मौजे कोपर्डी, तालुका कर्जत, जिल्हा अहमदनगर येथील एका शाळकरी मुलीवर सामुहिक बलात्कार झाला आणि त्यानंतर तिला ठार मारून मृतदेहाची विटंबना करण्यात आल्याची बातमी अंगावर शहारे आणणारी आहे. पण अशी बातमी पहिली नाही किंवा नुसती थरारक नाही. अशा बातम्यांच्या निमीत्ताने ज्या प्रतिक्रीया येतात, त्याच अधिक शहारे आणणार्या असतात. कारण ह्या बातम्या आल्यावर तिथेही त्या विटंबित मृतदेहात धर्म व जात शोधली जाते आणि त्यानुसारच प्रतिक्रीयाही उमटत असतात. ज्या जातीधर्माची पिडीता असेल, त्यानुसार प्रतिक्रीया उमटतात. थोडक्यात प्रतिक्रीयामध्ये एका माणसाचा किंवा निरपराध महिलेचा बळी घेतला गेला वा विटंबना झाली, याची कोणाला फ़िकीर नसते. माध्यमांपासूनच त्याची सुरूवात होते. दलित मुलीवर अन्याय किंवा अत्याचार, अशा ठळक बातम्या दिल्या जातात. उलट पिडीता उच्चवर्णिय सवर्ण असेल, तर ठळकपणे बातमी देण्याचे टाळले जाते. ही वस्तुस्थिती आहे. समाजात भेदभाव करण्याचे काम तिथूनच सुरू होते. आताही कोपडी या गावातील पिडीता सवर्ण आहे म्हणून त्यावर आक्रोश कमी असल्याची तक्रार आहे. अशा प्रतिक्रीया देणारे आपापल्या पद्धतीने आपण सामाजिक अन्यायाविषयी किती संवेदनाशील आहोत, त्याचे यशस्वी प्रदर्शन मांडत असतात. पण बलात्कार हा कुठल्याही जातीची असली तरी महिलेवर मुलीवरच होतो, याकडे अशा प्रतिक्रीयांतून पाठ फ़िरवली जाते. शिवाय त्यात राजकीय विचारसरणीनुसारही भेदभाव होतच असतो. पिडीता ही माणूस आहे किंवा होती; याचे कुठलेही भान यातून दिसत नाही. कुठल्याही जातीची असली म्हणून बलात्कार वा त्यासंबंधातील अत्याचार भिन्न असू शकत नाहीत. तिच्याकडे वापरून फ़ेकून देण्याची चैनीची वस्तु म्हणून बघितले जातेच. पण त्यावर प्रतिक्रीया देतानाही तिचा पुन्हा वापरच होतो, ही अतिशय हिडीस बाब होत चालली आहे.
दलित स्त्री अन्यायाचे घाव सोसते तेव्हा ते तीव्र; किंवा सवर्ण महिलेला त्या यातनातून जावे लागले, तर वेदना सौम्य नसतात. तिच्या अस्तित्वालाच छिन्नभिन्न करून टाकले जात असते. अगदी वेश्या म्हणून देहविक्रय करणार्याही महिलेला बलात्कार यातनामयच असतो. त्याविषयी तावातावाने बोलणारेही पुरूषी अहंकारानेच रागलोभ व्यक्त करीत असतात. खरे सांगायचे तर स्त्रीवर्गाला कुठली जात नसते किंवा धर्म नसतो. त्यातला अहंकारही पुरूषी असतो. तो अहंकार हीच मुळात पाशवी मनोवृत्ती आहे. जातधर्म ही पुरुषी मानसिकता आहे. आपला वंश पुढे घेऊन जाण्याची जननक्षम व्यवस्था म्हणून स्त्रीकडे बघणारा दृष्टीकोन; म्हणजे पुरूषी अहंकार होय. त्यातूनच मग जातीचे धर्माचे वर्णाचे अभिमान सुरू होतात. म्हणूनच कुठल्याही अन्य जातीधर्माची मुलगी लग्न होऊन आपल्या जातीधर्मात आल्याची वेदना दिसत नाही. पण आपल्या जातीधर्माची मुलगी इतर जातीधर्मात विवाह करून