Wednesday, March 23, 2016

हिंदूतला मुस्लिम जागवणारे

सोमवारी ‘दिव्य मराठी’ दैनिकात ‘डिवचलेले उधाण’ या शिर्षकाचा अग्रलेख प्रसिद्ध झाला आहे. त्यातून पुरोगामी अतिरेक व मुर्खपणाचा लाभ, संघ व भाजपाला कसा मिळतो, त्याचा उहापोह छान केलेला आहे. खरे तर त्यात नवे असे काही नाही. बावीस महिन्यांपुर्वी पुरोगाम्यांना भ्रमातून खेचून बाहेर आणणारा प्रचंड विजय संपादन केलेल्या नरेंद्र मोदी यांचा शपथविधी राजधानी दिल्लीत चालू होता. त्याच दिवशी दक्षिणेतील ख्यातनाम इंग्रजी दैनिक ‘द हिंदू’मध्ये एक अप्रतिम विश्लेषणात्मक लेख प्रसिद्ध झाला होता. शिव विश्वनाथन ह्या प्राध्यापक विचारवंताचा तो लेख होता. त्याचे शिर्षकच बोलके होते. आपला मुर्खपणा कबुल करण्यासाठीच त्यांनी तो लेख लिहीला होता. ‘माझ्यासारख्या उदारमतवाद्याला मोदींनी कसे हरवले’ असे त्याचे शिर्षक होते. अर्थात मी खुप नंतर तो लेख वाचला. माझा समाजवादी मित्र सुनील तांबे याने फ़ेसबुकवर लिन्क टाकल्यामुळे माझे तिकडे लक्ष गेले. अनेकांनी तो लेख नक्कीच आणि तेव्हाच वाचलेला असणार. प्रश्न इतकाच आहे, की इतके सुंदर विवेचन असूनही त्याचा कुणी थोडातरी गंभीरपणे विचार केला होता किंवा नाही? कारण आज बावीस महिन्यानंतर ‘दिव्य मराठी’त नेमके तेच विवेचन तसेच्या तसे आले आहे. थोडक्यात तीन वर्षापुर्वी मोदींना पुरोगाम्यांनी यशस्वी होण्यास जसा हातभार लावला होता, तेच तसेच्या तसे आजही चालू आहे. म्हणजे अनुभवातून कोणीच काहीही शिकायला तयार नाही. दोन प्रमुख विचारांच्या भोवती समाजातील काही लोक गोळा होत असतात. पण त्यांच्याही पलिकडे प्रचंड मोठी लोकसंख्या असते आणि तिच्याच पाठींबा किंवा विरोधामुळे एकाला बाजी मारता येत असते. लोकशाही संघर्षात कुठल्याही बाजूची बांधिलकी नसलेल्या लोकसंख्येला आपल्या बाजूने ओढण्याला महत्व असते. कारण तोच पारडे झुकवणारा मतदार असतो.
लोकशाही बहुमताने चालते आणि म्हणूनच बहुसंख्यांकांना आपल्या बाजूने राखण्याला प्राधान्य असायला हवे. याचा अर्थ अल्पसंख्यांकांची गळचेपी असा अजिबात होत नाही. पण अल्पसंख्यांकांना न्याय म्हणजे प्रत्येक वेळी व प्रत्येक बाबतीत बहुसंख्यांकांची मुस्कटदाबी असा होत नाही. जेव्हा असे होऊ लागते, तेव्हा बांधिलकी नसलेली लोकसंख्या विचारापेक्षा श्रद्धा व भावनांना दाद देऊ लागते. ज्याची प्रचिती आजकाल अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांच्या उमेदवारीच्या बाबतीत येत आहे. मुस्लिम अल्पसंख्य आहेत, म्हणून त्यांचे इतके चोचले प्रत्येक पक्षाने अमेरिकेत पुरवले आहेत, की मुस्लिम नसलेल्यांना गळचेपी असह्य झालेली आहे. पण त्याविषयी कोणी बोलायलाही राजी नाही. ट्रम्प यांनी ते स्पष्ट शब्दात बोलायची हिंमत दाखवली आणि त्यांना अनपेक्षित पाठींबा मिळत चालला आहे. अगदी त्यांच्याच रिपब्लिकन पक्षाला देखील ट्रम्प माथेफ़िरू वाटतो आहे. पण जनतेला मात्र त्याचे बोल पटू लागले आहेत. त्याचा अर्थ ट्रम्पचा आगावूपणा लोकांना मान्य आहे असेही नाही. पण नावडते सत्य बोलायची त्याची हिंमत दाद मिळवून जाते आहे. हेच मोदींच्या बाबतीत दोन अडीच वर्षात होऊन गेले. जगभर हेच होत आलेले आहे. शिव विश्वनाथन यांनी त्याबद्दल विवेचन केले होते. पुरोगामीत्वाच्या नावाखाली देशातल्या बहुसंख्य हिंदूंना इतके धमकावण्यात येत असते आणि दुखावले जात असते, की त्याच्या विरोधात खमकेपणाने कोणी बोलू लागला, तर लोकांना तो आवडू लागतो. ती व्यक्ती आवडते याचा अर्थ त्याचे विचार आवडलेले नसतात, तर भंपकपणाला झुगारण्याची त्याची हिंमत लोकांना भारावून टाकत असते. अकारण उठसुट लोकांच्या मनात अपराधगंड निर्माण करायचा प्रयत्न झाला, मग अशी प्रतिक्रिया उमटत असते. हेच बावीस महिन्यांपुर्वी शिव विश्वनाथन यांनी लिहीले होते आणि सोमवारी ‘दिव्य मराठी’ने कथन केले आहे.
