मध्यंतरी आपल्या कारकिर्दीला दोन वर्षे पुर्ण झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पत्रकार परिषद घेतली नाही वा कुणाला मुलाखत दिली नाही. म्हणून त्यांच्यावर टिका झाली होती. अखेरीस त्यांनी एकट्या अर्णब गोस्वामीला मुलाखत दिली. ‘टाईम्स नाऊ’ सध्या देशात सर्वात लोकप्रिय असल्याचा दावा केला जातो. मग अशी मुलाखत देण्यापेक्षा मोदींनी खुली पत्रकार परिषद घेऊन ‘आमच्या पत्रकारांच्या’ सरबत्तीला तोंड देण्याची हिंमत दाखवावी, असे आव्हान हसरे कॉग्रेस प्रवक्ते कपील सिब्बल यांनी दिले होते. हे त्यांचे आपले खास ‘कॉग्रेसी पत्रकार’ कोण, त्याचे उत्तर लौकरच मिळाले. मंगळवारी मोदी सरकारचा विस्तार होणार ही आधीच ठाऊक असलेली बातमी होती. सकाळपासून प्रत्येक वाहिनीवर नव्या मंत्र्यांचा परिचय सांगितला जात होता. पण नऊच्या सुमाराला ‘इंडियाटूडे’ वाहिनीवर प्रियंका गांधींचे कौतुक चालू होते. कपिल सिब्बल ज्यांना ‘आमचे पत्रकार’ संबोधतात, त्यापैकी राजदीप सरदेसाईने खास ब्रेकिंग न्युज दिलेली होती. प्रियंका गांधी उत्तरप्रदेशच्या विधानसभा निवडणूकीतून राजकारणात प्रवेश करणार, अशी ती बातमी होती. अर्थातच ती फ़क्त त्याच वाहिनीवर प्रथम प्रक्षेपित होत असल्याचा राजदीपचा दावा होता. पण राजदीप एक गोष्ट साफ़ विसरला, की तोच एकटा कॉग्रेसचा ‘आपला पत्रकार’ नाही. त्याचीच जुनी सहकारी आणि एनडीटीव्हीची सल्लागार संपादक बरखा दत्तही कॉग्रेसची ‘आपली पत्रकार’ आहे. त्यामुळे तीच प्रियंकाची बातमी त्याचवेळी तिच्याही वाहिनीवर चघळली जात होती. बाकी कोणी वाहिन्या त्याकडे ढुंकूनही बघायला राजी नव्हत्या. मग थोड्याच वेळात राष्ट्रपती भवनात शपथविधी सुरू झाला आणि प्रियंकाचा नाद सोडून बरखा व राजदीपलाही शपथविधीकडे वळावे लागले. पण तिथे सर्व खळबळजनक पत्रकारांचा विरस झाला. कारण कुठलाही मोठा धक्कादायक निर्णय मोदींनी घेतला नव्हता आणि एकट्या जावडेकरांना बढती देऊन नव्या १९ मंत्र्यांना आपल्या सत्तेत सहभागी करून घेतले होते. सहाजिकच दुपारपासून बहुतेक पत्रकार प्रियंकाच्या बातमीकडे झुकले.
