. म्हणजेच युनुस व मतीन यांच्या सेक्युलर नरकवासाच्या काळात विलासराव, सुशीलकुमार, छगन भुजबळ व आर आर पाटील असे चार दांडगे सेक्युलर नेते महाराष्ट्रातल निर्णायक महत्वाच्या जागेवर होते आणि त्याच काळात मुस्लिम होतकरू तरूण इंजिनीयर युनुसच्या नशीबी असल्या सेक्युलर यमयातना आलेल्या होत्या. हा सेक्युलॅरिझमचा खरा चेहरा आहे. तो जितका मुस्लिमांसाठी वास्तव आहे तितकाच तो अन्य कुठल्याही धर्मियांसाठी हिंस्र व हिडीस आहे. १८ जानेवारी २००३ रोजी महाराष्ट्रात सत्तेमध्ये फ़ेरपालट झाला. आणि त्याच फ़ेरबदलाच्या कालखंडात युनुस बेपत्ता झाला. ती तारीख होती ७ जानेवारी २००३. त्या दिवशी मुंबई पोलिसांनी पवईच्या कोठडीतून युनुसला उचलले आणि औरंगाबादला नेत असताना मध्यरात्री त्यांच्या गाडीला अपघात होऊन युनुस फ़रारी झाल्याची तक्रार सकाळी पारनेरच्या पोलिस ठाण्यात नोंदवण्यात आलेली आहे. पण पुढे युनुसचा कुठेच थांगपत्ता लागला नाही आणि मतीनच्या कोर्टातील जबाबामुळे खुनाला वाचा फ़ुटली. युनुसच्या आईने त्याचा पाठपुरावा केला आणि कोर्टाने राज्य गुप्तचर खात्याकडे चौकशीचे काम सोपवले. त्यात युनुस कस्टडीतच पोलिसांच्या मारहाणीचा बळी झाला व त्यावर पांघरूण घालण्यासाठी पोलिस गाडीला अपघात व युनुस पळून जाण्याचे नाटक रंगवण्यात आल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार कोर्टाने युनुसच्या आईला सरकारने भरपाई द्याची असा आदेशही दिला. म्हणजेच महाराष्ट्रातील सेक्युलर सरकारच्या अधिकारात मुंबई पोलिस कुणाही नागरिक वा मुस्लिमाला संशयाखातर अटक करून ठार मारू शकतात, यावर कोर्टानेच शिक्कामोर्तब केलेले आहे. इशरतचे एकूण प्रकरण व त्यातले तपशील संशयास्पद असताना व अजून त्यातले काहीच कोर्टात सिद्ध झालेले नसताना; तमाम सेक्युलर मंडळी तिच्या नावाने अश्रू ढाळतात, त्यांचे युनुसबद्दल काय म्हणणे आहे? त्यांनी कधी एकदा तरी त्या निर्दोष, निष्पाप युनुसबद्दल दोन अश्रू ढाळलेत काय? अगदी त्यांच्या मुस्लिमप्रेमाची साक्ष म्हणून तरी त्यांनी त्याचा पुरावा दाखवावा. पण तो सापडणारच नाही. कारण सेक्युलर मंडळींना मुस्लिमांविषयी काडीचे प्रेम नाही, की मुस्लिमांच्या न्यायासाठी सेक्युलरांच्या मनात किंचितही आस्था नाही. असती तर तिची प्रचिती इशरतच्या आधी व इशरतपेक्षा जास्त प्रमाणात ती युनुस प्रकरणात दिसली असती.