सवाल इतकाच आहे, की त्याचा गाभा कोणी पुरोगामी समजून घेणार आहे किंवा नाही? त्या लेखात विश्वनाथन यांनी एका जागी बुद्ध धर्माचे जागतिक गुरू दलाई लामा यांचा उल्लेख केला आहे. ‘इराकविषयी अमेरिकेचे तात्कालीन अध्यक्ष जॉर्ज बुश जितक्या आवेशात बोलत होते, त्यामुळे आपल्यातला मुस्लिम जागा होतो’ असे दलाई लामा एका जागी म्हणालेले होते. याचा अर्थ समजून घेतला पाहिजे. लामा हे बौद्ध धर्माचे गुरू असताना, त्यांच्यातला मुस्लिम जागा होतो, म्हणजे नेमके काय होते? जो माणुस मुस्लिमच नाही, त्याच्यातला मुस्लिम जागा होतो, याचा अर्थ कसा घ्यायचा? तर मुस्लिम हा कट्टर धर्मवादी असतो आणि धर्मासाठी खुप आक्रमक असतो. धर्मासाठी मुस्लिम लढाईला प्रवृत्त होतो. किंबहूना धर्मावरून डिवचला गेल्यास मुस्लिम हिंसक होतो, असे दलाई लामांना सुचवायचे आहे. बुश यांची भाषा इतकी डिवचणारी आहे, की दलाई लामांसारख्या शांततावादी धर्मगुरूलाही ती प्रतिकार करण्यासाठी डिवचून उभी करू शकते, असा त्याचा अर्थ आहे. माणसे सामान्यत: शांत असतात आणि शांततावादी असतात. त्यांची कोंडी केली वा त्यांना सतत डिवचले, तर प्रतिकाराला प्रवृत्त होण्यापलिकडे त्यांना पर्यायच शिल्लक उरत नाही. लढणे अथवा हिंसक प्रतिकार करणे हा मानवाचा स्वभाव नसतो. पण सतत कोंडी केल्यास घुसमटल्यासारखा माणूस मोकळा श्वास घ्यायला उलटून अंगावर येऊ शकतो. माझ्यातला मुस्लिम जागा होतो, असे दलाई लामा त्यासाठीच म्हणतात. ज्याची ‘डिवचलेले उधाण’ अशी व्याख्या ‘दिव्य मराठी’ने केलेली आहे. गेल्या काही वर्षात पुरोगामीत्वाच्या भंपक अतिरेकाने नेमकी तीच गोष्ट सातत्याने करून शांततावादी हिंदूंच्या मनातल्या भावनांना डिवचले आणि त्याचा लाभ मोदींनी धुर्तपणे उचलला आहे. अशावेळी त्याच हिंदू समाजाला अधिक डिवचणे कोणाच्या पथ्यावर पडेल?
शेवटी लोकशाही मतांवर चालत असेल तर लोकांची मते बनवणे महत्वाचे असते. ती मते बनवताना भावनाही मोलाच्या असतात. भावना प्रतिकांशी निगडीत असतात. त्या प्रतिकांचे विडंबन वा हेटाळणी त्याच समाजाला डिवचत असते आणि अंगावर यायला भाग पाडत असते. गेल्या पाचसात वर्षात मोदींना लक्ष्य करण्यातून प्रत्यक्षात हिंदू समाजाला डिवचण्याचा मुर्खपणा सातत्याने होत राहिला आणि भाजपा नव्हेतर मोदी हे बहुसंख्य हिंदूंच्या भावनेचे प्रतिक होऊन गेले. मिळालेले यश हिंदूत्वाचे वा भाजपाचे नव्हेतर दुखावलेल्या लोकभावनेचे होते. हिंदूंना उठसुट दुखावणार्‍या पुरोगाम्यांना हाणलेली ती चपराक होती. वर्षभर मोदी सरकार बघितले आणि हळुहळू हिंदू बहुसंख्यांकही त्या डिवचलेल्या मानसिकतेतून बाहेर पडू लागले होते. त्याचा परिणाम मतदानावरही पडू लागला होता. बिहारचे निकाल हिंदूत्वाचा पराभव नव्हता. लोक डिवचलेल्या मानसिकतेतून बाहेर पडल्याचा दाखला होता. तर तीच आपल्या विकृत पुरोगामीत्वाला मान्यता समजून पुन्हा हिंदूंना दुखावण्याचा उद्योग राजरोस सुरू झाला. आता हिंदूत्व मागे पडले असून राष्ट्रवाद किंवा राष्ट्रप्रेम यावरून सामान्य माणसाला डिवचण्याचा पोरखेळ रंगला आहे. आपण अचकट विचकट बोलून संघवाले वा मोदीभक्तांना डिवचतोय याचे समाधान जरून पुरोगामी मिळवत आहेत. पण वास्तवात ते पुन्हा एकदा त्याच बहुसंख्य बांधिलकी नसलेल्या मतदाराला डिवचून एकत्र आणण्याची प्रक्रिया सुरू करून बसले आहेत. ‘भारतमाताकी जय’ ही नुसती घोषणा नाही, तर लोकभावना आहे. तिला डिवचल्याचा परिणाम क्रिकेटच्या मैदानावर दिसला तसाच खेड्यापाड्यापर्यंत दिसला. उन्माद मोदी वा संघाला निर्माण करणे शक्य नाही, इतका तो उन्माद पुरोगामी डिवचण्यातून उदयास आलेला आहे. हिंदूंमधला कटटरपणा आपण जागवतोय, याचे भान सुटलेल्या पुरोगाम्यांकडून यापेक्षा अधिक काय अपेक्षा करावी?