मंत्रिमंडळ विस्ताराची बातमी चालू रहिली. पण हा विस्तार चांगल्या कारभारापेक्षा केवळ उत्तरप्रदेश विधानसभा डोळ्यापुढे ठेवून करण्यात आल्याचा निष्कर्ष बहुतेकांनी काढला होता. मग त्याला धरूनच त्या राज्यात कशा लढती होतील आणि तिथे कॉग्रेसचा हुकूमाचा पत्ता म्हणून प्रियंका गांधी वाड्रा कसा चमत्कार घडवू शकतील; याचा उहापोह सुरू झाला होता. बाकी नव्या मंत्र्यांना कोणती खाती दिली जातील याची कोणालाच फ़िकीर नव्हती. ते काम पंतप्रधानांनी मागे ठेवले होते आणि त्याचा जाहिर उच्चार झाल्याशिवाय त्याबद्दल बोलण्यात काही अर्थ नव्हता. कारण आदल्या दिवसापर्यंत पियुष गोयल वा धर्मेंद्र प्रधान अशा अनेकांना पत्रकारांनी मोदींना बाजूला ठेवून बढती देऊन टाकलेली होती आणि मोदींनी त्यांना शपथविधीतून खोटे पाडलेले होते. जावडेकर या एकाच मंत्र्याला बढती मिळाली आणि त्यांचे नाव कुठल्याही पत्रकाराला सुचलेलेही नव्हते. हा मंत्रिमंडळ विस्तारातला मोठा धक्का होता. त्यातून धडा शिकलेले खातेवाटपाविषयी काही भाकित करायला धजावत नव्हते. संध्याकाळी खातेवाटप होईपर्यंत मग प्रियंकाचा अध्याय सुरू राहिला आणि रात्री प्राईंम टाईम चर्चाही त्याचभोवती घोटाळत होत्या. इतक्यात पंतप्रधानांनी माध्यमांचे लक्ष विचलीत केले. किंबहूना ठराविक हौशी उतावळ्या पत्रकारांना हवी असलेली बातमी देऊन टाकली. खातेवाटपात मोदींनी मोठाच फ़ेरफ़ार करून टाकला. त्यात मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांना बाजूला करून त्यांचे खाते प्रकाश जावडेकर या नव्या ज्येष्ठ मंत्र्याला सोपवण्यात आले. तर वस्त्रोद्योग हे नगण्य खाते स्मृतीला देण्यात आले. मग काय एकामागून एक पत्रकार जोशात आले आणि स्मृतीची यथेच्छ निंदानालस्ती सुरू झाली. आपण कशी स्मृतीला राजकारणात योग्य पायरीवर आणून बसवली, त्यासाठी प्रत्येकजण आपापली पाठ थोपटून घ्यायला लागला, तर नवल नव्हते.
रोहित वेमुला किंवा नेहरू विद्यापीठ अशा प्रकरणानंतर स्मृती विरोधात काहुर माजले असतानाही पंतप्रधान तिच्यामागे ठामपणे उभे राहिले होते. तेव्हा मोदींना मुजोर उर्मट म्हणण्यापर्यंत ज्यांनी मजल मारली होती, तेच मोदींची पाठ थोपटू लागले. शिवाय स्मृतीला आपल्याच टिकाटिप्पणीने खाते गमवावे लागले, अशी प्रत्येकाची ठाम खात्री आहे. किंबहूना तेच समाधान त्यांना मिळणार हे मोदींनाही कळत होते. इतके समाधान मोदी आपल्याला कशाला देऊ इच्छितात, असा सवाल पत्रकार वा मोदींच्या विरोधकांनी म्हणूनच स्वत:ला विचारण्याची गरज आहे. पण झिंग चढलेली असली, मग कोणाला विचार व तारतम्य सुचते? प्रत्येकजण आपापले विजय साजरे करण्यात गर्क झाला आणि त्यात सर्वांनाच प्रियंका उत्तरप्रदेशच्या राजकारणात चमत्कार घडवणार असल्याच्या आपल्याच्या ब्रेकिंग न्युजचा विसर पडला. स्मृतीचे नाक कापले गेल्याचा आनंद इतका अफ़ाट होता, की प्रियंकाचा राजकारण प्रवेश विस्मृतीत गेला. त्याचे स्मरण होण्यासाठी बुधवार उजाडावा लागला. पण अजून कोणाला आपल्याच लाडक्या मंत्र्याला मोदींनी दुय्यम खात्यात कशाला हलवले असेल, त्याचा शोध घेण्याची गरज वाटलेली नाही. किंबहूना ईदनंतर कॉग्रेस प्रियंकाच्या राजकारण प्रवेशाची घोषणा करणार, त्याच मुहूर्तावर मोदींनी स्मृतीला दुय्यम खात्यात ढकलण्याचा संबंध शोधावा असे कोणाला वाटलेले नाही. पत्रकारिता किती भरकटली आहे त्याचा हा नमूना आहे. अमेठीत भावासाठी प्रियंका तळ ठोकून होती आणि अवघा महिनाभर आधी स्मृती तिथे उमे़दवार म्हणून जाऊन थडकली होती. पण तेवढ्या अल्पावधीत या महिलेले प्रचाराची अशी रणधुमाळी उडवली, की आपल्याच बालेकिल्ल्यात राहुलसाठी सोनिया व प्रियंका यांना शेवटचे दोन दिवस ठाण मांडून बसावे लागलेले होते. तरीही राहुल गांधी यांना आपले पिढीजात मताधिक्य तिथे गमवावे लागले होते.
