Sunday, July 3, 2016

चला, अण्णांनी मौन सोडले



दिर्घकाळ अण्णा हजारे काय करीत आहेत, तेच ठाऊक नव्हते. पण पुण्यातल्या स्मार्ट सिटी शुभारंभाच्या निमीत्ताने अण्णांनी आपले मौन सोडले आणि जणू अण्णा अज्ञातवासातून पुन्हा बाहेर पडले. तसे अण्णा अगदीच गप्प नव्हते. अधूनमधून त्यांनी आपल्या भ्रष्टाचार निर्मूलन समित्यांच्या नेमणुका वा बैठका चालू ठेवल्या होत्या. पण माध्यमांना त्यात काहीच खळबळ माजवण्यासारखे मिळत नसल्याने अण्णांविषयी माध्यमे गप्प होती. अखेरीस अण्णांना आपल्या नव्या शिष्याचे अनुकरण करावे लागले म्हणायचे. आपल्याकडे माध्यमांचे लक्ष वेधून घ्यायचे असेल, तर मोदींना टोचून बोलायचे हा आजच्या प्रसिद्धीचा निकष झाला आहे. म्हणून असेल, अण्णाही त्याच मार्गावर आले आणि त्यांनी शरद पवारांना शोभावे असे चमत्कारीक विधान केलेले आहे. गांधी मानायचे की मोदी मानायचे, असा सवाल त्यांनी विचारला आहे. गांधीजींनी शहरातून खेड्याकडे चला असा संदेश मागल्या शतकाच्या पुर्वार्धात दिलेला होता. आजचे पंतप्रधान स्मार्ट सिटी उभ्या करून शहरीकरणाला प्राधान्य देतात, असा फ़रक अण्णांनी शोधून काढला आहे. अर्थात यापुर्वी ६८ वर्षे देशाला स्वतंत्र होऊन झाली आणि त्या कालखंडात लक्षावधी लोक शहरी जीवन सोडून खेड्यापाड्यात वास्तव्य करायला गेले असावे. गांधींजींच्या शब्दाची बुज राखून आजवरच्या सरकारांनी शहरांना दुय्यम स्थान देऊन ग्रामीण विकासाला प्राधान्य दिलेले असावे. म्हणूनच आजवर अण्णांना शहरीकरणाच्या समस्येची आठवण झालेली नसावी. अन्यथा त्यांनी लोकपाल आंदोलनाच्याही आधी शहरीकरणाच्या विरोधात हत्यार उपसलेच असते. पण तसे काही घडल्याचा अनुभव नाही. फ़ार कशाला? गेल्या दोनतीन दशकात अण्णांची किर्ती जगभर पसरली, त्या काळात अण्णांनी एकदाही कधी वाढते शहरीकरण वा दुर्दशा झालेली ग्रामव्यवस्था, याविषयी मतप्रदर्शन केलेच असते ना?

