Tuesday, March 8, 2016

गझलनवाज कुठे फ़रारी झाले?

काही महिन्यापुर्वी मुंबईत जगजीतसिंग यांच्या स्मरणार्थ एक समारंभ योजला होता. त्यात पाकिस्तानचे प्रसिद्ध गायक गुलाम अली यांना आमंत्रित करण्यात आले होते. त्याला शिवसेनेने कडवा विरोध करीत नेहमीप्रमाणे आंदोलनाचा इशारा दिला. अर्थात तशी वेळ आली नाही आणि आयोजकांनी पक्षप्रमुखाशी संपर्क केल्यावर तो समारंभच मागे घेतला. त्यामुळे भारतातले बहुतांश गजालनवाज (मालवणीत गजाल म्हणजे गप्पा) कमालीचे हताश निराश झाले. सहाजिकच ज्यांनी आयुष्यात कधी कुठला मुशायरा वा गायनाचा कार्यक्रम बघितला ऐकला नसेल, असे हे गजालनवाज गुलाम अलीचा समारंभ आयोजित करायला हिरीरीने पुढे आलेले होते. केरळ, दिल्ली वा कोलकात्यात अगत्याने या पुरोगामी गजालनवाजांनी गुलाम अलीला अगत्याने आमंत्रित करून सन्मानित केले होते. तिथेच न थांबता राजकारण सीमावाद आणि कला यांचे क्षेत्र कसे भिन्न आहे; त्यावर प्रवचने दिलेली होती. दिल्लीचे केजरीवाल, बंगालच्या ममतादिदी किंवा केरळचे उमन चंडी त्यात आघाडीवर होते. त्यापैकी ममतादिदीमध्ये गुलाम अलींना साक्षात सरस्वतीचे दर्शनही घडले होते. असे हे महानुभाव आज तसाच प्रसंग ओढवला असताना अकस्मात कुठल्या बिळात लपून बसले आहेत? कारण जसे गायन वा कला ह्या राजकारणापासून अलिप्त असतात, तशीच क्रीडाही राजकारणमुक्त असते. त्यामुळेच जे गजालनवाज गुलाम अलीचे गुलाम आहेत, त्यांनीच आजवर पाक क्रिकेटचेही असेच समर्थन केलेले आहे. जोवर काश्मिरातला वा सीमेवरचा जिहाद संपत नाही, तोपर्यंत भारतात पाकसंघाचे क्रिकेट सामने नकोत, अशी शिवसेनेची जुनीच भूमिका आहे. म्हणूनच क्रिकेटचा संबंध भारतीय जवानांच्या हौतात्म्याशी जोडला जाऊ नये, ही पुरोगामी भूमिका राहिलेली आहे. आज तीच भूमिका कसोटीला लावण्याची वेळ आली असताना ही मंडळी कुठे फ़रारी झालीत?
भारताने यंदाच्या २०-२० क्रिकेट स्पर्धेचे यजमानपद आपल्याकडे घेतलेले आहे. सहाजिकच जगभरच्या क्रिकेट खेळणार्‍या संघांना त्यात समाविष्ट करून घेणे भाग आहे. अशा स्पर्धेत कुठे ना कुठे भारत-पाक लढत होणे अपरिहार्य आहे. अशीच लढत मग कुठे ठेवायची? मुंबईत ठेवली तर शिवसेनेची ‘गुंडगिरी’ तो सामना होऊ देणार नाही. म्हणून सर्वात सुरक्षित अशा कॉग्रेसी राज्य व पुरोगामी पोलिस असलेल्या राज्यात सामना ठेवला तर सुखरूप पार पडू शकेल, ही आयोजकांची अपेक्षा गैरलागू म्हणता येणार नाही. म्हणूनच मग हिमाचल प्रदेशात धर्मशाला इथे ह्या सामन्याचे वेळापत्रक ठरवले गेले. आता त्याच्यावर गदा आलेली आहे. कारण तिथल्या कॉग्रेसी मुख्यमंत्र्याने गजालनवाज व्हायला नकार देत, त्या भारत-पाक सामन्याला विरोध केला आहे. अन्य राजकीय नेत्यांनीही