जातानाचे दु:ख अटीतटीचा विषय बनते. अशा प्रत्येक जातीधर्माच्या मुलीमहिला अगतिकता म्हणून वेश्या होतात. देहविक्रयाच्या गलिच्छ धंद्यात ओढल्या जातात. तेव्हा त्यांची जात कुठली ते तपासून बघायला किती अभिमानी लोक पुढे सरसावतात? त्या नरकातून आपल्या जातीच्या मुलींना बाहेर काढायचा पुरूषार्थ कितीजण दाखवू शकतात? अशा जंजाळात फ़सलेल्या आपल्या जातीच्या मुलींसाठी कितीजणांचा जाती अभिमान उसळी मारून पुढे येतो? एका जातीधर्माची मुलगी दुसर्या जातीधर्माच्या पुरूषाच्या आहारी गेली, मग अभिमानाला ठेच लागते. पण त्याचवेळी ती ज्या अन्य जातीधर्मात सहभागी होते, त्यांना त्याचा अभिमान वाटतो. हा पुरूषी अहंकार असतो. जो वंशवृद्धीच्या पाशवी मनोवृत्तीमधून आलेला असतो. मग त्यानुसार प्रतिक्रीया उमटत असतात. बलात्कारावरच्या प्रतिक्रीयाही बहुतांशी तशाच येतात.
सचिन पायलट नावाचा एक कॉग्रेसी नेता आहे आणि त्याने फ़ारुख अब्दुल्ला यांच्या मुलीशी प्रेमविवाह केला. तेव्हा तिच्या पिता व भावाने त्यावर बहिष्कार घातला होता. एका मंत्रीमंडळात सासरा व जावई गुण्यागोविंदाने नांदत होते. पण कुटुंबात एकत्र नांदणे त्यांना पसंत नव्हते. हे आपल्या ‘राष्ट्रीय एकात्मतेचे’ लक्षण आहे. पुरोगामीत्वाचा निकष आहे. मात्र त्याच फ़ारुख कन्येचा भाऊ व काश्मिरचा माजी मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला परदेशी ख्रिश्चन मुलीशी लग्न करतो, त्याचा बाप फ़ारुख अब्दुल्लांना खेदही नसतो. कारण अशी मुलगी कुठल्याही जातीधर्माची असली तरी वंश आपलाच पुढे नेणार; ही पुरूषी मानसिकता त्यात दडलेली असते. मात्र आपल्या जातीधर्माच्या मुलीने अन्य जातीधर्माचा वंश पुढे घेऊन जाण्यात पाप असते. डारफ़ोर येथील मुस्लिम असलेल्या कृष्णवर्णीयांच्या गावावर हल्ले करून अरबी मुस्लिम पुरूषांना ठार मारतात आणि महिलांना बलात्काराने गरोदर करून सोडून देतात, हा गेल्या काही वर्षातला अनुभव आहे. इसिसचे प्रभावक्षेत्र असलेल्या प्रदेशातील यझदी पुरूषांना मारून महिला गुलाम करण्याची मानसिकता कुठली आहे? त्याचेच थोडे सौम्य स्वरूप आपल्याकडे जातिधर्माच्या भेदभावांमुळे महिलांना मिळणार्या वागणूकीतून दिसते. जातधर्म फ़क्त महिलांना लागू होतात. पुरुषी अहंकाराचा बोजा महिलेच्या डोक्यावर चढवून अभिमानाची मुळे रुजवली जातात. म्हणून मग अन्याय अत्याचारालाही जातीधर्माचा म्हणजे प्रत्यक्षात पुरूषी अहंकाराचा रंग चढवला जात असतो. मग कधी तो लव्हजिहाद म्हणूनही राबवला जातो, तर कधी जाती अभिमान म्हणून फ़ुगवला जातो. कुठूनही गेलात तरी त्यातली पिडीता महिलाच असते. पुरूषच त्यातला अन्यायकर्ता असतो. मग अवघा समाज आपापल्या मतलबानुसार त्यात अन्याय शोधून वा सारवासारव करून प्रतिक्रीया देत असतो. त्यात कोणी सोवळाओवळा मानायचे कारण नाही.