स्मृती इराणी मंत्री म्हणून किती कार्यक्षम आहे, त्यावर वाद होऊ शकतो. पण राजकीय प्रचाराच्या आखाड्यात ही महिला थेट प्रतिस्पर्ध्याला जाऊन भिडणारी आहे, यात शंका घ्यायचे कारण नाही. म्हणूनच राहुल विरोधात अमेठीत उभे रहाण्याचे धाडस तिने केले होते आणि गांधी खानदानाला शिंगावर घेण्यापर्यंत मजल मारलेली होती. आपल्या पिढीजात बालेकिल्ल्यात प्रियंकाला स्मृतीशी दोन हात करताना नाकी दम आलेला होता. अशी स्मृती इराणी मंत्रिमंडळात असण्यापेक्षा आगामी विधानसभांच्या आखाड्यात लाभदायक असेल, तर कोणाचा लाभ होऊ शकतो? बाकीच्या गोष्टी बाजूला ठेवा. मंगळवारी रात्री स्मृतीकडून मनुष्यबळ विकास खाते काढून घेतले, इतक्या बातमीनेच प्रियंकाच्या राजकारण प्रवेशाची हवा काढून घेतली. याचा अर्थ इतकाच, की उत्तरप्रदेश विधानसभेच्या प्रचारात वादग्रस्त होऊन वा वादळ उभे करून प्रियंकाला शह देण्यासाठी स्मृती इतका कोणी खंदा शिलेदार भाजपापाशी असू शकत नाही. मुलायम वा मायावतीही प्रियंका-सोनियांना जितक्या भिडू शकणार नाहीत, अशी झुंज देण्याची क्षमता स्मृतीपाशी आहे. मग तिला त्या आखाड्यात उतरवायचे असेल, तर तिच्यावरला प्रशासकीय बोजा कमी करायला हवा ना? पण तोच बोजा स्मृतीकडून काढून घेतला, तर बहुतांश विरोधक व पत्रकारही खुश होणार. त्यातले कॉग्रेसचे खास ‘आपले पत्रकार’ मोदींची पाठही थोपटणार. म्हणजे दुहेरी लाभ नाही काय? मोदींनी मंगळवारी संध्याकाळी उशिरा नेमकी तीच संधी खातेपालटातून साधली. गुजरात दंगली आणि चकमकीतून माध्यमांचे लक्ष्य झालेल्या अमित शहांना लोकसभेपुर्वी उत्तरप्रदेश भाजपाचे प्रभारी करण्यात आल्यावर किती गदारोळ झाला होता ना? स्मृतीच्या खातेपालटाने त्यापेक्षा काय वेगळे झाले आहे? कोणी कॉग्रेसचे खास ‘आपले पत्रकार’ असायला हरकत नाही. पण थोडा वेळ नुसते पत्रकार म्हणूनही विचार करायला काय हरकत आहे?
दिग्विजय सिंह बोलतील कांग्रेस करता टंच माल प्रचार करणार
ReplyDeleteभाऊ ज्या अँगलने तुम्ही हा विषय पाहू शकलात त्याबद्दल हॅट्स ऑफ !
ReplyDeleteवाह वा सुरेख
ReplyDeleteUltimately right presentation......
ReplyDeleteह्याची दुसरी बाजू:
ReplyDeletehttps://in.news.yahoo.com/lesson-smriti-smriti-irani-lost-000754380.html
भाऊ, मधे ट्विटरवर Dear संबोधल्याचा बाईंनी मोठा इश्यू केला. महिलांना Dear so and so असं संबोधणं इंग्लिशमधे वाह्यात मानत नाहीत. परत जे काही प्रश्न विचारले गेले होते त्यांची बाईंनी शेवटपर्यंत उत्तरंच दिली नाहीत. त्या प्रकरणानंतर भांडण उकरून काढणार्या अशी त्यांची प्रतिमा झाल्यास नवल नाही. त्यानंतर काही दिवसातच खातं काढून घेतल्याची बातमी आली. ती वाचून आश्चर्य वाटलं नाही.
ReplyDelete