Friday, July 22, 2016

इमान की नियत ठिक नहीपश्चीम बंगालच्या नव्या सरकारचा शपथविधी पार पडला. त्यासाठी अन्य काही राज्यांचे मुख्यमंत्री अगत्याने हजर होते आणि त्यांना ममता बानर्जींनी अगत्याने आमंत्रित केले होते. त्यात दिल्लीचे अरविंद केजरीवाल हजर होते. तसेच ते बिहारच्या नितीशकुमार यांच्याही शपथविधीला उपस्थित होते. तिथे त्यांना लालूप्रसादांनी आलिंगन दिल्यावरून काही काळ वादंग माजले होते. जगातल्या संपुर्ण पावित्र्याचा मक्ता आपल्याकडेच असल्याचा सतत दावा करणार्‍या केजरीवालांनी लालूंना आलिंगन दिले, तर गाजावाजा व्हायचाच. कारण केजरीवालांचा भारतीय राजकीय क्षितीजावरचा उदय भ्रष्टाचार निर्मूलनाच्या आंदोलनातून झाला आणि त्याच काळात देशातील सर्वात भ्रष्ट मानल्या गेलेल्या लालूंना कोर्टाकडून भ्रष्टाचारासाठी शिक्षा होऊन त्यांची खासदारकी रद्दबातल झालेली होती. अशा दोन टोकाच्या भिन्न वर्तुळातील व्यक्तींनी परस्परांना आलिंगन दिल्यास गदारोळ न झाला असता तरच नवल. पण केजरीवाल यांचे हे बदलणारे रंग नवे नाहीत. ममताविषयी त्यांचे प्रेम नवे नाही. आरंभीच्या काळात त्यांनी ममतांना आपल्या बालेकिल्ल्यात हिसका दाखवला होता. तेव्हा औट घटकेसाठी केजरीवाल कॉग्रेसच्या पाठींब्याने मुख्यमंत्री झाले होते आणि तेव्हाच अण्णा हजारे दिल्लीला गेलेले होते. तिथे त्यांची भेट ममता बानर्जी यांच्याशी झाली. दोघांनी रामलिला मैदानावर सभा घेण्याच घोषित केले. पण गर्दी जमली नाही, म्हणून अण्णा तिकडे फ़िरकले नाहीत आणि गर्दी जमू नये याची काळजी अण्णांचे भक्त केजरीवाल यांनी घेतलेली होती. शेवटी अण्णा नसतानाही ममतांनी ओसाड मैदानावर सभा साजरी केली होती. अशी ममता केजरीवाल यांची कहाणी आहे. पण दरम्यान एक मोठा फ़रक पडला आहे. केजरीवाल यांच्या डोक्यावरची टोपी गायब झाली आहे.

केजरीवाल हा माणूस किती व कसे रंग बदलतो, त्याची ही कहाणी आहे. त्यांच्या उपोषणाची सांगता करायला कधीकाळी विविध पक्षाचे नेते व्यासपीठावर आलेले होते. त्यात शरद यादव या नितीशच्या सहकार्‍याचा सहभाग होता. त्यांच्या दाढीचा उल्लेख करून केजरीवाल यांचे सहकारी शिसोदियांनी ‘चोर के दाढीमे तिनका’ अशी मल्लीनाथी केलेली होती. त्याच चोराला पाठींबा द्यायला पुढे केजरीवाल बिहार विधानसभेच्या प्रचाराला गेले होते. ज्या कॉग्रेस विरोधात भ्रष्टाचाराचा आवाज उठवला त्याच कॉग्रेसचा नितीशच्या आघाडीत समावेश असूनही केजरीवाल यांना फ़रक पडला नाही. कॉग्रेसच्या पाठींब्याने सरकार बनवावे किंवा नाही म्हणून प्रत्येक वॉर्डात सभा घेऊन जनमताच अकौल घेणारे केजरीवाल, तेव्हा बंगला-गाडी नको म्हणत होते. पण मुख्यमंत्री होताच घेतलेला बंगला व गाडी त्यांनी सत्ता गमावल्यानंतर अनेक महिने सोडलेली नव्हती. त्याचे प्रचंड भाडे कोणी कशासाठी भरले, त्याचा खुलासा कोणी कधी दिला नाही. बाकी प्रत्येकाकडे पुरावे आणि हिशोब मागणार्‍या केजरीवाल यांनी कधी आपल्या अशा खाजगी खर्च व वर्तनाचे पुरावे कोणाला दिले नाहीत. सरडा परिस्थितीनुसार रंग बदलतो म्हणतात. केजरीवालही प्रसंगानुसार गरजेनुसार धोरणे रंग बदलत असतात. अशा केजरीवाल यांची ओळख म्हणजे अण्णांची टोपी होय. लोकपाल आंदोलन सुरू झाले, तेव्हा त्याच्या प्रचारासाठी केजरीवाल यांनी धुर्तपणे अण्णांच्या टोपीचा वापर केला होता. जमणार्‍या गर्दीला अण्णांची पांढरी गांधीटोपी घालायला त्यांनी भाग पाडले आणि त्यावर ‘मै अण्णा हू, मुझे चाहिये लोकपाल’ अशा घोषणा लिहून प्रचाराची धमाल उडवली होती. जणू ती टोपी म्हणजे लोकपाल आंदोलनाचे प्रतिक होऊन गेले आणि अण्णांशी फ़ारकत घेऊन केजरीवाल यांनी राजकीय चिखलात उडी घेतली, तरी टोपी मात्र सोडली नाही.