काही महिन्यांपुर्वी मराठा मुलीने ब्राह्मण मुलाशी प्रेमविवाह केला म्हणून तिच्या भावाने दोघांचेही मुडदे पाडले होते. दिडदोन वर्षापुर्वी मराठा मुलीने दलिताशी प्रेम केले म्हणून पित्यानेच तिचा मुडदा पाडून पोलिसांकडे हजर झाला होता. केंद्रातल्या मंत्र्यापासून खेड्यातल्या अर्धपोटी जगणार्यांपर्यंत तीच कहाणी आहे. दलितांच्या उपजातीचे अभिमान त्यातून सुटलेले नाहीत. पण सगळीकडे बळी फ़क्त महिला असते. तिला स्वत:च्या इच्छाआकांक्षा, मते-विचार, आवडनिवड यांचे स्वातंत्र्य नसते. जननक्षमता इतकीच तिची उपयुक्तता असते आणि त्यातूनच मग ती मौजमजेची वस्तु बनवली गेली आहे. त्याला पाशवी संबोधणेही गैरलागू आहे. कारण पशूंमध्ये आपली जननक्षमता दर्जेदार संततीसाठी वापरण्याचे स्वातंत्र्य मादीला असते. उपलब्ध नरांपैकी सुदृढ वा गुणसंपन्न नर निवडण्याचा अधिकार मादीला निसर्गाने दिलेला आहे. तोच नाकारून मुलीला तिच्या इच्छेविरुद्ध कोणाचीही संतती निर्माण करण्याच्या गुलामीत माणसाने ढकललेले आहे. त्यासाठी तिला अबला ठरवून तिच्या रक्षणाचे अधिकार स्वत:कडे घेऊन पुरूषाने मानवी मादीला मालमत्ता बनवून टाकले आहे. त्याचेच विविध अविष्कार म्हणजे बलात्कार, महिलांवरील अत्याचार, घरगुती हिंसाचार किंवा तशा घटनांनंतरच्या प्रतिक्रीयेतून बघायला मिळत असतात. माजावर म्हणजे जननक्षम नसताना पशूतील मादीवर नर सक्ती वा जबरदस्ती करू शकत नाही, ती फ़क्त माणसात होऊ शकते. कारण आम्ही त्याला प्रणयरंग देऊन स्वप्नाळू कल्पनाविश्वात नेऊन ठेवले आहे. पण त्याच जंजाळात स्त्रियांना कायमचे अदृष्य शृंखलांनी जखडून टाकले आहे. त्या वास्तवाला सामोरे जाण्याची हिंमत जोवर मानवी नरांमध्ये येत नाही, तोवर बलात्काराच्या यातना, वेदना, टाहो जातीधर्माचे बोळे तोंडात कोंबून दडपल्या जाणार आहेत. पुरूषी अहंकारापासून माणुस मुक्त कधी होणार आहे?
भाऊ भारत देशची वाटचाल जनाब दिशेने आहे पहिले पाऊल हाहाहा अशांना नपुंसकतेची शिक्षा दिली पाहिजे आधा नही पुरा कलम होना चाहिए
ReplyDeleteज्या दिवशी जगाला हे उमजेल तो खरा सुदिन !
ReplyDeleteब्राह्मण समाजाला आज ना उद्या हा देश सोडणे भाग आहे नाहीतर अन्य सर्व जाती संगनमताने तसे करायला भाग पडतील नाहीतर ब्राह्मणाची कत्तल करतील
ReplyDeleteभाऊ सत्य कितीही दाबले तरी ते बाहेर येते सत्य मरूशकत नाही
ReplyDeleteApratim lekh...... Ultimately written article new vision provided.....
ReplyDeletemanya pan rohit vemulachya atmahatyela jat kashi ali?
ReplyDeleteकुठल्याही व्यक्ती, संघटना, विचार वा भूमिकेच्या दावणीला ज्यांची बुद्धी बांधलेली आहे; त्यांच्या मानसिक आरोग्याला हा ब्लॉग वाचणे अपायकारक असू शकते.
ReplyDelete