विरोध दर्शवला आहे. कारण हिमाचल राज्यातीलच कॅप्टन सौरभ कालीया नावाच्या भारतीय सैनिक अधिकार्‍याला पळवून नेवून हाल हाल करून पाकसेनेने ठार मारले आणि त्याच्या विटंबना केलेल्या मृतदेहाला भारताच्या हवाली केलेले होते. त्याच का्लीयाचे हुतात्मा स्मारक सामना होणार्‍या मैदानापासून दोनतीनशे पावलावर आहे. म्हणूनच अशा परिसरात सामन्याच्या निमीत्ताने पाकचे झेंडे फ़डकावले जाऊ नयेत, असे राष्ट्रप्रेमी लोकांना वाटते. त्यासाठी स्थानिक संस्था व संघटनांसह तिथल्या राज्यसरकारने असा सामना अन्यत्र घेऊन जाण्याचा आग्रह धरला आहे. थोडक्यात गुलाम अलीच्या मुशायर्‍यासारखी स्थिती उदभवली आहे. अशावेळी खरे म्हणजे भारत-पाक प्रेमाने ओथंबून वहाणार्‍या पुरोगामीत्वाने धाव घेऊन पुढे यायला हवे ना? गुलाम अलीला अगत्याने आमंत्रित करून शिवसेनेला डिवचणार्‍या प्रत्येकाने यात पुढाकार घ्यायला हवा ना? केजरीवाल, उमन चंडी वा ममतादिदी अशा वेळी कुठे दडी मारून बसलेत? त्यांनी पर्याय द्यायला नको काय?
केजरीवाल यांनी सामना दिल्लीत भरवायला पुढाकार घ्यायला नको काय? ममतादिदीने कोलकात्यात ह्या सामन्यासाठी मैदान उपलब्ध करून देणे, हे त्यांचे सेक्युलर कर्तव्य नाही काय? उमन चंडी यांनी कोची वा त्रिवेंद्रम येतील क्रिडांगणे त्यासाठी सज्ज करायला नकोत काय? गुलाम अलीचे हे गुलाम आज कुठे गायब झालेत? सरकार वा अन्य कुणी यासाठी मदत करण्याचे कारणच काय? भारतातील क्रिकेट नियामक मंडळाने खरे तर याच तिघांना शरण जावे आणि त्यासाठी कन्हैयाकुमारला आपल्या क्रिकेट स्पर्धेचा ब्रॅन्ड अंबॅसेडर बनवावे. भारतात कुठेही पाकिस्तानी संघाला क्रिकेट खेळण्याची आझादी कशी मिळू शकते आणि भारतीय राज्यघटनेत त्यासाठी कुठल्या कलमात त्याची तरतुद आहे, ते फ़क्त कन्हैयाच सांगू शकेल. एकदा त्यासाठी कन्हैयाने नेहरू विद्यापीठात भाषण केले, मग प्रश्न चुटकीसरशी निकालात निघू शकेल. हा इतका सोपा सुटसुटीत मार्ग उपलब्ध असताना भारतीय क्रिकेटचे संयोजक उगाच सरकारच्या दारात खेटे कशाला घालत आहेत? त्यापेक्षा त्यांनी कन्हैयासह उमर खालीद याचे वकीलपत्र घेऊन देशकी बरबादी म्हणजेच आबादी कशी असते, ते कोर्टाला पटवून देणार्‍या दिग्गज कायदेपंडितांना शरण जाणे योग्य नाही काय? पण आपल्या देशाचे दुर्दैव असे, की इथले संयोजक नेहमी चुकीच्या लोकांकडे जाऊन मदत मागतात. योग्य जागा त्यांना ठाऊकच नसतात. त्याचा फ़ायदा मग देशप्रेमाची झुल पांघरलेले प्रतिगामी उठवतात आणि समस्या उभ्या करतात. खरे तर एव्हाना क्रिकेट संयोजकांनी मणिशंकर अय्यर, सुधींद्र कुलकर्णी, जनरल परवेझ मुशर्रफ़ किंवा कसुरी यांच्याकडे धाव घ्यायला हवी होती आणि केजरीवाल ममताचे उंबरठे झिजवायला हवे होते. इतका गाजावाजा न होता धर्मशाला येथला सामना सहज मान्य झाला असता. कदाचित सीमेवर सैनिक भारत-पाक प्रेमानेच घुसमटून शहीद होतात, असाही गौप्यस्फ़ोट झाला असता.