अण्णांशी फ़ारकत घेऊन केजरीवालांनी राजकारण सुरू केले, तेव्हा नव्या पक्षाला आम आदमी पक्ष असे नाव दिले. त्याच्या प्रचारासाठी ‘मै हू आम आदमी’ अशी घोषणा असलेल्या टोप्या घातलेले लोक रस्तोरस्ती फ़िरू लागले. खुद्द केजरीवाल व त्यांचा प्रत्येक सहकारी अगत्याने ती टोपी घालून वाहिन्यांवर मिरवत होते. गबाळग्रंथी दिसणारी ती टोपी एक प्रतिक होते. आपण अण्णांच्या वतीने व लोकपाल आंदोलनाच्या वतीने राजकारणात प्रतिनिधीत्व करतो, असा आभास त्यातून निर्माण करण्यात आला होता आणि त्याचा मोबदला पुरेपुर मिळवण्यात आला. दिल्लीत वा अन्यत्र केजरीवाल व त्यांच्या पक्षाला मिळालेला प्रतिसाद त्याचीच किंमत होती. मात्र जसजसे त्यात यश मिळाले, तसतसे टोपीचे महत्व कमी करून केजरीवाल यांची महत्ता उभी करण्याचा प्रयोग सुरू झाला. दिल्ली सरकारचे पैसे वापरूनही केजरीवाल आपलीच जाहिरात करू लागले. त्यात न्यायालयाला हस्तक्षेप करण्यापर्यंत त्याचा अतिरेक झाला होता. अखेर कोर्टानेच लगाम लावल्यावर पाठमोरी केजरीवालांचॊ प्रतिमा दाखवून टोपीला जोडून मफ़लरही प्रतिकात साहभागी करण्यात आला. मध्यावधी विधानसभा निवडणूकीत तर ‘पाच साल केजरीवाल’ असे व्यक्तीमहात्म्य तयार करण्यात आले. आता केजरीवाल हेच एक प्रतिक होऊन गेले आहे. सहाजिकच त्यांना अण्णांची टोपी किंवा मफ़लर अशा प्रतिकाची गरज उरलेली नाही. आपण आम आदमी असल्याचेही सांगण्याची गरज उरलेली नाही. राजकारणात सगळे सारखे असतात, तसे आपणही खास आदमी झाल्याचे कृतीतून मान्य करण्याची वेळ आली आहे. म्हणून मध्यंतरी केव्हा केजरीवाल व त्यांच्या सहकार्‍यांनी त्या अण्णाटोपीला तलाक दिला, कोणाच्या लक्षात आलेले नाही. आजकाल केजरीवाल कशाला; कुठलाच आम आदमी पक्षाचा नेता कार्यकर्ता ती टोपी परिधान करून कुठे वावरताना दिसत नाही.