7 comments:

  1. भाऊ फर्ग्युसन मध्ये जो राडा झाला त्यावर पण एक लेख लिहा ना

    ReplyDelete
  2. https://www.washingtonpost.com/news/morning-mix/wp/2016/03/24/ga-parents-offended-by-the-far-east-religion-of-yoga-get-namaste-banned-from-school/?tid=sm_tw/...Sharing a link of Washington Post's article on yoga.

    ReplyDelete
  3. दिल्ली मध्ये डॉक्टर पंकज नारंग यांना मुस्लिम जमावाने ठार केले . इतर वेळी एखादा मुस्लिमासाठी दिवस रात्र एक करणाऱ्या सेकुलर ,विचारवंत ,बुद्धिवंत ,पुरोगामी ,सामाजिक जाणिवेचे भान असणारे ,यांना हे दिसले नाही का ? मारला गेलेला हिंदू आहे आणि मारणारे मुस्लिम आहेत म्हणून डोळे बंद करून झोपणारे ,किंवा दुर्लक्ष करणारे हेच लोक आमच्यातला मुस्लिम जागा करतायत .

    ReplyDelete
  4. Bhau - I don't think religion was really at play here - or at least not to the extent it is naturally made out to be a factor for Trump win out in India. I live here on west coast of the US - Silicon Valley, California to be specific. In a way, my world view of US view was limited to what I could see out here. But sadly, the picture in Michigan, Wisconsin, Ohio and Pennsylvania was lot different. Industrial jobs have been lost - and not just in last 8 years but frankly for since early 2000s. It's just that the electorate in these states got a chance to express their anger through these elections. Now some of these jobs have been shifted overseas but a significant reason for these losses have been automation and that robots now do what humans did 20 years back - as simple as that. It boils down what helped Bill Clinton back in 1992 -- "Its the economy stupid".

    ReplyDelete
  5. याही पलिकडे खूप गोष्टी आहेत

    ReplyDelete
  6. Excellent analysis.pseudo secularists in India are hypocrates and it has been proved time and again.

    ReplyDelete
  7. भाऊ सही पकड़े है

    ReplyDelete