अण्णांनी त्यासाठी पंतप्रधानांना एक खरमरीत पत्र लिहीले आहे. अर्थात असे पहिल्यांदाच घडलेले नाही. अण्णांना राळेगण सिद्धीमध्ये बसून नामवंत प्रभावशाली लोकांना पत्रे लिहीण्याचा दांडगा छंद आहे. यापुर्वी त्यांनी मनमोहन सिंग यांनाही पंतप्रधान असताना खुप पत्रे लिहीली होती. त्याची उत्तरे किंवा पोचपावती सिंग अगत्याने देत असत. म्हणजे तसे अण्णांनीच म्हटल्यामुळे समजते. मात्र सत्तांतर झाले आणि अण्णांच्या पत्रांना नवे पंतप्रधान कार्यालय साधी पोचपावतीही देत नाही, असे अण्णांच्याच बोलण्यातून स्पष्ट झालेले आहे. मात्र अण्णांच्या अशा पत्राला माध्यमे अगत्याने प्रसिद्धी देतात. त्यामुळे आपल्याला बातमी कळते. किंबहूना पंतप्रधान मोदी वा अन्य कुणा मोठ्या सत्ताधार्‍याने वाचावे म्हणून असे पत्र अण्णा लिहीतही नसावेत. त्यांच्या नावाने पत्र पाठवून सामान्य माणसाला वाचकाला जागृत करावे, असा त्यामागचा सदहेतू असावा. नुसतेच अण्णा असे काही बोलले, तर कोणी वाचणार नाही. पण पंतप्रधानाल खरमरीत पत्र लिहीले म्हटल्यावर लोकांचे लक्ष तिकडे जाणारच ना? म्हणून असेल, अण्णांनी पंतप्रधानांना पत्र लिहीले आणि स्मार्ट सिटीमुळे पर्यावरणाचा नाश होत असल्याकडे जनतेचे लक्ष वेधलेले असावे. मोदी मानावे की गांधी मानावे, असा प्रश्न अण्णांना कशाला पडला असेल, ते समजत नाही. कारण अण्णा हे गांधीवादी आहेत, तेव्हा त्यांनी कोणाला मानायचे ते आधीच ठरलेले आहे. मग असा सवाल करण्याचे कारणच काय? मोदींची धोरणे व भूमिका पटली तर उद्यापासून अण्णा मोदीवादी होणार आहेत काय? नसेल, तर कोणाला मानायचे हा संभ्रम कशासाठी? गांधी हा विचार आहे आणि त्यांच्या ठराविक भूमिका व कल्पना विसाव्या शतकाच्या पुर्वार्धातील परिस्थितीवर आधारलेल्या आहेत. एकविसाव्या शतकात कोणती स्थिती व समस्या असतील, याची जाण महात्म्याला त्या काळात असेल काय?

एक गोष्ट स्पष्ट आहे. मोदींनी कितीही मोठा राजकीय विजय मिळवला असला व लोकप्रियता संपादन केलेली असली; तरी त्यांची तुलना याक्षणी तरी गांधीजींशी होऊ शकत नाही. गांधी्जींचे सर्व विचार पटोत किंवा त्यांच्याही मतभेद असोत, त्यांचा प्रभाव दिर्घकाळ एका मोठ्या लोकसंख्येवर राहिला आहे. त्यामुळेच त्यांना मानणे व मोदींना मानणे यात जमिन अस्मानाचा फ़रक आहे. कारण आता कुठे मोदींची वाटचाल सुरू झाली आहे आणि त्यांच्या काम व निर्णयाचे परिणाम जगाला अनुभवायचे आहेत. त्यामुळे मोदींची गांधींशी कुठलीही तुलना होऊ शकत नाही. गांधींनी त्यांच्या जमान्याला सुसंगत असे काही विचार व भूमिका मांडलेल्या होत्या आणि आज मोदी आपल्या युगाशी सुसंगत कार्यक्रम योजत आहेत. दोन्हीकडे डोळसपणे बघण्याची गरज आहे. ते बघता आले तर त्यापैकी कोणाला मानावे किंवा कशासाठी मानू नये, त्याचा खुलासा आपोआप होऊ शकेल. गांधीजींना एकदा ठक्करबाप्पा नावाचे नेते विचारते झाले, तुमच्या नंतर आम्ही कशाच्या आधारावर निर्णय घेऊ शकणार आहोत? तर बापू हसून उत्तरले, त्यात काही मोठे नाही. आपण घेतलेला निर्णय वा योजनेचा सर्वात तळातल्या व्यक्तीवर काय परिणाम संभवतो, त्याचा विचार करावा. आपल्या धोरणामुळे त्या सर्वात वंचित दुबळ्या समाजघटकाला त्रास होणार असेल, तर सावध असावे. गांधीवाद यामुळेच अतिशय सोपा झाला आणि त्याची सामान्यांना भुरळ पडली होती. गांधीवादी जितका गुंतागुंतीचा करून गांधीविचार बोजड करतात, तितका तो गुढ नाही. म्हणून तर गांधीवादी म्हणवणा‍र्‍यांना अशा संभ्रमाने पछाडलेले असते. मोदी की गांधी असा त्यांना प्रश्न पडतो. हाच प्रश्न महात्म्याला पडला असता, तर स्वातंत्र्याच्या चळवळीचे काय झाले असते? पण गांधींना प्रसंगाचे व काळाचे भान होते. म्हणून ते असे संभ्रमित झाले नाहीत.

