Wednesday, March 30, 2016

क्रिकेट वा राजकारणातली झिंग

बुधवारी बंगलुरू येथे भारत बांगलादेश यांच्यातला सामना अतिशय रंगला किंवा अटीतटीचा झाला. म्हणजे अखेरच्या क्षणापर्यंत त्याचा निकाल कोणालाच ताडता आला नाही. आरंभापासून बघितले तर बांगलादेशने भारताला कुठेही वरचढ होऊ दिले नाही. भारताचा संघ फ़टकेबाज आक्रमक फ़लंदाजांसाठी प्रसिद्ध आहे आणि अगदीच मर्यादित षटकांच्या मानल्या गेलेल्या या खेळात फ़टकेबाजीवरच बाजी मारता येते. म्हणूनच भारत पहिल्या दिवसापासून स्पर्धेतला विजेता असे गृहीत धरले जात आहे. मात्र बुधवारी भारतीय फ़टकेबाजांना बांगलादेशी गोलंदाज व क्षेत्ररक्षकांनी वेसण घालून ठेवली होती. वीस षटकात दिडशे पावणे दोनशे धावा करणे भारतासाठी जड नाही. पण तितकी मजल भारताला मारू दिली नाही तर बाजी मारता येईल, हे बांगलादेशचे गणित होते आणि आपल्या मर्यादा ओळखून खेळताना त्यांनी एकदाही भारताला वरचढ होऊ दिले नाही. धावाच होऊ नयेत याची इतकी का्ळजी घेतली की हाराकिरी केल्यासारखे भारतीय फ़लंदाज घुटमळत राहिले. मग दिडशेहून कमी धावांचे आ्व्हान पेलताना पुन्हा बांगलादेशी फ़लंदाजांनी सावधपणे खेळत आपल्या ध्येयाकडे वाटचाल केलेली होती. अखेरच्या षटकात विजय त्यांच्या टप्प्यातही आलेला होता. बांगलादेश विजयाच्या इतक्या जवळ आलेला होता, की भारतीय क्रिडाशौकीनांसह भारतीय संघानेही पराभव मान्य केला होता. पराभवाच्या सुतकाची छाया सामना संपण्यापुर्वीच भारतीय मानसिकतेवर पडलेली होती. पण प्रत्यक्षात तसे झाले नाही आणि अखेरच्या तीन चेंडूंनी खेळाचा सगळा नूरच पालटून टाकला. त्या तीन चेंडूत सहज सामना जिंकण्याची स्थिती असताना आत्मघात कसा करावा, त्याचे प्रात्यक्षिक त्या संघाने घडवले. थोडक्यात बांगलादेशचा संघ त्या सामन्यात पराभूत झाला आणि परिणाम म्हणून विजय भारताच्या पारड्यात पडला.
खरे तर तो सामना बांगलादेशनेच जिंकायला हवा होता. कारण ४० पैकी ३९ षटके सामन्यावर त्याच संघाची हुकूमत होती. पण विजय हातातोंडाशी आल्यावर बांगला खेळाडूंना काय दुर्बुद्धी सुचली, त्याचे संशोधन करण्याची गरज नाही. त्याचे उत्तर पाकिस्तानी संघाचा कर्णधार शाहीद आफ़्रिदी याने दिलेले आहे. दबावाखाली कसे खेळावे याचा धडा भारताकडून घ्यावा असे आफ़्रिदी म्हणाला होता. त्याची प्रचिती बंगलुरूच्या अखेरच्या तीन चेंडूत आली. कारण त्या तीन चेंडूत बांगला देशला अवघ्या दोन धावा विजयासाठी करायच्या होत्या आणि एक एक धावूनही त्या सहज करता आल्या असत्या. त्यासाठी कुठल्याही आतषबाजी वा हाणामारीची गरज नव्हती. चौकार वा षटकार मारून काढलेल्या अखेरच्या धावेनेच विजय साजरा होत नाही. कुठल्याही मार्गाने धावांचा पल्ला गाठण्याने होतो, त्याला विजयच म्हणतात, याचे बांगलादेशी फ़लंदाजांना भान उरले नाही. म्हणूनच हाती आलेला विजय त्यांनी लाथाडून पराभव ओढवून आणला. अखेरच्या षटकातल्या चौथ्या चेंडूवर उंच फ़टका मारण्याचा धाडसी उतावळेपणा करून मशफ़िकुर बाद झाला आणि एक चेंडू वाया गेला. उरलेल्या दोन चेंडूतही दोन धावा अशक्य नव्हत्या. पण तीच चुक पुढल्या फ़लंदाजाने केली आणि त्याचा बळी जाण्याबरोबरच आणखी एक चेंडू वाया गेला. उरलेल्या एका चेंडूत दोन धावा मग अवघड होऊन बसल्या आणि त्याचा लाभ उठवत धोनीच्या संघाने विजय संपादन केला. पण वास्तवात तो बंगलादेशी आत्महत्येचा भारताला मिळालेला लाभ आहे. राजकीय भाषेत सांगायचे तर धोनीच्या संघाने बांगलादेश संघाचा दिल्ली-बिहार करून टाकला. या सामन्यातही आपण राजकीय डावपेचाचे प्रतिबिंब बघू शकतो. जेव्हा तुम्हाला यशाची चालना मिळालेली असते, तेव्हा तुम्ही त्यात सहजगत्या सहभागी व्हायचे असते. आगावूपणे हस्तक्षेप करायची गरज नसते.