   ह्या दोन प्रकरणातून एक आपल्या लक्षात येऊ शकेल. सेक्युलर म्हणून मिरवणारे, न्यायाबद्दल पोपटपंची करणारे, मुस्लिमांविषयी आपुलकीचे नाटक रंगवणारे जे कोणी आहेत, त्यांच्यावर मुस्लिम धार्जिणेपणाचा आरोप करणेही गैर आहे. त्यांना माणुसकी वा मानवता याच्याशीही कर्तव्य नाही. असते तर युनुसच्या बाबतीत त्यांनी टाहो फ़ोडलेला दिसला असता. इशरत वा साध्वी प्रज्ञा सिंग यात फ़रक त्यांनी केला नसता. पण असे शेकडो प्रसंग व घटना घडामोडी दाखवता येतील, की सेक्युलर भाषा बोलणारे व मिरवणारे निव्वळ दांभिक आहेत. त्यांच्या उक्ती कृतीमध्ये जमीन अस्मानाचा फ़रक दिसून येईल. बघणार्‍या हिंदूंना त्यांचा राग येईल. पण त्यांच्या अशा मानभावीपणा व शहाजोगपणाला भुलणार्‍या मुस्लिमांचीही हे सेक्युलर निव्वळ फ़सवणूक व दिशाभूल करीत असतात. शिकार करताना जसे पिंजर्‍यात वा सापळ्यात सावज लावले जाते; तसे हे सेक्युलर मुस्लिमांना आपल्या भाजपा विरोधी राजकारणार बळीचा बकरा म्हणून वापरत असतात. त्यामुळेच आपण वा आपल्या विचारानी चालणार्‍या सत्तेच्या अधिकारातील पोलिसांनी ख्वाजा युनुसला हालाहाल करून व यमयातना देऊन मारले; तर त्यांची दातखिळी बसलेली होती. कोणी अवाक्षर त्याबद्दल बोलले नाही. आज जे कोणी पोपट इशरतच्या नावाने गळा काढत आहेत, त्यांनी युनुससाठी किती अश्रू ढाळले व त्यासाठी तात्कालीन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व गृहमंत्री यांच्या विरोधात किती हलकल्लोळ केला होता? त्याचा एकतरी पुरावा कोणी समोर आणून देईल काय? म्हणून मी म्हणतो, इशरत व तिचे कुटुंबिय तुलनेने नशीबवान. तिचा मृत्यू मोदींच्या गुजरातमध्ये चकमकीत झाला व तिचा मृतदेह तरी हाती लागला. महाराष्ट्रात सेक्युलर सरकारच्या अधिकार क्षेत्रातल्या पोलिसांकडून इशरत पकडली वा मारली गेली असती; तर युनुसप्रमाणे तिचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठीही मिळू शकला नसता. अन्याय व्हावा तरी तो गुजरातमध्ये मोदींच्या राज्यात व्हावा, सेक्युलर सत्ताधार्‍यांच्या राज्यात तो प्रसंग ओढवणे अधिक भीषण, पाशवी असते.

(जुलै २०१३ मध्ये लिहीलेला लेख आहे)

7 comments:

  1. Tumche lekh vachayla mi ek mahinya purvi suruvat keli hoti. mal ek prashn padlay ki tumche saglech lekh kase pro-modi aastat.Tumhala modi nchya saglyach goshti barobar vat tat.2007 la GST la virodh karnare modi ata kase GST aanu pahatayet yachya vr nahi tumhi kadhi lekh lihila...Pan ata mala tumchi marketing strategy aawadli.Tumhala mahiti he aaj modi bhaktanchi sankhya jast ahe.Tya mulech tumhala ase lekh lihave lagtat.

    ReplyDelete
    Replies
    1. Truth will justify himself
      Satya baher aanane mhanje modibhakti kay
      Bjp chya hi baryach nirnayavar bhau ni lekh lihale ahet
      Please. Go through. It

      Delete
  2. काका, आज लोकमतमध्ये ‘इशरत‘ वरून सुरू झालेला पोरखेळ नावाचा संपादकीय लेख आला आहे. त्याची पण चिरफाड केलीत तर बरं होईल.

    ReplyDelete
  3. एक प्रश्न उरतोच, युनुसला अटक का केली? त्यांच्याकडे त्याच्या बॉम्बस्फोट सहभागाचे पुरावे होते तर खटला न्यायालयात का नाही उभा केला? न्यायालयात जायच्या आधीच त्याला पोलीसांनी इतकी जबर मारहाण का केली? कोणाही निरपराध माणसाला असा त्रास देणं हे सर्वस्वी चुकीचंच आहे.....मग तो माणूस कोणत्याही देशाचा, धर्माचा, जातीचा का असेना.

    ReplyDelete
  4. मस्त.माहितीपूर्ण लेख भाऊ.

    ReplyDelete