गांधीवादी असलेल्या अण्णांनी जरा आपल्याच पठडीतून निघालेल्या केजरीवाल नावाच्या समस्येकडे बघावे. अण्णांच्या गांधी टोपीचा वापर करून सराईत राजकारण्यापेक्षा बनेलगिरी करण्याचा उच्चांक केजरीवाल यांनी गाठला आहे. आमदारांचे पगारभत्ते पाचपट वाढवण्यापासून मंत्रीपदाचा दर्जा ३० टक्के आमदारांना देण्यापर्यंत मस्तवालपणा केजरीवाल करून बसले आहेत. त्यांच्या डझनभर आमदारांवर कुठले ना कुठले गुन्हे दाखल झाले आहेत. पण अण्णांनी एकदाही केजरीवाल यांना त्याविषयी पत्र लिहीले अशी बातमी कुठे वाचनात आली नाही. तीन वर्षापुर्वी नेमका असाच सवाल केजरीवाल आणि अण्णांच्या अनेक लोकपाल सहकार्‍यांना पडलेला होता. अण्णांना मानायचे की केजरीवालची कास धरायची, असा प्रश्न आला. तेव्हा बहुतांश लोकपाल पुरस्कर्ते केजरीवाल यांच्या मागून निघून गेले. त्यातले जे काही दोनचार गांधीवादाचा आग्रह धरत राहिले, त्या योगेंद्र यादव, प्रशांत भूषण यांना केजरीवालांनी गचांडी धरून बाहेर हाकलले. लोकपाल आंदोलनातून आपण काय साध्य करतोय, याचा अण्णांनी विचार केला होता काय? त्यातून कुठली भुतावळ भारतीय समाजात धुमाकुळ घालू लागेल, याची चिंता तेव्हा कोणी करायला हवी होती? कुठल्याही क्षणी राजधानी दिल्लीत धिंगाणा घालू शकेल, अशी झुंड बलवान करून अण्णा राळेगण सिद्धीला परतले. आज त्याचे परिणाम दिल्लीकर भोगत आहेत. त्याविषयी अण्णा मौन धारण करून राहिलेत. नरेंद्र मोदींची गोष्ट सोडून द्या. अण्णांनी त्यांच्या राजकीय यशासाठी काही केलेले नाही. पण केजरीवाल यांना प्रतिष्ठाप्राप्त नेता बनवण्यात अण्णांचे मोठेच योगदान आहे. त्यांना एकदाही कुठला सवाल अण्णांनी केला नाही, की खरमरीत पत्र पाठवल्याचे ऐकीवात नाही. स्मार्ट सिटीचे परिणाम दिसायला अजून खुप अवघी आहे. पण आपल्या स्मार्ट अनुयायाने दिल्लीचे पर्यावरण विनाशाकडे चालविले आहे त्याचे काय?

6 comments:

  1. "गांधीवाद जितका गुंतागुंतीचा————तितका गूढ नाही." सत्य आहे.

    ReplyDelete
  2. भाऊ अण्णा हे एका राजकीय पक्षाचे एजंट आहेत असे वाटते (भारतीय गांधी पक्ष)

    ReplyDelete
  3. शहरीकरण समस्या आहे हे बहूतेक अण्णांच्या लक्षात आले नाही. .त्यामुळे त्यांना असे प्रश्न पडले आहेत. अण्णा केजरीवाल यांना जागेवर आणण्यासाठी काय करणार हे पहायला हवे. . नाही तर अण्णांनी चांगल्या शिष्याच्या शोधात खेड्याकडे फीरले पाहिजे. ..