लोकसभा निवडणूकीने भाजपाला व प्रामुख्याने नरेंद्र मोदी यांना जनतेचा कौल मिळाला होता. त्याला लोकांच्या सदिच्छा म्हणतात. लोक क्रमाक्रमाने तुमच्याकडे यायला लागलेले असताना राजकीय लबाडी वा भामटेगिरीची गरज नसते. लोक तुम्हाला आजमावत असतात. अशावेळी अन्य पक्षाचे आमदार फ़ोडण्याचे किंवा नेते पळवून आणायची गरज नसते. तीन चेंडूत दोन धावा अतिशय सोपे काम होते. पण बांगला फ़लंदाज नको असलेल्या षटकार चौकाराच्या फ़टकेबाजीच्या मोहात गुरफ़टत गेले. विजय पचवण्यासाठी जो संयम आवश्यक आहे त्याचा पुर्णपणे अभाव बांगलादेशी संघामध्ये शेवटच्या क्षणी जाणवला. विजय दणक्यात साजरा करायच्या नादात त्यांनी सामना गमावला. भाजपाने बिहार व दिल्लीत आपल्याकडे येणार्‍या जनतेला चुचकारण्यापेक्षा अन्य पक्षातल्या बंडखोरांना आमंत्रित करून वा फ़ोडून बहुमतापर्यंत जायचा मोह बाळगला. त्यात झालेल्या चुकांची किंमत त्यांना मोजावी लागली होती. इथे बांगलादेशी संघाला त्याची फ़ळे भोगावी लागली आहेत. पहिली गोष्ट म्हणजे आपली जेवढी कुवत आहे, त्याच्या मर्यादा ओळखून खेळी करायला हवी. भाजपाला अजून देशव्यापी प्रतिसाद मिळालेला नाही. लोकसभेतील बहुमत हा आकडा असला तरी देशातल्या अनेक राज्यात अजून भाजपाला बस्तान बसवता आलेले नाही. म्हणूनच खरोखरच आपण देशव्यापी पक्ष असल्याच्या थाटात भाजपाने नको तितके धाडस करण्यात अर्थ नाही. इंदिरा गांधी वा राजीव यांच्याप्रमाणे बहुमताचे पंतप्रधान म्हणून मोदींकडे बघायला हवे. पण पुर्वीच्या दोघांना देशाच्या बहुतांश राज्यातून प्रतिसाद मिळाला, तसा अजून मोदींना मिळालेला नाही. म्हणूनच भाजपाने उतावळेपणाने राजकारण करण्यात धोका आहे. त्याची प्रचिती दिल्ली बिहारमध्ये आली. उतावळेपणाचा तो दुष्परीणाम होता व आहे.
अर्थात त्याच राजकारणाची दुसरी बाजूही आपण परवाच्या त्या सामन्यात बघू शकतो. दोन वर्षात मोदी लाट ओसरत आली हे कोणी नाकारू शकत नाही. तो काळाचा महिमा असतो. पण सरकारविषयी नाराजीचा राजकीय लाभ उठवताना विरोधकांनीही आपापल्या कुवतीच्या पलिकडे जाऊन उतावळेपणाचे राजकारण करण्यात धोका आहे. दिल्ली व बिहारमधील भाजपाचा पराभव हे त्याच्या मुर्खपणाचे परिणाम असताना, त्याला आपल्या डावपेचांचे यश समजून गेल्या काही महिन्यात मोदी विरोधकांनी चालविलेला अतिरेक, बांगलादेशी फ़लंदाजांचाच नमूना आहे. राहुल गांधी यांची वक्तव्ये किंवा मागल्या दोन महिन्यातील विविध विद्यापीठासह संस्थांमध्ये पेटवण्यात आलेला देशद्रोह देशप्रेमाचा विवाद, हा पुरोगामी राजकारणाचा अतिरेक आहे. मोदी विरोधातले राजकारण करायला काहीही हरकत नाही. पण ते करताना आपल्यावरच ते डाव उलटणार नाहीत, याचेही भान राखायला हवे ना? इथेच विरोधकांचे भान सुटलेले दिसते. बिहार दिल्लीतला भाजपाचा पराभव म्हणजे मतदार हिंदूत्वाच्या विरोधात जाऊन पुरोगामी राजकारणाला भुकेला असल्याच्या समजूतीने जी नाटके रंगलेली आहेत, तिचे दुष्परीणाम अखेर मोदींना लाभदायक ठरू शकतात. कारण सातत्याने चालू असलेल्या राष्ट्रप्रेमाच्या हेटाळणीने सामान्य माणसाच्या मनात कुठल्या प्रतिक्रिया उमटतात, त्याचे भान मोदी विरोधकांना राहिलेले नाही. विरोधक इतक्या टोकाला जाऊन देशाला तिलांजली देणार असतील, तर कसाही असला तरी मोदी वा भाजपा बरा; असा एक समज रुढ होऊ शकतो. किंबहूना होत चालला आहे. यालाच बांगलादेशी संघाचा उतावळेपणा म्हणतात. मोदी विरोधात जाऊन देशविरोधी घोषणांचे समर्थन, त्याच घातक चौकार षटकारासारखे आहे. पण कोण कोणाला समजावणार? यशाची वा विजयाची चाहुल ही सर्वात भयंकर नशा असते ना?

2 comments:

  1. क्रिकेट आणि राजकारण यांची सुंदर सांगड घातलीत भाऊ तुम्ही आणि सहज सुंदरतेने प्रसंगाची गंभीरता सांगितली. Bhau you are great !

    ReplyDelete