राजकारणात दिर्घकाळ वावरलेल्या लोकांनाही आपले पक्ष, प्रतिमा किंवा रंग बदलण्यास वेळ लागतो. केजरीवाल अतिशय वेगाने आपले रंग व भूमिका बदलत असतात. सोयीचे असलेले सहकारी, प्रतिमा किंवा मान्यवर क्षणात कचर्‍यात फ़ेकून देण्याची केजरीवाल यांची कुवत वाखाणण्यासारखी आहे. आधी त्यांनी सहजगत्या अण्णांनाच आपल्या वाटेतून बाजूला केले. अण्णा राजकारणाला विरोध करणार हे ठाऊक असल्याने, केजरीवाल बाजूला होऊन त्यांनी राजकीय पक्ष काढला. तेव्हा राजकारणासाठी आपली प्रतिमा फ़ोटो वापरू नयेत अशी अट अण्णांनी घातली होती. पण अण्णांचा वापर कसा करायचा, ते केजरीवाल यांनी आधीच ठरवून टाकले होते. अण्णांचा फ़ोटो दुय्यम करणारी प्रतिमा म्हणजे अण्णांची टोपी होती. ती कधीच वेगळी काढून केजरीवाल यांनी आपल्या ओलीस ठेवलेली होती. अण्णांचा चेहरा कोणाला हवा होता? ती टोपी पुरेशी होती आणि म्हणून सरसकट टोपीचा वापर पक्षासाठी करून आपली ओळख निर्माण करण्यात केजरीवाल यशस्वी झाले. ते शक्य झाल्यावर त्यांनी अण्णांना बाजूला केले. त्यांच्याप्रमाणेच किरण बेदी आदिंना खड्यासारखे बाजूला केले. ज्यांना तसे बाजूला करणे शक्य नव्हते, त्या प्रशांत भूषण वा योगेंद्र यादव इत्यादिंना गुंड अंगावर घालून बाजूला करण्यात आले. शेवटी राहिली होती अण्णांची टोपी, म्हणजे लोकपाल आंदोलनाचे शेवटचे प्रतिक! आता केजरीवाल मुरब्बी राजकारणी झाले आहेत. या बोटावरची थूंकी त्या बोटावर करण्यात वाकबगार होऊन गेले आहेत. त्यांना आत टोपीचॊ गरज उरलेली नाही. कदाचित म्हणून असेल, त्यांनाही टोपीचा पुरता विसर पडला आहे. हल्ली केजरीवाल टोपी घालत नाहीत की त्यांच्या पक्षाचा कोणी ती आम आदमीची टोपी घालत नाही. लोकांना टोपी घालून झाल्यावर तिचा उपयोग तरी काय राहिला? एक जुने गाणे आठवते,

निकला न करो तुम सजधज कर
इमान की नियत ठिक नही
इस रंग बदलती दुनियामे

7 comments:

 1. छान भाऊ उत्तम लेख

  ReplyDelete
 2. भाऊ वरील website वर Dr. गौरव प्रधान यांचा Arvind Kejrival वरील एक article वाचण्यात आले ( AK - Snake in our Backyard ) आणि voters किती मूर्ख असतात याची खात्री पटायला लागली. वरील twits कितपत सत्य आहेत माहीत नाही पण ज्या पद्धतीने AK रंग बदलतोय ह्यावरून ते factual असतील असे तुम्हाला वाटते का ??

  ReplyDelete
 3. भाऊ अत्यंत समर्पक व आण्णा केजरीवाल या काँग्रेस रचित जोडगोळीचा पोल खोल करणारा लेख. लाखो लोकांना हे आपल्या सहज शैलीत समजावण्या बद्दल धन्यवाद.
  आण्णा हजारे यांच्या आंदोलनाचा अभ्यास केला तर तुमच्या लक्षात येईल की आण्णा नी जास्तीत जास्त आंदोलने काँग्रेसइतर सरकार विरोधात / मंत्र्याच्या विरोधात केली. मी त्यांना जुन 2010 मध्ये ई मेल व पत्रा द्वारे आवाहन केले होते की त्यांनी काँग्रेस सरकार विरोधात/ मंत्र्याचा विरोधात एकदा तरी आंदोलन करुन दाखवावे. आणि त्यावेळी अनेक सामान्य माणसांना ते आर्ध शतकातिल एक युगपुरुष वाटत होते. (परंतु ते (आण्णा) एक दशकानु दशके राज्य करणाऱ्या पक्षाचे व त्या पुरस्कृत मिडिया चे पेरलेले एक हस्तक / गांधीजी सारखे रोल माॅडेल तयार केले होते/ आहे ) त्यांच्या भ्रष्टाचारा विरोधात केलेल्या आंदोलनाला एखाद्या चित्रपटा प्रमाणे युपीए पुरस्कृत मिडिया ने एक सेट ऊभा केला त्यामुळे जनमानसाचा उस्फूर्त प्रतीसाद मिळाला व युपीए काळात केलेल्या भ्रष्टाचाराला जणु वाचा फुटल्याचे ( जनतेच्या उग्र भावनांना वाचा फुटली असा देखावा तयार केला गेला) हा एक काँग्रेस ने खेळलेला डाव होता त्यात अनेक राजकीय मुस्सद्दी / विश्लेषक वाहवत गेले व खरेखुरे आंनलोन आसल्या प्रमाणे त्यावर स्तुती सुमने वाहू लागले. परंतु आंदोलन अतीउच्च शिखरावर असताना आण्णांनी पुढील 5 राज्यातील निवडणूकीत काँग्रेसच्या विरोधात प्रचार करीन अशी आवइ उठवली. पण प्रत्यक्षात आण्णा मोक्याच्या वेळी आजारी पडले. त्याच दरम्यान बाबा रामदेव यांच्या आंदोलनावर लाठ्ठी ह्रल्ला सरकारी आदेशानुसार झाला व फ्लोप ठरवले गेले परंतु आण्णांचे आंदोलन कुठे विरघळले हे जनतेला समजलेच नाही. हे एक त्रिधारी अस्त्र होते.
  आण्णा आंदोलन हे एका बाजूने जनतेच्या भ्रष्टाचारा विरोधत भावनांना वाट करून देण्यासाठी प्लॅन होता. दुसऱ्या बाजूने केजरीवाल सारखे राष्ट्रीय नेतृत्व तयार करणे म्हणजे मतांचे ध्रुवीकरण होउन भाजपची मते खाइल व युपीए ला नेहमी प्रमाणे सत्ता स्थापन करुन परत भ्रष्टाचार शेयर करुन सत्ता उपभोगता येइल.
  याचे भांडे प्रथम फुटले आण्णांनी केलेल्या चार दिवसाच्या उपोषणाला प्रतिसाद म्हणून युपीएने 2014 मध्ये लगेचच पास केलेल्या लोकपाल बिलावरुन आला. मी यावर अनेक मिडिया पंडितांना त्यावेळी लिहले.