    ReplyDelete
  4. आण्णा हजारे यांच्या आंदोलनाचा अभ्यास केला तर तुमच्या लक्षात येईल की आण्णा नी जास्तीत जास्त आंदोलने काँग्रेसइतर सरकार विरोधात / मंत्र्याच्या विरोधात केली. मी त्यांना जुन 2010 मध्ये ई मेल व पत्रा द्वारे आवाहन केले होते की त्यांनी काँग्रेस सरकार विरोधात/ मंत्र्याचा विरोधात एकदा तरी आंदोलन करुन दाखवावे. आणि त्यावेळी अनेक सामान्य माणसांना ते आर्ध शतकातिल एक युगपुरुष वाटत होते. (परंतु ते (आण्णा) एक दशकानु दशके राज्य करणाऱ्या पक्षाचे व त्या पुरस्कृत मिडिया चे पेरलेले एक हस्तक / गांधीजी सारखे रोल माॅडेल तयार केले होते/ आहे ) त्यांच्या भ्रष्टाचारा विरोधात केलेल्या आंदोलनाला एखाद्या चित्रपटा प्रमाणे युपीए पुरस्कृत मिडिया ने एक सेट ऊभा केला त्यामुळे जनमानसाचा उस्फूर्त प्रतीसाद मिळाला व युपीए काळात केलेल्या भ्रष्टाचाराला जणु वाचा फुटल्याचे ( जनतेच्या उग्र भावनांना वाचा फुटली असा देखावा तयार केला गेला) हा एक काँग्रेस ने खेळलेला डाव होता त्यात अनेक राजकीय मुस्सद्दी / विश्लेषक वाहवत गेले व खरेखुरे आंनलोन आसल्या प्रमाणे त्यावर स्तुती सुमने वाहू लागले. परंतु आंदोलन अतीउच्च शिखरावर असताना आण्णांनी पुढील 5 राज्यातील निवडणूकीत काँग्रेसच्या विरोधात प्रचार करीन अशी आवइ उठवली. पण प्रत्यक्षात आण्णा मोक्याच्या वेळी आजारी पडले. त्याच दरम्यान बाबा रामदेव यांच्या आंदोलनावर लाठ्ठी ह्रल्ला सरकारी आदेशानुसार झाला व फ्लोप ठरवले गेले परंतु आण्णांचे आंदोलन कुठे विरघळले हे जनतेला समजलेच नाही. हे एक त्रिधारी अस्त्र होते.
    आण्णा आंदोलन हे एका बाजूने जनतेच्या भ्रष्टाचारा विरोधत भावनांना वाट करून देण्यासाठी प्लॅन होता. दुसऱ्या बाजूने केजरीवाल सारखे राष्ट्रीय नेतृत्व तयार करणे म्हणजे मतांचे ध्रुवीकरण होउन भाजपची मते खाइल व युपीए ला नेहमी प्रमाणे सत्ता स्थापन करुन परत भ्रष्टाचार शेयर करुन सत्ता उपभोगता येइल.
    याचे भांडे प्रथम फुटले आण्णांनी केलेल्या चार दिवसाच्या उपोषणाला प्रतिसाद म्हणून युपीएने 2014 मध्ये लगेचच पास केलेल्या लोकपाल बिलावरुन आला. मी यावर अनेक मिडिया पंडितांना त्यावेळी लिहले. दुसरे बिंग सामान्य माणसात फुटले ते केजरीवाल जे भ्रष्टाचाराच्या आंदोलनातुन निर्माण केले गेले ते मोदींन सारख्या एकही भ्रष्टाचाराचा आरोप नसलेल्या उमेदवारा समोर उभे राहिले. आणि तिथेच मोदींनी आर्धी लढाई जनसामान्यात जिंकली.
    परंतु जनता चाणाक्ष आहे तिने महागाई, भ्रष्टाचार अल्प संख्याकांचे लंगुचालन यातुन अनेक दशके हवा असलेला भक्कम पर्याय म्हणून मोदींना बहुमताने निवडून दिले
    यातुन आण्णा चे अस्त्र परत काँग्रेसच्या ताब्यात राहिले.
    आण्णा, अमिर खान, शोभा डे, मेघा पाटकर, तिस्ता सेटेलवार, व मिडिया अशी एकापेक्षा एक सरस अस्रे असताना देखील मोदींना लोकसभेत विजय मिळाला हे म्हणुनच आजुन ही काँग्रेस व मिडिया ला व पुरोगामी ना पटत नाही.
    .अमुल

    ReplyDelete