ज्याच्या हौतात्म्याने हे वादळ उठले आहे, त्या कॅप्टन सौरभ कालियावर पाकिस्तानी सैनिक व तुरूंगाधिकार्‍यांनी इतका प्रेमाचा वर्षाव केला, की त्यातच त्याचा तडफ़डून मृत्यू झाला. त्याच्या अंगावरच्या जखमा हे पाकिस्तानच्या भारतप्रेमाच्या खाणाखुणा आहेत. इतकेच नव्हेतर कालिया मुळातच भारत-पाक सामने व कला देवाणघेवाण विषयक मागणीसाठी आंदोलन करताना सीमेवर शहीद झाला, असे काही नवे शोध केजरीवाल यांच्यापासून कन्हैयापर्यंत मंडळी आपल्याला समजावून सांगायला पुढे येऊ शकतील. आपण त्यांना संधी दिली पाहिजे. धर्मशाला इथे पाक संघाने सामना खेळल्यावर पाक झेंडे फ़डकावले जातील आणि त्यामुळे इथेच घुटमळणार्‍या कॅप्टन कालियाच्या आत्म्याला आझादी मिळून जाईल, असेही काही नवे वैज्ञानिक शोध लागून जातील. पाकिस्तान व त्यांची सेना, तिथल्या विविध मानवाधिकार संस्था भारतीयांवर इतके जीवापाड प्रेम करतात, की त्यातच भारतीयांना इहलोकापासून आझादी मिळत असते. मुंबईहल्ला किंवा पठणकोट वगैरे हल्ले हे भारतीयांना इहवादापासून मोक्ष म्हणजे आझादी देण्यासाठीचा पाकिस्तानी सेक्युलर प्रयास असल्याचेही उघड होऊ शकेल. पण त्यासाठी अशा गजालनवाजांना आपण बोलण्याची संधी द्यायला हवी. यातल्या प्रत्येकाकडे ऐतिहासिक भाषण करण्याची पात्रता आहे. खरे तर याविषयात आपल्याला गजाआड पडलेल्या उमर खालीदची मोठी मदत होऊ शकेल. त्याला तात्पुरता पेरॉल देवून धर्मशाला सामन्यातला राष्ट्रवाद उलगडून सांगायला नेहरू विद्यापीठात आणले पाहिजे. शेकडो पुरोगामी मार्ग आहेत. पण तिकडे ढुंकूनही बघायला भारतीय क्रिकेट मंडळ तयार नाही. हे संयोजक फ़क्त सरकारचे दार ठोठावत बसले आहेत. म्हणून समस्या सुटण्यापेक्षा अधिकच गुंतागुंतीची होऊन गेलेली आहे. कन्हैया, बाळा तूच आता या वसुदेवांना उधाणलेल्या यमुनेपार घेऊन जाऊ शकशील!

2 comments:

  1. सध्या भूमाता ब्रिगेड ही श्रद्धाळू महिलांची संघटना प्रत्येक मंदिरात जाऊन पूजा आर्चा करण्यात दंग आहे. पण हीच संघटना दुर्गा मातेबद्दल जी पुरोगामी मते व्यक्त करण्यात येत आहेत क्रांतिकारक संघटनांकडून त्या बद्दल काही आंदोलन करायला पुढे आली नाही... भाऊ या बद्दल एक ब्लॉग लिहावा ही विनंती

    ReplyDelete
  2. सर्वात कढी म्हणजे पाकिस्तानने धरमशाला नको कोलकत्ताला सामना ठेवा असे प्रथम सांगणे भारताने ते काबुल करणे इथपर्यंत ठीक होते. आता पाक सरकारला खेळाडूंच्या सुरक्षेची भारत सरकारकडून लिखित हमी हवी. हे जरा अतिच होते असे मला वाटते.

    ReplyDelete