  दुसरे बिंग सामान्य माणसात फुटले ते केजरीवाल जे भ्रष्टाचाराच्या आंदोलनातुन निर्माण केले गेले ते मोदींन सारख्या एकही भ्रष्टाचाराचा आरोप नसलेल्या उमेदवारा समोर उभे राहिले. आणि तिथेच मोदींनी आर्धी लढाई जनसामान्यात जिंकली.

  जनता चाणाक्ष आहे तिने महागाई, भ्रष्टाचार अल्प संख्याकांचे लंगुचालन करणार्‍या सरकारकडुन सुटका करणारा अनेक दशके हवा असलेला भक्कम पर्याय म्हणून मोदींना बहुमताने निवडून दिले.

  यातुन आण्णा चे अस्त्र परत काँग्रेसच्या ताब्यात राहिले.
  आण्णा, अमिर खान, शोभा डे, मेघा पाटकर, तिस्ता सेटेलवार, व मिडिया अशी एकापेक्षा एक सरस अस्रे असताना देखील मोदींना लोकसभेत विजय मिळाला हे म्हणुनच आजुन ही काँग्रेस व मिडिया ला व पुरोगामी ना पटत नाही. म्हणून मोदी सरकारने व भाजप कार्यकर्तया कडुन एक जरी चुकीचा शब्द चुकीचा निघाला तर आर्णव पासून राजदीप पर्य॔त जेडुयु, कमुनिष्ट, आप, बसपा, एनसीपी व सपा यांना जोडीला घेऊन कडाडुन हल्ला करतात व मोदीना जबाबदार धरतात.
  .अमुल

  ReplyDelete
  Replies
  1. भाऊ आभारी,

   https://storify.com/drgpradhan/natwarlal-fools-of-delhi
   भाऊ वरील link वर Dr. गौरव प्रधान यांचा अजून एक Arvind Kejrival वरील एक article वाचण्यात आले ( Natwarlal, X X X, X X X & fools of Delhi ) आणि पंजाब निवडणुकी पूर्वी आप नक्की डेडली game प्लान करतोय ह्याची खात्री येतेय ??
   poltical पार्टी आपल्याच लोकां च्या जीवाशी खेळून इतक्या खालच्या थराला जातील हे वाचून डोके सुन्न होते

   Delete
 4. Is AK previously belong to RSS. By media it was described. In entire episode RSS people were get to see on Ramlila Maidan. What is truth only you may know. Some othertime please open it.....

  ReplyDelete
 5. Can someone help me to express my view in my language Marathi..... Please..

  ReplyDelete
 6. नमस्कार दीपक जी,
  मराठीतून लिहायला मी swiftkeyboard app वापरतो. त्यात ३भाषांचे कळपाटीतून लेखन करता येते. यातून आधी वापरलेले शब्द आपोआप समोर येतात.

  ReplyDelete